Wednesday, November 22, 2017

फ़लाटदादा...फ़लाटदादा ची जन्मकथा

कराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्रावीण्य जेमतेम मिळेल एव्हढाच अभ्यास (तो पण ऐन परीक्षेच्यावेळी) करून नाटक, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, भावगीत गायन स्पर्धा, एकपात्री प्रयोग, युवा महोत्सव आणि विद्यार्थी परिषदेचे काम यासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे अक्षरशः पालथे घातलेत. आज या जिल्ह्यातील तालुके न तालुके मला माहिती आहेत आणि किमान एकदा तरी मी या सर्व तालुक्यांच्या गावाला जाऊन आलोय. तेव्हढा सोलापूर जिल्हा राहून गेला होता तो पण आता सांगोल्यातील नोकरीच्या निमित्ताने (२०१२ ते २०१५) पूर्ण पालथा घातला गेला. पायावर चक्रच मोठ जोरदार आहे आणि भटका स्वभाव.

१९९२ मध्ये अशीच बार्शीच्या "पाणिनी वक्तृत्व स्पर्धे"ची जाहिरात महाविद्यालयीन नोटीस बोर्डावर पाहिली आणि आम्ही आमची एन्ट्री पाठवली. इथे कराडला येण्यापूर्वी बार्शी हे नाव पुलंच्या बार्शी लाइट रेल्वेच्या संदर्भात ऐकले होते आणि कराडला आल्यावर बार्शीचे बरेच विद्यार्थी आमचे मित्र झालेत. नवीन गाव बघण्याची उत्सुकता आणि फ़ुकटात भटकंतीचा हा मौका आम्ही सोडणार नव्हतोच. (अर्धा जाण्यायेण्याचा खर्च आयोजकांकडून, उरलेला अर्धा प्रवासखर्च महाविद्यालयातून जाण्यायेण्यासाठी मिळणा-या विद्यार्थी प्रवास सवलत पासात होणार होता. रहाण्याची व्यवस्था आयोजकांकडूनच होणार होती)

त्या स्पर्धेचे विषय मोठे नामी होते. "चंद्रभागेचे वाळवंट : भारतीय अधात्मशास्त्रातील एक महत्वाचे विद्यापीठ" "फ़लाटदादा, फ़लाटदादा..." असे ताकदीचे ५ विषय होते. आमच्या महाविद्यालयातील माझ्या धाकट्या बंधुवत असलेला रावेरचा राजा चौधरी आणि मी आम्ही जायला निघालोत. मी "फ़लाटदादा, फ़लाटदादा..." हा विषय निवडला होता. बालपणापासून बस आणि रेल्वेशी खूप घट्ट नाते असल्याने फ़लाट हा तर सखाच होता. म्हणून या विषयाची भुरळ पडली. कराडवरून रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटे आम्ही दोघेही बार्शीला पोहोचलो. आयोजकांनी रहाण्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. स्पर्धा त्याचदिवशी दुपारच्या सत्रात सुरू होणार होती.






पाणिनी वक्तृत्व स्पर्धा" ही खूप मोठ्ठी आणि दर्जेदार असते हे आमच्या बार्शीकर मित्रांनी सांगितले असले तरी तो दर्जा काय ? हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी इतर ठिकाणचेही स्पर्धक मंडळी उतरलेली होती. शेजारच्या खोल्यांमधून त्यांचे पाठांतराचे आणि वेळ मोजण्याचे वगैरे आवाज ऐकून आम्ही अचंबित झालो. १२ मिनीटांच्या भाषणासाठी १० मिनीटांनंतर परीक्षकांकडून एक वेळेबाबत सूचना येणार होती. ११ मिनीटांनंतर अंतिम सूचना आणि १२ व्या मिनीटाला भाषण थांबवायचेच नाहीतर गुणांमध्ये वजावट येणार होती. सगळी इतर स्पर्धक मंडळी त्यानुसार बरोबर भाषण अकरा ते साडेअकरा मिनीटांत बसवण्याची पराकाष्ठा करीत होती. आम्ही मात्र एव्हढे तयार नव्हतो. एकतर "असे नियम प्रत्येक स्पर्धेत असतातच. १२ मिनीटे म्हणजे बोलू १० ते १५ मिनीट." या व-हाडी, खानदेशी खाक्याने आम्ही निवांत होतो पण आजूबाजूची ही तयारी पाहून सजग झालो. मुद्द्यांची पुन्हा एकदा नीट मांडणी, जुळवणी करू लागलोत आणि शेवटी वेळेच्या बंधनांमध्ये आपापल्या भाषणांना अडकवून दुपारी आम्ही स्पर्धेसाठी पोहोचलो.

आयोजन खूप छान आणि भव्य होते. स्पर्धेसाठी औरंगाबाद ते कोल्हापूर या ठिकाणांहून महाविद्यालयीन स्पर्धक मंडळी आलेली होती. स्पर्धेतली भाषणे ऐकायला बार्शी शहरातूनही नागरीक आलेले होते. सगळ आम्हाला नवलच होत. सांघिक पारितोषिक म्हणून एक फ़िरता चषक होता. काचेच्या पेटीतल्या चांदीच्या रथाच्या आजूबाजूला या स्पर्धेतल्या गतविजेत्यांची नावे पदकांवर लिहून ठेवली होती. स्पर्धेचे पहिले विजेते "प्रमोद महाजन" (त्यांच्या महाविद्यालयीन काळातले) आणि त्यानंतर "सविता प्रभुणे" ही नावे वाचून आम्ही भारावून गेलो. प्रेरीत झालोत. आता या चषकासाठी आपण प्रयत्न करायचा हा आमचा निश्चय अगदी दृढ झाला.

सुरूवातीला आयोजकांनी भूमिका मांडली. स्पर्धेचा इतिहास विषद केला. विषयांविषयी बोलल्यावर मी तर स्तब्धच झालो. "फ़लाटदादा, फ़लाटदादा...." ही मर्ढेकरांची कविता आहे हे मला पहिल्यांदा तिथेच कळल. आमचे वाचन म्हणजे पुल, वपु, सुहास शिरवळकर आणि कवितांचच बोलायच झाल तर बापट, पाडगावकर, करंदीकरांच्या पुढे आम्ही गेलो नव्हतो. मी मर्ढेकरांच्या कवितेच्या दृष्टीकोनातून "फ़लाटदादां"चा विचारच केला नव्हता. भर थंडीत हातापायाला घाम फ़ुटणे घशाला कोरड पडणे, एकदम नर्व्हस वाटणे वगैरे सर्व क्रिया एकदमच झाल्यात. पण म्हटल आलोच आहोत तर आपले "फ़लाटदादा" मांडूनच परत जाऊयात.

स्पर्धेतल्या भाषणांना सुरूवात झाली आणि या स्पर्धेला इतका दर्जेदारपणा का प्राप्त झालाय ते एकदम कळल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या ४० भाषणांपैकी ३० तरी भाषणे रेकॉर्ड करून ठेवावी अशीच होती. दुर्दैवाने तेव्हा आजच्यासारखी साधनांची मुबलकता आणि सर्वोपलब्धता नव्हती. माझ्या भाषणात मी माझे फ़लाटदादा आत्मविश्वासाने मांडलेत. राजाचेही भाषण छान झाले आणि मुख्य म्हणजे १२ मिनीटांच्या अवधीत संपले.
स्पर्धा संपली. निकाल जाहीर झालेत. मला आणि राजाला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले. परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केलेत आणि बहुतांशी स्पर्धकांनी परीक्षकांशी वैयक्तिक चर्चेतून आपापले गुणदोष त्यांच्याकडून समजावून घेतलेत. दोन परीक्षकांपैकी एकांना फ़लाटदादांविषयी माझे विचार आवडले. मर्ढेकरांच्या कवितेहून एक वेगळा विचार मांडला म्हणून त्यांनी कौतुक केले पण दुसरे परीक्षक मात्र एव्हढे उदारमतवादी नव्हते. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकनात मी कमी पडलो होतो. 

भारतात एकमेव असणा-या आणि समस्त बार्शीकरांचा मानबिंदू असलेल्या भगवंत मंदीरात भल्या सकाळी दर्शन घेऊन लागलीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परतताना विठूमाउलीचेही दर्शन घेतले.






परतल्यावर मग मर्ढेकरांच्या कवितेचा आणि त्यांच्या दृष्टीकोनाचा शोध घेऊ लागलो. साधारणतः दोन वर्षांनी धामणगाव येथील वास्तव्यात फ़लाटावर अधिक चिंतन झाले आणि परिणामस्वरूपी हा लेख  नागपूरच्या तरूण भारतात प्रकाशित झाला. हा लेख मी नेहेमीप्रमाणे पोस्टाने तरूण भारतला पाठवला. लेख प्रकाशित होण्यापूर्वी दोन दिवस आधी तरूण भारत नागपूरचे तत्कालीन मुख्य संपादक आणि साक्षेपी साहित्यिक श्री. वामनराव तेलंगांचे मला वैयक्तिक पत्र धामणगावला आले. "फ़लाटदादा खूप आवडले. असेच लेखन सतत आपल्याकडून होत जावे" ही भलीमोठी शाबासकी मिळाली. लेख प्रकाशित झाल्यावर इतरांकडूनही वाहवा झाली. आमचे फ़लाटदादा सुखावलेत.



Monday, November 20, 2017

"लट उलझी....." आणि रहमान

सकाळी सकाळी एखाद गाण मनात आल की दिवसभर ते गाण मनात रूंजी घालत रहात हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव. काल सकाळी अचानकच बिहाग रागातल "लट उलझी सुलझा जा बालम..." ही चीज आठवली आणि दिवसभर त्याने पिच्छा सोडला नाही. बिहाग हा आधीच खूप रोमॅंटीक राग आणि गाण्याचे बोलही रोमॅंटीकच. मग काय, यू ट्यूबवर या चीजेचा शोध घेतला.

यापूर्वी ऐकलेली पंडीत जसराजांची चीज सापडलीच. ऐकताना मझा आला. या रागाचा रोमॅंटीक मूड या चीजेमधे संगीतातून खूप उत्कृष्टपणे सादर झालाय हे जाणवले. एका प्रेयसी आणि प्रियकरामधले संभाषण आपण ऐकतो आहे याचा फ़ील आला. "बाबारे, माझे दोन्ही हात मेंदीने भरलेले आहेत आणि माझ्या बटा अशा मुजोर उधळल्यात, त्या तू प्लीज सावर ना. माझ्या कपाळावरची बिंदी कुठेतरी विस्कटलीय, तिला नीट कर ना" हे प्रेयसी सांगतेय आणि ते ही बिहाग रागात. किती मधूर ! संगीत हे भावना पोहोचवण्याचे किती समर्थ माध्यम आहे याचा पुनर्प्रत्यय आला. 

थोडा अधिक शोध घेताना रहमानने पण रचलेली तीच चीज सापडली. आणि....

"ही बया ब्युटी पार्लर मध्ये बसलेली आहे (आजकाल चौकाचौकात निघालीयत तशा एखाद्या् युनिसेक्स अशा पार्लर मध्ये) आणि तिथल्या तिच्या केसांवर काम करणा-या कारागिराला सूचना देतेय" असा फ़ील आला. अरे त्या गाण्यातल्या भावना कुठल्या आहेत ? तू त्या पोहोचवतोयस कसा ? काही विचार ?

रहमान भलेही ऑस्कर वगैरे प्राप्त कलाकार असेल पण भारतीय शास्त्रीय संगीत त्याला सापडल अस वाटत नाही. असंख्य वाद्यांमधून चमत्कृती निर्माण करणारा एक संगीतकार असे मला कायम वाटत आलेय. पुल म्हणतात त्याप्रमाणे एखादा बाजारू संगीतकार असंख्य वाद्यांचं कडबोळ करून कोलाहल निर्माण करतो तर एखादा अस्सल संगीतकार फ़क्त तानपुरा, तबला आणि सुरपेटीच्या सहाय्याने सुरांचा स्वर्ग निर्माण करतो. त्याच प्रत्यंतर आल. 


नाही, रहमान माणूस असेल मोठा हो, पण आमच्या लेखी त्याच मोठेपण मांडायच ते कुठल्या खात्यावर ?



Sunday, November 5, 2017

अतिथी देवो भव ?





कालचा आणि आजचा ब्रम्हचैतन्य विचार पाहिला आणि तो फ़ेसबुकवरच्या दोन ग्रूप्समध्ये टाकला पण. नंतर थोडा स्वतःशीच विचार करू लागलो असता कळल की आजकालच्या युगात अभ्यागताचेच स्वागत सत्कार करणे सर्वसामान्य गृहस्थींना दुरापास्त झाले आहे. (अपवाद विरळा आहेत.) तर अतिथीचे स्वागत करायला कुणाची वृत्ती असणार ? (अभ्यागत : जो येणार हे प्रथमपासूनच अवगत असते तो. आणि अतिथी म्हणजे जो तिथी न कळवता, वेळी अवेळी, येतो तो.)

बालपणी आम्ही इतवारीत कुहीकर वाड्यातल्या दोनच खोल्यांच्या घरात रहात असू. परिस्थिती बेताचीच होती. पण आमच्या आई दादांची मने विशाल असल्याने त्या गैरसोयीत सुद्धा एका मावशीचे साक्षगंध, दोन मामेबहिणींच्या मंगळागौरी आणि असे तत्सम अनेक कार्यक्रम आम्ही बालपणी अनुभवले. पै पाहुण्यांचा मुक्काम सदैव असायचाच. नागपुरात खरतर इतर नातेवाईकांची त्यामानाने प्रशस्त घरे त्याकाळातही होती पण आमच्या दादांचा फ़टकळ असला तरी आंतरीक स्नेहाने भरलेला स्वभाव आणि आमच्या आईची कुणासाठीही अपार कष्ट सोसण्याची तयारी यामुळे सर्वांना आमच्याच कडे प्रशस्त वाटे. त्या वाड्यातल्या छोट्या घरात पहाटे ४, ४.३० च्या सुमारास नळ येत असे आणि नळ जाण्याआधी अंघोळी वगैरे उरकून पुन्हा दिवसभराच्या वापरासाठी पाणी भरून ठेवावे लागे. त्यामुळे मुक्कामाला असलेल्या पाहुण्यांनाही पहाटे उठणे आणि आवरणे क्रमप्राप्त असे. तरीही सगळ्यांचे प्रेम आम्ही अनुभवले.

आज मात्र अगदी जवळच्या नातेसंबंधांमध्येही जाण्यासाठी फ़ोनाफ़ोनी करून जाण्याची गरज पडते. मन कुठेतरी खंतावते. जिव्हाळा आटत चाललाय हे लक्षात येते. आपण एकटे त्यात कुठेकुठे पुरू शकणार हा जाणिवेने मन खंतावते आणि थरकापते सुद्धा.

प्रश्न परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूलतेचा नाही. आज आपली वृत्ती तपासून बघण्याची गरज आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्येच ह्या प्रकार जास्त वाढीला लागल्याचे पहायला मिळाले. गेली ४-५ वर्षे नागपूर आणि विदर्भाबाहेर होतो त्यामुळे हा प्रकार आतिथ्याची खाण असलेल्या विदर्भात तरी नसेल ही मनाची समजूत गेल्या वर्षभरातल्या इथल्या वास्तव्याने खोटी ठरवली आहे.

असो, कालाय तस्मै नमः.