Monday, May 21, 2012

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३

पूर्वपिठीका :

१९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अखेरीला दिवाळी आली. सुट्ट्या अगदी ४-५ दिवसांच्याच मिळाल्यात आणि त्यासुद्धा अगदी आठवडाभर आधीच जाहीर झाल्यात. मुंबई ते नागपूर रेल्वे आरक्षण मिळणे शक्यच नव्हते. (तेव्हा ती "तत्काळ" योजना सुद्धा नव्हती.) 


अगदी महिना दीड महिन्यापूर्वीच मुंबई-पुणे नागपूर असा बसचा प्रवास केलेला असल्यामुळे आपण पुणे मार्गे सहज नागपूरला जाउ शकू असा एक अनाठायी आत्मविश्वास आला. माझ्यासोबतच मुंबईला नागपूरचाच संजय भोयर पण रुजू झाला होता. आम्ही एकत्रच रहायचो. तो आणि मी, दोघांनीही ,हा प्रवास करण्याचे ठरले.


आमचे प्रवासाच्या व्यवस्थापनाचे गृहीतक असे की ठाण्यावरून दुपारी एक दीड वाजता निघावे. पुण्याला सहज आपण पाच पर्यंत (गेला बाजार संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत) पोहोचतोय. तेव्हाचा मुंबई - पुणे प्रवास काय सांगता महाराजा ! राष्ट्रीय महामार्ग ४ वरून बोरघाटातून पुण्याला जाताना वाहनांची ती कसरत आणि खोपोली बस स्थानकानंतरची ती वाहतूक कोंडी ! हरहर. 

मग पुण्यावरून आपल्याला एखादी तरी खाजगी ट्रॆव्हल कंपनीची आरामबस मिळेल. फ़ारफ़ारतर मागली आसने मिळतील पण आपण दुस-या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत नागपूरला असू हे नक्की. रेल्वेत जागा नसताना उभे राहून धक्के खातखात (किंवा दुस-या कुणाच्या आसनावर बसल्यावर शिव्या खात) नागपूरपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या हक्काच्या जागेवर आरामशीर बसून जाऊ. फ़ारफ़ारतर मागे बसल्या मुळे थोडा हवाई प्रवासाचा आनंद मिळेल पण आम्ही दोघेही तरूण गब्रू जवान होतो.


बेत तर मोठा नामी आखला होता पण आमची अजून मुंबई-नागपूर प्रवासाची पुरती तोंडओळख व्हायची होती हे आम्हाला प्रवासानंतर कळले.

आम्ही ठाण्याला वंदना थियेटर स्थानकावर जावून ठाणे-पुणे निमाआराम एशियाड गाडीची दोन तिकीटे पण आरक्षीत केलीत आणि निर्धास्त झालोत.

ठरलेला दिवस उजाडला. मी खूप खुशीत. नागपूरला आपल्या सर्व नातेवाइक, मित्रमंडळींमध्ये दिवाळीला जायला मिळणार म्हणून. दुपारी सव्वा वाजताची बस होती. आम्ही सकाळी अकरा साडे अकरालाच घर सोडले. ऐरोली, सेक्टर ३ मधल्या साई-प्रकाश मधे जेवलो. साधारणत: दुपारी साडेबारा पाउण वाजता आम्ही वंदना (ठाणे) बस स्थानकावर आलोत. 

सुरूवातीचा अर्धा तास हा नेहमीच्या गप्पांमध्ये पसार जाला पण जवळपास सव्वा वाजत आले तरी आमच्या बसचा ठाणे स्थानकावर पत्ता नव्हता. मग पावलं "चौकशी" कडे वळलीत. तिथे कळले की ही बस पुण्यावरून येते आणि लगेच परत फ़िरते. पुण्यावरून येणारी बस नक्की कधी येइल हे सांगता येणं कुणालाही अवघडच होतं.

हळूहळू गर्दी वाढतच होती. दरम्यान पुण्याकडे जाणा-या दोनतीन बसेस आल्या आणि निघून गेल्यासुद्धा. (ठाणे-करमाळा, बोरीवली-कोल्हापूर वगैरे) थोडक्यात आमच्या लक्षात आलं की बहुतेक सर्व मंडळींनी याच एशियाडच आगाऊ आरक्षण केलेलं आहे. गाडी अगदी फ़ुल्ल होती. 

सुरूवातीच्या उत्सुकतेची जागा आता थोड्या काळजीने घेतली. आपण पुण्याला, नागपूरला जाणारी शेवटची बस निघून जाण्यापूर्वी, नक्की पोहोचू नां ? हा नकोसा प्रश्न मनात नकळत रुंजी घालायला लागला. आमच्या सारख्या इतरही प्रवाशी मंडळींच्या त्यांच्या त्यांच्या चिंता असाव्यात. हळूहळू सार्वत्रिक अस्वस्थता वाढायला लागली. कुण्याच्या ना कुणाच्या स्थानक प्रमुखांकडे चकरा वाढायला लागल्या.

एस.टी. ची अधिकारी मंडळीही वैतागली. त्यांच्या हातात काहीच नव्हते. येणा-या बस ऐवजी दुसरी बस सोडण्यासाठी आगारात बसही नव्हती.

शेवटी वाट पाहून थकलेल्या मंडळींना दूरून एशियाड चे पांढरे-हिरवे धूड येताना दिसले. पु. लं. च्याच भाषेत सांगायचे तर "कोलंबसाच्या जहाजावर जमिनीवरचे पक्षी दिसल्यावर खलाशांना जो आनंद झाला" तसा आनंद सर्वांना झाला.

गाडी आली. प्रवाशी भराभर आत चढलेत आणि आता अपेक्षा अशी की गाडी त्वरीत सुटावी. आधीच जवळपास तासभर उशीर झाला होता. पण  चालक महाशय निवांत होते. समोरच्याच एका पान टपरीवर ते निवांतपणे मावा (नागपुरी भाषेत खर्रा) घोटत होते. सर्व प्रवाशी स्थानापन्न झालेत. वाहक साहेब आत आलेत. (जवळपास पूर्णच प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले असल्यामुळे त्यांना नवीन तिकीटे देण्याचे कामच नव्हते. फ़क्त आरक्षणे तपासायची होती. ते काम त्यांनी सुरूही केले.) पण चालक महाशय निवांत होते. 

साधारणतः अडीचच्या सुमाराला चालकाच्या केबीनचे दार उघडण्याचा आवाज आला आणि हे महाशय आत बसलेत. प्रवाशी एव्हाना वैतागले होते. त्यातच कुणीतरी चालकाला उद्देशून काही तरी म्हणाले. झाले. त्या डायवर साहेबांनी आपली जागा सोडली, प्रवाशांच्या भागात ते आले आणि प्रवाशांना उद्देशून ते म्हणाले की आज ते रजा टाकणार आहेत. आणि उतरून गेलेत.

झालं. पुन्हा गोंधळ. मग वाहक आणि इतर काही उतारू मंडळी त्यांच्या मागे धावलीत आणि इतर काही प्रवाशी स्थानक प्रमुखांकडे धावलीत. तक्रारी करिता आणि पर्यायी व्यवस्थेकरिता. कशीबशी त्या साहेबांची पब्लिकने समजूत घातली आणि बसच्या एंजिनाचा आवाज दुपारी पावणे तीन वाजता सुरू झाला. (एकदाचा)

दि. २१/१०/१९९५
ठाणे (वंदना) ते पुणे : आसन क्र. १६, १७ (संजय भोयर)
ठाण्यावरून प्रयाण: दुपारी १४.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: ठाणे रेल्वे स्टेशन, पनवेल, खोपोली (एम. टी. डी. सी. उपहार गृह), चिंचवड बस स्थानक.
बस: ठाणे निम आराम पुणे.
बस क्र.: MH-12 / Q 8073, म.का.दा. न. ले. १९९३-९४.
आगार: ठा. ठाणे-१ आगार.
चेसिस क्र.: २६५७०
मॊडेल : ASHOK LEYLAND, CHEETAH
आसन व्यवस्था: ३ x २.
पुणे आगमन: रात्री २०.१५ वाजता
एकूण अंतर: १६५ किमी.
सरासरी वेग: ३० किमी प्रतीतास.

पुन्हा एकदा बोरघाटाची मजा लुटत प्रवास केला. तसा थोडासा टेन्शनमध्येच होतो पण पुन्हा मजा आली.

पुण्यात शिवाजीनगर ला उतरलो. तिथूनच नागपूरकडे जाणा-या खाजगी ट्रॆव्हल्स सुटायच्यात. या ऒफ़िसातून त्या ऒफ़िसात. या ट्रॆव्हल कडून त्या ट्रॆव्हलकडे आम्ही फ़िरलो. बहुतेक सगळ्या नागपूरकडे जाणा-या गाड्या निघून गेलेल्या होत्या. एक दोन होत्या पण त्यांच्यात फ़क्त ड्रायव्हर केबीन मध्येच बसायला जागा होती आणि तिकीटेपण भन्नाट होती (४५० रू. मागत होते. तेव्हा नागपूर-पुणे खाजगी गाड्यांचे प्रवासभाडे रू. २०० - २५० होते. "प्रसन्न" ची फ़क्त १८ आसनांची असलेली आरामशीर अशी गोल्ड लाइन बस ५०० रू. घ्यायची.) (त्या बस मध्ये आपण बसायचच हे माझं स्वप्न होतं. पण तसे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत प्रसन्नने ती गाडीच बंद केली.)



मी जपून ठेवलेली प्रसन्न गोल्ड लाईन ची जाहिरात. हे स्वप्न पूर्ण झालंच नाही.

मग आम्ही आमचा मोर्चा शिवाजीनगरच्या एस.टी. स्थानकाकडे वळवला. तिथेही तुफ़ान गर्दी. पण आशेची गोष्ट एव्हढीच होती की दर पंधरा मिनिटांनी पुणे-अकोला अशी विशेष बसफ़ेरी सोडण्यात येत होती. कुठल्याही डेपोची (अगदी सोलापूर, सातारा, कोल्हापूर विभागातली सुद्धा) बस आली की लगेच ती अकोल्याकडे जादा बस म्हणून रवाना करायचे.

अशीच एक बस फ़लाटावर येताना दिसली आणि गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसे त्या बसला चिटकणा-या इतर प्रवाशांमध्ये आम्ही सामील झालो.

दि. २१/१०/१९९५ व २२/१०/१९९५

पुणे ते औरंगाबाद : आसने मिळाली नाहीत.
पुण्यावरून प्रयाण: २१/१० रोजी रात्री २०.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: सुपे ढाबा, अहमदनगर, नेवासे फ़ाटा.
बस: पुणे जादा अकोला.
बस क्र.:  MH-12 / Q 8950, म.का.दा. न. टा. १९९४-९५.
आगार : सो. पंढरपूर आगार.
चेसिस क्र.: GVQ ७१६७३५.
मॊडेल: TATA 1510 Air Brakes
आसन व्यवस्था: ३ x २
औरंगाबाद आगमन: २२/१० रोजी पहाटे ०३.१५ वाजता.
एकूण अंतर: २६० किमी.
सरासरी वेग: ४० किमी. प्रतीतास.




(Special Thanks to Vishal Joshi, Ratnagiri for this wonderful sketch.)


बसमध्ये आम्ही घुसलोत खरे पण थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. सगळी बस आरक्षित होती. जादा बस असूनही पूर्णपणे आरक्षण होते. आम्हाला बसायला तर सोडाच पण आमच्या बॆगा ठेवायलाही जागा नव्हती. प्रत्येकच जण दिवाळीला आपापल्या गावाला, विदर्भात चालला होता. मधल्या मार्गिकेमध्येही सगळ्यांचे सामान. आम्हाला कसेबसे पाउल ठेवण्यापुरती जागा उरलेली. मग त्या बसने अकोल्यापर्यंत जाण्याचा विचार सोडावा लागला. आता निघालोच आहोत तर औरंगाबाद पर्यंत तरी जाउ. रात्री तिथे अण्णाकाकांकडे थांबून उद्या अण्णाकाकांकडून नागपूरला जाण्याची व्यवस्था करू असे ठरले.


पहाटे पहाटे औरंगाबादला उतरलो. रात्रभर उभ्याने प्रवास झाला होता. सुप्याच्या ढाब्यानंतर आम्ही आमच्या हातातले सामान ड्रायव्हर केबीनमध्ये ठेवायची परवानगी ड्रायव्हर साहेबांना मागितली होती त्यामुळे नीट उभे तरी राहता आले होते. पण प्रचंड थकलेलो होतो. तसेच अण्णाकाकडे गेलोत आणि थोडे आडवे झालोत.

दि. २२/१०/२०१२

तास दोन तासांच्याच झोपेनंतर आम्ही उठलो. घरी चर्चा करताना लक्षात आलं की औरंगाबाद ते नागपूर जाणा-या खाजगी ट्रेव्हल्सच्या बसेस पण सगळ्या फ़ुल्ल आहेत. एस. टी. नेच जावे लागणार. सकाळी ९.३० ची औरंगाबाद-साकोली गाडी तेव्हा नुकतीच सुरू झालेली होती. त्या गाडीत जर जागा मिळाली असती तर आम्ही रात्री १०, १०.३० पर्यंत सहज नागपूरला पोहोचू शकत होतो. आरक्षण मिळाले तर पहावे आणि न जाणो, दिवाळीच्या वेळेला आरक्षणासाठी इथेही गर्दी असली तर ? म्हणून आम्ही साधारणतः सकाळी सहा साडेसहाच्याच सुमाराला औरंगाबाद बस स्थानकावर गेलो.

सकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. स्थानक नुकतेच झोपेतून जागे झाल्यासारखे आळोखेपिळोखे देत होते. रात्री उशीरा आलेल्या गाड्या मस्त झोपल्या होत्या तर पहाटपक्षी गाड्यांची लगबग सुरू झालेली होती. आत प्रवेश केल्यावर बाजुलाच काल रात्री आलेली साकोली-औरंगाबाद निवांत झोपून होती. आता सकाळी हीच गाडी आम्हाला नागपूरला नेणार या भावनेने बरे वाटले आणि आरक्षणासाठी रांग लावायला आम्ही तिकडे निघालोत.

तिथे शुकशुकाट होता. पण आरक्षण काउंटर सुरू झालेली होती. आश्चर्याचा मोठा धक्का आम्हाला बसला. दिवाळी म्हणून की काय सगळी काउंटर्स सकाळी सहा वाजताच सुरू झालेली होती. आणि आम्ही दोघे सोडून त्या केंद्रावर आत्तातरी कुणीही नव्हते.

आम्ही आत गेलो आणि तिथल्या कर्मचा-याला औरंगाबाद-नागपूर आरक्षण मागितले. त्याने चार्ट पाहिला आणि सांगितले की संध्याकाळी साडेसहाची गाडी फ़ुल्ल आहे. आम्ही म्हटले की आम्हाला ती संध्याकाळची गाडी नकोच आहे. आत्ता साडेनवाला सुटणा-या साकोली बसचे आरक्षण द्या. त्याने सरळ नकार दिला. म्हणाला अशी गाडीच नाहीय. मी म्हटलं की अहो, गाडी सुरू होउन सहा आठ महिने झालेले आहेत आणि आत्ता ती गाडी तुमच्या मागल्या बाजुला उभी आहे.

काय कोण जाणे ? तो एकदमच भडकला. आणि कारण नसताना तो भडकल्याचे पाहून आम्ही दोघेही भडकलो. आमची वादावादी "तू बाहेर ये, तुला दाखवतो" इथपर्यंत येऊन पोहोचली. (तसा संजय पहिल्यापासून बॊडी बिल्डर आणि आम्हा दोघांमध्येही तारुण्याचा जोश. त्यातच कुणीतरी चुकीच्या कारणांसाठी अकारण भडकतोय म्हटल्यावर अन्यायाविरुद्धची चीडही उफ़ाळून आली होती.)

आमचे चढलेले आवाज ऐकून एक वरिष्ठ अधिकारी तेथे आलेत. त्यांनी पहिल्यांदा त्या कर्मचा-याला तिथून जायला सांगितले. आम्हाला तो विषय सोडून द्यायला सांगितले आणि स्वतः त्या काउंटरवर बसून आम्हाला विचारले की नक्की आमचे काम काय ? आम्ही आमचा साकोली गाडीचा विषय मांडल्यावर त्यांनी सांगितले की गाडी असेलही, पण त्याचे आरक्षण करण्याची मुभा औरंगाबाद केंद्राला नाही. 

मग आम्ही विचारात पडलो. सकाळी आत्ता पटकन घरी जाउन ही गाडी पकडायला यावे तर समजा ऐनवेळी ही गाडीही कालच्या गाड्यांसारखीच भरून गेली तर उभ्याने एव्हढा लांबचा प्रवास करण्याची आमची ताकद नव्हती. शिवाय रात्रभरच्या जागरणामुळे झोपेची खूप आवश्यकता वाटत होती.

आम्ही असे विचारात पडल्याचे पाहून ते म्हणाले अहो असला विचार कसला करताय ? नवीन गाडी सोडूयात आज नागपूरला आणि त्यांनी लगेचच त्या आरक्षण रजिस्टरवर नव्या गाडीची वेळ संध्याकाळी सात अशी लिहून आमची नावे आसन क्र. १ आणि २ वर टाकलीही. (ही आसने महाराष्ट्र एस.टी. त आमदार खासदारांसाठी राखीव असतात.) आता हा सगळा एव्हढा घोळ झाल्यानंतर ही गाडी खरंच जाणार की ही आमची वचपा काढण्यासाठी केलेली फ़सगत आहे ? हा मोठ्ठा प्रश्न आम्हाला पडलेला होता. हा प्रश्न त्यांनी मनकवड्यासारखा वाचला असावा. ते म्हणाले "घाबरू नका. तुमच्या दोघांसाठीच ही गाडी सोडत नाहीये. इतकी गर्दी आहे की आत्ता बाहेर घोषणा करायचीच खोटी की गाडी दुपारपर्यंत फ़ुल्ल होतेय बघा." आणि खरोखरच आम्ही आरक्षण करून बाहेर येइस्तोवर बाहेर जादा गाडी बाबतच्या घोषणेचा बोर्डही टांगला गेला होता.

मग काय ? आम्ही अण्णाकाकांकडे परतून रात्रीच्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरूवात केली. औरंगाबादमध्ये तसाही आमचा दिवस आरामशीरच असतो. आज मस्त झोप आणि थोडी भटकंती करून आम्ही थोड्या साशंक मनानेच सायंकाळी बस स्थानकावर गेलोत.

संध्याकाळी साडेसहाची बस साडेसहाला फ़लाटावर लागली आणि पावणेसात पर्यंत सुटलीही. बस गच्च भरून गेली पण आमचा जीव भांड्यात टाकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे आमच्या गाडीला भरपूर प्रवासी मिळालेले होते आणि आम्ही सगळेच बस फ़लाटावर लागण्याची वाट बघत होतो.

सातचे साडेसात वाजले तरी बसचा पत्ताच नाही मग आमच्यापैकी काही उत्साही आणि उतावीळ मंडळींनी औरंगाबाद स्थानकाला लागूनच असलेल्या औरंगाबाद आगाराच्या दारापाशी धाव घेतली आणि आमच्या विशेष गाडीसाठी कुठली बस पाठवणार याचे अंदाज आणि बेताबेताने खाकी कपडेवाल्या मंडळींना विचारणा सुरू केली. आणि मग कळले की गाडी पाठवायला आगारात आत्ता वेगळी अशी गाडीच नाहीये.

मग आमचे सर्वांचेच धाबे दणाणले. संध्याकाळ अधिकच निराश वाटायला लागली. आता आजची रात्रही औरंगाबादमध्येच काढावी लागतेय की काय ? अशी शंका मनात येवू लागली. त्याचा प्रश्न नव्हता पण उद्यातरी नागपूरला जायला मिळणार की नाही याबद्दल खात्री नव्हती.

रात्र अधिकच गडद वाटायला लागली होती. आठ साडेआठ वाजत आलेले होते. आणि अचानक अक्षरशः एक आशेचा किरण चमकला. एक नवीन कोरी लेलॆण्ड बस दापोडी कार्यशाळेतून औरंगाबाद आगारात सामील व्हायला औरंगाबाद आगाराजवळ आली. साधारण ५० च्या गणसंख्येच्या आसपास डेपोपाशी उभ्या असलेल्या पासिंजरांची त्या डेपो मॆनेजरला दया आली असावी त्याने त्या बसलाच औरंगाबाद-नागपूर विशेष बस म्हणून पाठवण्याचे ठरविले. ज्या चालकाने ती बस कार्यशाळेतून औरंगाबादपर्यंत आणलेली होती त्याच चालकाला विनंती केली आणि त्या भल्या माणसाने ती मान्यही केली.

दि. २२/१०/१९९५ व २३/१०/१९९५
औरंगाबाद ते नागपूर : आसन क्र. १ व २.
औरंगाबादवरून प्रयाण: २२/१० रोजी रात्री २१.३० वाजता.
मार्गावरील थांबे: जालना, देउळगावराजा, चिखली ढाबा, चिखली,अकोला, अमरावती, तळेगाव, कारंजा (घाडगे).
बस: औरंगाबाद जादा नागपूर.
बस क्र.: MH-12/ R 1950,  म.का.दा. न. ले. १९९५-९६.
आगार : औ. औरंगाबाद-२ आगार.
चेसिस क्र.: HVQ ३४५१९७
मॊडेल: ASHOK LEYLAND, CHEETAH model.
आसन व्यवस्था: ३ x २
नागपूर आगमन: २३/१० रोजी सकाळी ०८.०० वाजता.
एकूण अंतर: ५०० किमी.
सरासरी वेग: ४६.१५ किमी. प्रतीतास.

(पुन्हा एकदा विशाल जोशींचे आभार. ह्या स्केचेस त्यांनी खूप मेहेनतीने आणि कल्पकतेने काढल्या आहेत पण त्या उदार मनाने मला माझ्या लिखाणासाठी वापरू दिल्यात.)


ऐन दिवाळीत मी आणि संजय भोयर नागपूरला आलो. त्या ड्रायव्हरविषयी कृतज्ञता आजही माझ्या मनात दाटून आहे. त्या भल्या माणसाने दिवस आणि रात्रभर ती गाडी पुणे ते नागपूरपर्यंत चालवली होती ती फ़क्त "प्रवाशांच्या सेवेसाठी" आणि एस.टी. चे ब्रीद सार्थ केले होते.








1 comment:

  1. masta re mitra.

    Mi pan khandeshatun Punyala khup chakara maralya ahet.

    Pravasacha avadata bhag mhanage shirdi/shrirampur la chaha pyayala gadi thambayachi. gaar varyat chaha pyayala masta vatayache.

    ReplyDelete