Thursday, July 9, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ९ विदुर मैत्रेय संवाद् (भाग पहिला)

कौरवांच्या दरबारात महाभारत युद्ध टाळण्यासाठी आपल्या भावाला, धृतराष्ट्राला आणि आपल्या पुतण्यांना न्याय्य आणि सात्विक बुद्धीने वागण्याचा उपदेश करणारे महात्मा विदुर शेवटी अत्यंत उद्वेगाने आणि निराशेने हस्तिनापुराबाहेर पडले. महात्मा विदुर भगवान श्रीकृष्णांचे चिंतन, मनन करीत विविध तीर्थस्थळी भेटी देत अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य व्यतीत करू लागलेत.

तीर्थयात्रा करता करता त्यांची भेट प्रभासपट्टण क्षेत्री असलेल्या कृष्णसखा उद्धव यांच्याशी झाली. श्रीमदभागवतात कृष्णसखा उद्धव याचे असे वर्णन आले आहे की उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत आत्मिक मित्र होते. इतकी घट्ट मैत्री की उद्धव हे दिसायला सुद्धा हुबेहुब भगवान श्रीकृष्णांसारखेच होते. आजच्या आधुनिक शास्त्रांनी सुद्धा हे सिद्ध केलेले आहे की पती आणि पत्नी जर एक्मताने, एकदिलाने, एकमेकांमध्ये विरघळून जर संसारात मार्गक्रमण करत असतील तर काही वर्षांनी एकमेकांसारखेच दिसायला, वागायला, बोलायला लागतात. उद्धव आणि भगवान श्रीकृष्णांच्या मैत्रीची स्थिती अगदी तशीच अंतरंग आणि आत्मिक होती.



महात्मा विदुरांनी कृष्णसखा उद्धवांना त्यांची ख्यालीखुशाली विचारली आणि विदुरांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दल विचारले. तेव्हा उद्धवांनी अत्यंत व्यथित मनाने यदुवंशामधल्या आपापसातल्या यादवीची, त्यांच्या संहाराची आणि प्रत्यक्ष भगवंतांच्या अवतार समाप्तीची अत्यंत दुःखद वार्ता विदुरांना कळवली. दोघेही महात्मा अत्यंत शोकाकूल झालेत. आता या पृथ्वीतलावर आपल्याला आसरा कोण ? कोण योग्य मार्गदर्शन करणार ? कुणाच्या आधाराने आपण यापुढील आयुष्य व्यतीत करायचे ? असे सगळे प्रश्न महात्मा विदुरांना पडले तेव्हा उद्धवजींनी त्यांना मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जाऊन मैत्रेय ऋषींचा उपदेश घेण्याची आज्ञा दिली आणि आपल्या पुढील प्रवासाला उद्धवजी रवाना झालेत.

महात्मा विदुर मैत्रेय ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी मैत्रेयांना या सृष्टीरचनेविषयी, तिच्या सार आणि असारतेविषयी विविध प्रश्न विचारलेत. मैत्रेयांनी त्याची जी उत्तरे विदुरांना दिलीत ती आज ५ हजार वर्षांनंतर आपल्याला आपल्या आधुनिक ज्ञानाने दिलेल्या उत्तरांशी अत्यंत मिळतीजुळती आहेत. हे स्तिमित करून टाकणारे आहे. 

मैत्रेय ॠषींनी सृष्टीच्या उत्पत्तीबाबत महात्मा विदुरांना सांगितले, 

"सृष्टीच्या प्रारंभी भगवान एकटेच होते. एकच तत्व होते. त्यांना इच्छा झाली "एकोहम. बहुस्याम." मी एकटाच आहे. आता आपली अनेक रूपे निर्माण करावीत. म्हणून त्यांनी

महत तत्वात विकुर्वाणाद अहंतत्वं व्यजायत ।

कार्य कारण कर्त्रात्मा भूत इन्दिय मनोमयः ॥

भगवंतांनी या सृष्टीत कार्य म्हणून अनेक भूत (विविध जीवांची), या कार्याचे कारण म्हणून अनेक इंद्रियांची आणि ही कार्ये करण्यासाठी कर्ता म्हणून मनाची निर्मिती केली. आजही आपण बघतो की कुठलेही कार्य आपण आपल्या इंद्रियांसाठी करतो, त्या कार्याचा मूळ कर्ता हे आपले मन असते आणि आपले शरीर हे ते कार्य प्रगट करण्यापुरते एक साधनच असते.



मैत्रेय पुढे सांगतात की त्यानंतर भगवंतांनी सात्विक, राजस आणि तामस असे तीन अहंकार निर्माण केलेत. सात्विक अहंकारातून या सृष्टीचे यथार्थ स्वरूप जाणणारे ज्ञान निर्माण झाले, राजस अहंकारांनी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना ज्ञान देण्याची व्यवस्था केली आणि तामस अहंकारातून शब्द निर्माण झाले आणि शब्दरूप आकाश निर्माण निर्माण झालेत.

शब्द आणि आकाश ते तामसी अहंकारांमधून निर्माण झालेले आहेत. आपण वाचतो, ऐकतो किंवा क्वचित अनुभवसुद्धा घेतो. एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे एखादी उत्कट भावना पोहोचवायची असेल, ये हृदयीचे ते हृदयी अशी एखादी गोष्ट आपल्याला संक्रमित करायची असेल तर तिथे शब्द अपुरे ठरतात किंबहुना शब्द उपरे ठरतात. तिथे शब्दांची आवश्यकता उरत नाही. अत्यंत गूढ असलेले संवाद, ज्ञानप्रसार हा शब्दांशिवाय होत असतो. शब्द त्याच  ठिकाणी आवश्यक ठरतात जिथे सात्विकता कमी पडते. 

यानंतर मैत्रेयांनी इतर सर्व सृष्टीच्या क्रमशः निर्मितीविषयी महात्मा विदुरांना जो उपदेश केला तो उपदेश आणि या सृष्टीनिर्मितीबाबत आधुनिक युगात आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाशी त्याचा निकटचा संबंध याविषयीचे विवेचन आपण पुढील लेखात करूयात.

आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य नवमी शके १९४८ दिनांक  ९ / ७ / २०२६


९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment