Friday, July 31, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३१ धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे गोपबालकांसह त्यांच्या गाई गुरांना चरण्यासाठी म्हणून वृंदावनालगतच्या रमणीय हिरवळींवर, उपवनांमध्ये घेऊन जात. वनात दररोज गोपबालकांसह अनेक खेळ होत असत. कुस्त्या होत असत. मोठाच आनंद असे.



वृंदावनाजवळच असलेल्या एका रमणीय वनामध्ये धेनुकासूर नावाचा एक राक्षस राहत असे. तो आणि त्याचे बांधव त्या वनातील मधूर आणि रसाळ फ़ळांचे स्वतःच सेवन करीत असत. त्या फ़ळांच्या वासाने आकर्षित होऊन ती फ़ळे घेण्यासाठी कुठलाही मनुष्य़प्राणी त्या वनात शिरला तर तो धेनुकासूर आणि त्याचे दुष्ट बांधव त्या माणसाला मारून टाकत असत. गोपांनी हे वृत्त कृष्ण आणि बलरामदादांना सांगितले आणि त्यांनी त्या धेनुकासुराचा वध करण्याचे निश्चित केले.


हे दोघेही बंधू त्या वनात शिरले. धेनुकासुराला हे कळताच तो गाढवाच्या रूपाने तिथे आला आणि आपल्या मागील पायांनी बलरामदादांवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करू लागला. एक दोन वेळा त्याला चपळ हुलकावणी दिल्यानंतर बलरामदादांनी संधी पाहून त्या धेनुकासुराचे मागील दोन्ही पाय घट्ट पकडले आणि प्रचंड बळाने त्याला गरागरा फ़िरवून त्याच वनात फ़ेकून दिले. आपल्या अंगाखाली अनेक उंच उंच वृक्षांचा चुराडा करीत तो धेनुकासूर जमिनीवर पडून अखेरचे क्षण मोजू लागला. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे इतर बंधू आणि मित्र त्याठिकाणी आलेत आणि कृष्ण बलरामांशी युद्ध करू लागलेत. पण कृष्ण आणि बलरामदादांनी त्या सगळ्यांचा वध केला आणि ते वन सर्वसामान्यांसाठी निर्भय केले. सार्वजनिक संपत्तीला खाजगी मालमत्ता समजून ती इतरांना वापरण्यास मज्जाव करणा-या धेनुकासूर प्रवृत्तीचा श्रीकृष्ण आणि बलरामांनी पाडाव केला.


वृंदावनाजवळून वाहणा-या यमुनेचे पाणी हळूहळू दुषित होत आहे याची जाणीव गोपबालकांना झाली. एकदा तर ते पाणी पिऊन काही गोपबालके मूर्छित पडली होती. भगवान श्रीक्रुष्णांच्या लक्षात यमुनेचे हे प्रदूषण आले. वृंदावनापासून जवळच असलेल्या एका डोहात कालिया नावाच्या अत्यंत विषारी सापाने आश्रय घेतला होता आणि त्याच्यामुळेच यमुनेचे पाणी वृंदावनाजवळ दुषित झाले होते. 



भगवान श्रीकृष्णांनी निर्भयपणे त्या डोहात उडी टाकली आणि कालियाशी भयंकर युद्ध केले. युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून त्यांनी कालिया नागाला हैराण केले आणि सरतेशेवटी त्याच्या फ़ण्यांवर भगवान नृत्य करू लागलेत. आता कालिया मरणार हे जाणून कालियाच्या राण्यांनी भगवंतांची स्तुती केली, त्यांची क्षमा मागितली. भगवंतांनीही कालिया तिथे आला ही कथा जाणून घेऊन त्याला तिथून निघून रमणकद्वीपाजवळ गरूडापासून निर्भय असे स्थान दिले. भगवंतांना वंदन करून कालिया सुखाने आपल्या नव्या निवासस्थानी गेला.


आज आपल्या नद्यांमध्ये कालियापेक्षाही जहाल विषाचे प्रदूषण दररोज होते आहे. हे विषारी पाणी पिऊन अनेक जीव मृत्यूमुखी पडत आहेत किंवा विविध दुर्धर आजारांना सामोरे जात आहेत. सगळ्या क्षेत्रात इतकी प्रगती आपण केली आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा पिण्यायोग्य बनविण्याची प्रगती आपण केली नाही असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. आपण ती सुद्धा प्रगती केली आहे. सिंगापूर या देशाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याजोगे करण्याइतपत त्यांनी सृष्टीची जपणूक केलेली आहे. आपल्याला आज गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची. नद्यांचे प्रदूषण शक्य तितके टाळण्याची आणि प्रदूषण झाले असेलच तर त्यावर योग्य त्या प्रक्रिया करून ते प्रदूषण हटवून नद्या पुन्हा निर्मळ करण्याची.


आपल्या लाडक्या सृष्टीला जिवापाड जपणा-या भगवंताचे आपण खरे भक्त असू तर ही सृष्टी विनाशाकडे वाटचाल करेल असे एकही पाऊल आपल्याकडून उचलले जायला नको आणि सृष्टीसंवर्धनासाठी आपले संपूर्ण प्रयत्न सतत व्हायला हवेत हाच या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद.   


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४८ दिनांक  ३१ / ७ / २०२६


३१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Thursday, July 30, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३० भगवंताच्या वृंदावनातील लीला आणि अनेक असुरांना दिलेली मुक्ती

भगवान श्रीकृष्णांनी पूतना, शकटासूर, तृणावर्त आणि आता यमलार्जून यांना दिलेली मुक्ती गोकुळातल्या गोप गोपींना मोठी आश्चर्यकारक वाटली होती. कृष्णाला सर्वजण आपल्या पुत्राप्रमाणे समजत असल्याने ही त्याचीच लीला असेल अशी शंकाही त्यांना शिवली नाही. याउलट कृष्णावर गोकुळात फ़ार संकटे येत आहेत असे वाटून त्यांनी कृष्णासाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी व गोधनासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू केला आणि गोकुळाजवळच असलेल्या वृंदावनात त्यांनी आश्रय घेण्याचे ठरविले. तिथे भरपूर वृक्षसंपदा होती, जनावरांच्या चा-यासाठी छान हिरवीगार कुरणे होती आणि गोपांना तिथे शांतता जाणवली. आपल्या कुटुंबियांसह, गोधनासह सगळे गोप गोपी वृंदावनात वास्तव्य करण्यास निघाले.


वृंदावनात आल्यानंतर सर्वांना विशेष आनंद झाला. गोपांसोबत गुरे चारण्यासाठी म्हणून कृष्ण आणि बलराम वनात जाऊ लागलेत. वनात गेल्यानंतर गुरे चरायला सोडल्यानंतर गोपांसोबत त्यांचे विविध खेळ रंगू लागलेत. रमविणारा राम आणि आकर्षिणारा कृष्ण हे दोघेही सोबत असल्याने गोपबालक त्यांच्या अवतीभोवतीच आपली दिनचर्या आखत असत. गोधन चरत असताना कृष्ण सुंदर मुरली वाजवीत असे. ती मुरली वाजत असताना गाईगुरे आपापला चारा खाणे विसरत असत आणि मुग्ध होऊन तो दिव्य सूर कानात साठवून घेत असत. दुपारच्या वेळी गोप आपली बांधून आणलेली शिदोरी कृष्ण आणि बलरामदादांसोबत खात असत. कृष्ण तेव्हा सगळ्या गोपांच्या शिदोरीतला थोडा थोडा भाग सेवन करीत असे. कधी एखाद्या गोपाने नुसतेच पोहे, नुसतेच लोणचे, नुसतेच दही जेवण्यासाठी आणलेले बघून कृष्ण सगळ्या गोपांना आपापल्या शिदो-या एकत्र करण्यास सांगत असे. सगळ्यांच्या विविध प्रकारच्या शिदो-या एकत्र झाल्यानंतर जो काही विशेष पदार्थ तयार होत असे तो गोपालकाला कृष्ण स्वतः सगळ्या गोपांना आग्रहाने भरवीत असे आणि स्वतःही मोठ्या आनंदाने फ़स्त करीत असे. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी दीनदुःखितांचा कैवारी कृष्ण आपल्या सवंगड्यांकडे किती बारकाईने लक्ष देत असे आणि त्यांच्या सामाजिक समरसतेसाठी काय करीत असे हे आपण आजही अनुकरण करण्यासारखे आहे. आपल्यासोबत कार्यरत असलेल्या चमूकडे जातीने लक्ष देणे, त्यांची सुखदुःखे वाटून घेणे आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे ही आजच्या युगात सुद्धा आचरण करण्याजोगी Leadership Skills आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण भगवंताचे भक्त असू तर तसे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवेत.



या लीला करीत असतानाच वृंदावनात आलेल्या आणि अजगराचे रूप धारण करून गोपबालकांना इजा पोहोचवू इच्छिणा-या अघासुराचा भगवंतांनी वध केला. दुष्टबुद्धीने भगवंताला मारण्यासाठी विशालकाय बगळ्याचे रूप घेणा-या बकासुराचा वध करून त्याला मुक्ती दिली. अशाच लीला वृंदावनात करीत असताना सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना भगवंतांची परिक्षा बघण्याची इच्छा झाली. भगवंत वनात असताना थोडेसे इतर कामात गुंतलेले पाहून त्यांनी सगळ्या गोप सवंगड्यांना त्यांच्या गोधनासकट वेगळ्या लोकात नेऊन ठेवले. भगवंत परतून बघतात तो सगळे गोप आणि सगळे गोधन अचानक नाहीसे झालेले होते. त्यांनी यामागील ब्रह्माजींची शक्ती ओळखली आणि स्वतःच्या रूपातूनच सगळे गोप बालक आणि त्यांची गोधने निर्माण केलीत. आणि कुठलेही काम न अडता ती सर्व मंडळी त्यादिवशी आपापल्या घरी गेलीत. गोपांनी आपल्या बालकांना हृदयाशी घेतले, गाईंनी त्यांच्या वासरांना पाजायला सुरूवात केली. भगवंतासोबत राहून प्रत्यक्ष भगवंतच आपल्या बालकांच्या रूपाने आपल्याजवळ आलेले आहेत हे त्या कुणालाच कळले नाही. फ़क्त त्यादिवशी आणि त्यानंतर त्या सगळ्या गोपांना आणि बछड्यांना एक विशेष आनंद मिळतो आहे याची जाणीव मात्र सदैव होत होती.



ब्रह्मदेवांनी वर्षभरानंतर हे सगळे अवलोकन केले आणि त्यांना भगवंताची लीला कळली. भगवंत प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि सगळी गोपबालके आणि गोधन पुन्हा पूर्ववत वृंदावनात आणून दिले. या सगळ्या गोपबालकांना आणि गोधनाला गेल्या वर्षभरात काय झाले याची खबरच नव्हती. त्यांनी वर्षभरापूर्वी कृष्णाने मारलेल्या अघासुराची कथा जणूकाय आजच घडली आहे अशा स्वरूपात आपल्या घरी सांगायला सुरूवात केली आणि सगळ्या गोपांना खूप आश्चर्य वाटले. सृष्टीपालनकर्ता भगवंत कधी गरज पडली तर प्रतिसृष्टीची निर्मिती सुद्धा करू शकतो हेच भगवंतांनी या कथेतून सर्वांना दाखवून दिले. वृंदावनात दिवसेंदिवस सर्वत्र आनंदीआनंद पसरत होता.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण प्रतिपदा शके १९४८ दिनांक  ३० / ७ / २०२६


३० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - २९ भगवंतांचे नामकरण आणि यमलार्जून उद्धार

यदुवंशीयांचे आचार्य गर्ग्यमुनी वसुदेवांच्या आज्ञेवरून एकेदिवशी गोकुळात आलेत. नंदबाबांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि त्यांची स्तुती केली. आचार्यांनी आपला गोकुळात येण्याचा हेतू नंदबाबांना सांगितला. नंदाघरी वाढत असलेल्या वसुदेवांच्या दोन्हीही पुत्रांचे नामकरण. पण जर तो नामकरण विधी मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत केला असता तर कंसाच्या गोकुळातील दूतांनी ही बातमी नक्की कंसापर्यंत पोहोचविली असती. कंस मोठ्या अस्वस्थतेने देवकीच्या आठव्या पुत्राचा ठावठिकाणा शोधत होता. त्याला ही वार्ता कळताच त्याने गर्ग्यमुनींद्वारे नामकरण संस्कार झालेले वसुदेवांचे पुत्र सहज ओळखून त्यांना हानी पोहोचविली असती.


गर्ग्य मुनींनी आणि नंदबाबांनी संगनमताने नंदबाबांच्या वाड्यातच एका गोठ्यात जाऊन या दोन्हीही पुत्रांचे नामकरण केले. रोहिणीच्या पुत्राचे नाव रौहिणेय ठेवले. तो आपल्या आसपासच्या सवंगड्यांना आणि सोबत्यांना या जगात रमवेल अशी भविष्यवाणी करून त्याचे दुसरे नाव राम ठेवण्यात आले. तो अत्यंत बलशाली असल्याने त्याला बल असेही नामाभिधान झाले. तो सर्व लोकांमध्ये समबुद्धीने बघेल आणि लोकांमध्ये फ़ूट पडलीच तर तो त्यांचा मिलाप घडवून आणेल म्हणून त्याचे आणखी एक नाव संकर्षण सुद्धा ठेवण्यात आले.


दुस-या पुत्राबाबत गर्ग्यमुनी म्हणालेत की या पुत्राने यापूर्वींच्या जन्मात श्वेत (पांढरा), रक्त (लालवर्णी) आणि पीत (पिवळा) अशी रूपे धारण केलेली आहेत. या जन्मात हा काळा रंग याने धारण केला आहे म्हणून याचे नाव कृष्ण असे ठेवण्यात यावे. वसुदेवांचा पुत्र असल्याने लोक याला वासुदेव म्हणूनही ओळखतील. गर्ग्यमुनी पुढे म्हणाले की या पुत्राची हजार नावे आहेत. प्रत्येक नावाला न्याय देण्यासाठी हा पुत्र ते ते गुण धारण करील. हा प्रत्यक्ष नारायणाचाच अवतार आहे. हा तुमच्या सगळ्यांवर आपली कृपादृष्टी ठेवेल. याचे सान्निध्य, नामस्मरण कुठल्याहे लौकिक किंवा पारलौकिक शत्रूला तुमच्यावर विजय मिळवू देणार नाही.


अशाप्रकारे गुप्ततेत नामकरण विधी आटोपल्यानंतर गर्ग्यमुनी निघून गेलेत. इकडे गोकुळात या दोन्हीही बालकांच्या बाललीला सुरू झाल्यात. छोट्याछोट्या पाऊलांनी रांगताना ते दोघेही घरभर फ़िरत असत. त्यांच्यामागे फ़िरताना, त्यांच्या बाललीला अवलोकन करताना त्यांची जननी आणि समस्त गोपींना मनापासून आनंद होत असे. त्यांचे बोबडे बोबडे बोल ऐकण्यासाठी समस्त गोकूळ अत्यंत व्याकूळ होत असे. थोडेच दिवसांमध्ये ही बालकी मोठी झाली आणि गोकूळातल्या गोपी यांची लाडिक तक्रार घेऊन यधोदामैय्याकडे येऊ लागल्यात.



एकदा यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात मग्न असताना कृष्ण तिच्याकडे आला आणि दूध पिण्याचा हट्ट करू लागला. यधोदामैय्याने त्याला मांडीवर घेतले आणि हातात घेतलेले काम करीतच त्याला दूध पाजण्यास सुरूवात केली. यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात जरा जास्तच मग्न आहे आणि तिचे माझ्याकडे लक्ष नाही हे पाहून भगवंतांनी जवळच असलेला एक लोटा लोण्याच्या घड्याला फ़ेकून मारला आणि तो घडा फ़ोडला. इतक्या मेहेनतीने काढलेले लोणी अशा प्रकारे मातीमोल केल्याचे पाहून यशोदामैय्याला कृष्णाचा राग आला आणि तिने त्याला बांधून ठेवण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी ती धावली तेव्हा तो जवळच असलेल्या उखळात लपून बसला. तिने हीच संधी साधली आणि त्याला उखळाला बांधण्याचे ठरविले.


श्रीमदभागवतकार वर्णन करताहेत की ज्या परमात्म्याला आजवर कुणीही काळाच्या आवाक्यात, शत्रूंच्या तडाख्यात, षडरिपूंच्या तावडीत, ब्रह्मांडात बांधू शकले नाही त्याला त्याची आई तरी कशी बांधेल ? यशोदामैय्याने कृष्णाला बांधायला जावे आणि दरवेळी ती दोरी दोन बोटे कमी पडावी असा खेळ व्हायचा. बरे, तिला जोड म्हणून दुसरी दोरी आणली तर ती सुद्धा अंती दोन बोटे कमीच पडायची. शेवटी यशोदामैया वैतागली आणि तिने कृष्णालाच "कृष्णा, बांधू दे न रे." अशी विनंती केली आणि कृष्ण बांधल्या गेला. श्रीमदभागवतकार सांगताहेत की जो ब्रह्मांडात कुणाच्याही तावडीत कधीच सापडत नाही, हजारो वर्षे तप, ध्यान करून जो अनेक योग्यांना गवसत नाही तो भगवंत भक्तीमुळे, प्रेमामुळे, अकृत्रिम प्रेमामुळे सहज वश होतो आणि भक्ताच्या हृदयात बांधल्या जातो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्वच या घटनेवरून अधोरेखित झालेले आहे. 



भगवंत उखळाला बांधलेल्या अवस्थेतच नंदबाबांच्या अंगणात गेलेत आणि तिथे असलेल्या एका अशोकवृक्षांच्या जोडीमधून बाहेर निसटण्याची लीला करू लागलेत. त्यावेळी त्यांच्या कमरेला बांधलेले उखळ नेमके आडवे झाले आणि त्यांनी त्या वृक्षांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच ते वृक्ष मुळापासून उन्मळून पडलेत. आणि त्यातून दिव्य शरीर धारण केलेले दोन सुंदर कुबेरपुत्र प्रगट झालेत. मागील जन्मात देवर्षि नारदांच्या शापामुळे या दोन कुबेरपुत्रांना हा वृक्षाचा जडदेह प्राप्त झाला होता पण देवर्षि नारदांनीच दिलेल्या उःशापामुळे आज भगवंताच्या हातून त्यांना या जडदेहातून मुक्ती प्राप्त होऊन पुनश्च दिव्यदेह प्राप्त झाला होता. दोघांनीही आपल्या मुक्तीदाता कृष्णाला वंदन केले, त्याची स्तुती गायली आणि ते आपल्या कुबेरलोकात रवाना झालेत.


आपण मनुष्य सुद्धा या जडदेहात आहोत. आसपासच्या अत्यंत भौतिकवादी जगात आपले जगणे, वागणे आणि आपली बुद्धीसुद्धा भौतिकवादी झालेली आहे. यातून सुटण्यासाठी आणि शाश्वत अशाश्वताचा विवेक मनात सदैव जागृत रहावा यासाठी आपल्या मनात भगवंताविषयी भक्तीचे बीज रोवले जाऊन कायमस्वरूपी तिची प्रस्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमदभाववताचा हा बोध आहे आणि तोच या कथेचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढी पौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूपौर्णिमा शके १९४८ दिनांक  २९ / ७ / २०२६


२९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 29, 2026

प्रवासी पक्षाचा एक अत्यंत सुंदर प्रवास

बरोबर १२ वर्षांपूर्वीचा प्रवास.


काही कामांनिमित्त दोन दिवस नागपूरला घालवून सांगोल्याला परत निघालो होतो.


आदल्या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना ६६० किमी साठी १४ तास ४५ मिनीटांचे नियोजन केले होते. 



पण नागपूरवरून निघायलाच जवळपास अर्धा तास उशीर झाला.


खडकीला हनुमंताचे आणि कळंबला चिंतामणीचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा गाडीतले दोन्ही पॅसेंजर्स (सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी) गाढ झोपी गेले होते. गेले दोन दिवस नागपुरात भरपूर भेटीगाठी, भटकंती आणि अपुरी झोप झाल्याचे परिणाम.

आर्णीला गाडीत पेट्रोल भरायला थांबलो तेव्हाही गाडीतल्या प्रवाशांची झोपमोड झाली नाही. मग मुद्दाम नाश्ता, चहासाठी थांबून या दोघींची झोपमोड करण्याचे माझ्या जिवावर आले.


सोबतीला कारच्या स्टिरीओवर भीमसेनजी, मालिनीताई, अभिषेकीबुवा, राशिद खानसाहेब सकाळचे राग गायला होतेच. एकेक बडा ख्याल आणि छोटा ख्याल एकेक तास चालणारा. मग काय ? त्याच सुरांवर तरंगत नाॅनस्टाॅप निघालो. मधे उमरखेड, हदगाव, नांदेड ही गावे कधी लागलीत ? आणि कधी मागे गेलीत ? कुणालाच कळले नाही.


दुपारी साधारण २ च्या सुमारास सौ. वैभवीची झोप उघडली. 

"कुठपर्यंत आलोय ?

नाश्त्याला उमरखेडला थांबायचे ना ?"

अशी पृच्छा झाली.


"बाईसाहेब, नाश्ता विसरा. आता थेट २० किमी नंतर लातूरला जेवायलाच थांबू." माझे विजयी उत्तर.


थांबे घेतघेत गेलो की भरपूर वेळ जातो. तेच थांबे टाळून सर्वसामान्य वेगात जरी गेलो तरी भरभर अंतर कापले जाते याचा वस्तूपाठ देणारा हा प्रवास.


१४ तास ४५ मिनीटांऐवजी १४ तास ९  मिनीटांतच ६५७ किमी सुरक्षितरीत्या गाठल्याची कृतार्थता एका ड्रायव्हर लाच समजू शकेल.



- "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" या वचनावर विश्वास असलेला, लांब पल्याचा सुरक्षित ड्रायव्हर रामराव गाडीवाले. 

कृतज्ञता

परवाच व्हॉटसऍपवर एक लेख वाचला. त्यात आपण सगळ्यांविषयी कृतज्ञ रहायला हवे असा सूर होता. मला ती कल्पना आवडली. जानेवारी २०१२ मध्ये लोकसत्तेत प्रशांत दीक्षितांचा एक लेख आला होता. त्यात प्रसन्न बुद्धीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता वाटण्याजोग्या ५ घटना आठवून लिहून काढायला सांगितलेल्या होत्या. 


या कृतज्ञ शब्दाचा शोध घेत आणखी मागे गेलो तर श्री. विवेकजी घळसासींची २०१० मधली रामकथा आठवली. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या सुरूवातीला नारदांनी महर्षी वाल्मिकींना विचारलेल्या प्रश्नांपासून सुरूवात केली होती. ते प्रश्न साधारणतः असे, 

"॥ को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ? धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ 

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ? विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ? ॥ 

आत्मवान् को जितक्रोधो मतिमान् कोऽनसूयकः ? कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ? ॥ 


(सांप्रत या पृथ्वीलोकावर सध्या कोण गुणवान, वीर आहे ? कोण धर्मज्ञ आणि कृतज्ञ असा आहे ? सर्वभूतांचे हित करणारा आणि चारित्र्यवान असा कोण आहे ? इत्यादी..इत्यादी) आणि त्याला महर्षी वाल्मिकींनी उत्तर दिले होते की "दशरथाचा पुत्र राम".

म्हणजे धर्मज्ञ आणि कृतज्ञ असणे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांच व्यवच्छेदक लक्षण होत तर. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तीमत्वाकडे आपल्याला मानवी गुणसमुच्चयाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणूनच बघाव लागेल.



कृतज्ञ या शब्दाविषयी चिंतन केल तर लक्षात आल की आपण कृतज्ञ म्हणजे "केलेले उपकार स्मरणारा" एव्हढाच मर्यादित अर्थ घेतोय. त्या शब्दाची एक वेगळी छटा आपण लक्षातच घेतलेली नाहीये. कृतज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ "केलेले ज्ञात असणारा / री". ते केलेले कर्म उपकारच असायला हवे असे नाही. कुठलेही केलेले कर्म त्यात येईल. 


आज आपल्या कार्यालयात आपल्या हाताखालील कर्मचा-याने स्वप्रेरणेने कार्यालयासाठी एखादे चांगले कर्म केले तर ते कर्म जर माझ्या लक्षात एक अधिकारी म्हणून राहिले तर मी कृतज्ञ. भलेही ते कर्म हे त्या कर्मचा-याने त्याच्या नियत कर्माचा भाग म्हणून केले असू देत. ते त्याने एक उत्तम केले याबद्दल माझ्या मनात एक अधिकारी म्हणून नोंद घेतल्या गेली की मी कृतज्ञ. तसेच एखादा मुद्दाम आपल्या वाईटावर टपून आपले वाईट योजण्यासाठी काही कर्म करीत असेल तरीही ते कर्म मला ज्ञात असायला हवे आणि मी सावध असायला हवे. तरीही मी "कृतज्ञ" च ठरेन. नाही का ?


मग प्रभू रामचंद्रांमध्ये हे सगळे गुण समुच्चयाने होते का ? अलबत होतेच. त्याशिवाय शत्रूंविषयी पूर्ण माहिती असणारे "रणकर्कश राम" होऊ शकणार नाहीत. तसेच कृतज्ञ राम असल्याशिवाय निषादाधिपती, सुग्रीव, बिभीषण यांचे मित्र आणि शबरीचे प्रभू होऊ शकणार नाहीत.


रामकथा ऐकण्याची फ़लश्रॄती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभूंचा एकेक गुण हळूहळू अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करू. या जन्मात सगळे गुण अंगी बाणले गेले नाहीत तरी जन्मोजन्मीच्या साधनेने प्रभू कृपा करतीलच आणि आपणही मानवी गुणसमुच्चयाच्या सर्वोत्तम आविष्काराकडे पायरी पायरीने का होईना, पोहोचूच.


चढायची मग पहिली पायरी या वर्षी ? करायची कृतज्ञ होण्याकडे सुरूवात ? 


- प्रभूंचेच नाम या देहाला असल्याने त्यांच्याविषयी अपार कुतुहल असणारा, प्रकाशात्मज, वैभवीरमण, श्रद्धाळू राम

Generation Gap Analysis

परवा असाच कशावरून तरी विषय निघाला तेव्हा लेक पटकन म्हणाली "बाबा, तू भोळा आहेस.  लोक तुझ्याशी काही काळापूर्वी कसे वागलेत ? हे तू विसरून जातोस आणि भाबडेपणाने त्याच लोकांवर पुन्हा विश्वास ठेवतोस."

तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला. "स्वतः पाॅझिटिव्ह राहून अशा लोकांना अदखल करून आपली प्रगती साधता आली पाहिजे" वगैरे तिला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला.


आणि मला मी २४ वर्षांचा असतानाचे माझे आणि माझ्या तीर्थरूपांचे अगदी असेच झालेले संभाषण आठवले. मी सुध्दा आमच्या दादांना असेच म्हणायचो. "दादा, तुम्ही भोळे आहात. लोक तुम्हाला फसवतात, तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. पण तरीही तुम्ही त्या सगळ्यांना सोबत घेऊन का चालता ?" वगैरे वगैरे.


मला खात्री आहे की आमच्या तीर्थरूपांचा आणि पितामहांचा सुध्दा असाच संवाद आमच्या तीर्थरूपांच्या पंचविशीत झालेला असेल. आम्हा मुलांसमोर कधी असा संवाद झाला नाही तरी आमचे दादा आमच्या पितामहांविषयी आमच्या काका मंडळींशी बोलताना जे बोलत त्यावरून असाच संवाद त्यांच्या तरूणपणीही झाला असेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

प्रत्येक जुनी पिढी ही अनुभवाने समृध्द असते, जगाचे टक्केटोणपे खाऊन त्यांनी आपापल्या जगण्याची पध्दती शोधली असते, विकसित केलेली असते.


तर प्रत्येक नवी पिढी ही त्या त्या काळाशी खूप सुसंगत असते. सतत बदलणारे जग या नव्या पिढीच्या कायम प्रत्ययाला येत असते. त्यानुसार त्या त्या नवोन्मेषाने जगण्याचा ही प्रत्येक नवी पिढी प्रयत्न करीत असते. या भिन्न विचारी पिढ्यांच्या एकमेकांबद्दल या भावना असणारच. जगण्याची मूळ मूल्ये सारखीच असलीत तरी काही बाबतीत Generation Gap साहजिकच आहे.


- "दोन पिढ्यांमधल्या सुप्त संघर्षाचा मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि कोटुंबिक  दृष्टीकोनातून घेतलेला एक सम्यक आढावा" या शोधग्रंथाचे लेखक आणि GGA (Generation Gap Analysis) या नव्या संज्ञेचे जनक  प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, July 28, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २८ पूतनावध

श्रीकृष्ण गोकुळात वाढतो आहे हा वृत्तांत जाणून कंसाने आपले राक्षसी दूत गोकुळात धाडले. त्यातलीच एक मायावी राक्षसी म्हणजे पूतना. तिने अत्यंत सुंदर सुस्वरूप स्त्रीचा वेष धारण केला आणि अंतरात अगदी काळकूट विष घेऊन ती गोकुळात आली आणि जन्मलेल्या नवजात शिशूंचा शोध घेऊ लागली. तिच्या बाह्य वेषामुळे गोकुळातल्या साध्यासुध्या गोपांना आणि गोपींना तिचा अजिबात संशय आला नाही. अशीच ती पूतना मायावीरूपाने नंदबाबांच्या वाड्यावर आली आणि तिच्यावर संशय नसल्याने ती सरळ अंतःपुरात घुसली.



तिथे तिने श्रीकृष्णाला स्तनपान करविण्याची इच्छा दर्शविली. तोपर्यंत सगळ्या गोकुळात नंदबाबांचा हा लोभसवाणा मुलगा इतका लोकप्रिय झालेला होता की त्याला बघण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याचे लाड करण्यासाठी, त्याला स्तनपान करविण्यासाठी गोपी सदैव उत्सुक असत. त्यामुळे नंदबाबांच्या वाड्यात पूतनेला कुणी अटकाव केला नाही.


पूतनेने श्रीकृष्णाला आपल्या स्तनांशी धरले. शास्त्रकार सांगताहेत त्याक्षणी श्रीकृष्णाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्या मायावी रूपाचे दर्शनसुद्धा भगवंताला नको असते. तिने काळकूट विष लावलेल्या आपल्या स्तनाद्वारे श्रीकृष्णाला दूध पाजण्याचा प्रयत्न केल्याबरोबर श्रीकृष्णांनी तिचे स्तन तोंडात आपल्या घेऊन जोरात आकर्षण करायला सुरूवात केली. इतक्या जोरात की ती महाशक्तीशाली पूतना राक्षसी कळवळली. "अरे, सोड, सोड"असा आकांत करू लागली पण भगवंतांनी एकदा ज्याला धरले त्याला ते कधीच सोडत नाहीत हे त्या राक्षसीला माहिती नव्हते. तिने त्या बालकाच्या तावडीतून सुटण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पण शेवटी आपले महाकाय स्वरूप प्रगट करीत ती मृत्यूमुखी पडली. गोकुळातल्या लोकांनी तिच्या रडण्या ओरडण्याचा आवाज ऐकून नंदबाबांच्या वाड्यात धाव घेतली तेव्हा तिथे मरून पडलेली विशालकाय पूतना आणि तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करणारे नंदबाबांचे हे बालक त्यांना दिसले. 



गोपींनी धावून जात त्या बालकाला पूतनेच्या शरीरावरून उचलले. त्याला न्हाऊ माखू घातले. मोठ्या संकटातून तो वाचला म्हणून बालरक्षा स्त्रोत्र म्हणत त्याची दृष्ट काढली. हे बालरक्षा स्तोत्र सर्व भाविकांनी आपापल्या घरी संग्रही ठेवण्यासारखे आणि आपापल्या मुलांच्या रक्षेसाठी नित्य पठण करण्याजोगे आहे.


इकडे गोपांनी तो पूतनेचा विशाल देह अक्षरशः तुकडे करून वनात नेऊन जाळला. जाळल्यानंतर तो देह जळत असताना त्यातून दिव्य सुगंध बाहेर पडत होता. एका राक्षसीच्या देहातून बाहेर निघणारा हा दिव्य सुगंध अनुभवून सगळ्या गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. पण शास्त्रकार सांगताहेत की भगवंतांना दुष्ट हेतूने का होईना स्तनपान करवून पूतनेने त्यांच्या मातेचा दर्जा प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे तिचा देह दिव्य झाला आणि त्यातून सुगंध बाहेर पडत तो देह नष्ट झाला.


भगवंताचा अगदी द्वेषभावनेने ध्यास घेऊन त्याला भजले तरी त्या जीवाला मुक्ती मिळाल्याची अनेक उदाहरणे श्रीमदभागवतात आहेत. मग आपण जर त्याच्यावर प्रेम करून त्याचा ध्यास घेतला तर तो आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांना का बरे भेटणार नाही ? आपला का बरे उद्धार करणार नाही ?


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध चतुर्दशी, शके १९४८ दिनांक  २८ / ७ / २०२६


२८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




श्रीमदभागवत चिंतन - २७ श्रीकृष्णजन्मोत्सव

भगवान श्रीकृष्णांचा जन्म ऐन मध्यरात्रीच्या सुमाराला झाला तर भगवान श्रीरामांनी ऐन दुपारी जन्म घेतला. याचे अनेक व्यावहारिक अर्थ आपल्याला अनेक संत मंडळी सांगतात. दुपारच्या वेळी पोटात भुकेचा आगडोंब उसळला असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो श्रीरामांची वाट बघतो, त्यांची आराधना करतो त्यालाच श्रीराम मिळतात आणि त्याची तहानभूक हरण करतात. तसेच ऐन मध्यरात्री वासनांनी तनात आणि मनात थैमान घातले असताना जो त्यावर विजय मिळवून भगवान श्रीकृष्णाची आराधना करतो त्यालाच श्रीकृष्ण प्राप्त होतात आणि त्याच्या मनातल्या सर्व वासना घालवून त्याचे मन अगदी निर्मळ करतात. 


काही कवी कल्पना अशा की प्रभू श्रीरामांनी सूर्यवंशात जन्म घेतला आणि भर दुपारी सूर्यनारायणाला प्रथम दर्शन दिले. त्याप्रसंगी श्रीरामांचे मनमोहक बालरूप पाहून सूर्यनारायण आपली चाल चालायचा विसरला आणि एकाच जागी थांबून श्रीरामांचे दर्शन घेत राहिला. त्यामुळे चंद्राला त्यांचे दर्शन उशीरा मिळाले. त्यामुळे चंद्राची दर्शनाची आस पुरविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपला हा अवतार चंद्रवंशीयांमध्ये घेतला आणि चंद्राला आपले प्रथम दर्शन देऊन त्याला पावन केले. कुठल्याही महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या दिवशीचा चंद्रोदयाची वेळ आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यादिवशी चंद्रोदय हा साधारण मध्यरात्रीच्याच वेळी होत असतो. भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचा, भक्ताच्या मनातील भावना पूर्ण करण्याच्या भगवंताच्या प्रयत्नांचा किती सुंदर आविष्कार !


इकडे वसुदेव कारागृहात परतल्यानंतर गोकुळातून आणलेल्या आदिमायेने मोठा टाहो फ़ोडला. कारागृहात पहारा देत असताना झोपे गेलेले सगळे द्वारपाल जागे झाले आणि त्यांनी कंसाला देवकीच्या पोटी नवीन बालकाचा जन्म झाल्याची वार्ता दिली. कंस लगोलग तिथे आला आणि इतर सहाही जणांप्रमाणे त्याने ही छोटी बालिका देवकीच्या कुशीतून ओढून तिला आपटून ठार मारायला निघाला असतानाच ती त्याच्या हातून निसटली आणि तिने विजेसारखी आकाशात जाऊन आकाशवाणी केली, कंसा, तुझा वैरी, देवकीचा आठवा पुत्र, सखेनैव गोकुळात वाढतो आहे आणि तुझा तो नाश करणार हे अटळ आहे. भगवंताची माया ही भल्याभल्या साधू पुरूषांना चकवून गेलेली आहे तिथे कंसासारख्या दुष्टाच्या हाती ती अशी थोडीच लागणार ?


कंस मनातून भयंकर घाबरला. त्याने वसुदेव आणि देवकीची कारागृहातून सुटका केली. त्यांचा यथोचित आदर करून त्यांना मुक्त केले आणि सतत देवकीच्या आठव्याचा ध्यास धरून बसला.


इकडे गोकुळात नंदबाबा आणि यशोदामैय्यांना खूप काळाने पुत्र झाल्यामुळे सा-या गोकुळवासियांना अगदी आनंद झाला होता. व्रजभूमीतल्या सगळ्या घरात अगदी उत्स्फ़ूर्तपणे साफ़सफ़ाई, झाडझूड सुरू झाली. सर्वत्र गोमयाचे सडे घातले गेलेत, सुंदर रांगोळ्या काढल्या गेल्यात. भगवंताच्या व्रजभूमीतल्या आगमनाने सर्व चर आणि अचर सृष्टीसुद्धा मोहरून गेली होती. व्रजभूमीतल्या वृक्षांमधून वाहून वाहून वारा भगवंताची स्तुतीपर गाणी गात होता. त्याच्या गाण्यांनी पुलकित होत सगळे वृक्ष त्याच तालावर डोलत होते. गाई, वासरे आणि व्रजभूमीतल्या गोपांकडले समस्त गोधन छान शृंगारले गेले. त्या गाई वासरांनाही आपल्यासोबत खेळणा-या नव्या सवंगड्याच्या आगमाची वार्ता कळली होती. त्यांचाही आनंद अनावर होत होता.



गोकुळाचे पालनकर्ते नंदबाबा आणि यशोदामैय्या हे इतके प्रेमळ आणि सगळ्या गोपांमध्ये लाडके होते की नंदबाबांचा पुत्र बघायला सगळे गोप गोपी भल्या पहाटे अनेक भेटवस्तू घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी नंदबाबांच्या वाड्यावर जमलेत. भगवंतांना बघितल्यावर त्या गोप गोपींचा आनंद मनात मावत नव्हता. त्यांनी अनेकविध रागांमधून आनंदगाणी गाऊन आपला उत्साह व्यक्त केला. आपल्या घरातले दूध, दही, लोणी ते एकमेकांच्या अंगावर उडवू लागलेत, नाचू लागलेत, आनंदोत्सव साजरा करू लागलेत.



नंदबाबांनीही सगळ्या गोपगोपींचा यथोचित सत्कार केला. भगवंताच्या आगमनापाठोपाठ गोकुळात अष्टसिद्धी आणि नवनिधी आपसूकच आल्यात. भगवंताच्या चरणाशिवाय इतरत्र कुठेही न राहणारी महालक्ष्मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गोकुळात येऊन निवास करती झाली. गोकुळाची भरभराट सुरू झाली. 


आपण सर्व भाविक जनांच्या घरी आणि मनात रोजच पहाटे पहाटे असा नंदोत्सव साजरा झाला तर ? भगवंत आपल्या घरी आला आहे, तो इथे खेळणार, बागडणार आहे ही भावना मनात ठेऊन रोजच सकाळी आपण आपल्या मनात असा आनंदोत्सव साजरा केला तर ? त्या सर्वव्यापी भगवंताला आपले मन कळणार नाही असे थोडेच आहे ? रोज रोज आपण असा मनात उत्सव करीत गेलो तर एके दिवशी तो आपल्या मनात प्रगट होईलही. आणि एकदा त्याने एखादी जागा व्यापली की मग तो तिथून काहीही केल्या जात नाही. आपल्या मनात त्याने कायम ठाण मांडावे यापेक्षा आपल्या इथल्या जीवनाचे अधिक दुसरे कुठले उद्दिष्ट असले पाहिजे. तो आला त्याने आपल्या मनाचा ताबा घेतला. झालेच या जन्मोजन्मोंतरीच्या फ़े-याचे काम. त्याच्या चिंतनातच इथले आयुष्य संपले आणि येरझार संपली की.


करायचा आपल्या मनांमध्ये रोज असा नंदोत्सव, आनंदोत्सव ? 


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १९४८ दिनांक  २७ / ७ / २०२६


२७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 27, 2026

प्रवास: एक अनुभव, एक चिंतन.

जानेवारी २०१३. नागपूरला ३ - ४ दिवस एका समारंभासाठी राहून सांगोला मुक्कामी परतत होतो. नागपूर - अमरावती - कारंजा लाड - मालेगाव जहांगिर - मेहेकर - सिंदखेडराजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर - सांगोला असा साधारण ८०० किमी प्रवासाचा मार्ग होता. 


भल्या पहाटे ४.३० ला नागपूरवरून प्रस्थान ठेवल्याने व वाटेत चहा, नाश्ता वगैरे गोष्टींसाठी वेळ न दवडता सलग ड्रायव्हिंग केल्याने दुपारी १.०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ओलांडल्या गेले होते. ४५० किमी ८ तास ३० मिनीटांत. लांबचे प्रवास अंतर कापायचे तर मधले थांबे कमी आणि कमीत कमी वेळाचे घायचेत हा आमचा नेहमीचा दंडक. म्ह्णून मग सकाळी निघतानाच भरपूर चहा पिऊन, थर्मासभरून चहा आणि कागदी कप्स घेऊन, घरीच बनविलेल्या सॅंडविचेस, ब्रेड बटरसारखा कोरडा नाश्ता घेऊन (म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हरसाहेबांनाही त्या नाश्त्याचा आनंद घेता येईल असा) गाडीतच चालता चालता चहा नाश्ता उरकून सलग गाडी चालवायची असा शिरस्ता.


छत्रपती संभाजीनगर  झाल्यानंतर मात्र सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. आता अहिल्यानगर साधारण ३.०० पर्यंत आणि सांगोला संध्याकाळी ७.३० पर्यंत असे हिशोब डोक्यात आकार घेऊ लागले होते. जेवण्यासाठी एक तास जरी थांबलो तरी सांगोला रात्री ८.३० पर्यंत पोहोचणार होतो. ते चालण्यासारखे होते. अहिल्यानगर सोडल्यानंतर मात्र करमाळा, जेऊर शिवाय थांबून जेवण्यासारखी ठिकाणे नव्हती. करमाळा , जेऊर यायला संध्याकाळच झाली असती. मग अहिल्यानगरच्या आधीच जेवणाचा बेत पक्का झाला.


नेवासे फ़ाटा, घोडेगाव वगैरे गेल्यानंतर हायवेलगतच एक सुंदर ढाबा दिसला. अर्थात शुद्ध शाकाहारी. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, सुंदर संकल्पना आणि मस्त ambience चा. 



थांबलो. झाडांच्या सावलीतच मस्त मांडी घालून, बैठक लावून निवांत जेवण केले. बेत साधासाच होता. झुणका - भाकरी, वांग्याचे मस्त भरीत आणि तोंडीलावणे म्हणून लगतच्याच शेतामधून तोडून आणून चुलीवरच भाजलेल्या मिरच्या आणि टोमॅटो. पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव घेतला. आणि नव्या उर्जेने उरलेला २५० किमीचा सांगोल्याकडचा मार्ग क्रमू लागलो.





पहिल्यापासून नियोजन नसले की कधीकधी अशा अनवट जागा एक वेगळाच अनुभव देऊन जातात, नाही ? या सगळ्या नवनव्या, नित्यनूतन अनुभवांचा स्वतःला शोध लागत जाणे म्हणजेच प्रवासाची खरी मजा. नुसते "क्ष" ठिकाणावरून "य" ठिकाणापर्यंत जाणे म्हणजे प्रवास नाही.


- स्वच्छंद आणि मनमौजी प्रवासी पक्षी, वैभवीवल्लभ राम.

श्रीमदभागवत चिंतन - २६ श्रीकृष्णावतार

श्रीमदभागवताचा दशम स्कंध म्हणजे श्रीमदभागवताचे हृदय समजले जाते. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे चरित्र या स्कंधातल्या ९० अध्यायांमध्ये अतिशय विस्ताराने वर्णन केलेले आहे. इतके विस्ताराने की श्रीमदभागवत हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाचे वाङ्मयीन स्वरूप समजले जाते. श्रीमदभागवताचा दशम स्कंध श्रीगणेशाला वर्णन करताना महर्षी वेदव्यास आपले देहभान विसरले आणि भावसमाधीत गेले. त्यांच्यात प्रवेश करून प्रत्यक्ष भगवंताने हा दशम स्कंध श्रीगणेशाला कथन केला असे मानले जाते आणि म्हणून दशम स्कंध ही वेदव्यासांची वाणी नसून प्रत्यक्ष भगवंताचे कथन आहे असे म्हणतात.


भाविक श्रोतृवर्गालासुद्धा दशम स्कंध ऐकताना अगदी आपल्या हृदयापासून एक निराळाच आनंद प्राप्त होतो. जसा नंदाघरी रोज सकाळी आनंदोत्सव साजरा होत गेला तसा आपल्या घरीही असा निखळ आनंदोत्सव साजरा होत जावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होत जाते. प्रत्येकाच्या हृदयात शिरून त्यात असलेले मालिन्य नष्ट करून निखळ आनंद प्राप्त करून देणारा हा दशमस्कंध. याचा आनंद आपण पुढले काही दिवस घेऊयात.


मथुरेचा राजा कंस हा एक अत्यंत दुष्ट आणि रागीट राजा होता. त्याच्या दुष्टपणाला आणि अकारण कोपाला कंटाळून त्याच्या राज्यातल्या सुजाण नागरिकांनी त्याकाळच्या अन्य राज्यांचा आश्रय घेतला होता. स्वतःची बहीण देवकीचा विवाह वसुदेवांशी झाल्यानंतर जी आकाशवाणी झाली त्यात कंसाला देवकीचा आठवा पुत्र आपल्या मृत्यूला कारणीभूत होणार असल्याचे कळले. तो संतापाने बेभान झाला आणि त्याने आपल्या बहिणीला व जावयाला तुरूंगात टाकले. देवकीच्या पोटी जन्म झालेल्या सहाही पुत्रांना त्याने अत्यंत क्रूरपणे ठार केले. सातव्या पुत्राची गर्भधारणा देवकीच्या उदरी झाल्याबरोबर तिला या पुत्राची सुद्धा काळजी वाटू लागली. आधीच्या सहा पुत्रांप्रमाणे हा सुद्धा आपल्या भावाच्या हातून जन्मतःच मारला जाणार असे तिला वाटून तिची मुद्रा म्लान झाली.


सर्वशक्तीमान भगवंतांनी आपल्या योगमायेला बोलावून आज्ञा केली की आत्त्ता देवकीच्या उदरी असलेला गर्भ आकर्षण करून गोकुळात नंदबाबांचीच एक पत्नी असलेल्या रोहिणीच्या उदरी तिने प्रस्थापित करावा आणि योगमायेने नंदबाबांची पत्नी यशोदेच्या उदरी जन्म घ्यावा. भगवंत म्हणतात आता ज्ञान आणि बळ धारण करून संपूर्ण पराक्रमाने पृथ्वीतलावर अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. मी देवकीच्या उदरी तिचा आठवा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे. भगवंतांनी योगमायेला अनेक आशिर्वाद दिलेत आणि भगवंताचे कार्य करायला योगमाया पृथ्वीवर आली. तिने तुरूंगात असलेल्या देवकीच्या गर्भाचे आकर्षण करून त्याला गोकुळात असलेल्या रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित केले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हेच ते संकर्षण. गर्भाचे आकर्षण केल्यामुळे त्यांचे नाव संकर्षण पडले. खरे तर हे भगवंताच्या सावलीसारखे राहणारे शेषावतार. गतजन्मी भगवंताच्या बंधूंचा जन्म घेऊन त्यांच्यासोबत सावलीसारखा वनवास भोगलेले लक्ष्मण. भगवंतांना सोडून राहणार नाही ही यांची प्रतिज्ञा. त्यानुसार हे या जन्मात भगवंतांचे मोठे भाऊ म्हणून जन्माला आलेत. या जन्मात हे सर्व लोकांना रमविणारे होते म्हणून यांचे नाव "राम" झाले आणि अत्यंत बलवान होते म्हणून यांचे आणखी एक नाव "बलभद्र" असेही झालेत. श्रावण पौर्णिमेला यांचा जन्म नंदपत्नी रोहिणीच्या पोटी गोकुळात झाला.


इकडे तुरूंगात देवकीचा सातवा गर्भ गळाल्याची बातमी कंसाला कळाली. त्याला आता सतत आठव्याची भिती वाटू लागली. सतत आठव्याचा त्याने जणू ध्यासच घेतला. सतत आठव्याचा आठव तो करू लागला. दुसरा विषयच त्याला सुचेना. नुसत्या आगमनाच्या वार्तेने तो पराक्रमी दुष्ट राजा सैरभैर झाला.


इकडे भगवंतांनी त्यांच्या पूर्ण तेजासह वसुदेवाच्या शरीरात प्रवेश केला आणि स्वतःला देवकीच्या उदरी प्रस्थापित केले. देवकीला आनंद तर झाला होता पण इतर पुत्रांचे आपल्या बंधूने जे जन्मतःच हाल केले ते पाहून तिला या बालकाची काळजी सुद्धा वाटत होती. काय गंमत आहे बघा. जो सगळ्या जगाची काळजी घेतो त्याची काळजी त्याच्या आईवडिलांनाच असते. आपणही भगवंताकडे सदैव मागणे सोडून त्याची त्याच्या आईबापासारखी काळजी केली तर आपण त्याचे मानलेले का होईना आईबाप होऊच ना ? केवळ त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला आळवून बघूयात का ? त्याच्याकडून अगदी कुठलीही अपेक्षा न करता. यादरम्यान आपल्याला प्राप्त होणारी सुखदुःखे ही त्याचीच देण म्हणून त्या सुखदुःखांकडे त्रयस्थतेने बघूयात. असे देवाचे मायबाप व्हायला किती आनंद मिळेल नाही ?


भगवंताच्या अवताराची वार्ता ऐकल्यानंतर साक्षात ब्रह्माजी आणि शंकरजी त्या कारागारामधल्या खोलीत आलेत आणि त्यांनी भगवंतांची स्तुती केली. विश्वनिर्मात्या ब्रह्माजींनी आणि श्रीशंकरजींनी विश्वपालक भगवान विष्णूंची केलेली ही स्तुती ही श्रीमदभागवतात मुळापासूनच वाचण्यासारखी आहे. ही स्तुती नुसती पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या मनातले सगळे मालिन्य, किल्मिष नष्ट होते हा अनेक साधकांचा प्रत्यक्षानुभव आहे.  


श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण ऐश्वर्यासह देवकीच्या उदरातून जन्म घेतला. त्यांचे ते दिव्य रूप बघून आपल्या पोटी प्रत्यक्ष श्रीविष्णूंनी जन्म घेतलेला आहे याची जाणीव वसुदेवांना आणि देवकीला झाली. त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि त्यांना सर्व जगताचे कल्याण करण्याची प्रार्थना केली. भगवंतांनी आपल्या आईवडिलांना त्यांच्या यापूर्वीच्या दोन जन्मांचे स्मरण दिले. यापूर्वीच्या दोन्हीही जन्मांमध्ये वसुदेव आणि देवकी यांनी भगवंत आपल्या उदरी यावेत अशी मनापासून कामना करून ते दोघेही अत्यंत सात्विक जीवन जगले होते. त्याचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या पूर्णांशाने त्यांच्या उदरी आलेले होते.



भगवंतांनी योगमायेला आदेश दिल्याप्रमाणे तिने कंसाच्या तुरूंगाच्या सर्व द्वारपालांना गाढ निद्रेत ठेवले. स्वतः योगमायेने गोकुळात नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घेतला पण जन्मानंतर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे यशोदामातेला ग्लानीत ठेवले. आपल्याला मुलगा झालाय की मुलगी झालीय हे न समजण्याइतक्या ग्लानीत. इकडे वसुदेवांनी भगवंताच्या आज्ञेनुसार आपले बालक आणि यशोदेचे बालक यांची अदलाबदल यमुनापार गोकुळात जाऊन केली. यशोदेच्या शेजारी भगवान कृष्ण निजलेत आणि देवकी व वसुदेवाला ठेवलेल्या कोठडीत योगमायेने आकांत मांडला.



भगवंताला बघायला, त्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घ्यायला प्रत्यक्ष यमुना नदी सुद्धा अत्यंत व्याकूळ झाली होती. वसुदेवांच्या मथुरा ते गोकूळ या प्रवासात तिने भगवंतांना चरणस्पर्श केलाच आणि ती पावन झाली. आपल्या प्रत्येकाघरी भगवंतांच्या जन्माचा असा आनंदोत्सव दररोज पहाटे साजरा व्हावा हीच मनापासून कामना करतो आणि आज इथे विरमतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वादशी, शके १९४८ दिनांक  २६ / ७ / २०२६


२६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Saturday, July 25, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २५ ययाती देवयानी आख्यान

देवपुत्र कच याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे कपटवेषाने राहून त्यांच्याकडे असलेली संजीवनी विद्या शिकून घेतली. ती संजीवनी विद्या वापरूनच दैत्यगुरू युद्धात मृत झालेल्या दैत्यांना पुनर्जिवीत करीत असत आणि त्यामुळे देवांचा विजय दुरापास्त होत असे. कचाने ती विद्या शिकली आणि आपल्यावर अनुरक्त असलेल्या गुरूभगिनी देवयानीला शिकायला बाध्य केली. संजीवनी मंत्र षटकर्णी झाला. स्वतः दैत्यगुरू शुक्राचार्य, त्यांची कन्या देवयानी आणि कच या तिघांच्या सहा कानांमध्ये मंत्र पोहोचला आणि म्हणून तो मंत्र निष्प्रभ झाला. दैत्यगुरूंना त्याचा उपयोग होईना. इकडे कचाने सुद्धा देवलोकात परतण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा देवयानीने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा प्रगट केली पण कचाने तू गुरूभगिनी आहेस, मला संजीवनी विद्येने मला जिवंत केलेले आहेस त्यामुळे मला जन्म देणारी माता आहेस हा तर्क मांडून तिचाशी लग्न करण्याचे नाकारले. देवयानीने कचाला शिकलेली विद्या विसरण्याचा शाप दिला तर कचानेही देवयानीला कुणाही ब्राह्मण मुलाशी तुझे लग्न होणार नाही असा शाप दिला. व तो देवलोकात परत गेला.


एखादे गुपित दोन माणसांमध्ये मर्यादित राहिले तरच ते गुपित राहू शकते. ते तिस-या माणसापर्यंत गेले तर ते गुपित राहत नाही. इंग्रजीत Two is company, Three is crowd म्हणतात ते याचमुळे. आपल्या संस्कृतीत मंत्र सुद्धा गुरू आणि शिष्य दोन माणसांमध्येच मर्यादित रहावा असे प्रतिपादन केलेले आहे. आपला गुरूमंत्र कुणालाही, अगदी आपल्या आईवडीलांना, जीवनसाथीला सुद्धा सांगू नये तो यासाठीच. किंबहुना आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव सुद्धा आपल्या सदगुरूवाचून कुणालाही सांगू नये. आपल्याला कितीही श्रेष्ठ स्वरूपाचे आध्यात्मिक अनुभव आले असतील, अनेक दर्शने झाली असतील पण ती सगळ्या लोकांना सांगून आपला लौकिक वाढवावा अशी कृती करू नये. आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव, झालेली दर्शने ही आपल्या पूर्वभाग्याने आलेली आहेत आणि आपण आता आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो आहोत हे मनोमनी समजावे. या गोष्टी सदगुरूंशिवाय कुणालाही सांगू नयेत.



देवयानीच्या याच उद्दाम स्वभावामुळे तिचे राजकन्या शर्मिष्ठेशी भांडण झाले पण दैत्यगुरूंची लाडकी कन्या असल्याने राजाने आपल्या कन्येला, शर्मिष्ठेला, देवयानीची दासी म्हणून तिची सेवा करण्यास पाठवले. कचाच्या शापामुळे ब्राह्मण कन्या असलेल्या देवयानीचे क्षत्रिय राजा ययातीशी लग्न झाले. ययाती हा अत्यंत सुखलोलूप राजा होता. देवयानीसोबत विवाहानंतर त्याने अनेक प्रकारच्या वैवाहिक सुखांचा अगदी आकंठ उपभोग घेत काळ क्रमण करणे सुरू केले. अतिशय सुंदर आणि सौष्ठवपूर्ण असलेल्या ययाती राजाला आपल्या तारुण्याचा आणि देखणेपणाचा फ़ार अभिमान होता. यथावकाश देवयानी गर्भवती राहिली.


ती गर्भवती असताना तिची दासी म्हणून वावरणा-या राजकन्या शर्मिष्ठेसोबत यया्तीने तिच्याच मागणीनुसार शरीरसंग केला आणि तिला दोन पुत्र प्राप्त झालेत. दैत्यगुरूंना हे कळताच त्यांनी ययातीला वृद्धाप्याचा शाप दिला. इंद्रियसुखे आकंठ भोगण्यात सुख मानणा-या ययातीवर अचानक वृद्धाप्य प्राप्त होणे हा वज्राघातच होता. तो अत्यंत लीन होऊन शुक्राचार्यांच्या चरणावर कोसळला आणि त्याने शुक्राचार्यांना उःशाप मागितला. शुक्राचार्यांनी ययातीला तुझे वार्धक्य जर कोणी तरूणाने घेऊन तुला त्याचे तारूण्य दिले तर तुला तारूण्य कायम प्राप्त होईल असा वर दिला.


ययातीने आपल्या तरूण पुत्रांना त्याचे वार्धक्य घेऊन त्याला त्या पुत्रांचे तारूण्य देण्याबाबत याचना केली. पण हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यास कुणीच तयार होईना. ययातीच्या धाकट्या पुत्राला, पुरूला मात्र आपल्या पित्याची दया आली. पुरूने या शरीराचे अनित्यत्व आणि शरीराने प्राप्त होणा-या सुखांच्या मर्यादा त्याच्या तरूणपणीच ओळखल्या होत्या. त्यामुळे पितृआज्ञापालनातून येणारी संतुष्टी ही तारूण्यापेक्षा आणि तारूण्यात प्राप्त होणा-या सुखांपेक्षा जास्त महत्वाची आहे हे तत्व त्याने जाणले आणि ययातीच्या वार्धक्याचा सहर्ष स्वीकार केला. ययाती तरूण झाला तर त्याचा पुत्र पुरू हा वृद्धाचे जीवन जगू लागला.


अनेक वर्षे अशा तारूण्याचा आणि सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर ययातीला स्वतःलाच या सुखोपभोगांमध्ये बुडून राहण्यातला फ़ोलपणा कळला आणि त्याला पश्चात्ताप झाला. आपण केवळ या शरीरापुरताच विचार केला. त्यापलिकडे जाऊन आपण शाश्वत परमेश्वराविषयी कसलेही चिंतन केले नाही. जगातले सगळे धान्याचे कण, सगळे सुवर्ण, सगळ्या स्त्रिया जरी एखाद्या पुरूषाला प्राप्त झाल्यात तरी त्याची इंद्रिय तृप्ती होणार नाही. विषयांच्या आगीत आपण आणखी आणखी विषयांच्या उपभोगाची आहुती टाकत गेलो तर तो विषयाग्नी अधिकाधिक भडकतो आणि त्या विषयाग्नीत मनुष्यजीवनाची राख होऊन जाते याची जाणीव ययातीला झाली आणि तो पश्चात्तापाने पोळून निघाला. त्याने आपल्या पुत्राला, पुरूला आपले तारूण्य परत करून त्याच्याकडील आपले वृद्धाप्य प्रत मागितले आणि उरलेला काळ तो ईश्वरचिंतनात घालवू लागला. ख-या पश्चात्तापामुळे आणि ख-याखु-या क्षमायाचनेमुळे त्याचे चित्त ईश्वरचरणी विलीन झाले आणि त्याने मुक्ती प्राप्त करून घेतली.


इंद्रियसुखांच्या मर्यादा दाखवणारी ही गोष्ट. मनुष्याने या मर्यादा आणि इंद्रियसुखांची सतत वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांच्या अधीन न होता भगवंताच्या आराधनेत आपले चित्त वळवीत रहावे कारण इंद्रियांची पूर्ण तृप्ती कधीही होत नाही हे साधकांच्या मनावर ठसविणारी ही गोष्ट. मनाला हा बोध होणे हाच या आख्यानाचा प्रसाद.



ययातीच्या पुत्रापासूनच यदुवंशाची उत्पत्ती झाली. यापुढील विवेचनात आपण यदुवंशीय भगवान कृष्ण यांचे गोड चरित्र श्रीमदभागवताचे हृदय समजल्या जाणा-या दशमस्कंधामधून अवलोकन करणार आहोत.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी, शके १९४८ दिनांक  २५ / ७ / २०२६


२५ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 24, 2026

मागणे लई नाही, लई नाही लई नाही...

नटांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन अभिनय वगैरे केलेल्या आणि प्रेक्षकांनी स्वतःच्या कौटुंबिक स्वास्थावर उदार होऊन पाहिलेल्या टुकार मराठी मालिका


 आणि 


मिळेल तिथून सर्वकाही फ़ुकट ओरबाडून घेण्याची वृत्ती. या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे नव्वदोत्तर मराठी मध्यमवर्गीय समाजाचा र्‍हास झालाय असे माझे निरीक्षण आहे.


१. ज्या घरातील वृद्ध मंडळी बाल गोपाळांना " लवकर निजे, लवकर उठे " चे फ़ायदे सांगण्याऐवजी स्वतःच जर रात्री ११, ११.३० पर्यंत टुकार मालिका (दुपारी रिपीट टेलीकास्ट पुन्हा हं) पहात बसत असतील तर मग नातवंड पब मध्ये जातात म्हणून ओरडण्याचा अधिकार गमा्वून बसणारच. माझे मित्र श्री सचिन मधुकर परांजपे यांच्या प्रमेयाप्रमाणे तद्दन (टाकाऊ) मराठी मालिकांमधील निगेटिव्ह स्पंदनांचा परिणाम घरातील वातावरणावर होतोच. त्यातच ही मंडळी एकच भाग, तो कितीही टुकार का असेना, वारंवार पहातात आणि त्यातल्या आभासी वास्तवालाच खरे मानतात. 


एकाहून एक मूर्ख मराठी निर्माते आणि त्याहून मूर्ख लेखक हिंदी मालिकांची भ्रष्ट नक्कल करत, सॅडिस्ट पद्धतीच्या मालिकांचे प्रमोशन करत असताना त्यांना आपण नुसताच आश्रय देतोय असे नव्हे तर त्या प्रवृत्तींना हळूहळू आपल्या मनात आणि पर्यायाने घरात जागा देऊन आपल विश्व नासवतोय, हे लक्षात येतय का ?

 

मुला नातवंडांकडे लक्ष नाही, कुणाच छान झालेल बघवत नाही या सर्वांना कारण आपण ह्या आभासी जगाला दिलेला आश्रय हे आपल्याला कळतच नाहीये. एव्हढच काय तर कुठे प्रवासात किंवा आपण कुणाकडे बाहेरगावी पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या सोयी गैरसोयींचा विचार न करता आपण आपले हे घाणेरडे व्यसन जोपासतोय याची शुद्धही आपल्याला नाही. 

या मालिकांतून मानसिक समाधान तरी कुठल्या स्तराच मिळत ? आणि त्या प्रकारच्या वेळ घालवण्यात गंमत तरी काय ? याचा मी खूप गांभीर्याने विचार करत असतो.


ज्या समाजात आजी आजोबांचा मायेचा स्पर्श नसल्याने पाळणाघरं वाढतात, त्याच समाजात वृद्धाश्रम वाढतात हे वास्तव आहे. आम्ही बघितलेले आमचे आजी आजोबा असे नव्हते पण ते सुख आमच्या मुला, नातवंडांना मिळेल याची अजिबात हमी नाही. पूर्णच्या पूर्ण समाजाने आपली विचारशक्ती आणि गती या अती तद्दन गचाळ मालिकांपायी गमावली हे आपण कधी लक्षात घेणार ?


२. आमच्या बालपणी रेशनच्या दुकानांवर (स्वस्त धान्य दुकान) खुल्या बाजारापेक्षा कमी दरात धान्य, खाद्यतेल वगैरे मिळत असे. पण घरची परिस्थिती कितीही निम्न मध्यमवर्गीय का असेना, आपण सहसा रेशनच्या दुकानातून साखर खरेदीच्या पलिकडे खरेदी करत नसू. धान्याचा दर्जा हे एक कारण होतच, पण गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतून आपण कसे आणायचे ? ही भावना आणि आपण दोनवेळ का होईना, पोटभर जेवू शकतोय ही भावना ते पदार्थ आणण्यासाठी आड यायची. 


आज समाजातल्या उच्च मध्यमवर्गीयात सुद्धा जिथून मिळेल तिथून ओरबाडून घ्यायची वृत्ती वाढीला लागली आहे. मग " सरकार आमच्या जातीला काहीतरी सवलती देतंय का ? मग असल्या योजनांमधून थोडंफ़ार घेतल तर काय बिघडल ?" असली लंगडी सबब पुढे केली जाते. मग मित्र मंडळींमध्ये फ़ुकट पार्टी देणारा लोकप्रिय होतो. त्याने तो पैसा कुठल्या का मार्गाने मिळवला असेना त्याचे सोयर सुतूक आपल्याला नसत. आजकाल फुकट मिळाले तर आपल्याला शेणही चविष्ट वाटेल अशी सामाजिक स्थिती आहे.

बरंच लिहीण्यासारखं आहे पण थांबतो. आपल्या आजूबाजूच्या या परिस्थितीचा नक्की विचार कराल ही अपेक्षा.


या मालिका चार महिने बघायच्या नाहीत असा जरी नेम बापांनो तुम्ही केलात तरी आम्हाला चातुर्मासात घरच्या घरी विठ्ठल भेटेल.


मागणं लई नाही ... लई नाही... लई नाही.


- आपला कृपाभिलाषी, बालके राम. 

श्रीमदभागवत चिंतन - २४ परशूराम अवतार

रेणु ऋषींची कन्या रेणुका हिचा विवाह श्रेष्ठ तपस्वी मुनी जमदग्नी यांच्याशी झाला आणि या पवित्र दंपतींना अनेक पुत्र झालेत त्यातला सगळ्यात कनिष्ठ पुत्र म्हणजे भगवान परशूराम. पृथ्वीतलावरील हैहय नावाच्या क्रूर वंशाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः हा अंशावतार धारण केलेला होता.



समाजात त्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. समाजाला बौद्धिक दिशा दाखवणा-या व्यक्ती ब्राह्मण नावाने ओळखल्या जायच्यात, समाजचे रक्षण करणा-या व्यक्ती क्षत्रिय नावाने ओळखल्या जायच्यात. व्यापार उदीम करून समाजाच्या आणि राष्ट्राच्या संपत्तीत वाढ करणा-या व्यक्ती या वैश्य म्हणून संबोधल्या जायच्यात तर समाजाची सेवा करणा-या व्यक्ती या शुद्र म्हणून संबोधल्या जायच्यात. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आजची service industry. त्या काळी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार हा वर्ण प्राप्त करण्याचा आणि इतर वर्णात जाऊ शकण्याचा अधिकार होता. नंतरच्या काळात ही वर्णव्यवस्था जन्माधारित होत गेली आणि म्हणून टीकेचा विषय झाली.


क्षत्रियांनी राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते पण हैहय वंशातले क्षत्रिय राजे या कर्तव्याला विसरून विषयलोलूप आणि तमोगुणी झालेले होते. त्यांनी आपल्या माहिष्मती नगरात अगदी हाहाकार उडवून दिलेला होता. त्याच नगरीचा राजा सहस्रार्जून याने भगवान दत्तात्रेयांची अतिशय कठोर उपासना करून त्यांना सहस्रबाहू मागून घेतले होते आणि ते वरदान मिळाल्यानंतर तो अधिकच उद्दामपणे वागू लागला.


एकदा तो सहस्रार्जून राजा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात काही कारणाने आला. ऋषींनी त्याचे स्वागत केले. आश्रमवासी ऋषींचे ते विलक्षण वैभव पाहून राजा मनात अस्वस्थ झाला. त्याने ऋषींना त्या वैभवाचे रहस्य विचारले तेव्हा ऋषींनी मोठ्या निर्मळ मनाने आपल्या आश्रमात असलेल्या कामधेनूविषयी त्यांना सांगितले. सहस्रार्जुनाने ती कामधेनू जमदग्नींकडे मागितली. तो देवाचा प्रसाद असल्याचे सांगून जमदग्नींनी राजाला कामधेनू देण्यास नकार दिला तेव्हा सहस्रार्जुनाने आपल्या बळाचा वापर करून ती कामधेनू बांधून आपल्या माहिष्मती नगरीत नेली.


परशूराम आश्रमात परतल्यानंतर त्याला हा वृत्तांत समजताच त्याने माहिष्मती नगरीवर चाल करून गेला. याप्रसंगी त्याचे आणि सहस्रार्जुनाचे तुंबळ युद्ध झाले तेव्हा त्याने अतुल पराक्रम गाजवून त्या जुलमी, विषयांध राजाचा वध केला. त्या देवप्रसादरूप असलेल्या कामधेनूला सोडविले व पुन्हा तिला तो जमद्ग्नी ॠषींच्या आश्रमात घेऊन आला.


आश्रमात परतताच आपले पिता जमदग्नी ऋषींना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी परशूरामाला ब्राह्मण धर्मातल्या क्षमेविषयी सांगितले. राजाचा वध करणे योग्य नाही आणि त्यामुळे लागलेले पाप दूर करायला परशूरामाला तपश्चर्येला जाण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार परशूराम तपश्चर्येसाठी गेलेत.



इकडे सहस्रार्जुनाच्या युद्धातून पळून गेलेल्या मुलांनी पुन्हा एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. तपाला बसलेल्या जमदग्नी ॠषींची त्यांनी हत्या केली. परशूरामाची आई रेणुका हिने याप्रसंगी मोठा विलाप केला आणि आर्त स्वराने परशूरामांना पाचारण केले. आईची आर्त हाक ऐकून प्रखर मातृपितृभक्त असलेले परशूराम आश्रमात परतले तेव्हा तिथली परिस्थिती त्यांच्या आईने त्यांना कथन केली. संतापून परशूरामांनी तिथले एक परशू उचलले आणि त्वरित माहिष्मती नगरीत जाऊन सहस्रार्जुनाच्या पुत्रांचा वध केला. त्यांच्या मुंडक्यांची रास त्यांनी रचली आणि आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेतला. त्यांचे पिता जमदग्नी ऋषींना  स्मृतीरूप संकल्पाने त्याने पुनर्जीवित केले. याप्रसंगी त्यांचे पिता जमदग्नी ॠषी आणि माता रेणुका यांच्या आशिर्वादाने ते नवीन मन्वंतरात सप्तर्षींमधले एक झालेत आणि त्यांनी सप्त चिरंजीवांपैकी एक होण्याचा वर मिळाला.


ज्ञानमार्गाने जाणा-यांनी केवळ ज्ञानाचीच उपासना करून भागणार नाही तर आपण उपासना करीत असलेले सात्विक आणि विमल ज्ञान रक्षिले जावे म्हणून स्वतः बलाची उपासना करणे आवश्यक आहे हा या कथेचा बोध. "लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या" हा उपदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या कथेलाच आदर्श मानून तर ठेवला नसेल ना ? अतिशय उदात्त, उत्तम असलेया आपल्या संस्कृतीरक्षणासाठी वेळप्रसंगी आपल्याजवळ शापाचे हत्यार पाहिजे पण शराचे (बाणांचे) ही हत्यार सज्ज असले पाहिजे हा संदेश भगवान परशूरामांनी आपल्याला दिला. शापादपि, शरादपि.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध दशमी शके १९४८ दिनांक  २४ / ७ / २०२६


२४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Thursday, July 23, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २३ श्रीरामचरित्र

खरेतर भगवान श्रीराम हे भारताचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेऊनच समस्त भारताच्या चारित्र्याची उभारणी झालेली आहे. ते समस्त भारतवर्षाचे आदर्शपुरूष आहेत. त्यांचे चरित्र माहिती नाही अशी व्यक्ती भारतात तरी विरळा. त्यांच्या चरित्र वर्णनासाठी एक निराळीच लेखमाला लिहावी लागेल इतका त्या चरित्राचा आवाका आणि विस्तार मोठा आहे. पण आपण इथे श्रीमदभागवतग्रंथातल्या नवम स्कंधातल्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायात वर्णन केलेल्या श्रीरामचरित्राची लेखनमर्यादा आखून त्या चरित्राचे आकलन करून घेऊयात.


राजा दशरथांच्या घरी कौसल्यामातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर भगवान श्रीरामांनी बालपणातच आपले क्षात्रतेज आणि पराक्रम दाखवायला सुरूवात केली. ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञकार्यात अडथळा आणणा-या मारीच, सुबाहू सारख्या मोठ्या मोठ्या राक्षसांचा त्यांनी वध केला. राक्षसी वृत्ती, राक्षसी जीवन यांचा नाश करणे आणि आदर्श जीवन व्यवस्था, आदर्श मूल्यव्यवस्था यांना प्रस्थापित करणे हेच प्रभू श्रीरामांचे जीवनध्येय होते. त्यानंतर त्यांनी जनकराजाच्या सभेत जाऊन भगवान शंकरांचे विशालकाय शिवधनुष्य तोडले आणि जानकीमातेचे पाणीग्रहण केले. भगवान विष्णूंच्या हृदयकमलात सदैव वास करीत असलेल्या लक्ष्मीमातेनेच जनकराजाकडे जानकीच्या रूपाने जन्म घेतला होता. त्यांचे या पृथ्वीतलावर या शिवधनुष्याच्या प्रसंगाने मीलन झाले. पाणीग्रहणावरून परतताना प्रभू श्रीरामांनी परशूरामांचे गर्वहरण केले.



राज्याभिषेकाच्याच दिवशी आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानून प्रभू श्रीरामांनी एखादा जीवनमुक्त योगी आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्याप्रमाणे प्राणत्याग करतो तशा संतोषात आपल्या राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला. केवळ आपल्या पित्याने, राजा दशरथाने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून आपल्या पत्नीसह आणि अनुज लक्ष्मणासह प्रभू श्रीराम वनात चालते झाले. वनात त्यांनी कलुषित बुद्धीच्या आणि अत्यंत कामवासनेने पीडित असलेल्या रावणभगिनी शूर्पणखेला विद्रूप केले आणि तिच्यासोबत असलेल्या खर, दूषण, त्रिशिरा आदि चौदा हजार राक्षसांचा वध केला.


अत्यंत कामासक्त असलेल्या रावणाने सीतामैयाचे हरण केले. त्यासाठी त्याने मायावी मारीचाची मदत घेतली. सीता शोधार्थ प्रभू श्रीराम रानोमाळ भटकू लागलेत. जटायूने प्रभूंना सीतेचे हरण आणि त्यासंबंधी वस्तूस्थिती कथन करून जटायूने देह ठेवला. प्रभूंनी त्याचे और्ध्वदैहिक केले आणि त्याने सांगितलेल्या मार्गाने ते दक्षिण देशाकडे मार्गक्रमण करू लागलेत. वाटेत त्यांनी वानरराज सुग्रीवाशी मैत्री करून वालीसारख्या दुष्ट वानराचा वध केला आणि असंख्य वानरसेना घेऊन प्रभू श्रीराम भारताच्या दक्षिणतटावर आलेत. श्रीमदभागवतकार मोठे आश्चर्य करताहेत की भगवान शंकर, प्रत्यक्ष जगत्पिता ब्रह्माजी ज्यांचे सदैव गुणगान करीत असतात ते प्रभू श्रीराम सामान्य पुरूषांप्रमाणे भारतवर्षात विहार करीत, सर्व जनजातींना आपल्यासोबत सदकार्यात जोडीत भ्रमण करीत होते.


समुद्र उल्लंघून लंकेत जाण्यासाठी त्यांनी सागराची प्रार्थना केली पण प्रार्थनेला सागर बधत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी सागरावर शस्त्र उचलले. प्राणभयाने सागर साकार प्रगट झाला आणि त्याने प्रभू श्रीरामांना आपल्या शरीरावरून सेतू रूपाने वाहून नेऊन लंकेत पोहोचवण्याचे वचन दिले. श्रीरामांच्या नेतृत्वात असंख्य वानरांनी सेतू बांधला आणि प्रभू श्रीराम सागरपार असलेल्या लंकेत दाखल झालेत.


त्यांनी राक्षसराज रावणाशी भीषण युद्ध करून त्याच्या अनाचारी आणि अत्याचारी बंधू व पुत्रांसमवेत त्याचा वध केला आणि आपल्या पत्नीची त्याच्या कारावासातून सुटका केली. राक्षसकुळात जन्मूनही अत्यंत सदाचारी असलेल्या रावणबंधू बिभीषणाला त्यांनी चिरंजीवित्वाचा वर दिला आणि हनुमान, अंगद, सुग्रीव आणि आपला बंधू लक्ष्मण व पत्नी जानकीसह प्रभू श्रीराम अयोध्येत परतलेत. आता श्रीरामांच्या वनवासाची १४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. श्रीराम वनवासात गेल्यानंतर अयोध्येचे राज्य ज्या भरताला मिळाले होते त्याने ते राज्य श्रीरामांच्या पादुकांना सिंहासनावर ठेऊन चालविले होते. तो स्वतः नंदीग्रामात असलेल्या वनात प्रभू श्रीरामांप्रमाणेच वनवासात राहून, त्यांच्याप्रमाणेच वल्कले परिधान करून, जटा वाढवून तपस्वी आयुष्य जगत होता. प्रभू आपला वनवास आटोपून परत आलेत म्हटल्यावर भरताने त्यांच्या सुपूजित पादुका त्यांना अर्पण केल्यात. प्रभूंनी मोठ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरताला आलिंगन दिलेत आणि ते अयोध्या नगरीत प्रवेशकर्ते झालेत. 



प्रभू श्रीराम, जानकी माता, लक्ष्मण, भरत, हनुमंत आदि अयोध्येत परतताच अयोध्येच्या प्रजाजनांतर आनंद झालाच पण समस्त देवांना आणि इथल्या चराचर सृष्टीलाही अतिशय आनंद झाला. सुगंधित वारे वाहू लागलेत, वृक्षांनी पुष्पवृष्टी करायला सुरूवात केली. अयोध्येची सगळी जनता डोळ्यात प्राण आणून प्रभू श्रीराम व जानकीमातेला बघू लागलेत. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सारे प्रभूंचे गुणगान गाऊ लागलेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी मातांनी आपल्या अश्रूभरल्या नेत्रांनी श्रीरामांना ओवाळले व आपापल्या मांडीवर बसवून त्यांना अश्रूंनी अभिषेक घातला.


वसिष्ठ ऋषींनी विधीपूर्वक श्रीरामांच्या जटा उतरवल्या आणि त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. श्रीरामराज्यात त्यांच्या प्रजाजनांना दुःख, शोक, चिंता, वार्धक्य, रोग, भय किंवा थकवा येत नसे. इतकेच काय तर ज्यांना आपले जीवन संपावे असे वाटत नसेल त्यांना मरणही येत नव्हते. अत्यंत पवित्र अशा श्रीरामांची कथा आपल्या समस्त भारतवर्षीयांसाठी कायम आदर्श आहे. असे आदर्श श्रीरामराज्य पृथ्वीतलावर स्थिरस्वरूपी अवतरित व्हावे असे आपण कायम म्हणत आलेलो आहे.

॥ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ॥


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक  २३ / ७ / २०२६


२३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Wednesday, July 22, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २२ नाभाग, अंबरीष आणि भक्ताभिमानी भगवंत

मनुपुत्र नभग याचा मुलगा नाभाग हा एका दीर्घ तपावरून परतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या मोठ्या भावांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वाटप आपापसात करून घेतलेले आहे आणि जेव्हा त्याने स्वतःच्या वाट्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा आपले बाबा आम्ही तुझ्या वाट्याला ठेवलेले आहेत असे त्याला उत्तर मिळाले. ही सर्व कथा नाभागाने आपल्या पित्याला सांगितली.


पित्याने त्याला अत्यंत सात्विक अशा ऋत्विजांच्या यज्ञात जाऊन त्यांना यज्ञकर्मात योग्य ती मदत करण्याबाबत उपदेश केला. पित्याची आज्ञा प्रमाण मानून नाभागाने यज्ञस्थळी जाऊन तो यज्ञ पुरा करण्यासाठी त्या अंगिरस गोत्री ऋत्विजांची मदत केली. ती सर्व मंडळी प्रसन्न झाली आणि यज्ञसमाप्तीनंतर यज्ञातील उरलेले सर्व शेष धन त्या नाभागाला त्यांनी देऊ केले.


पण यज्ञ संपल्यानंतर ते शेष धन घेण्यासाठी एक काळाकभिन्न पुरूष त्या यज्ञस्थळी आला आणि त्या शेषधनावर परंपरागत माझाच अधिकार आहे असे सांगू लागला. नाभागाने याबाबत आपल्या पित्याचा सल्ला घेतला तेव्हा त्याच्या पित्याने तो पुरूष म्हणजे साक्षात रूद्रदेव असून तो तुझी परीक्षा बघण्यासाठी त्या यज्ञस्थळी आलेला आहे असे प्रतिपादन केले.


नाभाग यज्ञस्थळी परत आला आणि त्याने महादेव रूद्राचा त्या यज्ञशेष संपत्तीवरील हक्क मान्य केला व त्यांची स्तुती केली. महादेव प्रसन्न झालेत. त्यांनी त्या शेषयज्ञसंपत्तीचे दान तर नाभागाला केलेच पण तो आणि त्याचा संपूर्ण वंश श्रेष्ठ भगवतभक्त होतील असा त्याला आशिर्वाद दिला.



अशा नाभागाचा मुलगा अंबरीष. हा सुद्धा अत्यंत पराक्रमी आणि तेव्हढाच धर्मनिष्ठ होता. याला श्रीहरींचे अत्यंत प्रेम होते. त्याच्या हृदयात श्रीहरींविषयी अतिशय विमल भक्ती कायम वास करीत असे. भगवान श्रीहरी त्याच्या निर्मळ आणि निष्काम भक्तीवर कायम प्रसन्न होते. त्याच्या राज्यात साधुसंतांचे कायम पूजन होत असे. एके वेळी असेच अंबरीष राजाच्या एकादशी व्रताचे पारणे संपन्न होत असताना तिथे दुर्वास ऋषी आलेत. अंबरीष राजाने दुर्वासांने यथासांग पूजन केले आणि त्यांना व्रताच्या पारण्यात भोजनाचे निमंत्रण दिले. दुर्वास ऋषींनी ते निमंत्रण स्वीकारले आणि स्नान करण्यासाठी म्हणून ते जवळच असलेल्या नदीवर गेलेत. तिथे स्नान करताना त्यांना अंमळ जास्तच वेळ लागला.


तोवर इकडे अंबरीष राजाच्या व्रतस्थळी द्वादशी तिथी संपायला अगदी थोडा वेळ उरला होता. दुर्वास ऋषींना भोजनासाठी आमंत्रण दिलेले असल्याने ते व्रतस्थळी आल्याशिवाय भोजन करू शकत नाही आणि एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथी संपण्याआधी केले नाही तर ते व्रत भंग झाल्याचा दोष लागतो अशा कात्रीत अंबरीष राजा सापडला. तेव्हा तिथल्या जाणत्या ब्राह्मणांनी त्याला तुलसीजल पिऊन उपवास सोडण्याचा सल्ला दिला. तुलसीदल प्राशन केल्यामुळे एकादशी उपवास सुटेल आणि भोजन न केल्यामुळे दुर्वासांच्या आधी भोजन करून त्यांचा अपमान केला असे होणार नाही. हा तोडगा अंबरीष राजाला मानवला. त्याने तसे करून एकादशी उपवासाचे पारणे केले व तो दुर्वास ऋषींची वाट बघत बसला.


स्नानादि कर्मे आटोपून दुर्वास ॠषी जेव्हा व्रतस्थळी आलेत तेव्हा राजाचे तेजःपुंज मुख पाहून त्यांनी जाणले की राजाने व्रताचे पारणे केलेले आहे. वस्तूस्थिती न जाणून घेता ते क्रोधित झालेत आणि त्यांनी अंबरीष राजाची निर्भत्सना केली आणि त्यावर शाप म्हणून आपल्या जटेतून उत्पन्न झालेली एक कृत्या अंबरीष राजाच्या संहारासाठी सोडली. हातात तलवार घेऊन ती कृत्या अंबरीष राजाला मारण्यासाठी पुढे येऊ लागली पण अंबरीष राजा आपल्या भगवत्भक्तीत मग्न होता. सदैव आपले आराध्य दैवत श्रीहरींचे चिंतन आणि स्मरण करीत बसला होता.


ती कृत्या आपल्या भक्ताचे अहित करण्यासाठी येते आहे हे बघून भक्ताभिमानी भगवंतांनी आपले सुदर्शन चक्र भक्त रक्षणासाठी सोडले. ते सुदर्शन चक्र प्रथम त्या कृत्येला निष्प्रभ करून मग दुर्वासांच्या मागे लागले. त्या सुदर्शनचक्राच्या भयाने दुर्वासांसारखे थोर ऋषी त्रिखंडात पळू लागलेत पण सुदर्शन चक्र त्यांचा पिच्छा सोडेना. ते ब्रह्मदेवांकडे आश्रयाला गेले पण ब्रह्मदेवांनी त्यांना सुदर्शनचक्राच्या प्रभावापासून वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली. ते कैलासावर महादेव शंकरांकडे गेले. त्यांनीसुद्धा या सुदर्शनचक्रापासून दुर्वासांना वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली आणि दुर्वासांना वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचा उपदेश केला.


त्याप्रमाणे दुर्वास ऋषी वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांवर कोसळले आणि त्यांनी त्या दुःसह सुदर्शचक्रापासून मुक्तीची मागणी केली. त्याप्रसंगी भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की कायम ख-या भक्तांच्या हृदयात वास करीत असतात. ख-या भक्तीचे ते इतके भुकेले आहेत की अशा ख-या भक्तांसाठी, भक्तांच्या कामांसाठी ते वैकुंठलोकाचा आणि प्रत्यक्ष लक्ष्मीचा सुद्धा त्याग करू शकतात. दुर्वासांनी त्यांच्या एका भक्ताला अकारण दुखावले आहे तेव्हा या सुदर्शनचक्रापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्वासांना त्या भक्तालाच शरण जावे लागेल.


दुर्वास ॠषी मनोमन खजिल झालेत आणि परत व्रतस्थळी येऊन श्रेष्ठ भागवत असलेल्या अंबरीष राजाची क्षमायाचना करू लागलेत. मूळचा सज्जन आणि मृदू हृदयी असलेल्या अंबरीष राजाने त्यांना लगेच क्षमा केली आणि दुर्वास ॠषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र पुन्हा भगवान श्रीहरींकडे जाऊन त्यांच्या करकमलांमध्ये विराजमान झालेत.



ख-या भगवत्भक्ताने निर्मळ, निष्काम भक्ती करीत असताना या संसारात येणा-या संकटांची तमा बाळगू नये. त्या संकटांचे निवारण आपले रक्षणकर्ता सदैव करतील असा दृढ विश्वास बाळगून आपल्या नियत कर्मांपासून च्युत न होता ती करीत रहावीत हा या कथेचा बोध आणि प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक  २२ / ७ / २०२६


२२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६