भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या बालपणीच गोपींच्या घरांमधून दही, दूध, लोण्याची चोरी केल्याचे अनेक आळ आलेले होते. त्यामुळे चोरीचे आळ त्यांना नवे नव्हते. पण हे सगळे लाडीक आळ होते. भगवंत नंदबाबांच्या समृद्ध घरातले पुत्र होते आणि आपल्या सवंगड्यांसाठी ते बालपणी या चो-या करायचेत पण भगवंत द्वारकाधीश असताना मात्र त्यांच्यावर चोरीचा आळ आला आणि त्याला भगवंतांनी कसे धीरोदात्त्तपणे तोंड दिले हे अभ्यासण्यासारखे आहे.
सत्राजित नावाचा एक तपस्वी क्षत्रिय होता. त्याने खूप मनापासून सूर्योपासना केली. भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झालेत आणि त्याला स्यमंतक नावाचा आपला एक मणि दिला. त्या मण्याचे अंगभूत तेज इतके होते की तो मणि गळ्यात धारण केल्यानंतर सर्व प्रजाजनांना साक्षात सूर्यनारायण आपल्या नगरात प्रगट झाल्यासारखे वाटले. सत्राजिताने तो स्यमंतक मणि आपल्या देवघरात सुपूजित केला आणि त्याची प्रतिष्ठापना केली. रोज तो मणि आपल्या भाराच्या आठपट सोने त्या घरात प्रदान करीत असे आणि तो मणि जिथे राहील तिथे रोग, भय, शत्रू, मानसिक किंवा शारिरीक दोष यांचा लवलेशही राहत नसे. भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला भेटून राज्याच्या व्यापक हितासाठी तो स्यमंतक मणि हा मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे सुपूर्द करायला सांगितले. पण त्या स्यमंतक मणिप्राप्तीचा इतका अहंकार सत्राजिताला चढला होता की त्याला वाटले की माझ्याकडे मणि आहे हे श्रीकृष्णाला सहन होत नाही म्हणून तो हा सल्ला देतोय. त्याने तो सल्ला धुडकावून लावत मणि स्वतःजवळच ठेवला.
एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित हा स्यमंतकमणि गळ्यात परिधान करून घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असताना एका सिंहाने त्याला त्याच्या घोड्यासकट मारून टाकले आणि तो मणि घेऊन सिंह जात असताना त्याची जांबुवताशी झटापट झाली. जांबुवंत अत्यंत पराक्रमी होता त्याने त्या सिंहाला मारून तो मणि हस्तगत केला आणि गुहेत राहत असलेल्या आपल्या लहान मुलांना तो मणि खेळायला दिला.
इकडे प्रसेनजित न परतल्यामुळे सत्राजित शोकाकूल झाला आणि माझ्या भावाचे, प्रसेनजिताचे, स्यमंतक मण्यासाठी अपहरण भगवान श्रीकृष्णानेच केलेले आहे असा आळ त्याने भगवंतावर घेतला. हळूहळू ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. प्रजाजनांमध्ये कुजबूज सुरू झाली. परिस्थितीजन्य पुरावे भगवंताच्या विरोधातच होते. या खोट्या आळामुळे भगवंत दुःखी झालेत पण डगमगले मात्र नाहीत. त्यांनी त्या मण्याच्या शोधासाठी काही प्रजाजन व सैन्य सोबत घेऊन वनात प्रसेनजिताच्या शोधाची मोहीम काढली.
वनात काही अंतर जाताच सिंहाने मारलेल्या घोड्याचे आणि प्रसेनजिताचे अवशेष सगळ्यांना दिसले. प्रसेनजिताला सिंहानेच मारून खाल्ले यावर सगळ्यांचे एकमत झाले. थोडे पुढे जाताच भगवंत जांबुवंतांच्या गुहेत शिरले आणि तिथे त्या स्यमंतक मण्याशी खेळत असलेली अज्ञान अस्वलबालके त्यांना दिसली. भगवंत तो मणि त्या बालकांकडून हस्तगत करण्यासाठी पुढे जाणार तेव्हढ्यात कुणीतरी पुरूष आपल्या गुहेत येऊन आपल्या बालकांना त्रास देतोय असा ग्रह करून घेत जांबुवंत पुढे सरसावला आणि त्याने श्रीकृष्णांशी मल्लयुद्ध सुरू केले. बराच वेळ कुणीही कुणाला हार जाईना. मग त्या दोघांचे मुष्टियुद्ध सुरू झाले. त्यात जांबुवंतावर अनेक मुष्टिप्रहार करून भगवंतांनी त्याचे बळ अगदी क्षीण करून टाकले. त्या युद्धामध्येच जांबुवंताला आपल्या या प्रतिस्पर्ध्याचे पूर्व अवतारातले श्रीरामांचे स्वरूप आठवले. युद्ध सोडून देऊन तो भगवंतांना शरण आला आणि त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. मागील अवतारात मी तुमचा दास होतो आणि म्हणूनच या अवतारात सुद्धा आपण मला दर्शन दिले हे माझे केव्हढे भाग्य अशी त्याने भगवंतांची स्तुती केली आणि स्यमंतक मण्याची कथा ऐकून तो मणि भगवंतांना दिला. सोबतच आपली कन्या जांबवती हिच्याशी भगवंतांचा विवाह करून दिला.
स्यमंतक मणि घेऊन आणि आपली नवपरिणीत वधू घेऊन भगवंत द्वारकानगरीत परतलेत. भगवंतांनी सगळ्या प्रजाजनांना एकत्र सभेत बोलावले आणि स्यमंतक मणि सत्राजिताकडे प्रदान करून स्वतःवरच्या आरोपांचे किटाळ धुवून काढले. सत्राजित मनोमन फ़ारच खजिल झाला. आपण कारण नसताना भगवान श्रीकृष्णाच्या हेतूवर संशय घेऊन फ़ार मोठी चूक केली अशी बोचणी त्याला लागली. त्याने आपली अत्यंत सुशील, सर्वगुणी आणि देखणी कन्या, सत्यभामा ही भगवंतांना दिली. सत्यभामेचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी झाला.
त्यानंतर भगवंताचे विवाह सूर्यदेवांची कन्या कालिंदी, उज्जैन नगरीची राजकन्या मित्रविन्दा, कौशल देशाचा राजा नग्नजित याची कन्या सत्या उपाख्य नाग्नजिती, कैकय देशातल्या श्रीकृष्णांच्या आत्याची, शृतकिर्तीची, मुलगी भद्रा आणि मद्रदेशाची राजकन्या लक्ष्मणा ह्यांच्याशी झालेत. प्रत्येक विवाहानंतर द्वारकेत अत्यंत विधिवत लग्न झालीत आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.
प्रागज्योतिषपूर येथे भौमासूर नावाच्या असुराने अनेक देशातील एकूण १६००० राजकन्यांना बळजबरीने अपहरण करून आपल्या कैदेत ठेवलेले होते. भगवंतांना हे अत्याचारी वृत्त्त कळताच ते सत्यभामेसह गरूडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूर येथे गेलेत. तिथे भगवंतांनी सत्यभामेसह अतुलनीय पराक्रम गाजवून भौमासुराचा वध केला. त्याचा पुत्र भगदत्त्त हा भयभीत होऊन भगवंतांना शरण आला त्याला त्यांनी अनुग्रहित केले आणि भौमासुराच्या तावडीतून त्या १६००० राजकन्यांची सुटका केली.
भगवान श्रीकृष्ण भौमासुराचा वध करून त्याच्या महालात प्रवेश करताक्षणीच त्या बंदिवान राजकन्यांना त्यांचे रूप आणि पराक्रम दिसला. त्या सगळ्या जणी श्रीकृष्णावर मोहीत झाल्यात आणि त्यांनी त्याला आपला पती मानले व मनोमन वरले. त्यामुळे त्या सगळ्यांशी भगवंतांनी विवाह केलेत. त्यांना भौमासुराच्या नरकातून मुक्त करून त्यांचा उद्धार केला. विवाह करून त्या सगळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण एकादशी शके १९४८ दिनांक ९ / ८ / २०२६
९ ऑगस्ट २०२६
No comments:
Post a Comment