मित्रांनो,
आपल्यापैकी ब-याच जणांनी ही गोष्ट बघितली असेल की आपल्या यष्टी ची भुरळ पडत नाही अस मूलच नसते. पण आपण मोठे झाल्यावर आपल्याला उगाचच त्याची लाज वाटते आणि मोठेपणीही हा बसचा छंद जपून ठेवणारी मंड्ळी विरळाच. पण आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला छंद पाहून आपल्या संपर्कातल्या ब-याच जणांना उत्सुकता वाटते आणि बालपण संपल्यावर दडपून टाकलेला हा छंद त्यांना पुन्हा साद घालतो. माझे असेच तीन भाऊ आहेत. (मावसभाऊ, आतेभाऊ आणि मामेभाऊ) हे तिघेही माझ्या छंदात सहभागी होत असतात.
मी कराडला महाविद्यालयात शिकत असताना वर्गात शेवटल्या बाकावर बसून एखाद्या कंटाळवाण्या लेक्चरमध्ये वह्यांच्या शेवटल्या पानांवर graffiti म्हणून बसेसची, रेल्वे गाड्यांची चित्रे काढायचो
आणि कधीकधी नागपूर - चंद्रपूर, चंद्रपूर - नागपूर मार्गावरच्या बसगाड्यांचे वेळापत्रक लिहीत बसायचो. थोड्याच दिवसात या छंदात आमचे काही नाशिककर, पुणेकर मित्र ही सामील झालेत. मग मागच्या बाकांवर फ़क्त नागपूर - चंद्रपूरच नाही तर नाशिक - पुणे, नाशिक - मिरज, बेळगाव - नाशिक वगैरे गाड्यांचीही वेळापत्रके लिहील्या जाऊ लागलीत.
बसफ़ॅनिंग आणि रेल्वेफ़ॅनिंग हे सर्वाधिक सांसर्गजनिक छंद आहेत हे नक्की.
- बसेस आणि रेल्वेच्या भुताने बालपणापासून पछाडलेला, राम
No comments:
Post a Comment