धृवबाळाचे चरित्र आपण सगळ्यांनीच आपापल्या बालपणी ऐकलेले आहे. उत्तानपाद राजा, त्याच्या दोन राण्या, सुरूचि आणि सुनीती. सुरूचि आवडती तर सुनीती नावडती. आणि मग धृवाचा पित्याच्या मांडीवर बसण्यावरून झालेला अपमान. त्याने वनात जाऊन देवर्षि नारदांच्या उपदेशानुसार केलेली तपश्चर्या आणि भगवंत त्याजवर प्रसन्न होऊन त्यांनी दिलेला वर आणि त्यामुळे धृवाला तारांगणात मिळालेले कायमचे आणि अढळ स्थान.
पण श्रीमदभागवतात याहीपेक्षा अधिक धृवाचे चरित्र आलेले आहे. अवघ्या पाच वर्षांचा बालक अपमान सहन न होऊन वनात जायला निघाल्यावर देवर्षि नारदांनी त्याला पहिला उपदेश हा मान अपमानाच्या पुढे जाण्या-या अशा वैराग्याचा केलेला आहे. श्रीगजाननविजय ग्रंथात गजानन महाराजांनी जसा बाळाभाऊंना "अरे, जन्मे न कोणी, मरे न कोणी" या ओवीत जो वैराग्यपूर्ण उपदेश केलेला आहे, तसाच. पण तरीही धृवबाळाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा भगवत्प्राप्तीसाठी "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्रपठणाचा उपदेश करून देवर्षि नारद तिथून निघून गेलेले आहेत.
धृवबाळाने पाच वर्षे तपश्चर्या करून भगवंतांना सगुण स्वरूपात प्राप्त करून घेतले आणि त्यांच्याकडून "अ च्युती" चा वरही प्राप्त केला पण नंतर त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि देवर्षि नारदांचा पहिलाच उपदेश न ऐकल्याबद्दल पश्चात्ताप झाला. "ज्या भगवंताला अनेक योगी, मुनी, साधक हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतरही प्राप्त करू शकत नाहीत त्याला मी अल्पशा तपाने प्राप्त केले पण त्यानंतर जे मागितले ते कधी ना कधी नष्ट होणारे सुखच मागितले. शाश्वत स्वरूपाच्या त्याच्या पदकमलांशी अतूट नाते मागायला मी विसरलो." अशी धृवाची भावना झाली आणि तो विषण्ण झाला. भागवतकार सांगतात की या आत्मसाक्षात्कारानंतरच धृवाची खरी उन्नती सुरू झाली. तो वैराग्याने वागत राहिला आणि त्या वैराग्यानेच परम पदाला प्राप्त झाला.
परम पूजनीय ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक दृष्टांत आहे. आई घराच्या कामात, व्यापात असली आणि तिचे मूल रडत असले की पहिल्यांदा ती मुला समोर खेळणी वगैरे टाकून त्याला रमविण्याचा प्रयत्न करते. तो जर त्या खेळण्यांमध्ये रमला तर ती पुन्हा आपले घरकाम आणि इतर व्याप सांभाळायला मोकळी होते. पण ते मूल खेळण्यांमध्ये न रमता जर "आईच हवी" म्हणून भोकाड पसरत राहिले तर त्याला कडेवर उचलून घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. तसेच भक्ताचे व्हायला हवे. भगवंत आपल्यामागील उपाधी टाळण्यासाठी भक्तांना या जगतातील अनेक सुखे प्रदान करतो, अनेक भौतिक खेळण्यांमध्ये त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करतो. पण भक्ताने या गोष्टींमध्ये न रमता जर भगवत्प्राप्तीचाच ध्यास घेतला तर भगवंताला आपले सान्निध्य भक्ताला द्यावेच लागते.
म्हणूनच मनाच्या श्लोकांमध्येही समर्थांनी
धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे। कृपा भाकितां दीधली भेटी जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥
असे या भगवत्भक्ताचे वर्णन केलेले आहे.
प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनापेक्षाही मनातील वैराग्यानेच एखादा मनुष्यप्राणी श्रेष्ठपद प्राप्त करू शकतो या शिकवणुकीसाठी हे धृवचरित्र श्रीमदभगवतात आलेले आहे. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीद खरे करणारा श्रेष्ठ भागवत धृवबाळ.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध तृतीया, १९/१०/२०२०)
या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)
आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.
तुझेच देणे तुलाच अर्पण.
No comments:
Post a Comment