Showing posts with label copyright:Ram Kinhikar. Show all posts
Showing posts with label copyright:Ram Kinhikar. Show all posts

Sunday, May 10, 2026

ताडोबा भटकंती, नर्मदा परिक्रमा आणि चारधाम यात्रा

प्रकाश आमटेंनी त्यांच्या वाॅलवर टाकलेला चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मागे,  जीपमधून खाली उड्या टाकून मोबाईल घेऊन फोटो आणि व्हिडीओजसाठी धावणार्‍या अति मूर्ख माणसांचा एक व्हिडीओ बघितला. तो वाघ बिचारा या कोलाहलात घाबरून पळून गेला म्हणून. जर त्याने बिथरून त्या भेकड जमावावर हल्ला केला असता तर, सगळ्यांच्या धोतरांचे पितांबर झाले असते.


चैत्रात नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा केल्याचे अनेकांचे अनुभव वाचलेत, परवापासून इथल्या एका ताईंच्या परिक्रमेचा रोजचा अहवाल वाचतोय. "आज सकाळी मैय्यात अंघोळ केली, पूजा करून निघालो, सकाळी या आश्रमात हा नाश्ता, दुपारी त्या आश्रमात अमुक अमुक पदार्थांचे जेवण, माझ्या मनात आज पुरणपोळी खायचे होते तिथे नेमकी पुरणपोळीच वाढत होते, बघा मैय्या आपल्या भक्तांची इच्छा किती आणि कशी पुरवतेय ते !, संध्याकाळी अमक्यातमक्या आश्रमात आसन लावले, चहा बिस्कीटे आणि रात्री आलु पुरीचा बेत होता." वगैरे वगैरे. हे सगळे भोग तर आपण घरीही छान घेऊ शकतो की. मैय्याच्या परिक्रमेत किती अंतर्मुख झालो, किती तिचे मानसिक सान्निध्य अनुभवले, किती तिथल्या निसर्गातल्या खूप सकारात्मक विचारांशी आपण जोडले जातोय, किती त्या वातावरणाचा भाग होऊन आपण स्वतःच मैय्यारूप, शिवरूप होतोय या प्रश्नाचे उत्तर नाहीच.


त्यात तर एका ट्रॅव्हल कंपनीने ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी आठवडाभराची मैय्या परिक्रमा "आरामदेह एसी स्लीपर कोच"ने व राहण्याची, भोजनाची फाईव्ह स्टार व्यवस्था अशी जाहिरात वाचली...


केदारनाथच्या दर्शनरांगेत मुंबईच्या लोकलशी स्पर्धा करणारी गर्दी पाहिली आणि...


एकच विचार मनात तरळून गेला की निसर्गाचे संवर्धन व्हावे, माणसांचा निसर्गाला त्रास कमी व्हावा आणि सगळ्या सृष्टीचा दुवा घ्यावा असे सरकारला वाटत असेल तर किमान किमान किमानताडोबा जंगल सफारी चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा यावर पुढली काही वर्षे संपूर्ण बंदी घालावी.


चारधाम आणि ताडोब्यातल्या ज्या मंडळींच्या उपजिवीका या पर्यटनावर अवलंबून आहेत, (परिक्रमेत तिथल्या स्थानिकांची उपजिवीका परिक्रमावासियांमुळे चालत नाही. उलट हे असे माजोरी आणि पर्यटक परिक्रमावासी तिथल्या स्थानिकांवर बोझ बनून राहतात. ते मैय्याकाठचे कायम निवासी असल्याने सात्विक रूजुतेने ते बोलत नाहीत तरी त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट आपण होऊ द्यायला नको.), त्यांना सरकारने पर्यायी उपजिवीका उपलब्ध करून द्यावी किंवा लाडक्या बहिणींसारखे अक्षरशः दरमहा चांगली रक्कम देऊन त्यांना सावरून धरावे.बस करा रे आता हा माजोरेपणा, निसर्गात ढवळाढवळ करून आनंद घेण्याचा पुण्य कमावण्याचा मूर्खपणा. Enough is really enough.


- "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" या श्रीतुकोबांच्या उक्तीशी आणि"सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला" या संत गाडगेबाबांच्या उक्तीशी प्रामाणिक असलेला सर्व संतांच्या पायीचा एक यःकश्चित कण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Monday, January 19, 2026

परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल

प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेव्हढे आवडते तेव्हढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणा-या या दोन्हीही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे

अ) परिक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे (Invigilation Duty)

आ) परिक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे


माझ्या माझ्या बाबतीत मी या दोन्हीहीवर उतारा काढलाय. पर्यवेक्षण सुरू असताना जे आवश्यक काम आहे (परिक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांवर सह्या, बारकोडस चिटकवणे, परिक्षाविषयक इतर नोंदी करणे वगैरे) ते साधारण अर्ध्या तासात संपवून उरलेला दीड. अडीच तास हा अगदी आपला आपला वेळ असतो. या वेळात मी माझ्या लिखाणासंबंधी चिंतन करतो. एखादे टिपण घ्यावेसे वाटले तर जवळच्या छोट्या डायरीत टिपून घेतो. मनात खूप दिवसांपासून घोळत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करायचा असेल तर या वेळासारखा दुसरा वेळ नाही. हा वेळ मी असा सत्कारणी लावतो.


आणि परिक्षा झाल्याझाल्या पेपर्स तपासून घेतले म्हणजे मग पेपर तपासणीचे कामसुद्धा कंटाळवाणे होत नाही हा माझा अनुभव आहे. अशा प्रकारे शिक्षकी पेशातल्या या टाळाव्याशा वाटणा-या पण टाळता न येणा-या बाबींवर मी माझा माझा तोडगा काढलेला आहे.


या पर्यवेक्षणादरम्यान माझ्या मनात या परिक्षा पद्धतींबाबत कायमच एक प्रश्नचिन्ह तयार होत असते. आजची आपली पारंपारिक परिक्षा पद्धती ही कालबाह्य होतेय का ? आणि होत असली तर सर्वांनाच हे पटूनही त्यावर उपाययोजना का होत नाही ? हा मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.


पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला माझा विरोध नाही. ज्या ज्या देशांनी, संस्कृतींनी पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला पहिल्यापासून झुगारून दिलेले आहे त्यांच्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झालेत ? ते आपण आज बघतोय. पाठांतरावर आधारित परिक्षा पद्धती हवीच पण ती पदवीला प्रवेश घेईपर्यंत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा मेंदू पाठांतरावर छान तयार व्हायला हवा. 


पदवी परिक्षेत मात्र पाठांतरावर भर नकोय. पदवीच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच. पदवी मिळवतोय म्हणजे जो विषय आपण पदवीसाठी निवडलाय त्यात मला कौशल्य प्राप्त करायचेय. मग त्यात आपली पारंपारिक परिक्षा पद्धती थिटी पडतेय असे मला ठामपणे वाटत आलेले आहे. या सर्व परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठांतर परिक्षे ऐवजी त्यांनी त्या विषयातले किती कौशल्य अर्जित केले याचे मूल्यमापन व्हावे असे मला वाटते. आणि आजचा काळ हा सर्वार्थाने या सर्व बदलांसाठी अनुकूल असताना तर हे करणे अत्यंत सोपी आहे. फ़क्त कुणीतरी तसा ठाम निर्णय घेऊन तसे पाठबळ या नवविचारांना द्यायला हवे.


कोरोना काळात घरी बसल्या बसल्या, महाविद्यालयात रोजचे जाण्यायेण्याचे तास वाचल्याने, फ़क्त थेअरी लेक्चर्स घ्यायचे असल्याने प्रात्यक्षिकांचे तास वाचल्याने उरलेल्या वेळात आपल्यापैकी ब-याच जणांनी Coursera सारख्या ऑनलाईन माध्यमावर अनेक विषय शिकले. मी पण त्यातलाच एक होतो. माझ्या विषयाव्यतिरिक्त मी अनेक नवीन तंत्रज्ञान त्या माध्यमातून शिकलो. त्या अभ्यासक्रमात अनेक तज्ञांची व्हिडीयो लेक्चर्स असतात, त्यांच्या नोटस दिलेल्या असतात. आपण ते बघायचे आणि आपल्याला कळलेय की नाही हे बघायला त्यांच्या परिक्षा द्यायच्यात. परिक्षा पण ऑनलाईनच. परिक्षेदरम्यान त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण त्यांचे व्हिडीयो बघू शकतो, नोटस वाचू शकतो. कारण शेवटी ही परिक्षा आपल्या आकलनाची असते आपल्या पाठांतराची नव्हे. आणि परिक्षेतले प्रश्न सुद्धा नोटस वाचून, व्हिडीयोज पाहून त्यातून थेट उत्तरे देण्यासारखे नसतात. परिक्षेतले प्रश्न सुद्धा आपल्या आकलनावर आधारित असतात आणि ब-याचशा विषयांमध्ये पास होण्यासाठी चक्क ८० टक्के गुण मिळवायचे असतात. समजा एखाद्या दिवशी आपण त्या परिक्षेत तेव्हढे गुण प्राप्त करू शकलो नाही तर पुन्हा २४ तासांनीच ती परिक्षा पुन्हा द्यायला मिळते तोपर्यंत तो पेपर आपल्या कॉम्प्युटरवर पुन्हा उघडत नाही. २४ तासात पुन्हा तेव्हढे ज्ञान प्राप्त करायचे, तेव्हढे आकलन प्राप्त करायचे आणि मग परिक्षा द्यायची. मला ही पद्धत फ़ार आवडली.


आज मी संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता वगैरे क्षेत्रातले विद्यार्थी आजच्या पारंपारिक परिक्षा पद्धतीत प्रोग्रॅमिंगचे पेपर्स लिहीताना बघितले की त्यांची, त्यांचे पेपर्स तपासणा-यांची आणि या एकूणच परिक्षा पद्धतीची कीव येते. एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कागदावर लिहीताना तो नीट चालतोय की नाही हे त्या विद्यार्थ्याला कसे कळणार ? तो प्रोग्राम बरोबर लिहीलाय की नाही हे त्या पेपर तपासणा-याला तरी कसे कळणार ? हे माझ्यापुढ्चे गहन प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्यांची अशी Coursera पद्धतीची परिक्षा झाली असती तर तो प्रोग्राम चालतोय की नाही हे त्यांचे त्यांनाच कळले असते. त्यातल्या चुका कशा काढायच्या याचे कौशल्य त्यांचे त्यांनीच मिळवले असते. यात परिक्षकाची भूमिका फ़क्त तसा पेपर देण्याची आणि अशा ऑनलाईन माध्यमात जर व्यवस्थित नियोजन केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच काठिण्यपातळीचे पण वेगवेगळे प्रोग्राम्स लिहायला सांगता येऊ शकेल त्यामुळे एकमेकांचे बघून लिहीणे वगैरे प्रकार टळू शकतील.


आजकाल तर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून अनेक सॉफ़्टवेअर कंपन्या विद्यार्थ्यांची घरबसल्या परिक्षा घेत असतात. एकाच वेळी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांची. त्यात त्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या विंडो व्यतिरिक्त दुसरी विंडो (गूगल, चॅट जीपीटी वगैरेला विचारण्यासाठी) नुसती उघडली तरी त्या विद्यार्थ्याची परिक्षाच रद्द होते. त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉप / डेस्कटॉपचा कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या  हालचाली टिपत असतो. थोडीही संशयास्पद हालचाल, बोलणे त्यात दिसले की एक वॉर्निंग येते आणि त्या वॉर्निंगला भीक न घालता आपण आपले चुकीचे काम सुरूच ठेवले तर त्या विद्यार्थ्याची ती परिक्षा रद्द होते. 


हे आधुनिक तंत्रज्ञान आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना अगदी परवडण्यासारखे आहे. मग आजकालच्या युगातल्या परिक्षा अशा स्मार्ट पद्धतीने का होऊ नयेत ?


नरसी मोनजी विद्यापीठात अध्यापन करीत असताना माझे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीतला एक अत्यंत कठीण विषय शिकवीत असत. भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी (Geotechnical Engineering). पारंपारिक परिक्षा पद्धतीत या विषयासाठी खूप फ़ॉर्म्युले, खूप डेरिव्हेशन्स, खूप संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो. नरसी मोनजी विद्यापीठात या विषयाची "ओपन बुक" परिक्षा व्हायची. त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, नोट्स वापरण्याची मुभा असायची आणि पेपरमध्ये नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स न विचारता (नाहीतर विद्यार्थ्यांनी ते सगळे सरळ पुस्तकांमधून पाहून लिहून टाकले असते.) एखाद्या फ़ाऊंडेशनचे डिझाईन करायला विचारले जात असे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून, आय एस कोडमधून त्या डिझाईनची प्रक्रिया बघून दिलेल्या डेटावरून डिझाईन करायचे असायचे. ते विद्यार्थी पदवी घेऊन आपापल्या क्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांना एखादे फ़ाऊंडेशन डिझाईन करायचे असले तर त्यांच्याकडे संदर्भासाठी पुस्तके, आय एस कोडस असतीलच. फ़क्त त्यांचा वापर करून डिझाईन कसे करायचे ? हे कौशल्य त्यांना त्या अभ्यासक्रमात शिकवायचे आहे. आणि म्हणूनच त्यांची तशी परिक्षा घ्यायची आहे हे माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले होते. किती अभिनव कल्पना ! अभियांत्रिकीसोबतच इतरही सगळ्याच पदवी परिक्षांसाठी या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिकवले गेले आणि तशा पद्धतीने त्यांच्या परिक्षा घेतल्या गेल्यात तर विद्यार्थ्यांचा किती कौशल्यविकास होईल, नाही ? नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स ही थेअरी लक्षात ठेऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठे आणि कसे वापरायचे हे कौशल्य मिळत नसेल तर परिक्षेत चांगले गुण मिळवूनसुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात त्याला आणि समाजालाही होणार नाही.


आणखी एक मुद्दा. वर्षभर शिकवून वर्षाअखेर एका तीन तासांच्या परिक्षेत त्या विद्यार्थ्याचे ज्ञान जोखण्याची जुनी पद्धती कशाला ? वर्षभर त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात किती प्रोजेक्टस केलेत, किती संशोधन केले, किती विविध कौशल्ये आत्मसात केलीत, त्याची आकलन क्षमता किती आहे ? ह्याचे गुणांकन त्या त्या वेळी त्या त्या शिक्षकाने केले तर शेवटी ही परिक्षा घेणे हेच कालबाह्य ठरेल. हे त्या त्या शिक्षकांना हे जोखू द्यात ना. अंतिम तीन तासाच्या परिक्षेचा आणि त्या विद्यार्थ्याने वर्षभर केलेल्या मेहेनतीचा संबंध आपल्याला तोडता येणार नाही का ?


बरे या अंतर्गत मूल्यमापनात हे शिक्षक जर भेदभावपूर्वक वागणूक करीत असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्याची यंत्रणा अगदी सहज उभारता येऊ शकते. असलेल्या कौशल्यापेक्षा जास्त मूल्यमापन करण्याचे एखाद्या संस्थेने ठरविले आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचे ओव्हरव्हॅल्युएशन केले तर ती एक केवळ कागदी सूज ठरेल. कारण असे ओव्हरव्हॅल्युड विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी त्या त्या कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जातील तेव्हा त्यांच्या या फ़ुगवलेल्या गुणांचे पितळ उघडे पडेल आणि त्या त्या महाविद्यालयाची, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात येईल. याउलट आकसापोटी जाणूनबुजून एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण प्रदान करणा-यांवरही महाविद्यालयांतर्गत, विद्यापीठांतर्गत कठोर अंकुश ठेवण्याची यंत्रणा राबवता येईल.


थोडक्यात काय ? आजची लक्षात ठेवण्याची क्षमता तपासणारी पारंपारिक परिक्षा पध्दती आपल्याला विद्यापीठातल्या पदवी स्तरापासून पुढे नक्की टाळता येऊ शकते. त्याऐवजी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्याची पद्धती आणायला आजच्या युगात फ़ार श्रम पडणार नाहीत. गरज आहे ती शिक्षणतज्ञांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची आणि त्यांना सरकारमधल्या, विद्यापीठामधल्या, समाजातल्या सर्वच घटकांकडून मिळणा-या अगदी सकारात्मक सहकार्याची. 


जायचेय मग पुढे ? करायचीय नव्या युगाला सुरूवात.


आपल्या अनेकविध मतांचे स्वागत.


- गेली अडीच तपे अध्यापन क्षेत्रात असलेला आणि या क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्यास इच्छूक असलेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१९ जानेवारी २०२६  


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Saturday, April 6, 2024

आकर्षणाचा नियम




आकर्षणाचा नियम


असतात ज्यांची घरे,

पाणवठ्यांजवळ, धरणांजवळ, कालव्यांजवळ.


असतो त्यांच्याच मनात कायम ओलावा,

मुलाबाळांविषयी, नातेवाईकांविषयी

प्राणीमात्रांविषयी, वृक्षवल्लींविषयी

आणि

स्वतःविषयी ही.


हे जितके खरे

तितकेच याच्या उलट, याचा converse


ज्यांच्या मनात असतो अपार,

समस्त सृष्टीबाबत कायम ओलावा.

ज्यांच्या डोळ्यांमधून झरतो,

समस्त दुःखितांविषयी अपार अश्रूपाट


कायम नांदते पाणी त्यांच्याच घरी

कामना करते पाणी कायम तिथेच राहण्याची.


कारण


आकर्षित करणार शेवटी पाण्याला पाणीच.


मग ते 


नदीतले पाणी मनातल्या पाण्याला असो

किंवा

डोळ्यातले पाणी घरच्या आडाच्या पाण्याला असो.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

(०६/०४/२०२४)


Monday, July 13, 2020

सांभाळ ही तुझी लेकरे...

अध्यात्मात आपल्याला आलेले आत्मिक अनुभव सगळ्यांना सांगणे
आणि
दुसर्याच एखाद्याचे अध्यात्मिक लेखन / विचार स्वतःच्या नावावर खपवणे.
या दोन्हींचा हेतू एकच. आपल्याला लोकांनी "फार अध्यात्मिक आहे" असे म्हणावे ही इच्छा.
इथले सगळे तुमची "अध्यात्मिक" म्हणून वाहवा करतीलही पण ज्याच्यासाठी हे सगळे व्याप चाललेयत, तो कन्हैय्या तुमच्यापासून खूप जन्म दूर जाणार हे नक्की.
- स्वतःचे लेखन इतर अनेकांच्या नावावर खपवलेले बघण्याचा भरपूर अनुभव गाठी असलेला, बापुडा रामभाऊ.

Tuesday, July 7, 2020

MSRTC in different liveries. Imagination - 8.



Ganga Kaveri express was announced in 1977 budget. It was connecting Varanasi with Rameshwaram.
(Varanasi to Madras beach BG and Madras beach to Rameshwaram MG. Similar experiment was with H. Nizamuddin - Madgaon Goa Express. H. Nizamuddin to Miraj BG and Miraj to Madgaon MG)
In earlier days, Ganga Kaveri express (BG) had this distinct livery of Blue + Orange livery.
How about MSRTC's Ganga Kaveri express ? or (Goda - Purna express connecting Nashik / Shirdi / Aurangabad / Nanded with Akola / Buldhana / Malkapur / Karanja.
Drawing credit to my daughter, Mrunmayi.

Monday, July 6, 2020

MSRTC in different liveries. Imagination - 7.


Indian Railways had all its common train coaches (except some special trains)painted in rust red colour for about 140 years.
In late 90s they adopted this blue + sky blue livery for its common express / mail / passenger trains.
How about painting our MSRTC in this livery ?
Drawing credit to my daughter, Mrunmayi.

Sunday, July 5, 2020

MSRTC in different liveries. Imagination - 6.



Rajdhani - One of the prestigious brand of trains was inaugurated in 1969. First Rajdhani express ran between Howrah and New Delhi and later in 50 years almost all the state capitals were connected with national capital by the respective prestigious air conditioned, superfast luxury services.

During earlier days (prior to advent of LHB), all Rajdhani trains have a distinct livery of Red / Orange with Cream / yellow bands. Even they had loco sets matching with their livery. A few prestigioys trains like Tamilnadu express, Grand Trunk Express, Keral - Karnataka Express, Andhra Pradesh Express had this livery in the era of 70s and 80s.

In 1995, when Shivsena - BJP government captured treasury benches of Maharashtra Legislative assembly, they had a "big" decision of painting yellow band on MSRTC with Saffron one to show their Saffron connection.

I sincerely feel this livery would had been a better choice for them to showcase their feelings.
Here is an attempt to imagine MSRTC buses in different liveries.

Sixth in the series is ICF Rajdhani Express livery.

Other experiments following soon. Stay tuned.

Drawing credit to my daughter, Mrunmayi.

Thursday, July 2, 2020

नित्यनैमित्तिक उपासना : एक चिंतन

नित्यनैमित्तिक उपासना करीत असताना (माझ्यासकट) सर्व साधकांनी भाव जागृत ठेवला पाहिजे. उपासनेत यांत्रिकता, उरकशास्त्र येऊ देता कामा नये.
श्रीगणपती अथर्वशीर्ष हा प्रत्यक्ष गणपतीशी संवाद आहे. या भावनेनेच ते सदैव म्हणायला हव. अंघोळ करता करता, प्रवासात मार्गक्रमण करताना (घरी वेळ मिळाला नाही ही सबब सांगत) अथर्वशीर्ष म्हणणे म्हणजे त्यातला भावच हरवणे, असे नव्हे काय ?
जी काही नित्यनैमित्तिक स्तोत्रे, मंत्र आपण उच्चारतो ती ऐकायला ते ते उपास्यदैवत हजर आहे अशी आपली भावना आहे का ? नसेल तर तो मंत्र, ते स्तोत्र म्हणणे हा केवळ उपचारच राहणार, नाही का ?
"न कळत पद अग्नीवरी पडे,
न करी दाह असे कधीही न घडे"
या शास्त्रोक्तीनुसार भावाविना केलेल्या उपासनेचीही फळे मिळतील पण आपली उपासना आपल्या दैवताच्या चरणी लगोलग रूजू व्हायला हवी असेल तर त्या उपासनेत भाव असल्याविना गत्यंतर नाही.


परमेश्वराजवळ सकल ऐश्वर्य आहे पण खर्या भक्तीभावाचा तो सदैव भुकेला आहे. कारण हा भाव दुर्मिळ आहे.
मग परमेश्वर आपला पुत्र, भ्रात, सखा असेल तर त्याला ही दुर्मिळातून दुर्मिळ भेटवस्तू आपणच दिली पाहिजे, नाही का ? बर या भेटीसाठी भौतिक साधने काही नकोत. आपले शुध्द अंतःकरण आणि त्यातला शुध्द सात्विक भाव एव्हढेच पुरे.
"यानंतर सगळ्या नित्यनैमित्तिक उपासनेत मी भाव ओतण्याचा १०० % प्रयत्न करेन."
मग करायचा हा निश्चय आज आत्ताच ?
- आजच्या प्रभातचिंतनात स्फुरलेले विचार. राम किन्हीकर.

Sunday, June 28, 2020

महाराष्ट्रीय वरणफ़ळे आणि तिबेटी थंपून

त्या डालगोना काॅफी मुळे आठवले.
साधारण ४ वर्षांपूर्वी शिरपूर मुक्कामी, एका संध्याकाळी, हा तिबेटियन थंपून चा प्रयोग करून बघितला होता. खूप सुंदर चवीचा हा पदार्थ बनला होता.
साधी गोष्ट. आपल्या आईने केलेली चविष्ट वरणफळे, वरणात न उकळता, चिनी साॅसमध्ये (रेड चिली, ग्रीन चिली, सोया आणि व्हिनेगर) उकळलीत की झाले थंपून तयार.
सुटसुटीतपणे होणारा आणि थंडीच्या रात्रीसाठी पोटाला उबदार असणारा हा शुध्द शाकाहारी पदार्थ.


मला प्रकर्षाने वाटत, बर का, की रागांच्या जशा वेळा असतात तशा पदार्थ खाण्याच्याही वेळा असतात.
ही वरणफळे दुपारच्या जेवणात चालत नाहीत असे थोडीच आहे ? भैरवी दुपारी ऐकली तर कान थोडेच फाटणार आहेत. पण जसा भैरवीचा मजा उत्तर रात्रीनंतरच्या फिकुटल्या पहाटेत, तशीच वरणफळांची मजा पावसाळी संध्याकाळीच.
बाकी वरणफळे ( ही खावीत ती आपापल्या आयांच्या हातचीच) पावसाळ्यात सरत्या संध्याकाळी किंवा चढत्या रात्री (८ ते ९ च्या मध्ये) च खावीत. बाहेर पावसाने सूर धरलेला असावा. वातावरणात सुखद गारवा नुकताच आलेला असावा आणि ताटातल्या वाफाळत्या वरणफळाचा घास तोंडात जावा. वा !.
अशावेळी साक्षात परमात्मा जरी प्रसन्न होऊन समोर उभा ठाकला आणि "वत्सा, तुला त्रिभुवन घेऊन टाक. मला ही वरणफळे दे." असे म्हणाला तरी "गोपालकाल्याप्रमाणेच वरणफळे हा सुध्दा मनुष्यमात्रांचाच विशेषाधिकार आहे. देवमंडळींनी ती खायला मनुष्यावतारात प्रकट व्हावे." असे त्याला ठणकावून सांगण्याची हिंमत वरणफळेच देऊ शकतील.
- आपला श्रीकृष्णभक्त, पण श्रीरामानुयायी अध्यात्मिक शेफ रामचंद्र तिबेटी फ्यूजने.

Saturday, June 27, 2020

स्वानुभवातून आलेले नैमित्तिक चिंतन

प्रपंच नेटका करणे म्हणजे कर्तव्यबुध्दीने करणे. त्यात लिप्त होऊन आणि तेच साध्य मानून करणे नव्हे.
प्रपंचातल्या सुखांमध्ये गुंतून जाण्याचा उपदेश करायला संत कशाला लागतात ? ती तर नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पण आपले अंतिम साधन काय ? याची जाणीव करून द्यायला संतच लागतील.
सर्व संसार सोडून हिमालयात जाऊन परमेश्वर प्राप्त करून घेणे म्हणजे २७५ वर २ गडी बाद असताना पीचवर येऊन शतक झळकवण्यासारखे आहे.
पण संसारात राहून, तो नेटका करून, त्याच्यातल्या तापत्रयांना सांभाळून, अखेर त्यात लिप्त न होता, परमेश्वर प्राप्तीची साधना करणे म्हणजे ६ बाद १२० असा स्कोअर असताना बॅटींगला येऊन आपल्या टीम ला ३२५ चा विजयी आकडा गाठून देण्यासारखे आहे.
म्हणूनच नेटका प्रपंच करून परमेश्वर आराधना करणार्या संसारी जनांना आपल्या शास्त्रांमध्ये संन्यासाश्रमाचे फळ सांगितलेले आहे.
- राम किन्हीकर

Friday, June 26, 2020

खाद्यभ्रमंतीतील काही खास स्थळे.

मी एक प्रवासी पक्षी आहे आणि तो सुध्दा खादाड. प्रवासात उत्कृष्ट कुठे काय मिळत ? याचा शोध सतत सुरू असतो.
नागपूरवरून पुण्याला किंवा सांगोल्याला जाताना दरवेळी देऊळगावराजा इथल्या चैत्रबन ढाब्यावरच थांबायचो. किंबहुना जेवणाच्या वेळेत आपण देऊळगावराजालाच असलो पाहिजे या हिशेबानेच प्रवासाची आखणी दरवेळी व्हायची.
शिरपूर जि. धुळे इथे असताना बर्याच फेर्या मुंबई, पुणे, सातारा, सांगली इथे झाल्यात. दरवेळी NH 3 ने मालेगाव मार्गेच गेलो.
धुळे मालेगाव रस्त्यावर मालेगावच्या बरोबर २० किमी आधी हा "साई कार ढाबा" आहे. इथे ट्रक्सना थारा नाही.

अस्सल गावराणी तुपातली, गुळाची पुरणपोळी, खापरावर भाजलेले मांडे. अप्रतिम चव.

धाब्याचे धोरण.
इथले वातावरण इथे एकदा तरी गेल्याशिवाय कळणार नाही. अस्सल खान्देशी , अत्यंत सात्विक पदार्थ इथे असतात. दरवेळी मुंबई, पुण्याला जाता येताना इथे थांबायचेच असे नियोजन करून आम्ही निघायचो.


केवळ मनातले मांडे खाऊ नका. प्रत्यक्षच खा.


भर उन्हाळी दुपारचा ऐसपैस निवांतपणा.
एकदा शिरपूरवरून पहाटे ५ वाजता निघावे लागले. इथे साधारण पावणेसातच्या सुमारास होतो. नाश्त्यासाठी गावठी मटकीची उसळ आणि गरमागरम कांदाभजी. ती सकाळ मी विसरूच शकत नाही.
काही ध्येयधोरणे ठेऊन मराठी माणसांनी चालविलेली ही प्रतिष्ठाने. चैत्रबन आणि साई कार. प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी अशीच.
- आपला खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ रामचंद्रपंत.

Thursday, June 25, 2020

करोना आणि आपल्या सवयी

करोना नंतर जग बदलणार असे सगळी सगळी मंडळी बोलताहेत खरे....
पण मला एक प्रश्न पडलाय
कागदांचा गठ्ठा दिसला की पान उलटवण्यासाठी....
किंवा
नोटांची गड्डी दिली की मोजण्यासाठी....
विनाविलंब आपली तर्जनी किंवा मधले बोट पटकन जिभेकडे नेणारी मंडळी कोरोनाच्या भीतीने तरी सुधारणार आहेत का ?
- शाळेतही पाटी पुसण्यासाठी स्पंज आणि पाण्याची छोटी बाॅटल घेऊन जाणारा गुणी विद्यार्थी,
कुमार राम प्रकाश किन्हीकर, वर्ग १ला.

Tuesday, June 23, 2020

किती भार घालू रघूनायकाला ?

शास्त्रकार म्हणतात,
"मांजर आडवे गेल्यावर आपले काम होत नाही या विश्वासापेक्षा,
श्रीरामनाम जपामुळे माझे काम नक्की होईल हा विश्वास मोठा वाटायला लागला की आपण भक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणून समजावे."
"एकांतात असताना कदाचित आपल्याला भूत दिसेल या भीतीपेक्षा,
माझ्या साधनेच्या योगाने माझ्या सदगुरूंचे दर्शन नक्की होईल याची खात्री मोठी झाली की आपण भक्तीमार्गावर चालायला लागलोय हे पक्के समजावे."
"आपण मांजराचे, भुताचे भक्त आहोत की श्रीरामांचे, सदगुरूंचे भक्त आहोत ? हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवायचे आहे."
हे विचार आज आठवण्याचे कारण म्हणजे दररोज संध्याकाळी उपासनेत श्रीसमर्थांचा
"किती भार घालू रघूनायकाला ?
मजकारणे शीण होईल त्याला."
हा श्लोक म्हणतोय खरा पण लक्षातच येत नव्हते की त्या सर्वशक्तीमान रघुनंदनाला आपण असा कुठला शीण देणारा भार वहायला लावतोय ते ?
त्या प्रश्नाचे उत्तरही आज संध्याकाळच्या श्रीरामरक्षेत मिळाले.
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षयाशुगनिषंग सङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम ।
"प्रभू श्रीराम आणि त्यांचे भ्राता लक्ष्मण या दोघांनीही माझ्या समवेत सदैव असून माझे रक्षण करावे" ही एका भक्ताची अपेक्षा आपण रोजच प्रभू श्रीरामांकडे व्यक्त करतो. सदैव आपल्यासोबत, आपल्या रक्षणासाठी, सज्ज अवस्थेत रहाण्याचा हा एकप्रकारचा शीणच आपण प्रभूंना देतोय हे आपल्या लक्षात येतय का ?
म्हणून एक अपराधीपणाची बोचणी आपण
"किती भार घालू रघूनायकाला..."
म्हणून व्यक्त करतोय असे नाही वाटत ?
।। जय श्रीराम ।।
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

Saturday, June 20, 2020

एक अंगलट आलेले साहस. एका निराळ्या फटफजितीची कहाणी.

बरोबर ३० वर्षांपूर्वींचा प्रवास.
First year engineering चा शेवटचा पेपर संपवून घरी नागपूरला येण्यासाठी कराडवरून महाराष्ट्र एक्सप्रेस पकडलेली.
फक्त १२ बर्थसचा कोटा. एकूण विद्यार्थी ७० च्या आसपास.
मित्रमंडळी आग्रह करीत होती की अरे, आपण एका बर्थवर दोघेदोघे जाऊयात. सगळेच आपले सिंगल हड्डी. जमून गेले असते
पण कराड स्टेशनला एंजिनच्या मागील जनरल + गार्डचा डबा रिकामा पाहिलेले अस्मादिक एका नवीन साहसाच्या तयारीत.


कराड ते पुणे या ६ तासांच्या प्रवासात या ४० माणसांच्या डब्ब्यात फक्त १५ - २० माणसे. मी घेतलेल्या निर्णयावर मी खुश.
रात्री १०.१५. पुणे स्टेशन. आमच्या ४० माणसांच्या डब्ब्यात २०० च्या आसपास गणसंख्येची माणसे ठेचून भरल्यासारखी कोंबल्या गेलीत. "खालून आग वर आग, आग बाजूनी" या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवताहेत. फक्त "आग" शब्दाऐवजी "माणसे" शब्द टाकायला हवा.
दिलासादायक बाब एव्हढीच की मी खिडकीजवळ असल्याने गार वार्याचा आनंद घेऊ शकतोय.
रात्री ११ वाजता पुण्याहून गाडी दौंडकडे हलतेय आणि लघुशंकेची जाणीव होतेय. "गर्दी दौंडला कमी होईलच. मग जाऊन येऊ टाॅयलेटपर्यंत." ही स्वतःच्याच मनाची घातलेली समजूत.
अर्धा प्रवासी आणि अर्धा गार्ड असा डब्बा असल्याने डब्ब्यात एकाबाजूलाच आणि २ च टाॅयलेटस. सर्वसाधारण डब्ब्यांमधे ४ असतात.
रात्री साडेबाराच्या सुमारास दौंड येतय. गर्दी कमी होण्याऐवजी वाढलीय. मी बसलेल्या, पसरलेल्या लोकांच्या अंगाखांद्यांवरून टाॅयलेटपर्यंतचा प्रवास करून येतोय.
टाॅयलेटच्या आतच बसून ७ - ८ मंडळी प्रवास करतायत. त्यांना "बाहेर पडा" म्हणणेही प्रॅक्टीकल नाही कारण बाहेरच्या अवकाशात या ७ - ८ माणसांना सामावून घेईल इतकी जागाच नाही.
डब्ब्याचे दार आतून बंद. दाराबाहेर पुन्हा ५० -६० माणसे आत येण्यासाठी गर्दी करताहेत. दाराला लागून १० माणसे. दार उघडणे अशक्य.
रात्री १ च्या सुमारास गाडी दौंड सोडतेय. आता ही गर्दी मनमाडपर्यंत, पुढले २६० किमी तरी अशीच.
पुन्हा खिडकीपाशी येऊन बसलोय. अस्वस्थ. मघाचे गार वारे आता नकोसे झालेय. प्रत्येक थंडाव्यागणिक अस्वस्थता वाढतेय.
Relativity of Time चा प्रत्यय येतोय. दर १० मिनिटांनी घड्याळ पाहणे सुरू आहे. आणि दर तासातासाने मागील वेळेसारखेच लोकांच्या अक्षरशः अंगा खांद्यांवरून टाॅयलेटचा प्रवास. टाॅयलेटच्या आत बसलेल्यांना माझी अडचण कळतेय पण प्रामाणिक इच्छा असूनही त्यांच्यातला कुणीही काहीही करू शकत नाहीये.
वाढत्या अस्वस्थतेतच पहाट होतेय. "बाॅर्डर" सिनेमातल्या त्या सैनिकांनी जितकी सूर्यकिरणांची वाट पाहिली त्याहून अधिक सूर्यकिरणांची वाट पाहणे सुरू आहे. कारण मनमाड सकाळी ६ वाजता येणार.
मनमाडला आऊटर सिग्नलला ही गाडी नेहमीच थांबते. पण आज थांबल्यावर आलेला रेल्वेचा राग अपूर्व आहे. एव्हाना पोटातली अजिजी, व्याकुळता चेहेर्यावर, डोळ्यांमध्ये येत चाललीय.
शेवटी मनमाड येतेय. प्लॅटफाॅर्मवर शिरताक्षणी अर्धवट धावणार्या गाडीतून निकराची उडी आणि प्लॅटफाॅर्मवर पुढे दिसेल ते स्वच्छतागृह गाठणे.
पुढच्या प्रवासासाठी शयनयान वर्गात मित्रांसोबत बसतोय. त्यांना ही हकिकत सांगितल्यानंतर हशा आणि त्यांची बोलणी वगैरे.
दौंड ते मनमाड हा प्रवास जन्म ते मृत्यू या प्रवासापेक्षा मोठा वाटणारी ती रात्र. आजही त्या आठवणीने शहारा आणणारी.
आज सांगताना मोठी मजा येतेय पण "जावे त्या वंशा तेव्हा कळे".
अर्थात प्रत्येकावर "अशी" एखादी वेळ आयुष्यात कधी न कधी नक्की येतेच.
- जीवनाच्या विविध अंगांना भिडलेला अनुभवी प्रवासी पक्षी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.