Friday, July 31, 2020

श्रीविष्णुसहस्त्रनाम

जेव्हा जेव्हा विष्णुसहस्त्रनाम म्हणायला लागतो, परमात्म्याच्या सहस्त्र नामांचा गोडवा गायचाय हा विचार तर अत्यंत आकर्षित करणारा आहेच. पण मला सुरूवातीलाच भरून येत ते त्यातल्या भावामुळे. 

शरपंजरी पडलेल्या आणि देहविसर्जन करण्याची वेळ समीप आलेल्या पितामह भीष्मांना, ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने, जेष्ठ पांडव, सत्यनिष्ठ युधिष्ठीर "अत्यंत योग्य धर्ममार्ग कुठला ?" असा प्रश्न विचारतो.

आणि वयाने, अनुभवाने अतिशय थोर असलेले पितामह भीष्म त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या, त्यांच्याविरूद्ध युद्धाचे संचलन करून, कुरूकुलाचा नाश करवलेल्या, श्रीकृष्णाचे खरे स्वरूप ओळखून युधिष्ठीराला त्याचीच भक्ती करण्याचा सल्ला देतात. ज्ञानोत्तर भक्तीचा हा श्रेष्ठ आविष्कार आहे असे मी मानतो. 

आपल्या आसपास असलेल्या, आपल्या स्वजनांविषयी आपल्याला "स्वजनमोहिनीमाया" असते आणि म्हणूनच आपण त्यांचे अंतरंग स्वरूप ओळखू शकत नाही. पांडवांनाही त्या परमात्म्याचे खरे स्वरूप तोपर्यंत तितकेसे कळले असण्याची शक्यता कमी आहे. एक सखा, आत्येभाऊ, एक राजा, एक योद्धा, एक मार्गदर्शक असेच त्या भगवंताला त्यांनी आजवर बघितले आणि जाणले होते. पण पितामह भीष्मांनी त्याचे वर्णन करताना पहिलेच शब्द "जगत्प्रभू, देवदेव, अनंत आणि पुरूषोत्तम" असे उच्चारून आपल्या ज्ञानाचा आणि हृदयात जागत असलेल्या भक्तीचा प्रत्यय दिला. 



नेमके याच वाक्यावर सदगदित व्हायला होत. पितामह भीष्म आपल्याला अनेक अंगांनी माहिती आहेत. गंगापुत्र देवव्रत, सत्यनिष्ठ, इच्छामरणी, कुरूकुलाच्या चुकांचा बोध होऊनही केवळ वचनात गुंतल्याने कुरूकुळाचे रक्षण करणारा अजोड योद्धा अशी अनेक रूपे आपण याप्रसंगापूर्वी बघितली आहेत पण भगवंताच्या ख-या स्वरूपाला ओळखून त्याच्या भक्तीत लीन झालेला आत्मा हे नवे स्वरूप कुणाही साधकाला सदगदित करणारेच आहे.

- भगवंताच्या प्रेमामुळे, अकारण करुणेमुळे सदगदित होत असलेला मुमुक्षू राम.

(माझ्या इतर धार्मिक लेखांप्रमाणे हा लेखही कॉपी पेस्ट होऊन काही दिवसात मला कुठल्या तरी धार्मिक गृपवर बघायला मिळेल याची खात्री आहे.)

Thursday, July 23, 2020

रेल्वे आणि बस फ़ॅनिंग : एक निराळा पैलू.

रेल्वे आणि बस फ़ॅनिंग : एक निराळा पैलू.
आजकाल रेल्वे किंवा बस फ़ॅनिंग म्हटले की रेल्वे किंवा बसचे फ़ोटो किंवा व्हिडीओजच अशी सर्वांची (काहीकाही बस आणि रेल्वे फ़ॅन्सची सुद्धा) समजूत होताना दिसते. गेल्या १० वर्षात चांगल्या प्रतीच्या कॅमे-यांची सर्वत्र, आणि रास्त दरात, उपलब्धता असल्याने फ़ोटोज, व्हिडीओज विपुल काढता येतात. त्यामुळेही असेल कदाचित.
दहा वर्षांपूर्वीच्या २ मेगापिक्सेल किंवा व्हीजीए प्रतीच्या कॅमे-यांची अवस्था आठवून बघा. किंवा त्या ही पूर्वी च्या रोलवाल्या कॅमे-यांमधे ३६ स्नॅप्समधे सगळे बसवण्याची आपली धडपड आठवून बघा.
पण बस आणि रेल्वे फ़ॅनिंग म्हणजे त्या ही पेक्षा खूप अधिक असा माझा अनुभव आहे. जुन्या काळी म्हणजे दैनंदिन जीवनात कॉम्पुटर्स खूप चलनात येण्यापूर्वी आणि मोबाईल बाळगणे हे केवळ राजनेते आणि गॅंगस्टरचाच विशेष अधिकार असण्याच्या काळात, फ़ावल्या वेळात, एखाद्या परिचित रेल्वे मार्गावरचे गाड्यांचे काल्पनिक नियोजन करणे हा पण माझ्या रेल्वे फ़ॅनिंगचा भाग असायचा.
पण हे नियोजन म्हणजे "आली लहर तर केला कहर" या थाटातले (Ad-Hoc) नसायचे. पूर्वीपासूनच गणित आणि आकडेमोड या विषयात रूची. आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर १९८९ ते २००६ या कालावधीत दर महिन्याला एक याप्रमाणे प्रवास (१९८९ ते १९९३, नागपूर ते मनमाड ते पुणे ते कराड) आणि १९९५ ते २००६ नागपूर ते मुंबई) यामुळे या मार्गाची खडानखडा माहिती यामुळे हे गाड्यांचे नियोजन अगदी काटेकोर आणि काही गृहीतकांवर आधारित असलेल्या आकडेमोडीवर असायचे. खूप मजा यायची.
उदाहरणार्थ:
१. गाडीला स्टेशनातून निघून महत्त्म वेग गाठण्यासाठी (MPS ,Maximum Permissible Speed) पहिल्या २.५ किमी ला पाच मिनीटे आणि थांबायचे असल्यास शेवटल्या ३ किमी ला पाच मिनीटे.
म्हणजे एकूण अंतरातून ५.५. किमी वजा करून उरलेल्या अंतरासाठी गाडी MPS ने( महत्तम वेगाने) जाईल या हिशेबाने वेळ काढायचा आणि त्यात ही acceleration आणि deceleration ची १० मिनीटे मि्ळवायचीत. म्हणजे गाडीची दोन स्टेशनांमधली धाववेळ मिळेल असे गणित.
२. प्रत्येक गाडीचा, तिच्या दर्जानुसार MPS (महत्तम वेग).
a) राजधानी / दुरांतो/ पूर्ण वातानुकुलीत गाडी १३० किमीप्रतितास,
b) सुपरफ़ास्ट १२० किमीप्रतितास,
c) एक्सप्रेस ११० किमी प्रतितास वगैरे.






नागपूर ते भुसावळ सेक्शनमधे दर ४० मिनीटाला एक प्रवासी गाडी धावली पाहिजे या गृहीतकानुसार, सर्व या गणितात, आपल्या मनातल्या गाड्या धाववून त्यांची मजा बघत राहणे हा अव्दितीय आनंद.
खूप थांबे असलेल्या एखाद्या एक्सप्रेस गाडीला मागाहून येणा-या दुरांतोचा होणारा ओव्हरटेक गणिताने प्लॅन करणे आणि तो दिवसाच्या / रात्रीच्या त्या विशिष्ट वेळेत त्या विशिष्ट स्टेशनावर होताना कसा दिसेल ? हे कल्पनेने बघणे म्हणजे अती प्रचंड आनंद.
मला वाटते सर्वच बस आणि रेल्वेफ़ॅन्सचा हा अनुभव असेल. व्यक्त होत असताना मी होतोय एव्हढच.
माझा आनंद आपणा सर्वांसोबत वाटण्यासाठी माझ्या कल्पनेतल्या गाड्यांची यादी.
१. नागपूर - पुणे, २१०८/२१०७ पुण्यनगरी एक्सप्रेस. (नागपूर १९.०० ... पुणे ०९.३०)
२. अकोला- लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, योगभूमी एक्सप्रेस. शेगावला मुंबई - ठाणे - नाशिक वरून येणा-या भाविकांसाठी सोय़ीची. (अकोला २२.३० ... कुर्ला ०६.३०)
३. अमरावती - मुंबई, जनशताब्दी एक्सप्रेस. (अमरावती ०५.३० ... मुंबई १४.३०)
४. नागपूर - पंढरपूर, १४३६ / १४३५ चंद्रभागा एक्सप्रेस. (नागपूर १०.०० ... पंढरपूर ०७.००)
५. चंद्रपूर - मुंबई, २१८६ / २१८५ महाकाली एक्सप्रेस. (चंद्रपूर १९.०० ... मुंबई ०७.३०)
६. नागपूर - मडगाव २१८४ / २१८३ गोमंतक एक्सप्रेस. (नागपूर ११.३० ... मडगाव ०७.३०) कोकण रेल्वे मार्गे.
६. नागपूर - औरंगाबाद १४४२ / १४४१ एलोरा एक्सप्रेस (नागपूर १९.३० ... औरंगाबाद ०६.३०) मनमाड मार्गे
७. दादर - बिलासपूर एक्सप्रेस, २८१३ / २८१४. (महाराष्ट्राबाहेरच्या गाड्या कशाला उगाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत न्यायच्या ? हा शिवसेना / मनसेवादी विचार ही गाडी दादरपर्यंतच नेताना होता.
८. भुसावळ - मुंबई , १४५६ / १४५५ खान्देश एक्सप्रेस. (भुसावळ २२.३० ... मुंबई ०६.००)
याशिवाय या मार्गावर धावणा-या विदर्भ, मेल, सेवाग्राम, गीतांजली, कुर्ला - शालीमार या गाड्यांचेही थांबे आणि धाववेळ कमी करून, वेळ बचत करून, त्या सुद्धा कशा धावतील याचेही नियोजन.





मजाय न ?
सोबतच कमी रिझ्योल्युशन असलेले का होईना पण माझे काही स्कॅनस जोडतोय. त्यावरून तुम्हाला कल्पना येईलच.
मला माहिती आहे या पोस्ट वर प्रत्येक रेल्वे आणि बसफ़ॅनच्या पोतडीतून याच प्रकारचे स्वत:चे काही ना काही बाहेर येईल.
वेटींग फ़ॉर इट.

- रेल व बस फ़ॅन राम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 22, 2020

भारतीय सण आणि फ़िल्लम, टी व्ही वाल्यांच्या कल्पना.

भारतीय सणवार आणि रूढी परंपरा याबाबत हे फिल्लम आणि सिरीयल्सवाले यांच्या भेज्यात नक्की काय कल्पना आहेत हे आता तपासून पहायला हवेच.
अरे, श्रावणाची चाहूल लागते न लागते तोच अजय देवगणचा अतीटुकार "शिवाय" या ना त्या सिनेमा चॅनेलवर झळकायला लागला. अरे श्रावणात शिवोपासना करतात हे ठीक आहे पण त्यासाठी "शिवाय" ?
मराठीवालेही मागे नाहीत. टि.व्ही. वर कुठेही "एलिझाबेथ एकादशी" लागलेला दिसला की मी मनातल्या मनात "नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये ...."म्हणायला लागतो. त्यादिवशी एकादशी आहे का ? हे बघायला पंचांग बघावे लागत नाही.
बाॅलीवुड आणि झी , थोर आपले ऊपकार !
- झी (मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगु) सगळ्यांचा उपकृत रामकुमार फ़िल्लमवाले.

Tuesday, July 21, 2020

सुजाण पालक आणि परिक्षांचे निकाल.

वसंत कानेटकर लिखीत "प्रेमाच्या गावा जावे" या नाटकात मी दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या भूमिका केल्यात.
१९९१ मधे कराडला आमच्या काॅलेज गॅदरिंगमधे मी त्यात क्रिकेटर "टिटू" ची भूमिका केली होती. आमचा तत्कालीन सिनीयर आणि आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतला एक संवेदनशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी माझ्या आजोबांच्या (बिंदुमाधव सरनोबत) भूमिकेत होता.


गंमत म्हणजे ४ च वर्षांनी धामणगावला नोकरी करीत असताना, "शब्दरंग" संस्थेतर्फे हे नाटक पुन्हा सादर झाले. डाॅ. आनंद सुभेदारांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रयोगात मी माझ्याच मागील भूमिकेच्या वडिलांची (चिंतामणी बिंदुमाधव सरनोबत, टिटूचे बाबा) भूमिका साकारली होती. या दोन्हीही भूमिका मी खूप एँजाॅय केल्या होत्या.
या नाटकातला आजोबांचा आपल्या मुलाशी झालेला एक संवाद माझ्या अगदी काळजावर कोरल्या गेला आहे.
"अरे, चिंतामणी, अभ्यासाबद्दल मुलांचे कान कधी उपटायचे ? परीक्षेच्या निकालानंतर ?
कधीच नाही.
जे काय कान उपटायचे ते परीक्षेच्या तयारीवेळी. परीक्षेच्या निकालानंतर फक्त मुलांच्या पाठीवर हात,
शाबासकीसाठी नाहीतर धीर देण्यासाठी."
सगळ्या सुजाण पालकांसाठी महत्वाचा संदेश आहे, नाही ?
- "A teacher is a performing artist" या वचनावर श्रध्दा असलेला एक शिक्षक आणि एक सुजाण पालक


Monday, July 20, 2020

गाड्यांची पळवापळवी. काही रँडम विचार.

प्रफुल पटेल भंडार्याचे खासदार असताना पहिल्यांदा कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस आणि नंतर मुंबई - नागपूर विदर्भ एक्सप्रेस गोंदियापर्यंत पळवली. १५ वर्षे झालीत. अजूनही या दोन्ही गाड्यांमधे नागपूर ते गोंदिया प्रवासासाठी एकूण प्रवासी क्षमतेच्या ३० % प्रवासीही नसतात.
नुकतीच फेब्रुवारीत नागपूर - सिकंदराबाद त्रिसाप्ताहिकगाडी रायपूरवाल्यांनी अशीच पळवली.
बरे. या गाड्यांचा जनरल कोटा गोंदिया ते कामठी पर्यंतच आहे. नागपूरपासून पूल्ड कोटा (PQWL) सुरू होतो. म्हणजे ७० % प्रवाशांना केवळ २० % तिकीटे उपलब्ध होतात. मग काय ? हुशार मंडळी कामठी ते मुंबई प्रवास तिकीट घेऊन बोर्डिंग पाॅइंट "नागपूर" टाकतात. आणि जादा पैसे भरून का होईना खात्रीची जागा मिळवतात.
आपल्या मतदारसंघाच्या रेल्वे प्रश्नांविषयी विशेष आस्था असणारे चंद्रपूरचे माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांनी आपल्या मतदारसंघाच्या सोयीसाठी मुंबई - काजीपेठ आणि पुणे - काजीपेठ गाड्या सुरू केल्या. आणि या दोन्हीही गाड्यांना जनरल कोटा तिकीटे थेट वर्धेपर्यंत उपलब्ध आहेत. वर्धेनंतर पुलगावपासून या गाड्यांचा पूल्ड कोटा सुरू होतो. म्हणजे बल्लारशाह, चंद्रपूर, भांदक, वरोरा, हिंगणघाट, वर्धा इथल्या प्रवाशांना पुण्याला / मुंबईला जायला पूर्ण गाडीच्या उपलब्धतेचा पर्याय असतो.
मला वाटत, विदर्भ एक्सप्रेसलाही गोंदिया ते चांदूररेल्वे पर्यंत जनरल कोटा मिळाला तर तिचे "विदर्भ" नाव सार्थ होईल.
(विदर्भ एक्सप्रेसच्याच जवळपास वेळेत अमरावतीवरून मुंबईसाठी रोज सुपरफास्ट गाडी आहे म्हणून चांदूररेल्वेपर्यंतच्याच प्रवाशांची जास्तीत जास्त सोय व्हावी हा दृष्टीकोन.)
आता दिल्ली सराय रोहिला ते छिंदवाडा पाताळकोट एक्सप्रेस नव्या झालेल्या मार्गाने नागपूरपर्यंत पळवली आहे. आम्ही नागपूरकर तर गोंदिया - रायगड जनशताब्दी, गोंदिया - बरौनी (साप्ताहिक एक्सप्रेस), गोंदिया - हावडा (सुट्टी विशेष गाडी) आणि बल्लारशाह - सिकंदराबाद एक्सप्रेस नागपूरपर्यंत पळवून आणण्याची वाट बघतोय.
डेक्कन क्वीन नंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची लाडकी पंचवटी एक्सप्रेस. ही गाडी सुरू झाली तेव्हा मुंबई - नाशिक होती. पण मनमाड्च्या रेल्वे वर्कशॉपच्या कर्मचार्यांनी हिला मनमाडपर्यंत पळवली. तशीच गत गोदावरी एक्सप्रेसची झाली. तपोवन एक्सप्रेसची झाली. आता तपोवन एक्सप्रेस तर नांदेड पर्यंत वाढवल्या गेली.



मुंबई - पुणे प्रवासासाठी डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड या गाड्या असताना फ़क्त मुंबई - नाशिक साठी एकही गाडी नाही हे दुर्दैव आहे. गोदावरी आणि पंचवटी या दोन्ही गाड्या ९५ % नाशिकलाच भरतात आणि परतीच्या प्रवासात नाशिकलाच रिकाम्या होतात. तरीही मनमाडवाल्यांच्या दादागिरीमुळे मनमाडपर्यंत धावतात.
या पळवापळवीमुळे गाड्यांची नावे निरर्थक ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरूवातीला औरंगाबाद - मुंबई धावणारी "देवगिरी एक्सप्रेस" आता थेट सिकंदराबादपर्यंत वाढवलीय. त्यातल्या किती तैलंगी प्रवाशांना "देवगिरी" या महाराष्ट्राच्या १२ व्या शतकापर्यंतच्या राजधानीविषयी काही माहिती असेल ? अर्थात मराठी प्रवाशांनाही काही माहिती असण्याची शक्यता कमीच आहे म्हणा.
तशीच समरसता एक्सप्रेस. तिला काही लोक समर सता असे अज्ञानाने म्हणतात. पण १९९८ ला ती सुरू झाली तेव्हा चैत्यभूमी मुंबई आणि दिक्षाभूमी नागपूरची समरसता साधणारी गाडी म्हणून आली होती. ममताबाईंनी ही गाडी पुरूलिया मार्गे हावड्याला पळवली आणि तिच्या नावाचा संदर्भच हरवला.
या समसरता एक्सप्रेससोबतच तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईकांनी मुंबई - हावडा "ज्ञानेश्वरी" सुपर डिलक्स एक्सप्रेस सुरू केलेली होती. पण हाय रे दैवा !
रेल्वेतल्या कुठल्यातरी अमराठी अधिकार्याने इंग्रजीत "Dnyaneshwari" ऐवजी "Jananeshwari" असे स्पेलिंग टाकले आणि ज्ञानेश्वरी एक्सप्रेसची "जन्नेश्वरी" एक्सप्रेस झाली. मराठी माणसांच्या मनाचा तथाकथित मानबिंदू वगैरे वगैरे असलेल्या कालनिर्णयमधेही चक्क २०१३ पर्यंत या गाडीचा "जन्नेश्वरी" म्हणून उल्लेख होत होता. या नावाची कुठली तरी देवी बिहार - बंगालकडे आहे ही बर्याच मराठी प्रवाशांची नंतर नंतर समजूत होत गेली. आत्मविस्मरणाचे हे किती दुर्दैव !
असो, या प्रकरणावर एखाद्या ग्रंथाचे लेखन होईल एव्हढा मालमसाला आहे. पण या माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन इथेच थांबतो.
- हाच लेख थोड्याच दिवसात व्हाॅटसअॅपवर माझ्या नावाशिवाय किंवा इतर कुठल्यातरी चौर्यकर्मी लेखकाच्या नावाने मलाच पहायला मिळेल याची खात्री असलेला सभ्य लेखक राम प्रकाश किन्हीकर.

Sunday, July 19, 2020

एका खादाडाची स्थानिक खाद्यभ्रमंती.

उन्हाळा संपत आला की बाजारात भोकरं येतात.
भोकराचे लोणचे ही माझ्या खाद्यजीवनातील खूप वर्षांपासूनची "मर्मबंधातली ठेव" आहे.
आता नवनवीन वैद्यकीय संशोधने जाहीर होऊन भोकर हे प्रकृतीला (विशेषतः रक्तातील प्रवाहीपणा चांगला ठेवायला) अतिशय उपयुक्त आहे हे वाचून तर भोकरांचे लोणचे अतिशय आवर्जून घरी खाल्ले जाते.


तसेच संशोधन श्रावण महिन्यातल्या विशेष रानभाजी काटवले (कंटुर्ले, काटवळ) या फळभाजीविषयीही जाहीर झाले. (ही भाजी हृदयाचे आरोग्य चांगले राखते म्हणे) आणि आमच्या बालपणी फारशी प्रतिष्ठा नसलेली ही रानभाजी चक्क २०० ₹ प्रतिकिलो एव्हढी महाग झाली. आमच्या बालपणी श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी संध्याकाळच्या जेवणात ही भाजी (आणि करवंदांचा मेथांबा) जणू दंडक असल्यासारखीच असायची. त्याकाळी (तत्कालीन मानकांनुसारही) ती फारशी महाग नसायची.
शिरपूर मुक्कामी असताना एका मिठाईच्या दुकानात ठेवलेल्या एका पॅकेटवर मला आवळ्यासारखे चित्र दिसले. मी प्रचंड आवळाभक्त असल्याने ती नेमकी काय वस्तू आहे हे बघायला दुकानदाराला ती वस्तू मागितली. त्याने दिली.
त्यावरचे नाव वाचून मी चाट पडलो. "लिसोडा अचार"
भोकरांना हिंदीत एखाद्या शिवीसारखे "लिसोडा" नाव दिल्याचे पाहून त्या भाषेविषयीचा आदर एकदम कमी झाला.


बरं, त्या टुटुमाईच्या शेंगांचे (या शेंगांचे वृक्ष फक्त चंद्रपूर, गडचिरोली आणि उत्तर तेलंगणात आहेत) लोणचे तर विदर्भातल्या खूप लोकांनी खाल्ले असेल म्हणा. अगदी एवंगुणविशिष्ट अशाच त्या असतात.
टुटुमाईच्या शेंगा आणि तिळ व तांदळाच्या पिठाची दातफोड चकली ही विदर्भाला आपल्या मावशीकडून (तेलंगाणा) मिळालेली देणगी आहे.
असो,
मग काय मंडळी ? करताय ना भोकराचे लोणचे या उन्हाळ्यात ?
- भोकरडोळ्या असलेला आणि सध्या टुटुमाईच्या शेंगेसारखा सडसडीत होण्याचा प्रयत्न करणारा स्थानिक खाद्यपदार्थांचा चाहता राम (भोजन) भाऊ.

Saturday, July 18, 2020

भाषासमिक्षा आणि खटकणा-या गोष्टी.

एखाद्या समारंभाच्या शेवटी कुणीही पसायदान म्हणायला लागले की आमच्या नकळत आम्ही सावरून बसतो. प्राण कानात येतात.
पूर्ण पसायदान छान म्हणून झाल्यावर "येथ म्हणे श्री विश्वेशरावो" ऐवजी "येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो" ऐकले की सचिन तेंडुलकर चांगला खेळत असताना अचानक मॅकग्राच्या एखाद्या आऊटस्विंगरवर स्लिपमधे कॅच देऊन परतल्यासारखे वाटते. पहिले पसायदान लता मंगेशकरांकडूनच ऐकल्याचे परिणाम.
अगदी तसेच सभेत, लिखाणात कुणीही "one of the" या वाक्ययोजनेनंतर singular form वापरला की वाटते.
"One of my student" कधीच व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही, "One of my students" "one of the teachers" "one of the leaders" असे plural forms च बरोबर हे समजावून सांगताना आपली दमछाक होते.
बरे हे समजावणे विद्यार्थ्यांना असते तर ठीक होते पण काही काही कुलगुरू पदावर पोहोचलेल्या व्यक्तीही "one of the म्हटल्यावर एकवचनच येईल ना ? अनेकवचन कसे ?" असा वाद घालताना पाहिल्यात की निराशा, हतबलता, चीड दाटून येते.
५ वी ते ७ वी मराठी माध्यमात शिकूनही, English as a third language शिकवताना आमच्या शिक्षकांनी आमच्यावर जी मेहेनत घेतली ती या काँन्व्हेंटमध्ये शिकलेल्या, English as a first language शिकणार्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांनी का घेतली नसेल ? हा प्रश्न अस्वस्थ करून जातो.
असो,
- आपला देशी क्रीडा आणि भाषासमीक्षक रामनाथ गंझगिरी.

Friday, July 17, 2020

कायदा आणि फ़ायदा. (अर्थात अध्यात्मातला)

आपल्या परिचयातल्या पती पत्नींची गाठ पडली आणि आपण पहिल्यांदा त्यातल्या पतीची तारीफ़ केली तर पत्नीची कळी खुलते. ती प्रसन्न होते. पण हेच उलट झाले तर ? पतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यांदा पत्नीची तारीफ़ केली तर त्या पतीला क्रोध येण्याची शक्यता असते. आणि पती नाराज तर पत्नीही नाराज.
म्हणून महालक्ष्मीच्या पूजेआधी भगवान विष्णुंचे स्मरण करावे असे शास्त्रकार सांगतात. श्रीसूक्ताआधी पुरूषसूक्त म्हटले जावे असाही शास्त्रांचा दंडक.
पण या नियमाला अपवाद आहेत. जर ती स्त्री आपली आईच असेल तर तिच्याकडे आधी वशिला लावला म्हणून बाबा रागावणार नाहीत. ब-याचशा गोष्टी बाबांकडे जाण्याआधी आईने मंजूर केल्यात तर बाबांचा होकार ही औपचारिकताच असते, हो ना ? अशीच आपल्या संतांची भावना असते.
ती जगज्जननी भलेही इतरांसाठी सौख्य संपत्ती आदि भौतिक गोष्टींची दात्री असेल आणि तो भलेही जगन्नियंता वगैरे असेल. पण आपले मायबाप आहेत म्हटल्यावर मग इतर सगळे मुद्दे बा्जूलाच पडतात ना हो.
शास्त्रकारांकडे सर्वत्र कायदाच कायदा असतो आणि संतांच्या सहवासात असा फ़ायदाच फ़ायदा असतो.
- "पंढरपुरी आहे माझा मायबाप" ही आरती मनापासून आवडणारा आणि तशीच भावना असणारा बालक राम.


Thursday, July 16, 2020

मराठी मा्णसाच्या मराठीपणाचे निष्कष.

अरे मराठी माणसांनो,
हिंदीच्या आणि बाॅलीवुडच्या प्रभावात "काश्मीर" चा काना खाऊन "जपान" ला चिकटवलात ?
त्याबरोबरच "गुडी" पाडवा आणि गणपती "बप्पा" म्हणणार्यांना महाराष्ट्राचे नागरिकत्वच नाकारायला हवेय.
— कुणी मराठी माणसाने "कश्मीर" "जापान" "गुडीपाडवा" किंवा "गणपतीबप्पा" म्हटल्यावर प्रचंड चीड येणारा एक मराठी. (मार्शल आर्ट ज्ञात.)


Wednesday, July 15, 2020

काल आणि आज. कोण होतो आम्ही ? काय झालो आम्ही ?

भोजनानंतर किंवा कुठल्याही अल्पोपहारानंतर (शुध्द भाषेत नाश्त्यानंतर) मुखारोग्यासाठी अत्यंत शास्त्रीय आणि उपयुक्त
उत्तराषोषणम (आपोष्णी घेणे),
हस्तप्रक्षालनम (हात धुणे),
मुखप्रक्षालनम (तोंड धुणे - खळखळून चूळ भरणे),
आचमनीयम (आचमन करणे),
या अशा सगळ्या क्रिया आपण पूजेपुरत्याच राहू दिल्यात.
प्रत्यक्षात मात्र कोमट लिंबूपाण्यात बोटे बुडवून (फिंगर बाऊल), तोंड कागदी नॅपकीनने पुसायला लागलो. या सर्व अशास्त्रीय प्रकाराला पाश्चात्यशरण दृष्टीकोनातून प्रतिष्ठेचे मानीत आलोत.
एकेकाळी पाहुण्यांना जेवणानंतर हात धूवून झाल्यावर, हाताला घासायला (कदाचित जेवणातल्या पदार्थांचा वास जावा म्हणून असेल) चंदनाची उटी देण्याइतपत आपण समृध्द होतो. (करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि)
आता मात्र संतूरच्या चंदन फ्लेवर्ड हँडवाॅशवर आपण समाधान मानतोय.
असो, कालाय तस्मै नमः.
- पूजाविधान प्रत्यक्ष जीवनात जगून जीवन समृध्द करू इच्छिणारा पुराणमतवादी, पुराणा रामभाऊ (डाॅ.मुरलीमनोहर जोशी समर्थक)


Tuesday, July 14, 2020

आठवणींचा हिंदोळा

निवांत बसलेलो असताना कुठल्या वेळी काय आठवेल ? याचा नेम नाही.
आज असाच निवांत असताना आम्ही सांगोल्यात घालवलेली वर्षे आठवली. महिन्याभराच्या किराणा आणि इतर खरेदीसाठी महिन्यातून एकदा तरी सोलापूर किंवा सांगलीची फेरी व्हायचीच.
सांगलीत विश्रामबागेतल्या दांडेकरांच्या किराणा मॉलमध्ये काऊंटरवर पापडाच्या लाट्या ठेवलेल्या असायच्यात. किराणा घेऊन बिल देताना सगळ्यात शेवटी त्यांची खरेदी व्हायचीच. आणि सांगोल्यापर्यंतच्या दीड पावणेदोन तासांच्या प्रवासातच त्यांचा फडशा पडायचा. बालपणी आई, मावशी, आजी पापड लाटत असताना आत शिरून "नको नको" चा धोशा असताना पळवून खाल्लेल्या लाट्यांची आठवण दाटून यायची.
एका आठवणीतून दुसरी, दुसरीतून तिसरी.... मनाचा आवाका आणि ताकद किती विचित्र आणि प्रचंड आहे, नाही ?

- पापड लाट्यांच्या नॉस्टाल्जियात रमणारा, राम.


Monday, July 13, 2020

सांभाळ ही तुझी लेकरे...

अध्यात्मात आपल्याला आलेले आत्मिक अनुभव सगळ्यांना सांगणे
आणि
दुसर्याच एखाद्याचे अध्यात्मिक लेखन / विचार स्वतःच्या नावावर खपवणे.
या दोन्हींचा हेतू एकच. आपल्याला लोकांनी "फार अध्यात्मिक आहे" असे म्हणावे ही इच्छा.
इथले सगळे तुमची "अध्यात्मिक" म्हणून वाहवा करतीलही पण ज्याच्यासाठी हे सगळे व्याप चाललेयत, तो कन्हैय्या तुमच्यापासून खूप जन्म दूर जाणार हे नक्की.
- स्वतःचे लेखन इतर अनेकांच्या नावावर खपवलेले बघण्याचा भरपूर अनुभव गाठी असलेला, बापुडा रामभाऊ.

Sunday, July 12, 2020

Promote local to global by being vocal.

आपल्या भारतीयांमधे जेव्हढे स्थितीस्थापकत्व (Inertia) आहे तेव्हढेच आपण गतीसारही आहोत. या प्रमेयाचा ताजा प्रत्यय आज आला.
आता हेच बघा ना. करोना आला. आपले सगळे दैनंदिन उद्योग प्रभावित झालेत. केशकर्तनालये बंद पडलीत आणि गेली तीन महिने केशकर्तनासारखी अत्यावश्यक गोष्ट आपल्यापैकी बहुतांशी जणांच्या आयुष्यातून नाहीशी झाली.
आता गेल्या आठवड्यापासून केशकर्तनालयांना परवानगी मिळाली. आज तिथे गेलो तेव्हा आपण भारतीय कुठलीही नवीन गोष्ट किती लवकर आत्मसात करतो आणि तिच्याशी जुळवून घेतो याचे प्रात्यक्षिकच पहायला मिळाले.
१. प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर.

२. पूर्णपणे झाकणारा गाऊन, हँडग्लोव्हज आणि मास्क बांधून एखाद्या सर्जनची आठवण करून देणारा माझा केशकर्तनकार मित्र.

३. माझ्यासारख्या प्रत्येक गिर्हाइकांसाठी वापरण्यात येणारा डिस्पोझेबल कटिंग गाऊन.
४. कटिंग आटोपल्यावर खांद्यांवर, मानेवर पडलेले केस झटकण्यासाठी नेहमीच्या ब्रशऐवजी चक्क ब्लोअर.


५. कैची, वस्तरा इत्यादी साधने बुडवून ठेवण्यासाठी सॅनिटायझरचे द्रावण.


६. माझी कटिंग सुरू असताना एक गिर्हाईक दाढीला डाय (!) करण्यासाठी आले तेव्हा त्याला स्पष्ट आणि नम्र शब्दात नकार.
(बाकी साठीत वगैरे असतानाही दाढीला डाय वगैरे करून घेणार्या माणसाबाबत "गुलछबु" ह्या एकाच शब्दाचा पर्याय मनात येतो.)
हे सगळे पाहून कौतुक वाटले.
आपण सर्वसामान्य भारतीय किती पटकन एखाद्या परिस्थितीचे आकलन करून तिच्याशी जुळवून घेतोय हे पाहून सकल भारतीय मनोवृत्तीचा अभिमान वाटला. Survival of the fittest मधे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा समाजच टिकत असतो आणि प्रगती करत असतो.
- एक अस्सल भारतीय राम प्रकाश किन्हीकर.