Monday, October 12, 2020

टपाल दिवस आणि टपाल एस टी च्या आठवणी.

 कालच्या जागतिक टपाल दिवसावरून आठवले. पूर्वी एस टी ची "टपाल सेवा" बस असायची. टपालाच्या सील केलेल्या थैल्या आणि स्थानिक वर्तमानपत्रांचे गठ्ठे त्या गाडीत दाराजवळील सिटांवर ठेवले जायचेत. (पूर्वी एस टी ला मागून दार होते.) आणि उरलेल्या जागेत प्रवासी मंडळींची सोय व्हायची.

या टपाल गाड्या भल्या पहाटे निघत असल्याने आणि टपालासाठी खूप थांबे घेत असल्याने प्रवासी मंडळी तशी कमीच असायचीत.
नागपूर - चंद्रपूर ही पहाटे ३.४० ला निघणारी आणि सकाळी ७.३० ला चंद्रपूरला पोहोचणारी अशीच एक गाडी. चंद्रपूरला आजोळी तरूण भारत यायचा तो याच गाडीने. नागपूरला सकाळी सकाळी ६.०० वाजेपर्यंत वाचायला मिळणारे वर्तमानपत्र, सुटीत आजोळी गेल्यानंतर आम्हाला सकाळी ९.०० च्या सुमारास वाचायला मिळत असे. मोठी मौज वाटे. चंद्रपूरवरून निघणारे "महाविदर्भ" दैनिक मात्र तिथे सकाळी लवकर येई. पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होता. तरूण भारताच्या आणि त्याच्या दर्जात खूप फरक असायचा.
त्या गाडीपाठोपाठ निघणारी, पहाटे ३.४५ ची, नागपूर - उमरखेड (मार्गे वर्धा - यवतमाळ - आर्णी - धनोडा - माहूर - धनोडा - महागाव - उमरखेड) ही सुध्दा टपाल गाडीच होती. पार माहूर पर्यंत नागपूरची वर्तमानपत्रे पोहोचवायची. पण माहूरला नागपूरची वर्तमानपत्रे हातात यायला सकाळचे १०.३० तरी नक्की वाजत असणार.
१९९४ मधे धामणगावला नोकरी करत असताना दसरा साजरा करण्याच्या निमित्ताने मी घरी नागपूरला आलो होतो. धामणगाव हे रस्तामार्गाने जाण्याच्या बाबतीत अतिशय दुष्कर. नागपूरवरून पावणेदोन ते दोन तासात सगळ्या रेल्वेगाड्या तिथे पोहोचवत पण बसने यवतमाळ किंवा अमरावती मार्गे जवळपास चार साडेचार तासांचा फेरा घेऊन जावे लागे. पण दसर्याच्या धम्मचक्रदिनाच्या गर्दीत रेल्वेत शिरकाव सुध्दा अगदी कठीण होता.
नागपूरला येताना तर खंडेनवमीच्या दिवशी महाविद्यालयीन मशीन्स वगैरे शस्त्रपूजनाचे कामकाज आटोपून निवांत अमरावतीमार्गे आलो. पण दसर्याच्या दुसर्या दिवशी सकाळी ९.३० चे महाविद्यालय गाठणे हे जिकीरीचे काम होते. महाविद्यालयात मुलांच्या परीक्षा सुरू असल्याने सुटी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. परतताना गाड्यांमधे पुन्हा तौबा गर्दी असल्याने रेल्वे मार्गाने जाणे दुरापास्त होते.
राहता राहिला रस्ता मार्ग. पण नागपूरवरून अमरावतीला जाणारी पहिली बस नागपूरवरून ५.१५ ला होती. नागपूर - इंदूर. ही बस केव्हातरी ९.०० वाजता अमरावती गाठणार (१९९४ चा नागपूर - अमरावती रस्ता. आज हा प्रवास एस टी ही पावणेतीनतासात करते. पण तेव्हा पावणेचार ते चार तास लागायचेत.) आणि तिथून एक ते दीड तास धामणगाव. हा पर्याय शक्य नव्हता.
मग या टपाल बसची आठवण झाली. पहाटे तीर्थरूप दादांनी बसस्टॅण्डवर सोडून दिले. या ३.४५ च्या टपाल गाडीने आमच्या देहाचेही टपाल निघाले. तुरळक पॅसेंजर्स. थंडी म्हणजे मी म्हणणारी.
सकाळी ७.३० ला यवतमाळला उतरलो. बाजूच्याच फलाटावरून यवतमाळ - धामणगाव ही जनता सेवेची बस पकडली. ८.४५ पर्यंत धामणगावात हजर.



त्या दिवशी मी माझे महाविद्यालय वेळेत गाठू शकलो ते केवळ या टपाल बसमुळे.
पुल म्हणतात "टपाल हा शब्द वरपांगी खेळकर आहे पण डाक हा भेदक मामला आहे." पण या खेळकर "टपाल" गाडीनेच त्यादिवशी आमच्या नोकरीतील वागणुकीचे गांभीर्य जपले होते.
- शाब्दिक टपल्या मारणारा विद्यार्थी पण डाके एव्हढाच गंभीर मास्तर (पोस्टमास्तर नाही साधाच मास्तर) राम किन्हीकर.

1 comment:

  1. तुम्ही खुप मस्त लिहितात.धन्यावाद Jio Marathi

    ReplyDelete