Thursday, July 2, 2020

नित्यनैमित्तिक उपासना : एक चिंतन

नित्यनैमित्तिक उपासना करीत असताना (माझ्यासकट) सर्व साधकांनी भाव जागृत ठेवला पाहिजे. उपासनेत यांत्रिकता, उरकशास्त्र येऊ देता कामा नये.
श्रीगणपती अथर्वशीर्ष हा प्रत्यक्ष गणपतीशी संवाद आहे. या भावनेनेच ते सदैव म्हणायला हव. अंघोळ करता करता, प्रवासात मार्गक्रमण करताना (घरी वेळ मिळाला नाही ही सबब सांगत) अथर्वशीर्ष म्हणणे म्हणजे त्यातला भावच हरवणे, असे नव्हे काय ?
जी काही नित्यनैमित्तिक स्तोत्रे, मंत्र आपण उच्चारतो ती ऐकायला ते ते उपास्यदैवत हजर आहे अशी आपली भावना आहे का ? नसेल तर तो मंत्र, ते स्तोत्र म्हणणे हा केवळ उपचारच राहणार, नाही का ?
"न कळत पद अग्नीवरी पडे,
न करी दाह असे कधीही न घडे"
या शास्त्रोक्तीनुसार भावाविना केलेल्या उपासनेचीही फळे मिळतील पण आपली उपासना आपल्या दैवताच्या चरणी लगोलग रूजू व्हायला हवी असेल तर त्या उपासनेत भाव असल्याविना गत्यंतर नाही.


परमेश्वराजवळ सकल ऐश्वर्य आहे पण खर्या भक्तीभावाचा तो सदैव भुकेला आहे. कारण हा भाव दुर्मिळ आहे.
मग परमेश्वर आपला पुत्र, भ्रात, सखा असेल तर त्याला ही दुर्मिळातून दुर्मिळ भेटवस्तू आपणच दिली पाहिजे, नाही का ? बर या भेटीसाठी भौतिक साधने काही नकोत. आपले शुध्द अंतःकरण आणि त्यातला शुध्द सात्विक भाव एव्हढेच पुरे.
"यानंतर सगळ्या नित्यनैमित्तिक उपासनेत मी भाव ओतण्याचा १०० % प्रयत्न करेन."
मग करायचा हा निश्चय आज आत्ताच ?
- आजच्या प्रभातचिंतनात स्फुरलेले विचार. राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment