Saturday, March 31, 2012

रेल्वे अर्थसंकल्पाबाबत - २या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या आणि विशेषतः विदर्भाच्या झोळीत काय टाकलेय ते बघूयात आणि तदअनुषंगाने इतरही बाबींचा आता वस्तुनिष्ठ विचार करूयात.

१) कामाख्या (गौहत्ती)- लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वातानुकूलीत एक्सप्रेस : इटारसी मार्गे धावणारी ही गाडी भुसावळ आणि थांबलीच तर नाशिककरांच्या फ़ायद्याची ठरेल असे वाटतेय. मुख्यत: आसाम, बंगाल आणि बिहार मधल्या कामकरी वर्गाला मुंबईत आणून सोडणारी आणि गावी परत नेणारी ही गाडी ठरणार.


२) वांद्रे टर्मिनस-भुज वातानुकूलीत एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- बिकानेर एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- गांधीधाम एक्सप्रेस : ह्या तीनही गाड्या मुंबईतल्या गुजराथी भाईंसाठी असणार हे उघड आहे. गेल्या १० वर्षांपासूनचे रेल्वे अर्थसंकल्प आणि त्यावरील प्रतिक्रिया बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की दर अर्थसंकल्पानंतर "आमच्यावर फ़ार अन्याय झाला हो" म्हणून कुठलं न कुठलं राज्य दरवेळी गळा काढतंच असतं. (महाराष्ट्राच्या वाट्याला तर हा मान ब-याचदा आलाय.) पण गुजरातवर अन्याय झालाय असं होताना दिसत नाही.

याच्या कारणाचा शोध घेताना आपल्या लक्षात असे येईल की साधारणतः रेल्वे अर्थसंकल्पाच्या आखणीला डिसेंबरमध्ये सुरुवात होते. नवीन गाड्यांची तरतूदही त्याच सुमारास विचारात घेतली जाते. डिसेंबरच्या सुरूवातीलाच गुजरातमधील सर्वपक्षीय खासदार पक्षभेद विसरून एकत्र येऊन रेल्वेमंत्र्यांना भेटतात आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवून त्यांची तड लावतात. मध्यंतरी मध्य रेल्वेच्या उच्चाधिका-यांनी रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागात येणा-या खासदारांच्या मतदारसंघांतील समस्या जाणून घेण्यासाठी व इतर चर्चेसाठी नागपूरला बैठक बोलावली होती. विदर्भातल्या खासदारांपैकी फ़क्त चंद्रपूरचे आणि बुलढाण्याचे खासदार उपस्थित होते. मग कश्या मिळणार तुम्हाला नवीन गाड्या ? कश्या अपेक्षा करणार रेल्वेकडून आपण काहीतरी भरीव मिळवण्याच्या ?

३) कोइंबतूर-बिकानेर एक्सप्रेस, दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस : या तीनही गाड्या कोकण रेल्वेमार्गावरून धावणार आहेत. पण महाराष्ट्राच्या पदरात फ़ार पडेल असे वाटत नाही. कोकण रेल्वे सुरू होऊन जवळपास १५ वर्षे होत आलीत तरी कोकणी जनतेच्या पदरात फ़ार काही पडले नाही. त्या मार्गाने भरधाव निघून जाणा-या गाड्याच कोकणाला बघाव्या लागताहेत. बहुतांशी गाड्यांना रत्नागिरी आणि फ़ार झालंच तर सावंतवाडी चा थांबा दिलेला असतो. तो सुद्धा रेल्वेच्या तांत्रिक सोयींसाठी. आता गरज आहे ती कोकणी नेत्यांनी आपापसातले नगरपालिका. ग्रामपंचायती, परिषदा यावरून होणारे राडे थोडे बाजुला सारून थेट रेल्वेमंत्रालयात राडा करण्याची.

ह्याठिकाणी गुजरातप्रमाणेच आणखी एका ठिकाणाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि ते म्हणजे मध्य प्रदेशातले इंदूर. दर अर्थसंकल्पात इंदूरच्या वाट्याला काहीतरी विशेष येतंच येतं. यंदाही दोन डबलडेकर वातानुकूलीत गाड्यांपैकी एक त्यांच्या वाट्याला आलेली आहे. (हबीबगंज, भोपाळ- इंदूर वातानुकूलीत डबलडेकर एक्सप्रेस) यामागे तिथल्या खासदार सुमित्राताई महाजनांची कळकळ आहे हे सांगणे नलगे.

या अर्थसंकल्पातील एक निरीक्षण असे की यावेळी जवळपास ३० एक्सप्रेस गाड्या या कमी अंतरासाठी सुरू केल्या गेलेल्या आहेत. उगाचच खंडप्राय गाड्या, विचार न करता सुरू करण्यापेक्षा, स्थानिकांच्या गरजा आणि सोयीसुविधा लक्षात घेउन हे केले गेलेले आहे. यशवंतपूर (बंगलुरू)- कोचुवेली (तिरूवनंतपुरम), काकीनाडा-सिकंदराबाद, कामाख्या-तेजपूर, जबलपूर-सिंगरौली, कानपूर-अलाहाबाद वगैरे. यातल्याच सिकंदराबाद-बेलमपल्ली गाडीच मला कौतुक वाटत. बेलमपल्लीला गाडी सुरू करण्यासंबंधी कसलीच सोय नसतानाही ही गाडी आंध्र प्रदेशातल्या प्रदेशात ३०० किमी अंतरासाठी सुरू होतेय. (विदर्भातल्या खासदारांनी थोडा जोर लावला तर पुढल्या अर्थसंकल्पात ह्या गाडीचा विस्तार नागपूरपर्यंत, किमान वर्धेपर्यंत निश्चितच होउ शकतो.)

४) विशाखापट्टणम- शिर्डी, म्हैसूर-शिर्डी : शिर्डीचं सध्याच बदलत जाणारं स्वरूप पाहिलं की आणखी काही वर्षांनी शिर्डी हा आंध्रप्रदेशातला जिल्हा घोषित करण्याची मागणी झाली तर आश्चर्य वाटायला नको. ४ वर्षांपूर्वी मी शिर्डीला गेलो असताना तिथल्या दुकानांच्या, भोजनालयांच्या पाट्या पाहून मी थक्कच झालो. आपण महाराष्ट्रात आहोत की आंध्रात असा प्रश्न पडावा इतपत तेलुगूकरण तिथे झालेले आहे. (मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिथे आंदोलन वगैरे केलेले ऐकले होते. त्याचा परिणाम झाला असेल अशी आशा आहे.) भारतीय रेल्वेने शिर्डी-पुणतांबे मार्गाचे निर्माण केवळ दक्षिण भारतातून शिर्डीला येणा-या भाविकांपुरतेच केलेले आहे की काय असा प्रश्न पडतो. मुंबई-शिर्डी २ गाड्या, हावडा-शिर्डी ही आठवडी गाडी आणि आत्ता उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये घोषित झालेल्या निज़ामुद्दीन- शिर्डी व पंढरपूर- शिर्डी गाड्या वगळता सध्या बाकी सगळ्या गाड्या विशाखापट्टणम-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी, काकीनाडा-शिर्डी, चेन्नई-शिर्डी, यशवंतपूर-शिर्डी अशाच आहेत. त्यात या दोन गाड्यांची भर.

५) इंदूर- यशवंतपूर आणि जयपूर-सिकंदराबाद : या दोन्हीही गाड्या सध्या निर्माणाधीन असलेल्या नरखेड-अमरावती मार्गाने जाणार आहेत. हा अट्टाहास कां ? हेच मला कळत नाही. जयपूर-सवाई माधोपूर-नागदा-उज्जैन-हबीबगंज-इटारसी-नरखेड-अमरावती-अकोला-पूर्णा-परभणी-विकाराबाद-काचीगुडा-धोन-धर्मावरम-यशवंतपूर हा लांबचा मार्ग झाला. त्यातला नरखेड-अमरावती मार्ग अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गाचा बहुतांशी भाग हा एकेरी आणि विद्युतीकरण न झालेला असा आहे. इटारसी-नागपूर-बल्लारशाह-काज़िपेठ-काचीगुडा या मार्गापेक्षा प्रस्तावित मार्गात अंतर तर जास्त होईलच शिवाय वेळही जवळपास दुप्पट लागेल. राष्ट्रपतींचा मान ठेवण्यासाठी या गाड्यांना असा अडनिडा मार्ग दिला असावा. त्यानिमित्ताने या वर्षात नरखेड-अमरावती मार्गाचे काम पूर्ण झाले तर तीच एक मोठी उपलब्धी ठरेल.


६) अमरावती-पुणे : या गाडीचा प्रस्तावित मार्ग सुद्धा असाच लांबचा आहे.अमरावती-अकोला-पूर्णा-परभणी-लातूर रोड-लातूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे या लांबच्या मार्गापेक्षा अमरावती-पुणे ही गाडी भुसावळ-मनमाड-दौंड मार्गे सोडता आली असती. सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणा-या नागपूर-पुणे गरीब रथ एक्सप्रेसला दररोज करून (आणि मार्गे कल्याण वळवून. फ़क्त २८ कि.मी. चा फ़रक पडतोय मार्गे कल्याण आणि मार्गे दौंड मध्ये. पण पुण्याबरोबरच ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरात राहणा-यांची मोठी सोय या गाडीने झाली असती.) त्याच वेळापत्रकात अमरावती-पुणे एक्सप्रेस सोडता आली असती. आठवड्यातून तीन दिवस अमरावती-पुणे, तीन दिवस नागपूर-पुणे (सध्या अस्तित्वात असलेल्या वेळापत्रकानुसार) आणि उरलेला एक दिवस सध्या असलेली बिलासपूर-पुणे असा मेळ घालता आला असता.

या लांबच्या मार्गाने अमरावतीहून पुण्यापेक्षा अमरावती-सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर-वाडी-बंगलुरू अशी गाडी अधिक सयुक्तिक ठरली असती. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या असलेल्या आणि बंगलुरूला कामाला असलेल्या असंख्य अभियंत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुवा रेल्वेला घेता आले असते.

७) सिकंदराबाद-दरभंगा : प्रस्तावित मार्गानुसार ही गाडी महाराष्ट्रातून बल्लारशाह-गोंदिया मार्गाने सुळकन निसटून जाणार आहे. म्हणजे कोकण रेल्वेवर धावणा-या गाड्यांप्रमाणे या गाडीचाही महाराष्ट्राला फ़ारसा उपयोग नाही. सध्या गोंदिया ते बल्लारशाह हा मार्ग द.पू.म. रेल्वे (बिलासपूर) च्या ताब्यात आहे तर हैद्राबाद-बल्लारशाह मार्ग द.म. रेल्वे (सिकंदराबाद) च्या ताब्यात आहे. तिथले अधिकारी आणि त्यांच्या निष्ठा त्यांच्या मुख्यालयाशी निगडीत आहेत. मग त्यांनी महाराष्ट्राचा विचार का करावा ? (शिवाय मध्य रेल्वे मधल्याही सगळ्यांनाच महाराष्ट्राविषयी आस्था आहे असं थोडंच आहे ?)

८) शिर्डी-पंढरपूर : घोषणा करण्यात आलेल्या गाड्यांपैकी छोट्या अंतराच्या गाड्यांमधली ही एक गाडी. ह्या गाडीची दोन्ही बाजुंनी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या धावत असलेल्या दादर-शिर्डी गाडीलाच थोड्या वेळाने शिर्डी-पंढरपूर म्हणून सोडण्याची दाट शक्यता मला वाटतेय. (उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये एक गाडी अशीच प्रस्तावित आहे. उन्हाळी विशेष गाड्या ह्या एका अर्थाने नियमित गाड्या चालवण्यापूर्वीची चाचपणी करणा-याच असतात हे येथे लक्षात घ्यायला हवे.)

९) विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) : या गाडीच्या प्रस्तावित मार्गामध्ये सध्यातरी फ़क्त रायपूर असे लिहिले आहे. पण रायपूर पासून भंडारा-नागपूर-अकोला-भुसावळ मार्गे जाणार असेल तर महाराष्ट्राला उपयोग. अन्यथा जाणून बुजून रायपूर-बिलासपूर-कटनी-इटारसी मार्गे जर गाडी लांबच्या मार्गाने वळवण्यात येणार असेल (तशीच दाट शक्यता आहे) तर आपल्या हातात फ़ारसे काही लागण्याची शक्यता नाही.

१०) पोरबंदर-सिकंदराबाद : वसई, कल्याण, पुणे, सोलापूर मार्गे जाणारी ही एक चांगली गाडी.

११) वांद्रे (टर्मिनस) ते दिल्ली सराई रोहिला : मुंबईकरांना दिल्लीला जाण्याची आणखी एक सोय झाली खरी पण ही गाडी लांबचा मार्ग घेत जातेय. अहमदाबाद नंतर राजस्थानाची सहल घडवत दिल्लीला जाणारी ही गाडी. अर्थात मुंबई ते दिल्ली प्रवासी बघता ही गाडीही रिकामी राहणार नाही हे निश्चित.

१२) झांशी-मुंबई : मध्यप्रदेशाला जोडणारी ही एक चांगली गाडी आहे. फ़क्त गतवर्षी छिंदवाडा-झांशी आणि छिंदवाडा-ग्वाल्हेर या गाड्यांची झाली तशी गत या गाडीची न होवो म्हणजे मिळवली. मोठ्या गाजावाज्याने या दोन गाड्या सुरू झाल्या ख-या पण पहिल्या काही फ़े-यांनंतरच त्यांना दिल्लीपर्यंत वाढवण्याची घोषणा झाली.

१३) सिकंदराबाद-नागपूर : आठवड्यातून तीन दिवस धावणारी ही गाडी बरेच दिवस प्रवासी मंडळांकडून प्रस्तावित अशीच होती. नागपूरवरून दररोज हैद्राबाद साठी असणारी वाहतूक पाहता ह्या गाडीचे उत्तम स्वागत व्हायला हवे. पण पुन्हा ह्या गाडीची वेळ महत्वाची ठरणार हे निश्चित. २०१० च्या उन्हाळ्यात नागपूर-अमरावती एक्सप्रेसच्याच रेकला नागपूर-सिकंदराबाद-वाडी उन्हाळी विशेष म्हणून चालवण्याचा प्रयोग अत्यंत गैरसोयींच्या वेळांमुळे फ़सला होता. त्या गाडीची फ़ार जाहीरातही मध्य रेल्वेने केली नव्हती.

१४) जबलपूर-निजामुद्दीन : या गाडीचा तसा महाराष्ट्राशी थेट संबंध नाही. पण ही गाडी सुरू झाल्यामुळे ह्या गाडीशी असलेला गोंडवाना एक्सप्रेसचा संबंध संपणार आहे. सध्या बिलासपूर / भुसावळ- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस १३ डब्यांनिशी धावत होती. रात्री बीना जंक्शनला या गाडीला जबलपूर-निजामुद्दीन गाडीचे ११ डबे लागायचेत. ते आता बंद होणार. त्यामुळे दुहेरी फ़ायदा असा की आता गोंडवाना एक्सप्रेस पूर्ण २४ डब्यांची धाऊ शकेल. त्यामुळे मधल्या स्थानकांवरून जास्त जागा उपलब्ध होउ शकतील आणि बीना जंक्शनला जबलपूरवरून येणा-या गाडीची वाट पहाण्यात वेळ वाया न जाता या गाडीला अधिक वेगवान करता येउ शकेल. (तशी चिन्हेही आहेत.)

१५) सोलापूर-यशवंतपूर एक्सप्रेस : आठवड्यातून तीन दिवस धावणारी ही गाडी लोकप्रिय व्हायला हरकत नाही. पुण्यापर्यंत वाढवायला हरकत नसावी.

१६) हैद्राबाद-अजमेर एक्सप्रेस : काजीपेठ-नागपूर-इटारसी-हबीबगंज-उज्जैन-नागदा या जवळच्या मार्गाने जाण्यापेक्षा मनमाड-इटारसी-रतलाम ह्या जवळपास ४०० किमी लांबच्या मार्गाने ही गाडी नेउन रेल्वे नक्की काय साधणार हेच कळत नाही.

१७) शालीमार (हावडा)- भुज एक्सप्रेस : ही गाडीही बिलासपूर- कटनी-भोपाळ-नागदा या मार्गापेक्षा नागपूर-भुसावळ-जळगाव=नंदूरबार मार्गे गेली असती तर अंतर वाचले असते आणि विदर्भातून गुजरातेत जायला आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असता.

१८) अमृतसर-नांदेड एक्सप्रेस : ह्याच दोन स्थानकांदरम्यान सचखंड एक्सप्रेस दररोज असतानाही शिख बंधूंच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. ही गाडी मात्र इटारसी नंतर नागपूर-सेवाग्राम-माजरी-आदिलाबाद-मुदखेड मार्ग घेत जाणार आहे.

१९) मालदा शहर- सुरत : ही गाडी सुद्धा नागपूर-वर्धा-भुसावळ-जळगाव मार्गाने प्रस्तावित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) गाडीच्याच वेळेत ही गाडी धावेल अशी आशा आहे.

ह्याव्यतिरिक्त नागपूर-वर्धा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर तिसरा मार्ग टाकण्याची घोषणा अस्तित्वात आलेली आहे. (ती कितपत अंमलात येतेय हे काळच ठरवेल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये घोषणा केल्या गेलेल्या वर्धा-यतमाळ-नांदेड, धुळे-इंदूर, कराड-चिपळूण, कोल्हापूर-रत्नागिरी या प्रकल्पांबाबत आजही थंडा कारभार आहे.) महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ह्या सर्व तरतूदी लवकरात लवकर अंमलात आणण्याची गरज आहे. गरज आहे ती जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते ती दाखवून दिल्लीत आपला ठसा उमटवणार का ? हे पाहणे आगामी काळात आवश्यक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment