Saturday, June 25, 2016

एक छंद आगळा.

आमच्या बालपणीचे स्वप्न. आपण एस.टी.त ड्रायव्हर व्हावे. रोज गाडी घेऊन दूरवरच्या प्रवासाला निघावे. (ती हौस मी माझ्या कार मध्ये पुरी करून घेतो. अक्षरशः दिवसभरच्या प्रवासात ७०० —८०० किमी अंतर न थकता अनेकदा कापतो.)

बालपणी घरी असलेला लोखंडी पलंग आमची बस व्हायचा. शाळेच्या पाटीवर " नागपूर सुपर चंद्रपूर " लिहीले जायचे. (पाटीच्या पाठीमागच्या बाजूवर " चंद्रपूर सुपर नागपूर "). ती पाटी पलंगाच्या खाचेत अडकवली आणि उरलेल्या दोन खाचांमध्ये पाय सोडून बसलो की झाली आमची बस तयार.



मी ड्रायव्हर. मधला भाऊ महेश , कंडक्टर. (जांब पर्यंतच्या बोलीवर. जांबनंतर त्याला स्टेअरींग देऊन मी कंडक्टर व्हायचो.)

स्टेअरींगवर बसल्यावर तोंडाने " घँग....घँग" (लेलॅण्ड असेल तर "हाॅम....") असा आवाज करत आमची बस सुरू व्हायची. रस्ता सगळा तोंडपाठ. त्यामुळे त्यानुसार स्टेअरींग वळवत, ब्रेक दाबत आमचा प्रवास चालत असे.



मला आठवतंय त्याकाळी नागपुरात सायकलरिक्षांना व टांग्यांना लागणारे पोंगे इतवारीत गांधीपुतळ्याजवळ मिळायचे. दरवेळेला वडीलांसोबत त्या रस्त्याने जाताना तसला एक पोंगा घेऊन देण्याचा हट्ट मी वडलांकडे करायचो. आमच्या पलंगाच्या बसला तो पोंगा आम्हाला लावायचा असे. 



एकमेव प्रवासी म्हणजे आमचा सगळ्यात धाकटा भाऊ श्रीकांत. हा प्रवासी लवकरच कंटाळून चालत्या बसमधूनच उतरून पसार व्हायचा आणि आमचा ओरडा खायचा.

या आमच्या छंदात माझे दोन मावसभाऊ  आणि दोन मामेभाऊ  पण उत्साहात सामिल व्हायचेत.

आज एका केरळी बसफॅनिंग ग्रूपवर हा फोटो दिसला आणि मन ३५—३७ वर्षे मागे गेले