Sunday, July 19, 2020

एका खादाडाची स्थानिक खाद्यभ्रमंती.

उन्हाळा संपत आला की बाजारात भोकरं येतात.
भोकराचे लोणचे ही माझ्या खाद्यजीवनातील खूप वर्षांपासूनची "मर्मबंधातली ठेव" आहे.
आता नवनवीन वैद्यकीय संशोधने जाहीर होऊन भोकर हे प्रकृतीला (विशेषतः रक्तातील प्रवाहीपणा चांगला ठेवायला) अतिशय उपयुक्त आहे हे वाचून तर भोकरांचे लोणचे अतिशय आवर्जून घरी खाल्ले जाते.


तसेच संशोधन श्रावण महिन्यातल्या विशेष रानभाजी काटवले (कंटुर्ले, काटवळ) या फळभाजीविषयीही जाहीर झाले. (ही भाजी हृदयाचे आरोग्य चांगले राखते म्हणे) आणि आमच्या बालपणी फारशी प्रतिष्ठा नसलेली ही रानभाजी चक्क २०० ₹ प्रतिकिलो एव्हढी महाग झाली. आमच्या बालपणी श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी संध्याकाळच्या जेवणात ही भाजी (आणि करवंदांचा मेथांबा) जणू दंडक असल्यासारखीच असायची. त्याकाळी (तत्कालीन मानकांनुसारही) ती फारशी महाग नसायची.
शिरपूर मुक्कामी असताना एका मिठाईच्या दुकानात ठेवलेल्या एका पॅकेटवर मला आवळ्यासारखे चित्र दिसले. मी प्रचंड आवळाभक्त असल्याने ती नेमकी काय वस्तू आहे हे बघायला दुकानदाराला ती वस्तू मागितली. त्याने दिली.
त्यावरचे नाव वाचून मी चाट पडलो. "लिसोडा अचार"
भोकरांना हिंदीत एखाद्या शिवीसारखे "लिसोडा" नाव दिल्याचे पाहून त्या भाषेविषयीचा आदर एकदम कमी झाला.


बरं, त्या टुटुमाईच्या शेंगांचे (या शेंगांचे वृक्ष फक्त चंद्रपूर, गडचिरोली आणि उत्तर तेलंगणात आहेत) लोणचे तर विदर्भातल्या खूप लोकांनी खाल्ले असेल म्हणा. अगदी एवंगुणविशिष्ट अशाच त्या असतात.
टुटुमाईच्या शेंगा आणि तिळ व तांदळाच्या पिठाची दातफोड चकली ही विदर्भाला आपल्या मावशीकडून (तेलंगाणा) मिळालेली देणगी आहे.
असो,
मग काय मंडळी ? करताय ना भोकराचे लोणचे या उन्हाळ्यात ?
- भोकरडोळ्या असलेला आणि सध्या टुटुमाईच्या शेंगेसारखा सडसडीत होण्याचा प्रयत्न करणारा स्थानिक खाद्यपदार्थांचा चाहता राम (भोजन) भाऊ.

No comments:

Post a Comment