Tuesday, July 14, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १४ पुरंजनोपाख्यान (भाग पहिला)

प्राचीन काळी पुरंजन नावाचा एक अतिशय पराक्रमी राजा होता. स्वतःला राहण्यासाठी आपल्या मनाजोगते नगर शोधत शोधत तो भटकत असताना त्याला नऊ द्वारांचे एक अतिशय सुंदर आणि रमणीय नगर दिसले. त्या नगरात वास करीत असलेली एक अतिशय सुंदर युवती आणि तिच्या सोबत असलेले अनेक नागरिक त्याच्या दृष्टीपथास पडले. त्या नगरीचे संरक्षण एक पाच फ़ण्या असलेल्या नागराज करीत होता. त्या नगरीचे एकूणच स्वरूप आणि रूपयौवनेचे मधुर भाषण याची भुरळ पडून राजा पुरंजन त्या नगरीतच राहू लागला.



राजा त्या नगरीच्या, त्या रूपयौवनेच्या भोगविलासांमध्येच रममाण झाला. दररोज वनात जाऊन मन मानेल तशी मृगया करणे, नगरीत परतल्यानंतर भोजनादि विलासांचे सेवन करणे आणि त्या राणीसोबत रतिक्रिडेत रममाण होणे हाच त्याचा जीवनक्रम बनला. याशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. आपल्या अंगभूत पराक्रमाचे एकूण फ़लित म्हणजेच हे अनेक प्रकारचे भोगविलास प्राप्ती हे त्याच्या मनाने घेतले. तो या पृथ्वीतलावरील सर्व नवनवीन विलासांमध्ये अक्षरशः आकंठ बुडून त्यांचे सेवन करीत राहिला.

याच कालावधीत राजा पुरंजनाला अनेक कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. त्यांचे त्याने विवाहादि संस्कार केलेत. आपले पुत्र, सुना, कन्या, जावई यांच्यामध्ये, त्यांच्या संसारांमध्ये, त्यांच्या कन्यापुत्रांच्या लाडाकोडात राजा पुरंजन मग्न झाला. त्याचे अर्धे आयुष्य असेच सरले.

चण्डवेग नावाचा एक गंधर्व आहे. त्याच्या अधीन असलेले ३६० गंधर्व आणि त्यांच्या पत्नी असलेल्या ३६० गंधर्वी आहेत. चण्डवेग गंधर्वराजाच्या आज्ञेनुसार हे गंधर्व आणि गंधर्वी या समस्त सृष्टीत सर्वत्र फ़िरून भोग आणि विलासात मग्न असलेली नगरे लुटण्याचे कार्य निरंतर करीत असता. त्यांना ही राजा पुरंजनाची नगरी दिसली आणि त्यांनी त्या नगरीला लुटण्यास प्रारंभ केला. त्या नगरीच्या रक्षणास असलेल्या सर्पाने तिचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण चण्डवेग गंधर्वाच्या पार्षदांपुढे नगररक्षणाचे त्याचे प्रयत्न अपुरे पडत गेले.

याच दरम्यान प्रत्यक्ष काळाची जरा नामक कन्या आपल्या इच्छित वरासाठी सर्वत्र फ़िरत होती. पण तिचा कुणीही स्वीकार करीत नव्हते. प्रत्यक्ष देवर्षी नारदा्ंना सुद्धा तिने तिचा स्वीकार करण्याची गळ घातली पण नारदांनी तिला नकार दिला. तिने संतापून देवर्षी नारदांना एका जागी स्थिर न राहू शकण्याचा शाप दिला. त्यामुळे नारदांना कायम त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणे आले. मनुष्यमात्रांचे कायम भले इच्छिणा-या देवर्षींनी त्या शापाचा वरासारखा उपयोग करून घेत कायम त्रैलोक्य भ्रमण करीत जागोजागी मनुष्यमात्रांना उपकारक अशा लीला केल्यात. आपल्याला प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा ज्ञानी लोक विषाद न मानता त्यातूनही अनुकूलता कशी शोधत त्यावर मात करतात याचे हे एक उदाहरण.



त्या कालकन्येला यवनराजाने असा वर दिला की जे नगर आणि त्यातले नगरवासी निरंतर भोग आणि विलासांमध्ये मग्न राहतील, त्यात तू आणि तुझा बंधू प्रज्वार हे दोघे घुसू शकाल आणि त्या नगरीचा सहज विध्वंस करू शकाल. तुम्ही दोघेहे त्या नगरीवर राज्य कराल आणि ती नगरी आपल्या पित्याला, काळाला, भेट देऊ शकाल. या प्राप्त वरानुसार ती कालकन्या, जरा आणि प्रज्वार नामक तिचा भाऊ हे राजा पुरंजनाच्या नगरीत घुसलेत आणि त्यांनी सर्व नगरीच्या नाशाला प्रारंभ केला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व वैभवाचा असा नाश होत असलेला पाहून आधीच हतबल असलेला राजा पुरंजन अतिशय दुःखित झाला, शोकाकूल झाला.

मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात का ? या कथेच्या उत्तरार्धात उद्या या गोष्टींचा उलगडा निश्चित होईल पण या गोष्टींचे प्रत्येक संसारी जीवाने अगदी अंतरातून मनन करणे आणि त्यांना तसे ते मनन घडवणे हेच श्रीमदभागताचे उद्दिष्ट आहे, हीच या कथेची फ़लशृती आहे, हा बोध प्रत्येक जीवाला होणे हाच श्रीमदभागवताचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ अमावास्या शके १९४८ दिनांक  १४ / ७ / २०२६


१४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment