Tuesday, October 2, 2012

कृष्णभूमीत ५: वृंदावन


इथे वाचा

कृष्णभूमीत-१ 

कृष्णभूमीत-२ 

कृष्णभूमीत-३ 

कृष्णभूमीत-४ 


दि. ११/०५/२०११ व १२/०५/२०११.

व्रजभूमीत शिरल्यावर उत्साह संचारला. आता त्या कृष्णलीलांची भूमी बघायला मिळणार याची उत्सुकता होती. बांके बिहारी विषयी जे काही श्रीमद भागवतात वाचले होते, अनेक प्रवचनकार, कीर्तनकारांकडून ऐकले होते ते आज आम्ही सर्व प्रत्यक्ष अनुभवणार होतो. वृंदावनातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून माकडांना चुकवत (मागच्या अवतारातल्या आपल्या निष्ठावान सेवकांना भगवंताने या अवतारातही उदार आश्रय दिला हे लक्षात आले.) आम्ही बांके बिहारी मंदीरात गेलो. बांके बिहारी चं दर्शन २ मिनीटेच झाल्याबरोबर सर्व देहभान हरवलेत. आपण कोण ?, कुठे आहोत ?, कशासाठी आहोत ? यासर्व गोष्टींचा विसर पाडणारी ती बांके बिहारी ची लोभस मूर्ती. आजवर नुसतेच ऐकले, वाचले होते पण आज प्रत्यक्ष "दर्शन" झाले. विवेकजींनी आपल्या प्रवचनांतून "दर्शन" या विषयाचे जे विवेचन केले होते त्याचा प्रत्यय आला.

वृंदावनात सर्वत्र "सर्वं कृष्णमयं जगत" आहे. पण त्याचबरोबर असंख्य भिकारी आहेत. "आपण भौतिक दृष्टीने एव्हढे समृध्द होतो, आध्यात्मिक दृष्ट्या आजही खूप समृध्द आहोत मग आपण इतके दीन कां झालोत ?" हा विवेकजींनी त्यांच्या प्रवचनांतून विचारलेला प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता नव्हे अधिक भेसूरपणे समोर येत होता. पण आमच्या इथल्या स्थानिक मार्गदर्शकाने प्रथमच आम्हांला सांगितले होते की वृंदावनात इतके भिकारी आहेत की दान द्यायला गेल्यानंतर एखादा करोडपती इसम देखील पुरा पडणार नाही. तेव्हा यथाशक्तीच आणि सत्पात्रीच दान करा. त्यामुळेच केवळ करूणा उत्पन्न झाली तरी काही करू शकत नसल्याने विषण्ण मनाने आम्ही फ़िरत होतो. रस्त्यावरच्या फ़ाटक्या भिका-यांबरोबरच मोठमोठ्या मंदीरात आपापली दुकाने लावून जबरदस्ती, दहशतीने भीक मागणारी पुजारी मंडळीही आम्हाला दिसलीत. एकंदरच उत्तर भारतात ज्ञानमार्गाचा प्रसार मध्ययुगीन काळात फ़ार न झाल्यामुळे दीन अवस्था आहे हे जाणवले. महाराष्ट्रात मध्ययुगीन काळांत समाजाला ज्ञानाचे बाळकडू पाजणारी समर्थ रामदास, जगदगुरू तुकोबाराय, संत एकनाथांसारखी मंडळी होऊन गेल्यामुळे हे दीनवाणेपण महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही हे जाणवले.

दि. १२/०५/२०११

सकाळी भल्या पहाटे आमचा वृंदावनातला गाइड कम पंडा आम्हाला सर्वांना उठवायला आमच्या धर्मशाळेवर आला. ५० जण तयार होउन सकाळी ६ वाजता निघालेसुध्दा. वृंदावन परिसर फ़िरण्यासाठी बस आमच्या त्या पंडानेच जमवली होती. बसचा नंबर जरा लक्षपूर्वक बघा हा.

११ तारखेलाच श्री. विवेकजी घळसासी  सोलापूरवरून थेट येवून आम्हाला सामील झाले होते. खरेतर त्यांच्या एव्हढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाचं आम्हा सर्वांवर एक दडपणच आलेले होते पण त्यांनी आपल्या मनमोकळ्या आणि अकृत्रिम वागणुकीने ते दडपण, अंतर कसे कमी होइल याची काळजी घेतली. माणूस म्हणूनही ते किती मोठे आहेत याची जाणीव पटवणारी ही सहल ठरली.


श्री जयंतराव भालेकर आणि श्री विवेकजी घळसासी.


प्रवासात सामील सर्व भाविक रामनाम परिवार.


आमचा गाइड कम पंडा. एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वच होते हे.



प्रवासात आम्हाला सर्वांना मनमुराद हसवायला असलेले, प्रसाद भालेकर


आमच्या प्रवासी मंडळींचा हिरो, सुखद संगमनेरकर


व्रजभूमीत शिरताना लगेचच बस उत्तर प्रदेश सोडून राजस्थानात शिरली. मधल्या आर. टी. ओ. नाक्यापूर्वी बस बराच काळ थांबली होती. क्लीनर महाशय खाली उतरले पण थोड्याच वेळात बस पुन्हा सुरू झाली. त्या थांब्याचा उलगडा आम्हाला थोड्या वेळाने झाला. राज्य बदलून जायचे म्हटल्यावर आर. टी. ओ. कडे विशिष्ट करभरणा करावा लागतो. तो टाळण्यासाठी या लोकांनी नामी युक्ती काढली आहे. ते बसची नंबर प्लेटच बदलतात. पूर्वी हीच बस उत्तर प्रदेश मध्ये पासिंग केलेली होती. (आता हा तरी नंबर खरा असेल की नाही ईश्वरालाच माहिती.) आता राजस्थान मधला नंबर दिसतोय. आहे की नाही उत्तर भारतातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची गंमत ?




राजस्थानात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर आहे. पुरूष आणि स्त्रियाही सर्रास विड्या ओढताना दिसतात. एका खेड्यात अशीच गंमत दिसल्याबरोबर विवेकजींनी सगळ्यांची गंमत करायचे ठरविले. ते म्हणाले " ऐका. काल माझ्या स्वप्नात श्री गजानन महाराज आलेले होते आणि ते म्हणाले की उद्या मी सर्व भाविकांना एका वेगळ्या रूपात दर्शन देणार आहे. जे कोणी विवेकजींकडे २१ रू. दक्षिणा म्हणून देतील त्यांनाच याची खरी अनुभूती येइल." आणि त्यांनी त्या चिलीम ओढणा-या बाईबरोबर बसून फ़ोटो सुध्दा काढला. आपल्या प्रवचनांमधून ज्या डोळस श्रध्देचा विवेकजी प्रचार आणि प्रसार करतात त्याचाच असा गंमतीशीर अनुभव त्यांनी दिला. नागपूरला त्यांचं "धार्मिकच नको आध्यात्मिक व्हा" हे प्रवचन तर आम्हा सर्वांना विशेष आवडले होते. आजकाल परमेश्वराविषयी कळकळा बाळगणा-या सर्वांनीच ऐकावे असे ते प्रवचन होते.












व्रजभूमीतील काही गावांमधील राजवाडे आणि त्यावरील अप्रतीम कलाकुसर. 

दुपारी व्रजभूमीतले "केदारनाथ" या गावी आमची स्वारी जाऊन पोहोचली. भगवान गोपालकृष्णाने आपल्या म्हाता-या आई वडीलांची सोय व्हावी म्हणून लांबवर हिमालयात असलेल्या केदारनाथ, बद्रीनाथ आदि चार धामांची व्रजभूमीतच स्थापना केलेले हे स्थान. छोटासीच दिसणारी ही टेकडी चढता चढता खरोखर केदारनाथाची २३ किमी. ची वाट आपण चालतोय असे श्रम झालेत. भर उन्हाळ्यात एव्हढा चढ चढून विवेकजीही थकलेत. 




या टेकडीचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने हे नैसर्गिक मंदीर नंदी सारखे तर दुस-या बाजूने शेषनागासारखे दिसते.

केदारनाथाच्या पायथ्याशी  नागा साधूंचा एक रम्य आश्रम होता. गर्द झाडांच्या सावलीत दुपारी सगळे विसावलोत. जेवणं झालीत आणि मग त्या पंड्यांचा भांग घोटण्याच बम भोले कार्यक्रम पण झाला. विवेकजी इथेही त्यांना प्रोत्साहन देत त्यांची मजा घेत होते.






ज्या उन्हात सर्वसामान्यांना केवळ फ़िरणे अशक्य आहे त्या भर उन्हात एक नागा साधू भर दुपारी १२ वाजता अंघोळ करून आपल्या आजूबाजूला शेण्यांची शेकोटी करून, डोक्यावरपण जाळ असलेले कुंड ठेवून, नैमित्तिक उपासनेला बसले तेव्हा त्यांचे कौतूक वाटल्यावाचून राहिले नाही.




पुढचा पडाव होता बद्रीनाथ. रस्त्यावर एक चौक दिसला. खेडेगावच होते पण चहा पाण्यासाठी टपरी दिसल्यावर सगळेच थांबलेत. सर्वांनी आपल्या तृष्णा शमवून घेतल्यात. एका ठिकाणी चिलीमी, हुक्के इत्यादी दिसल्यावर सगळ्यांनी चिलीम पीत नसले तरी फ़ोटो काढण्याची आपापली हौस भागवून घेतली.









व्रजभूमीत जागोजागी दिसणारे हे वैशिष्टयपूर्ण कच्चे बांधकाम. मला वाटतं गोव-यांची साठवणूक करण्यासाठी यांचा वापर करीत असावेत.


बद्रीनाथात मात्र प्रसन्न वाटत होते. भर उन्हाळा असला तरी गर्द झाडी असल्यामुळे शांत वाटत होते. तिथल्याच एका इमारतीवर लिहीलेला हा दोहा मला आवडला.


बद्रीनाथमध्ये सर्वजण स्थानापन्न झाल्यावर प्रार्थना म्हणायची विनंती झाली. अस्मादिक प्रार्थना म्हणताना.


या सर्व प्रवासातली आमची यंग ब्रिगेड. ज्यांच्या सहकार्याशिवाय आणि उत्साहाशिवाय हा प्रवास अपूर्णच राहिला असता.


गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पहाड.


आशिर्वादाच्या मुद्रेत असलेल्या आमच्या श्रेयावहिनी तेलंग.



विवेकजींच्या मुद्रेवरून त्यांचा थकवा जाणवतोय. पण त्या दिवशी रात्रीही त्यांनी प्रवचनाद्वारे उदबोधन केलेच.





व्रजभूमीत मोर फ़ार दिसतात. सुरूवातीला खूप कौतूक वाटतं. पण जागोजागी असे सुंदर मोर दिसायला लागल्यावर मग दरवेळी फ़ोटो काढावाच असं वाटत नाही. असाच एक मयूरराज बद्रीनाथवरून परत येण्याच्या वाटेवर दिसला.






परतताना टोंक येथील सुंदर राजवाडा बघितला. राजा सूरजमल जाटाचा हा सुंदर राजवाडा. (सूरजमल जाट : पानिपतावर मराठ्यांना मदत पुरवणारा एकमेव उत्तर भारतीय राजा). दुर्दैवाने कॆमे-यातली बॆटरी एका दोन फ़ोटोंनंतर संपलीच. आत एक जागृत हनुमंताचं मंदीर आहे. आत रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचं सामूहिक पठण झालं. मन प्रसन्न झालं.





हा आमच्या गाइड्चा जिगरी दोस्त. (भांगेमुळे दोस्ती घट्ट होत असावी. भांगेमुळेच कां ? खर्रा, तंबाखू खाणा-यांची, दारू पिणा-यांची मैत्री अशीच लवकर होते आणि घट्ट होते.)