वृष्णीवंशीय उद्धव हे कृष्णसखा होते. त्या दोघांच्या दिसण्यात इतके साम्य होते की फ़ार परिचित नसलेल्या कुणालाही उद्धवात श्रीकृष्णाचा भास व्हावा. एकदा मथुरेत श्रीकृष्णांनी उद्धवाला बोलावून घेतले आणि त्यांना व्रजभूमीत जाऊन श्रीकृष्ण परतण्याची वाट बघत असलेल्या नंदबाबा, यशोदामैय्या आणि सगळ्या गोपींना भेटून श्रीकृष्णांचे कुशलवृत्त कळविण्यास सांगितले.
भगवंतांच्या आज्ञेनुसार उद्धव निघालेत. संध्याकाळच्या वेळेस व्रजभूमी जशीजशी जवळ येऊ लागली आणि गोठ्यात परतणा-या गाईंच्या खुरांनी उडालेल्या धुळीने उद्धव आणि त्यांचा रथ जसेजसे झाकले जाऊ लागलेत तसेतसे उद्धवाच्या मनात अत्यंत पुलकित भाव उमटू लागलेत.
नंदबाबांनी उद्धवांचे यथोचित स्वागत केले आणि श्रीकृष्णाचे कुशलवृत्त त्यांना विचारले. उद्धवांनी आपल्या व्रजभूमीत येण्याचा हेतू त्यांना निवेदन केला आणि श्रीकृष्णाचे कुशल त्यांना सांगितले. ते ऐकून आणि श्रीकृष्णाने आपल्यासोबत घालवलेले त्याचे बालपण आठवून नंदबाबा आणि यशोदामैय्या भावविभोर झालेत. त्यांच्या डोळ्यांना लागलेल्या अश्रूधारा थांबेचनात. प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी येऊन आपल्या मुलासारखा राहिला आणि आपल्याला त्याच्या दैवी शक्तीची जाणीव झाली नाही या भावनेने तर ते दोघेही अधिकच गहिवरलेत.
उद्धव नंदबाबा आणि यशोदामैय्याची समजूत काढताना म्हणालेत की श्रीकृष्ण हा केवळ तुमचाच मुलगा नव्हता. तो सकल विश्वाचे पालन पोषण करणारा आणि म्हणूनच सकल विश्वाचा पुत्र आहे. सकल विश्वाला तारणारा असा तो आहे. तो सर्वत्र आहे. केवळ लीलारूपाने हे परब्रह्म तुमच्या घरी तुमच्या पुत्ररूपाने राहिलेत हे तुमचे किती मोठे भाग्य ! सकल विश्वाचा मायबाप होऊन
राहणा-या या भगवंताचे मायबाप होण्याचे भाग्य तुम्हाला लाभले असे भाग्य इतर कुणाला लाभणार ? तो भगवंत अजूनही तुमचेच गुणगान गातोय. ज्या भगवंताचे सगळे जग गुणगान करतात तो भगवंत स्वतः तुमचे गुणगान करतो आणि तुमचे उपकार स्मरतो आहे याहून अधिक भाग्य ते कुणाचे ! नंदबाबा आणि यशोदामैय्याच्या विरहव्याकुळ हृदयाला याप्रमाणे थोडी शांतता प्रदान करून उद्धव आपल्या पुढल्या कार्याला सज्ज झालेत.
उद्धव त्यानंतर गोपींना भेटण्यास गेलेत. गोपींची अवस्था श्रीकृष्णाच्या विरहात अत्यंत व्याकूळ झालेली होती. श्रीकृष्णांनी सांगितलेले कुशलवृत्त सांगून गोपींचे समाधान करण्याचा प्रयत्न उद्धवांनी केला पण गोपी अधिकाधिक व्याकूळ होत गेल्यात. हळूहळू उद्धवांना गोपींची मनःस्थिती कळली. आणि त्यांची श्रीकृष्णावरील निःसीम प्रेमभक्ती बघून उद्धव भारावून गेलेत. त्यांनी गोपींचे पाय धरलेत आणि ते त्या गोपींची स्तुती करू लागलेत.
उद्धव म्हणाले गोपींनो, अनेक योग्यांना, महात्म्यांना अनंत जन्मे साधना करून जे साधत नाही ते तुम्ही या एकाच जन्मात साध्य केलेले आहे. भगवंतावर प्रेम करणे आणि त्याच्याकडून कसलीही अपेक्षा न करता केवळ त्याच्यावर प्रेम आहे म्हणून प्रेम करीत राहणे ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. ते तुम्ही आपल्या सहज भक्तीने साध्य केलेले आहे. तो श्रीकृष्ण तुमच्या प्रेमाच्या भक्तीमुळे इतका बांधला गेलेला आहे की तो गोकुळ सोडून कुठेही वास करणार नाही. तो गोकुळातल्या चराचरात आहे. तुमच्या आसपास वावरणा-या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे. तो तुम्हा सगळ्यांच्या हृदयात आहे. तुम्हाला त्याचा विरह कधीही शक्य नाही. उलट मी अशी कामना करेन की मला पुढला जन्म हा व्रजभूमीतल्या एखाद्या वृक्षाचा, धूळीकणाचा, पशुचा, पक्ष्याचा किंवा मनुष्याचा मिळावा म्हणजे मलासुद्धा त्या भगवंताचे अविरत सान्निध्य प्राप्त होऊ शकेल.
लौकिक व्यवहारात अडाणी समजल्या जाणा-या साध्यासुध्या गोपींनी केवळ प्रेमामुळे त्या परब्रह्माला आपल्या हृदयात कसे बांधून ठेवले होते तसेच प्रेम आपल्याकडूनही त्या परब्रह्मावर व्हावे आणि आपली जन्मोजन्मींची साधना सफ़ल व्हावी हाच वर आपण या उद्धवप्रसंगातून भगवंताकडे मागूयात. आणि हाच या कथेचा प्रसाद समजूयात.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण अष्टमी शके १९४८ दिनांक ६ / ८ / २०२६
६ ऑगस्ट २०२६
No comments:
Post a Comment