Thursday, January 17, 2013

पुन्हा नागपूर - १


२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२ ऒगस्टला आल्यापासून सुपत्नी आणि सुकन्या नागपूरला गेलेल्याच नव्हत्या. मग काय ! चि. मृण्मयीला मिळणा-या बक्षिसाच्या निमित्ताने नागपूरला जाउचयात अशी टूम निघाली आणि तयारी जोरात सुरू झाली.

सांगोला मार्गे जाणारी कोल्हापूर-नागपूर ही रेल्वे गाडी आहे तशी चांगली. पण आठवड्यातून दोनच दिवस. आम्हाला नागपूरला ३ जानेवारी म्हणजे गुरूवारी पोचण्याला त्या गाडीचा काहीच उपयोग नव्हता. इथून कोल्हापूर-नागपूर मार्गावर काही खाजगी बसेसही जातात पण दिवाळीच्या वेळेला मी त्यांचा "चांगलाच" अनुभव घेतल्याने त्या बसेस मधून जाण्याची कल्पनाही अंगावर शहारा आणत होती. अत्यंत घाणेरड्या अवस्थेतल्या या बसेस "खुराणा," "चिंतामणी," "सैनी" हे ट्रेव्हल्स वाले इतक्या लांबच्या पल्ल्यावर का पाठवतात ? हे एक कोडंच आहे. (दिवाळी पूर्वी काही दिवसांसाठी "प्रसन्न" ची पर्पल प्लस सुरू झाली होती. मी खरंच हरखून गेलो होतो. पण एका आठवड्यात च "प्रसन्न" ने ती बस बंद करून नागपूर-पुणे मार्गावर धाडली.)

मग पर्याय म्हणून आमच्या कारनेच जायचे ठरले. नागपूरवरून सगळं सामान बांधबुंध करून आणताना मी आमच्या कुटुंबियांसकट नागपूर ते सांगोला कार ने आलेलो होतोच त्यामुळे ड्रायव्हिंगचा तसा प्रश्न नव्हता. यावेळी मात्र सांगोला-सोलापूर-तुळजापूर-लातूर-नांदेड-उमरखेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर हा जवळपास (आणि जवळचा सुद्धा) ६९० किमी चा रस्ता टाळून सांगोला-पंढरपूर-टेंभूर्णी-करमाळा-नगर-औरंगाबाद-जालना-मेहेकर-कारंजा(दत्त)-वर्धा-नागपूर हा रस्ता घेण्याचे मी ठरवले. जवळपास १०० किमी जास्त ड्रायव्हिंग होणार हे नकाशांत पाहून कळले. पण लातूर ते नांदेड या १४० किमी च्या अगदी रद्द्ड रस्त्यापेक्षा हे परवडले असा आम्ही हिशेब केला. गेल्यावेळी या १४० किमी साठी आम्हाला जवळपास साडेचार तास लागले होते आणि लातूर ला आल्यानंतर गाडीचा टायर पंक्चर झाला तो त्रास निराळाच. (मराठवाडा हा रस्ता वाहतुकीच्या संदर्भात खूपच मागासलेला आहे याची जाणीव २०११ च्या दिवाळीत काढलेल्या औंरंगाबाद सहलीतच झाली होती. खुद्द औरंगाबाद शहरातही रस्त्यांच्या बाबतीत "आनंदी आनंद" च आहे. लातूर आणि नांदेड ही दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांची गावे. पण एकमेकांवर कुरघोडी करण्यातच दोघांनीही वेळ घालवल्याने "विकास" वगैरे क्षुद्र बाबींकडे दुर्लक्षच झाले असावे.)

दि. २/१/२०१३

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आजच्या प्रवासाची जय्यत तयारी केलेली होती. मला स्वतःला रात्री ड्रायव्हिंग करायला आवडत नाही त्यामुळे भल्या पहाटे प्रस्थान करायचे ठरले. खूप लांबचा पल्ला गाठायचा तर मधले मधले थांबे कमी आणि कमी वेळाचे घ्यायचे ठरले होते. आम्ही पहाटे ४ लाच उठलो आणि आवरून गाडी सुरू करायला पहाटेचे ०५.०८ झाले होते.

पहाटेचा प्रवास आरत्या आणि भजनांच्या साथीने प्रसन्न आणि उत्साहात गेला. पंढरपूरनंतर टेंभूर्णी मार्गावर मी पहिल्यांदाच गाडी चालवत होतो. (१९९२ साली बार्शी ला झालेल्या "पाणिनी वक्तृत्व स्पर्धे" साठी कराड वरून जाताना रात्री पंढरपूरला बस बदलून दुस-या बसने या रस्त्यावरून गेल्याचे आठवत होते पण धूसरसे.) रस्ता छान होता. आम्ही सगळे नागपूरला जायचय म्हणून आनंदात आणि उत्साहात होतो. मृण्मयी नेहेमीप्रमाणे मागल्या सीटवर पडून झोपेची थकबाकी गोळा करायला लागलेली होती. आम्ही दोघे मात्र निवांत गप्पा मारत प्रवास करीत होतो. (वॆगन आर गाडीची आसनव्यवस्था इतकी मस्त आहे की मी निवांत वेळ घालवतोय असंच फ़ीलिंग मला ड्रायव्हिंग करताना येतं. त्रास अजिबात होत नाही.)

सूर्य क्षितीजावर दिसायला लागला तोवर आम्ही टेंभूर्णीचा एन. एच. ९ डावलून करमाळ्याच्या रस्त्यावर लागलो होतो. हा रस्ता आहे फ़ारच छान. चौपरीकरणाचे कामही सुरू आहे आणि टोलही फ़ार नाहीत. जड वाहनांची वाहतूक मात्र फ़ार आहे. इंदौर-नाशिक ते बंगलोर हे अंतर या मार्गाने कमी भरतं त्यामुळे नॆशनल परमिटचे बरेच ट्रक या मार्गावर होते.


धुक्यात दिसलेली पहिली एस.टी. "अहिल्या एक्सप्रेस"

दूरवरून पाहताना पवनचक्क्या एव्हढ्या एव्हढ्याश्या दिसतात पण त्यांची पाती वाहून नेणारे ट्रक्स पाहिल्यानंतर त्यांची भव्यता लक्षात येते.


मार्गावरून येणा-या जाणा-या माझ्या काही मैत्रीणींचे माझ्याच बायकोने काढलेले फोटो.


अशा वाहनांवर काही निर्बंध आहेत की नाहीत ? आपल्या आकाराच्या दीडपट आकाराची यंत्रसामुग्री घेउन अशा प्रकारे प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच नाही का ?


नागपूरला बनलेली एस.टी. नगर-श्रीगोंदा. साधारण सेवा. श्रीगोंदा आगार.

मध्ये फ़क्त एका ठिकाणी निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी, निसर्गरम्य ठिकाणी, केवळ ५ मिनीटे थांबून आम्ही नगर शहरात आलो तेव्हा सकाळचे सवानउ वाजले होते. जवळपास २२५ किमी ४ तासात. चांगला वेग. रस्ता चांगला होता त्यामुळे आम्ही थांबायचे टाळून लगेच नगर-औरंगाबाद रस्त्याला लागलो. काल रात्री सौभाग्यवतींनी केलेली आणि सोबत बांधून घेतलेली सॆंडविचेस चालत्या गाडीतच आम्ही खाल्लीत. नाहीतर त्यासाठी पुन्हा अर्धा तास थांबाव लागल असत.नगरनंतर चौपदरी रस्त्यावर दिसलेल्या या आणखी काही सुंद-या.


नगरनंतर घाट उतरताना. मृण्मयीला फ़ारच आश्चर्य वाटले. म्हणाली "बाबा, आपण घाट चढलोच नाही तर उतरतोय कसे ?" मग तिला साधारण महाराष्ट्रातली भूपृष्ठरचना आणि दख्खनची रचना थोडक्यात सांगितली.
जुन्या असल्यात तरी त्या माझ्या आवडत्या आहेत. त्यांचे पण फ़ोटो काढलेत.

नगरनंतर मात्र आम्हाला थोडी चहा घेण्याची तल्लफ़ आली. फ़ूड मॊल २४ बाय ७ च्या मोठमोठ्या जाहिराती जवळपास १० किमी आधीपासूनच खुणावायला लागल्यात. मग थांबलोच. वडाळ्याच्या या फ़ूड मॊलमध्ये ब-याच सोयी केलेल्या आहेत. या मार्गावरच्या सगळ्या एस.टी. बसेसही तिथेच थांबतात. आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावली तेव्हा बरोबर १०.०८ झालेले होते. २६४ किमी अंतर (ट्रीपमीटर नुसार) बरोबर ५ तासात.

चहा चांगला होता. भूक तर नव्हतीच. स्वच्छतागृहांची साफ़सफ़ाई मात्र यथातथाच होती. बाहेरच कोल्हापूरच्या बहिःशाल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध उपयोगी आणि नवनवीन वस्तूंचा एक स्टॊल होता. थोडावेळ रेंगाळून पंधराव्या मिनिटाला पुन्हा गाडीत बसून प्रवासाला सुरूवात झालेली होती. (वडाळा प्रस्थान १०.२३)
त्यानंतर चौपदरी रस्ता होता. चांगला होता. फ़क्त मध्ये मध्ये टोल नाक्यांवर वेळ जायचा. सगळा टोल एकत्रच वसूल केला असता तर बरे. किमान प्रत्येक २५ किमी वर असलेल्या नाक्यांवर थांबण्याचा आणि वाहतूक खोळंब्याचा त्रास तर वाचला असता असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला इतकच.


श्रीक्षेत्र दत्त देवगड चा फ़ाटा दिसला. परतताना याच मार्गाने येणार असल्याने येताना तिथे नक्की जाण्याचा मनसुबा झाला.


औरंगाबाद शहराची चुणूक वाळुंजच्या एम.आय.डी.सी. पासूनच दिसायला लागली होती. खूप जास्त आणि खूप बेशिस्त, अपघातांना निमंत्रण देणारी वाहतूक. औरंगाबाद ला बायपास न करता शहरातून जाण्याचा चुकीचा निर्णय आम्ही घेतला आणि ११.१५ ला शहरात शिरलेल्या आम्हाला चिखलठाणा गाठेस्तोवर ११.४५ झाले होते.


औरंगाबाद सोडले, मात्र रस्त्यावर छान छान धाब्यांच्या जाहिराती दिसायला लागल्या. जालना रोडवर एकापेक्षा एक छान धाबे आहेत. भूक तशी फ़ार नव्हती पण जालना झाल्यानंतर मेहेकर पर्यंत मध्ये काही मिळणार नाही याची जाणीव झाली. मेहेकर गाठायला दुपारचे तीन साडेतीन तरी झाले असतेच मग जालन्याआधी २० किमी "अमृतसर पंजाबी" मध्ये आम्ही जेवायला थांबलोत.


धाबा छान होता. जेवणही छान होते. तिथून फेसबुक अपडेट केले. आणि जवळपास ५० मिनीटे थांबून आम्ही निघालो. (अमृतसर पंजाबी १२.२२ - १३.१२)

मग मात्र पुन्हा लांब पल्ल्यावर निघाल्यागत निघालो. आता प्रवाशांतर्फ़े कुणीही जागे नव्हते. जालना शहरातून मेहेकर मार्गाला लागलो. पुन्हा एकदा जालना शहरा (?) तल्या "दिव्य" रस्त्यांचा व बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला.जालना शहरात शिरताना दिसलेली औरंगाबाद कार्यशाळेने बांधलेली ही नवीन गाडी.


औरंगाबाद-वाशिम जलद बस. वाशिम डेपो या मार्गावर भरपूर जुन्या गाड्या पाठवत.


लेलॆण्ड ची जरा जुनी बस. अरे पण काय हाल केलेत त्या बसचे.! या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे डेपोला टक्कर देणार कुणीतरी आहे तर. जाफ़्राबाद डेपो. जालना विभाग.


"चक्के पे चक्का चक्के पे गाडी". हे छोट्या (नॆरो गेज) गाडीचे एंजिन बहुधा परळ वर्कशॊपमधून कुठेतरी पाठविल्या जात असावे.

जालना ते मेहेकर हा प्रवास थोडा रहस्यमय आहे. रस्त्यावरच्या अंतर दर्शविणा-या पाट्या थोड्या गोंधळात घालतात. (दिवाळी २०११ नंतर नागपूर ते औरंगाबाद येताना मेहेकर सोडल्यानंतर सिंदखेड राजा काही येता येत नव्हते.) मध्येच सिंदखेड राजा २८ किमी तर काही अंतर गेल्यानंतर सिंदखेड राजा ३५ किमी चा दगड. शेवटी सिंदखेड आले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान वीराला जन्म देणा-या व त्यांच्यावर स्वराज्याचा संस्कार भिनवणा-या जिजाउ ची ही जन्मभूमी. रस्त्यावरून येतानाच जिजाउ सृष्टीचे दर्शन होते पण वेळेअभावी थांबून आत जाता आले नाही. इथे मात्र टोल नाक्यांना वैतागलो. दर २०-२५ किमी ना टोल नाका. २४ रू. किंवा २७ रू. तरी बर, मनसेच्या दणक्यामुळे की काय रक्कम परत करताना चॊकलेट्स परत मिळत नव्हती. योग्य ती सुट्टी नाणीच परत मिळायचीत.

आता आमच्या सौभाग्यवती आणि सुकन्येची झोपबीप झाली होती. पुन्हा एकदा रस्त्यावरील वाहनांचे फोटोसेशन सुरू झाले.या ट्रॆक्टर्स ची रंगसंगती आवडल्यामुळे ह्यांचा फोटो निघाला.


तर या प्रकारची नवी यंत्रसामुग्री माझ्या आग्रहामुळे छायाचित्रांकित करण्यात आली.


वाशिम डेपोची वाशिम-औरंगाबाद ही जुनी बस. जलद मार्गावर अशी थकलेली बस. किती वेळ घेत असणार ?

मेहेकर शहरात पोहोचलोत तेव्हा १५.३४ झाले होते. गाडीचे मीटर ४८६ किमी दाखवत होते. थकवा मात्र अजिबात नव्हता. विदर्भ भूमीत दाखल झाल्याचा आनंद मात्र भरपूर झाला होता. मेहेकर शहरात वळण रस्ता नाहीच. (काम सुरू झालेले दिसले.) त्यामुळे शहरातून गर्दीतून वाट काढत निघायला जवळपास १० मिनीटे गेलीत.


विदर्भात शिरल्यावर नागपूर कार्यशाळेने बांधलेल्या बसेस खूप दिसायला लागल्यात. स्वाभाविकच आहे म्हणा ते. विदर्भातल्या बहुतांशी डेपोजची गरज नागपूर कार्यशाळाच भागवते. फ़ारच कमी गाड्या औरंगाबाद किंवा दापोडी कार्यशाळेतून येतात.


या साखळ्या थोड्या जरी सैल झाल्यात किंवा तुटल्यात तर काय अनावस्था प्रसंग मागल्या गाड्यांवर कोसळेल ? या कल्पनेचे आम्ही थोडे चिंतन केले.दापोडी कार्यशाळेने बांधलेली आणि विदर्भातल्या डेपोत असलेली ही एक गाडी. पुसद-जळगाव.


काय पण वेळा ठेवल्यात पुसद डेपोने ! ३०० किमी च्या पल्ल्यावर जाणा-या दोन गाड्या अगदी एकापाठोपाठ ? पुसद-जळगाव गाडीनंतर एकाच मिनीटाने पुसद-धुळे गाडी.

आता प्रवासी मंडळींना चहा पिण्याची तलफ़ आली होती. ड्रायव्हर साहेब बिचारे इतके निर्व्यसनी आहेत की त्यांना चहाचीसुद्धा आठवण होत नाही. चहा नसला तरी चालतो. सुपारी बिपारीचा तर प्रश्नच नाही. डोणगावला चहाला थांबलो (१६.००-१६.१४. किमी झाले होते ४९७)

मग मात्र पुन्हा नव्या दमाने निघालोत. आता संध्याकाळ व्हायला लागली होती. रात्री कुठे थांबायच ? की सरळ नागपूरलाच जायच ? या विषयाच मनातल्या मनात चिंतन सुरू झालेल होत. अजून नागपूर किमान ३५० किमी दूर होत.मालेगाव (जि. वाशिम) येथे उभी असलेली ही स्कूल बस. एस.टी. या बसेसना आपल्या नियमीत मार्गांवर पण पाठवते.


दिग्रस-औरंगाबाद. दिग्रस डेपोला संपूर्ण महाराष्ट्रात खरच सावत्र वागणूक मिळत असावी. या डेपोची नवी बस पहायला मिळण विरळाच.अकोला-नांदेड. परभणी जिल्ह्यातल्या कळमनूरी डेपोची ही बस. म्हणजे हपापाचा माल गपापाच.

कारंजा (दत्त) गाठले तेव्हा संध्याकाळचे १७.४५ झाले होते. चि. मृण्मयीच्या शाळेतला समारंभ सकाळी ९.१५ ला होता त्यामुळे कारंज्याला थांबून सकाळी निघण्याचा बेत रहीत करावा लागला कारण कारंजा-नागपूर हे अंतर जवळपास २२० किमी आहे आणि सकाळी कदाचित उशीर झाला असता.

अंधार पडल्यामुळे फोटोग्राफी थांबली होती. कारंजा ते नागपूर रस्ता हा खूप एकटा आहे. कुठलंही मोठ गाव लागत नाही. सरळसोट आपला रस्ताच रस्ता. गाडीही वेगात जात होती. मध्ये मध्ये टोल नाके आपली वसुली करतच होते. 

(या टोल नाक्यांबाबत. जनतेच्या आणि मनसेच्या दबावामुळे सरकारने इलेक्ट्रोनिक डिस्प्ले बोर्डस लावणे अनिवार्य केले आहे. काही नाक्यांवर ते नव्हतेच आणि ज्यांच्यावर होते त्यांच्यावर प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत निरूपयोगी माहिती दाखवण्याचे दळण चालले होते. उदा. प्रकल्पाची एकूण किंमत, पूर्ण रक्कम वसूल करण्याचा कालावधी, रक्कमेवरचे व्याज इ.इ. फ़ालतू गोष्टींपेक्षा मी जे २४, २७ किंवा ३० रू. भरतोय त्यामुळे एकूण किती रक्कम या नाक्यावर जमा झाली ? आणखी किती बाकी राहिली ? इ सरळ बेरीज वजाबाकी बघायला सगळ्यांनाच आवडेल. पण मग भ्रष्ट्राचाराला कमी वाव मिळेल. सरकारला जनतेचे ऐकून काही तरी निर्देश दिल्याच सुख आणि नियमपालनाचा देखावा करताना टोलनाक्यावरील गुंडांना सुख.)

कंटाळा येत असतानाच देवगाव फ़ाटा, नाचणगाव मागे पडले आणि भूक लागली होती म्हणून वर्धा शहरातून गाडी घेतली. संध्याकाळचे २०.१५ झाले होते. जवळपास गेले ४ तास आम्ही थांबलो नव्हतो. डोणगाव पासून २२४ किमी अंतर विना थांबा कापून वर्धेला हॊटेल राधिका मध्ये आम्ही थांबलो. तोपर्यंत नागपूरवरून कौस्तुभ आणि मंडळींचे फ़ोन्स सुरू झाले होते. आता वर्धेपर्यंत आलाच आहात तर सरळ नागपूरलाच या, मध्ये कुठे थांबू नका वगैरे वगैरे. वर्धेला पोटपूजा झाल्यावर मस्त कॊफ़ी झाली आणि थकवा पार पळाला. 

५५ मिनीटांच्या विसाव्यानंतर पुन्हा निघालो. आता वर्धा नागपूर म्हणजे घर आंगणच. सगळा रस्ता अगदी पायाखालचा (गाडीच्या टायर्सखालचाच) होता. नागपूरला प.पू. महाराजांकडे पोहोचलो तेव्हा रात्रीचे २२.४६ झाले होते. एकाच दिवसात ७९८ किमी प्रवास एकट्याने, न थकता व सतत १७ तास ३८ मिनीटे गाडी चालवत मी पार केले होते. स्वतःचा अभिमान तर वाटलाच पण माझ्या कारबद्द्लही खूप प्रेम व अभिमान वाटला. (सुनीताबाईंचा "आहे मनोहर तरी" मधला अनुभव आठवला. अर्थात मी कारची पापी वगैरे घेतली मात्र नाही.) एक नवीन आत्मविश्वास देऊन जाणारा हा प्रवास.

(एव्हढही करून ज्या बक्षिसासाठी नागपूरला गेलो होतो ते बक्षीस बघितल्यावर आमचा सगळ्यांचाच उत्साह मावळला. सोमलवार सारख्या नामांकित शिक्षण संस्थेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या  कौतुकात कंजुशी का होतेय ? हे नकळे. चि . मृण्मयी वर्ग पहिला ते वर्ग ४ था तिच्या वर्गात पहिली येत गेली मात्र शाळेच कौतुक आटत गेलं . गेल्या वर्षी तर शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली होती पण त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या करण्याच्या कौतुकात मात्र कल्पनादारिद्र्य च दिसलं. यावर्षी च बक्षीस बघितलं आणि सोमलवार शाळेला आपण निरोप दिला हे बर केल अस वाटून गेलं.)


वर्ग १ ला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 


वर्ग २ रा. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. लाकडाऐवजी एक्रेलिक. पण ठीक आहे.वर्ग ३ रा. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.  हे वर्ष शाळेची १०० वर्षे पूर्ण झाल्याचे वर्ष होते. बक्षिसाची गुणवत्ता किती घसरली पहा. उत्तम कल्पनांचा  किंवा प्रबळ इच्छाशक्तिचा अभाव. दुसरं काय ?आणि हे पारितोषिक घ्यायला आम्ही ८०० किमी प्रवास करून गेलो. वर्ग ४ था. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.  निर्गुण, निराकार. याच  वेगाने संस्थेचे अधःपतन सुरू राहिले तर पुढच्या वर्षी केवळ कागदाचा चिठ्ठीएव्हढा तुकडाच बक्षिस म्हणून  वाटतील.

( फोटो सौजन्य : सौ. वैभवी किन्हीकर. )                              प्रत्यक्ष प्रवासाआधी इंटरनेटवरून अंतरे पाहून प्रवासाचे केलेले नियोजन.

2 comments:

  1. Faarch Sunder Pravas Varnan! Pu La n chi aathvan zhali!

    ReplyDelete
  2. Kya baat hai sirjee... you are a excellent writer. I would also love to drive one day... but its a dream yet to accomplish.. Anupam

    ReplyDelete