नुकतीच बातमी आली की भारतीय रेल्वे ने बहुतांशी गाड्यांचे स्लीप कोचेस (परिशिष्ट १) रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. आणि माझ्यासारखे अनेक रेल्वे फ़ॅन्स हळहळले. या निर्णयामुळे थेट प्रवास करणा-या लोकांची गैरसोय होणार आणि त्यांची दगदग वाढणार हे उघड आहे. या स्लीप कोचेसशी माझी एक रोमॅंटिक आठवण निगडीत आहे म्हणूनही मला थोड हळहळायला झाले आणि आपसूकच मी भूतकाळात गेलो.
आमचे लग्न ठरले फ़ेब्रुवारी महिन्यात, साखरपुडा झाला तो मार्च महिन्यात आणि लग्नाची तारीख निघाली चक्क डिसेंबर मध्ये. अर्थात हा काळ आम्हा उभयतांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता हे सांगणे न लगे. मधला काळ आम्हाला एकमेकांना भेटायला, जीवनाविषयी बोलायला, एकमेकांना समजून घ्यायला मिळाला.
इ.स. २००० चा जुलै महिना. माझा वाढदिवस नागपूरला साजरा झाला होता. वाढदिवस आणि गुरूपौर्णिमा (दोन्ही एकाच दिवशी असतात.) साजरी करायला मी सुटी घेऊन नागपूरला आलेलो होतो. सौ वैभवी पण चंद्रपूरवरून नागपूरला आलेली होती. गुरूमहाराजांकडला कार्यक्रम आटोपून ती परत चंद्रपूरला गेली. मी सुद्धा मुंबईला कामावर परतलो. लगेचच ४ ऑगस्टला तिचा वाढदिवस होता. तिला न कळत तिला धक्का देण्याचा मी गुप्त बेत आखला आणि तसे नियोजन केले.
३/८/२०००. ठाण्यावरून दुपारी ३.४५ ला सुटणा-या सेवाग्राम एक्सप्रेसच्या दादर - चंद्रपूर स्लीप कोचेसमध्ये मी बसलेलो होतो. तेव्हा मोबाईल फ़ोन्सचे एव्हढे प्रस्थ नव्हते. (बरे झाले. कारण चुकूनही मधल्या काळात कुठूनही मला फ़ोन आला असता, तर गाडीच्या आवाजात बिंग फ़ुटले असते.) आदल्याच दिवशी संध्याकाळी, मुंबईच्या आमच्या घराजवळील टेलीफ़ोन बूथमधून मी वैभवीशी बोललेलो होतो. वाढदिवसाला सकाळी शुभेच्छा देईन वगैरे सांगून तिचा निरोप घेतला होता. (तेव्हा रोज रोज फ़ोन करणे परवडतही नसे. कुणाला हे वाक्य जरा अनरोमॅंटीक वाटेलही पण रात्री ९ नंतरही १० रूपये प्रतिमिनीट दर देऊन तीन मिनीटांतच बोलणे आटोपावे लागे. बूथबाहेर भली मोठी रांग आणि त्यातल्या सगळ्यांचे आपल्यावर "हा लेकाचा कधी बोलणे संपवतोय" या आविर्भावात रोखलेले अक्षरशः शेकडो डोळे. शिवाय चंद्रपूरला फ़ोन खुद्द वैभवीच्या घरी नव्हता. शेजारी राहणा-या तिच्या काकांकडे होता. त्यामुळे तिथे पण संकोच.)
४ ऑगस्टला सेवाग्राम एक्सप्रेस नेहेमीप्रमाणे भल्या पहाटे वर्धा स्टेशनावर आली. आमचे स्लीप कोचेस बाजूच्या प्लॅटफ़ॉर्मवर उभ्या असलेल्या वर्धा - बल्लारशा पॅसेंजरला जोडून उरलेली सेवाग्राम एक्सप्रेस तिच्या गंतव्याकडे (नागपूर) रवाना खालेली होती. तशीही मला भल्या पहाटे उठायची सवय आणि आज तर आपल्या प्रयोगाची उत्सुकता. त्यामुळे मी जागाच होतो.
४/८/२०००: सकाळी ६ वाजण्याची मी वर्धा स्टेशनावर वाटच बघत होतो. सहा वाजले आणि मी स्टेशनबाहेर आलो. शेजारी प्रवाश्याला माझ्या बॅगेकडे लक्ष ठेवायला सांगितले. प्लॅटफ़ॉर्मवर उभी असलेली पॅसेंजर काही सकाळी ७ शिवाय सुटणार नव्हती. मग बाहेर आलो. एक टेलीफ़ोन बूथ पाहिला आणि वैभवीला फ़ोन लावला. (त्यांच्याकडे कॉलर आयडेंटिफ़िकेशन यंत्र नव्हते हे मला माहिती होते नाहीतर मुंबईऐवजी वर्धेचा एस. टी. डी. कोड पाहून बिंग फ़ुटले असते.)
सकाळी सकाळी पहिला फ़ोन आणि पहिल्या शुभेच्छा आपल्या वाग्दत्त वराकडून येईल हे तिला अपेक्षित होतेच. पण तिला सांगितले की आमच्या महाविद्यालयातले माझे सहकारी प्रा. विवेक देशमुख हे काही कामानिमित्त काल सेवाग्राम एक्सप्रेसने मुंबईवरून चंद्रपूरसाठी निघालेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू पाठवलेली आहे. ती घ्यायला तिला पॅसेंजरच्या वेळेवर चंद्रपूर स्टेशनावर जावे लागेल आणि ती वस्तू त्यांच्याकडून घ्यावी लागेल.
गाडीत परतलो. मनात खुशीचे लाडू फ़ुटत होते. प्रा. देशमुख सरांकडून मी पाठविलेली भेटवस्तू घ्यायला वैभवी स्टेशनवर येणार हे तर नक्की होते. पण ऐनवेळी मीच तिच्या वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून हजर असलेलो दिसल्यावर तिच्या चेहे-यावर येणारी खुशी पाहणे हा माझ्यासाठी जन्मभराचा अनुभव असणार होता. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे " Best present for one's wife's birthday is to remain absent in the office on that day and celebrate the day with her." तसा अनुभव आम्ही उभयता घेणार होतो.
वर्धेपासून सात वाजता निघालेली पॅसेंजर अडीच पावणेतीन तासांनंतर चंद्रपूरला आली. अपेक्षेप्रमाणे वैभवी तिच्या धाकटी बहिणीला सोबतीला घेऊन चंद्रपूरला स्टेशनवर आलेली होती. गाडीतून उतरणा-या मला बघून तिच्या वाढदिवशी तिची कळी काय खुलली म्हणता ! अवर्णनीय.
स्लीप कोचेस च्या थांब्याचा फ़ायदा घेऊन एका रेल्वेफ़ॅनने आखलेला हा रोमॅंटीक बेत. स्लीप कोचेसच नसतील तर आता कुठला आला रोमॅंटीक रेल्वेफ़ॅन आणि कुठला आला त्याचा अनोखा बेत !
- बसेस आणि रेल्वे हेच पहिले प्रेम असलेला तरीही व्यावहारिक जीवनातही रोमॅंटीक असलेला रेल्वेफ़ॅन राम
परिशिष्ट १. ज्या दोन ठिकाणांना जोडणारी पूर्ण लांबीची रेल्वे सुरू करणे व्यावसायिक दृष्ट्या शक्य नसेल त्या दोन ठिकाणांसाठी दुस-या एखाद्या गाडीत एक दोन किंवा अधिक कोचेस जोडण्याला भारतीय रेल्वे स्लीप कोचेस म्हणतेय.
अ) एकेकाळी नागपूर ते सोलापूर थेट प्रवासी संख्या फ़ार नसावी. म्हणून नागपूर - कोल्हापूर (आताची गोंदिया - कोल्हापूर) महाराष्ट्र एक्सप्रेसला नागपूर - सोलापूर (एस. ९) कोच जोडायचेत. पहाटे पहाटे दौंड स्टेशनला हा कोच गाडीपासून वेगळा काढला जायचा. आणि मुंबईवरून रात्री निघून पहाटे दौंडला पोहोचणा-या मुंबई - चेन्नई एक्सप्रेसला हा कोच सोलापूरपर्यंत जोडला जायचा. परतताना तसेच. चेन्नई - मुंबई एक्सप्रेसने हा कोच रात्री दौंडला यायचा आणि यार्डात पडून राहून मध्यरात्री दौंडला येणा-या कोल्हापूर- नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट बघत रहायचा.
आ) मुंबई ते चंद्रपूर थेट गाडी नव्हती. म्हणून मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसला चंद्रपूरसाठी पाच कोचेस लागायचेत. (सुरूवातीला एक शयनयान व एक शयनयान + प्रथम वर्ग (FN - 1) असे दोन, मग दोन शयनयान आणि एक सर्वसाधारण डबा असे तीन आणि आताशा दोन वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान, दोन शयनयान आणि एक गार्ड आणि लगेजचा असे पाच डबे स्लीप कोचेस म्हणून लागायचेत. सेवाग्राम पहाटे पावणेचारच्या सुमारास वर्ध्याला आली की हे डबे काढून वेगळे ठेवून द्यायचेत. मग सकाळी सातच्या सुमारास वर्धेवरून निघणा-या वर्धा - बल्लारशा पॅसेंजर गाडीला हे डबे जोडून सकाळी दहा पर्यंत बल्लारशा / चंद्रपूर गाठले जाई.
No comments:
Post a Comment