सोनीमॅक्स म्हणा किंवा इतर कुठलेही सिनेमांचे चॅनेल्स म्हणा. वर्षाच्या, दिवसाच्या कुठल्याही एका वेळेस त्यांच्यावर
"जय लव कुश : द पाॅवर ऑफ थ्री",
"खतरनाक खिलाडी"
"डॅशिंग सी एम: भारत"
"वेदलम "
किंवा तत्सम डब्ड (या शब्दातला शेवटला "ड" हा उर्वरित भारताप्रमाणे हलन्त उच्चारावा. सोलापूर जिल्ह्यातल्या उच्चारांप्रमाणे पूर्ण उच्चारलात तर भलता अर्थ निघेल हो.) सिनेमे सुरूच असतात.
365 x 24 x 7. दळण सुरूच.
यातल्या काहीकाही सिनेमांचा आणि फक्त जाहिराती दाखवणार्या चॅनेल्सचा माझ्या मनात फार गोंधळ होतो हो. एकदा असेच चॅनेल्स पुढे पुढे ढकलताना खाली चॅनेलच्या नावांमध्ये अचानक "सेट ऑफ थ्री" म्हणून वाचले. "अरे वा, हा एक नवीन सिनेमा कसा आहे ? म्हणून बघू तरी." असे मनाशीच बोलत ते चॅनेल लावले तर ती सेट ऑफ थ्री बेडशीटस आणि पोळ्या ठेवण्याच्या भांड्यांची (कॅसरोल्स) जाहिरात होती. नामसाधर्म्यामुळे इकडे आम्ही गंडलो ना.
बाकी ही पोळ्या ठेवण्याची भांडी आणि बेडशीटसची एकत्र जाहिरात करणार्या माणसाला पुण्यातल्या तुळशीबागेतल्या "आमचे येथे उत्तम दर्जाची काजू कतली आणि परकर मिळतील." या दुकानातून प्रेरणा मिळालेली असणार. अरे कुठल्या दोन गोष्टींची एकत्र जाहिरात करायची याचा काही विवेक ?
आता त्या बेडशीटस जुन्या काळच्या ढाक्याच्या मलमलीसारख्या (ढाक्याची मलमली साडी म्हणे काडेपेटीत वगैरे मावायची. खरेखोटे मुजीबुर आणि त्याची प्रजाच जाणे.) त्या पोळ्यांच्या भांड्यात ठेवायच्या आहेत ? की त्या बेडशीटसवर बसून त्या पोळ्यांच्या भांड्यातून पोळ्या खायच्यायत ? काही तरी तार्किक मेळ ?
यांच्या या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर म्हणून
कलाईग्नार, जया, सन टीव्ही वर,
"मला घेऊन चला, पळवापळवी, अण्टीने वाजवली घंटी, हळद रूसली कुंकू हसल" आणि असलेच मराठीत मैलाचा दगड ठरणारे (यातला 'दगड' येवढाच शब्द खरा) सिनेमे डब करून सतत दाखवावेत असा अंमळ दुष्ट विचार माझ्या मनात नेहमी येतो.
जशास तसे वागायला आम्ही मराठी मंडळी कधी शिकणार , कुणास ठाऊक ?
No comments:
Post a Comment