Wednesday, February 29, 2012

बोन्साय

सुटीतल्या वेळात परिचितांकडे, नातेवाइकांकडे मी आवर्जून भेटी देतो. रोजच्या कामांच्या धबडग्यात ज्या निवांत क्षणांना. एकमेकांच्या आस्थेने केलेल्या गप्पांना आपण मुकतो ते क्षण पुन्हा अनुभवता येतात. पुढल्या सुट्टीपर्यंत आपण ताजेतवाने होउन जातो.


असाच एकदा एका स्नेह्यांकडे गेलो असताना नेहेमीप्रमाणे शिळोप्याच्या गप्पा झाल्यात लगेच ते म्हणालेत, " चला. तुम्हाला आमची बोन्सायची बाग दाखवतो. "

बाग पाहताना माझा चेहरा "अजि म्यां ब्रम्ह पाहिले" असा झाला असावा. कारण ते स्नेही अधिकाधिक उत्साहाने त्या झाडांची लागवड, जोपासणी इ. विषयी बोलायला लागले. मी मात्र हुंकार. कधी होकारार्थी कधी नकारार्थी शब्दांच्या द्वारे माझा बचाव करीत माझी सुटका करून घेतली.

परतताना तोच विचार मनात सारखा घोळत होता. खरच, किती अफ़ाट आहे नाही हा निसर्ग ! आणि त्याहून अफ़ाट आहे त्या निसर्गावर मात करणारा माणूस. आंबा, संत्री, वड, पिंपळासारख्या चांगल्या ३०-३५ फ़ूट वाढू शकणा-या झाडांची वाढ खुंटवून त्यांना २०-२५ इंचांमध्ये आणायचे. त्यात त्यांना इवली इवली पाने. फ़ुले, फ़ळे अगदी तसेच.

मग मला ते स्नेही अचानक दुष्ट वाटायला लागलेत. वाटलं की मुक्या जीवांबाबत हा काय अमानुषपणा ! पण मनात पुन्हा वाटलं की केवळ त्यांनाच दुष्ट, अमानुष म्हणून काय फ़ायदा ? आपलं शिक्षणखातं नाही का, मुलांवर त्यांच्या नैसर्गिक कलाचं, आवडीचं शिक्षण न देता त्यांची वाढ खुरटवून त्यांचा बोन्साय करून टाकत ? अनेकांचे पालकच तर त्यांच्या नैसर्गिक कलाचा विचार न करता आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादून त्यांचा बोन्साय करून टाकतात.

आपले पुढारी नाही कां, ज्या वयात तरुणांना विधायक दिशा दाखवून राष्ट्रउभारणीच काम करायचं, त्या तरुणांची माथी या ना त्या प्रक्षोभक कारणांनी भडकवून त्यांच्या मनाचा आणि एकंदर आयुष्याचाच बोन्साय करून टाकत ?

तसं पहायला गेलो तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजमनात आज एक बोन्साय़ आहे आणि बोन्साय घडविणारेही आहेत. आपली कुवत असताना हवी तेव्हढी उंची गाठू न शकणे म्हणजे बोन्साय. बोन्साय म्हणजे कोतेपणा. बोन्साय म्हणजे निसर्गावर मात करण्याच्या वेड्या हट्टापायी स्वतःचीच केलेली प्रतारणा.

या विचारमालेतच मनात विचार चमकून गेला की स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक जीव हा ’अव्यक्त ब्रम्ह ’ असताना, जर प्रत्येकाने पूर्ण ब्रम्ह होण्याकडे वाटचाल केली, तर आपणच आपल्या "बोन्साय"पणातून बाहेर पडू. नाही कां ?

प्रा. राम प्रकाश किन्हीकर

पाकीटमारी

नेहेमीची बस वळून येत होती. सुटकेचे निःश्वास सोडतोय न सोडतोय तोच कंडक्टरने डबल बेल वाजवल्याची जाणीव झाली. थोडावेळ बसबरोबर धाऊन बसला कसाबसा लटकलो. पुढल्या थांब्यावर बस थांबल्यानंतर जरा आत जायला मिळालं.

कंडक्टर जवळ येईपर्यंत पैसे काढून ठेवलेत. गर्दी भयानक होती. कार्यालयात काम करून (क्वचित झोपा काढूनही) थकलेले जीव घरी परतत होते. सीताबर्डीच्या थांब्यावर पुन्हा काही माणसं आत कोंबल्या गेलीत. " पीछे खाली गाडी आ रहा है " असं म्हणतच कंडक्टरने उरलेल्यांना बसचा दांडा सोडायला लावला होता. (या कंडक्टर लोकांना नेहेमीच मागची बस रिकामी कशी दिसते ? हे मला न कळलेले कोडे आहे. मुळात मागच्या बसमधलं त्यांना दिसतं कसं ? भगवंतांने त्यांना संजयाप्रमाणे दिव्यदृष्टी दिली असावी.)


बसमध्ये वैताग, चीड, नैराश्य, थकवा यांच एक सुरेख मिश्रण होतं. तेवढ्यात कुणीतरी ओरडलं " अपनेअपने खिसापाकीट संभालो. " माझ्या पुढल्या सेठने अगदी त्याच्याही नकळत त्याचा खिसा चाचपून स्वतःची खात्री करून घेतली. ही गोष्ट त्या ओरडणा-याच्या नजरेतून सुटणार थोडीच? पुढल्याच तीन थांब्यांनंतर " अरे म्हारो पाकीट! म्हारो पाकीट मारी गयो रे! " असा हंबरडा ऐकू आला.
लगेचच त्या माणसाला फ़ुकटचे सल्ले आणि उपदेश सुरू झालेत. " पण मी म्हणते, सगळे पैसे एकाच पाकीटात ठेवावेत तरी कां म्हणून ? "


" हो. पण. ठेवलेत म्हणून काय बिघडलं ? पाकीट मारणा-याने ते मारावं तरी का म्हणून ? "

शेवटी हा सगळा प्रवास बस कंपनीला शिव्या, कंडक्टर आणि पाकीटमारांचं संगनमत, आपले स्वतःचे अनुभव अशी ठराविक वळणे घेत " शेवटी जगात माणुसकी उरलेली नाही. " या थांब्यावर येणार हे त्याला माहिती होतं. तो उठला. ड्रायव्हर केबिनमागे सर्व प्रवाशांकडे तोंड करून उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला " थांबा "

त्याच्या आवाजात काय जादू होती कुणास ठाऊक ! पण सगळा गलबला थांबला. तोच धागा पकडून त्याने पुढे बोलायला सुरूवात केली. " एव्हढे ओरडू नका. एक साधं पाकीटच तर मारल्या गेलंय. काय ५००-१००० रुपये असतील ते असतील. दरवर्षी सरकार नवनवीन कर बसवून मंत्र्यांच्या आणि त्यांच्या खुशमस्क-यांच्या चैनींसाठी हजारों लाखों रुपयांची तुमची पाकीटं मारते तेव्हा तुम्ही ओरडता ? एव्हढंच नाही तर वीज मंडळ, टेलीफ़ोन कंपन्या तुम्हाला भरमसाठ बिलं पाठवून वर कोडगेपणा स्वीकारते, तेव्हा तुम्ही ओरडता ? एव्हढेच नव्हे तर अनेकदा तुम्ही स्वतःच कर चुकवून ह्या देशाची, पर्यायाने स्वतःचीच पाकीटमारी करता, तेव्हा तुम्ही ओरडता ?"

" केवळ त्या पाकीटमाराला दोष देऊन उपयोग नाही. आपण सर्वच केव्हा ना केव्हा दुस-यांचे खिसे कापतच असतो. फ़क्त काहीजण सरळसोट खिसे कापतात काहीजण अप्रत्यक्ष. हा पाकीटमार त्याला जबाबदार नाहीय. त्याला जबाबदार आहे ती परिस्थिती. आणि ही परिस्थिती आपण स्वतःच केव्हा ना केव्हा पाकीटमारी करून त्याच्यावर आणलेली आहे."

"तुमच्यापैकी कितीजण आपापल्या कार्यालयांमध्ये पूर्ण सहा-सात तास फ़क्त कार्यालयीन कामेच करता ? तसे करत नसाल आणि पगार मात्र पूर्ण घेत असाल, तर सरकारचा किंवा मालकाचा खिसाच तुम्ही कापत असता. काय साहेब ? ओरडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तेव्हा प्लीज ओरडू नका."

गर्दी अवाक होऊन पहात असतानाच त्याचा थांबा आला. तो उतरून नाहीसा झाला. बस पुन्हा वेग घेत असतानाच पुन्हा कोणीतरी ओरडले. " अरेरे ! आपण सगळे त्याचं भाषण ऐकत असताना माझंही पाकीट कुणीतरी मारल रे !"

प्रा. राम प्रकाश किन्हीकर

पार्श्वभूमी: १९८८ ते १९८९ , सी. पी बेरार, रवीनगर मध्ये ११वी आणि १२वी साठी होतो. बस प्रवास फ़ार व्हायचा. अयाचित मंदीर ते विधी महविद्यालय. कधी रघुजीनगर ते रवीनगर. तिथून पायी. त्यातच तरूण भारत. नागपूर मध्ये ’विषयांतर’ हे एक स्फ़ुट लेखनाचे सदर सुरू होते. त्यात लिहितही होतो. काही लेख मात्र प्रकाशनासाठी पाठवलेच नाहीत. (कां ? आत्ता आठवत नाही.) त्यातलाच हा एक अप्रकाशित लेख.

Thursday, February 9, 2012

"मी एक प्रवासी पक्षी" विषयी

कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ज्या काही अविस्मरणीय वल्ली भेटल्या त्यातली एक वल्ली म्हणजे चित्तरंजन सुरेश भट. आम्ही पहिल्या वर्षाला असताना चित्तरंजन दुस-या वर्षाला होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी पण तितकाच हळवा आणि कविमनाचा हा "सिनियर" आमचा मित्र कधी झाला ते कळलंच नाही. सुरेश भटांचा वारसा तो समर्थपणे चालवायचा. "सुरेश भट" ही काय चीज असेल! याचा अनुभव आम्ही चित्तरंजन कडे बघूनच करत असायचोत. तो सुद्धा तेव्हढाच प्रतिभावान आणि कलंदर कलावंत होता.


मला आठवतं १९८९ मध्ये आमची प्रथम सत्र परीक्षा सुरू होती आणि त्याच वेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका होत होत्या. त्या निवडणुकांच्या निकालाबद्द्ल सर्वांनाच मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. (बोफ़ोर्स प्रकरणात विश्वनाथ प्रताप सिंघ बाहेर पडल्यानंतर झालेल्या या निवडणुका. धक्कादायक निकाल येतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि ती फ़लद्रुप झालीदेखील. मला आठवतंय विश्वनाथ प्रताप सिंघांचा शपथविधी झाला म्हणून पराग लपालीकरने ए ब्लॊकमधल्या लोकमान्य मेस मध्ये थाळीनाद करून पेढेही वाटले होते.)


त्याकाळी दूरदर्शनवरून दर तासा दोन तासांना निवडणूकविषयक विशेष वार्तापत्र सादर व्हायचे. परीक्षा सुरू होती आणि त्यातच निवडणूक निकालांचीही उत्सुकता अशा द्विधा मनस्थितीत आम्ही सारे जण होतो. (तेव्हा आम्ही सारे सी. ब्लॊक मध्ये रहायचोत)

असाच एकदा अभ्यास आटोपून (की गुंडाळून) आम्ही निवडणूक वार्तापत्र पहायला सी. ब्लॊकच्या टी. व्ही. रूममध्ये बसलेलो होतो मागे जोरदार आवाज येउ लागलेत म्हणून मागे वळून पाहिलं तर चित्तरंजनने त्याच्या परीने अभ्यास आणि निवडणुकींची उत्सुकता यावर मार्ग शोधून काढला होता. त्याने आपल्या खोलीतला अभ्यासाचा भलामोठा आणि अवजड टेबलच उचलून टी. व्ही. च्या रूममध्ये आणला होता आणि तसाच टी. व्ही. समोर अभ्यास त्याने त्या सत्रात केला. (एव्हढं करूनही त्याला क्लास कसा मिळाला? हे आम्हाला आजवर पडलेलं कोडंच आहे.)


महाविद्यालयीन जीवनात मी पण थोड्याफ़ार कविता करायचो त्यामुळे चित्तरंजनची आणि माझी मैत्री झाली. एकदा मी तिस-या वर्षात असताना माझ्या डी. ब्लॊकच्या खोलीत तो आला तेव्हा मी असाच काहीतरी शब्द जुळवत बसलो होतो. अनामिक हुरहूर, अज्ञात प्रिया, कलंदर कवी अशी काहीतरी कल्पना होती. चित्तरंजनला ती कळली आणि त्याने माझ्या पुढ्यातला कागद ओढून त्याच्या खूप सुंदर हस्ताक्षरांत एकदम लिहायला सुरूवात केली.


" मी एक प्रवासी पक्षी, क्षितीजावर भरकटलेला,
तुजला कैसे शोधावे, आसमंत धुरकटलेला,
मी निघून गेल्यावरती, म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा, आपल्यातच गुरफ़टलेला"


आणि म्हणाला आता ही कविता पूर्ण कर आणि तुझ्या नावावर "मुक्तांगण"मध्ये (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) देउन टाक.

मी ब-याच लटपटींनंतर ती कविता पूर्ण केली.

"पूर्वक्षितीजी लाल उषेचा रंग हा कसा रसरसलेला,
मोरपंखी लेवून पालखी आसमंत हा मुसमुसलेला,
तो झडून गेल्यावरती म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा आपल्यातच गुरफ़टलेला"


पण माझं कडवं हे त्या कवितेला लावलेल्या ठिगळासारखंच होतं ही माझी तेव्हापासूनची भावना आजतागायत आहे. त्यानंतर मी
ब-याचदा या कवितेचं वाचन खाजगी मैफ़िलीत आणि मित्रमंडळींमध्ये केलं पण दरवेळेची दाद चित्तरंजन साठीच होती हे माझ्या पुरतं ध्यानात होतं.

माझा हा प्रवासविषयक लेखनाचा ब्लॊग. याला समर्पक मथळा म्हणूनही मला हीच कविता सुचली आणि म्हणून " मी एक प्रवासी पक्षी"

(होळीवर लिहिलेल्या आणखी एका कवितेत चित्तरंजनने मला शब्द नीट वृत्तामध्ये आणि गझलेच्या वृत्तीमध्ये बांधायला मदत केलेली आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.)

Wednesday, February 8, 2012

माहौल निवडणुकांचा

"संत असती वेगळाले, परी ते अंतरी मिळाले" असं संतांबाबत म्हटले जाते ते राजकारण्यांबाबतही खरच आहे. काल संध्याकाळी नागपूरातल्या गांधी पुतळा चौक इतवारी येथले हे दृष्य बोलके आहे.


एकाच गाडीवर दोन पक्षांचे दोन कार्यकर्ते आपापल्या पक्षांची निवडणूक प्रचार सामग्री घेऊन चाललेले होते. त्यांना तरी दोष कशाला द्यायचा म्हणा? दोन अगदी विरूध्द पक्षाची नेते मंडळीच कार्यकर्त्यांना झुंजवून ठेवत आपल्या खाजगी मैत्रीचा जाहीर उच्चार करायला घाबरत नाहीत तिथे बिचा-या कार्यकर्त्यांनी तरी काय करावे?

काय म्हणताय? ’ विचारधारा वगैरे?’
काय राव? परग्रहावरून आलात का?

Tuesday, February 7, 2012

विदर्भतून विदर्भ

परवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास हुकल्याची खंत मनात घर करून राहिली. एका मोठ्या आनंदाला आपण, तात्पुरते का होइना, मुकलोय ही जाणीव प्रवासभर छळत राहिली.

आजपर्यंत मी अक्षरशः शेकडो वेळा नागपूर-मुंबई-नागपूर किंवा नागपूर-पुणे-नागपूर हा प्रवास केलाय पण अजूनही प्रत्येक प्रवास निराळा असतो. अगदी रखरखीत आणि तहानलेल्या उन्हाळ्याच्या दिवसांपासून ते ओल्यागच्च पावसाच्या दिवशी (गाडी निघणार की नाही याची शाश्वती नसताना आणि गाडी आल्यावर आधीपासूनच ओला बर्थ असलेल्या आणि पूर्णपणे बंद न होणा-या खिडकीतून थेंबाथेंबाने बर्थ ओला होत असतानाही) केलाय. दुस-या वर्गाच्या डब्यात जागा मिळावी म्हणून दोन दोन तास आधी स्टेशनवर जाउन जागा पकडून केलाय तसाच पहिल्या वर्गाच्या वातानुकूल केबीनमधून बाहेरच्या विश्वाशी अजिबात संबंध नसतानाही केलाय. लग्न, मुंजी, साखरपुड्यांना जाण्यासाठी केलाय तसाच दुःखद प्रसंगांमध्येही केलाय.प्रत्येक प्रवास मोठा विलोभनीय आणि विविधरंगी अनुभव देणारा असतो.


बालपणी मावशीच्या गावी दूर कोकणात जाताना मुंबईला जाण्यासाठी नागपूर-दादर गाडीचा लाडका हट्ट आम्ही वडीलांजवळ करायचो. कारण एकच, रात्री १०.१० ला सुटलेली ही गाडी सकाळी सहाच्या सुमारास भुसावळला पोहोचली, की नंतरचा, तुलनेने अपरिचित, भाग बघायला मिळावा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते बोगदे. विदर्भासारख्या मैदानी प्रदेशात जन्मून वाढणा-या आम्हा सर्व मुलांना कसारा घाटातल्या बोगद्यांच विलक्षण आकर्षण (आणि सुप्त भितीही) वाटत असे. त्यासाठी नागपूर ते शेगाव हा नेहमी बघितलेला भाग रात्री झोपेत गेला तरी आमची हरकत नसायची.




अर्थात रात्री प्रचंड औत्सुक्यामुळे गाडीत झोपच येत नसे व प्रत्येक स्टेशनावर गाडी थांबली की उठून, गाडीच्या गजांमधून जमेल तेव्हढं डोकं बाहेर काढत, स्टेशनांची नावं वाचण्याचे आमचे सफ़ल, असफ़ल प्रयत्न, आमच्या जन्मदात्यांच्या आरडाओरडीला कारणीभूत होत असत. म्हणूनच १९७७ मध्ये गीतांजली एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. कारण त्या गाडीने नागपूर-मुंबई हा दिवसभराचा प्रवास होत असल्याने, "झोपा रे आता" असं टुमणं लावणारं कुणी नव्हतं आणि सगळाच परिसर खिडकीतून मनसोक्तपणे न्याहाळता येणार होता. पण काकांची बदली १९७८ मध्ये विदर्भातच झाली आणि गीतांजली एक्सप्रेसने जाण्याचा योग लांबणीवर पडला. तो योग १९९६ मध्ये मुंबईला नोकरीनिमित्त जाताना आला. तोपर्यंत बालपण हरवलं होतं तरी हुरूप हरवला नव्हता. त्यामुळे १९९६ मधला प्रवासही तेव्हढाच आवडला.

काही काही प्रवास आणि त्यातले अनुभव मनात घर करून आहेत. आता अकोला हे इतर स्टेशनांसारखं एक स्टेशन. अशाच एका हिवाळ्याच्या सुरुवातीला मुंबईवरून सुट्ट्या घालवण्यासाठी नागपूरला येत होतो. गाडीत फ़ार गर्दी नसल्यामुळे रात्री झोप छान लागली होती. विदर्भ एक्सप्रेस पहाटेच्या अंधारातच अकोल्याला पोहोचत होती. मला तृप्ततेची जाग आली. सहज दारात आलो आणि काय विलक्षण अनुभूती आली! रात्रीनंतर सुंदर प्रसन्न पहाट फ़ुटत होती. पहाटेच्या त्या गुलाबी थंडीत अंगावर शाल-स्वेटर्स लपेटून अगदी थोडेसेच कुडकुडत प्रवासी उतरत होते. प्रत्येकाकडे बघितल्यानंतर त्यांनी रात्रीची प्रसन्न झोप घेतल्याचा आभास होत होता. अंधार संपण्याची नुकतीच चाहूल लागली होती. पांस्थस्थांचे पाय देखील घराच्या ओढीने पडत होते आणि या सगळ्या प्रसन्न विश्वाइतकाच तो फ़लाटही प्रसन्न आणि आनंदी वाटत होता.

प्रत्येक दिवाळीच्या वेळी नागपूरला येताना एक वेगळंच वातावरण. दिवाळीसाठी मुंबईवरून नागपूरला येण्याच्या जल्लोषात रात्री ’विदर्भ’ पकडलेली. रिझर्वेशन, टी.टी.इ, आपला बर्थ आदि गोष्टी गर्दीमुळे दिसणेही दुरापास्त. मग मित्रांसोबतच खालीच पेपर (अशा वेळी टाइम्स ऒफ़ इंडियाचा केव्हढा आधार वाटायचा!) टाकून जमवलेली, गप्पांची, जुन्या आठवणींची आणि गाण्यांची मैफ़ल, रात्री केव्हातरी जडावलेल्या डोळ्यांनी, आहे त्याच जागेवर अस्ताव्यस्त पसरणे. अशावेळी गाडीतल्या गर्दीची, गोंधळाची, गैरसोयींची, कशाचीही आठवण व्हायची नाही. पहाटे अकोल्यापासून प्रवासी उतरायला सुरूवात झाली की मग रिकाम्या जागा मिळायला सुरूवात व्हायची. पण मग झोपण्याचा मूड नसायचा. एखाद्या आडबाजूच्या खेड्यात दिवाळीसाठी पहाटे उठलेली मुले फ़टाके फ़ोडायला सुरूवात करत असायचीत. दिवाळीतल्या दिव्यांचा आनंदी प्रकाश त्यांच्या डोळ्यात दिसत असायचा. अशावेळी त्या मुलांचे चेहरे कसेही असलेत तरीही सुंदरच दिसत असायचेत. मग त्यांनी गाडीकडे पाहून हलवलेल्या हातांसाठी आपलाही हात आपल्या जाणिवांच्या नकळत हलवला जायचा. ऒक्टॊबर, नोव्हेम्बर महिन्यातली ज्वारी/बाजरीची हिरवीगार शेते काळ्याभोर मातीत फ़ुलून आलेली दिसायचीत. विदर्भाविषयीच्या अभिमानाने जीव सुपाएव्हढा व्हायचा. केव्हा एकदा नागपूरला पोहोचून आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये जातोय असं व्हायचं.

कराडला शिकत असताना महाराष्ट्र एक्सप्रेसने आम्ही सगळे वैदर्भिय विद्यार्थी परतायचो तेव्हा तर अधिकच गंमत. संपूर्ण सत्राचा अभ्यास, परीक्षा आदींचा ताण संपवून परत येताना आमच्यातले बहुतेक जण मलकापूर आलं तरी "बस्स! आता नागपूर आलंच आहे" असं समजून बोगीच्या दारात वाट पहात उभे रहायचे. मलकापूर ते नागपूर हे अंतर रेल्वेसाठी कागदोपत्री जरी ३५० कि.मी. असले तरी आमच्या मनात ते शून्य व्हायचं.

होळीच्या वेळी परतताना ग्रीष्माची नुकतीच चाहुल लागलेली असायची. वर्धेनंतर नागपूरपर्यंतच्या प्रवासात पळसाची लाल, केशरी अशी मनमोहक रंगांची फ़ुले आमच स्वागत करीत असायचीत. का कोण जाणे हा आम्हाला ’मिलनऋतु’ वाटे. अनामिक, अज्ञात प्रियेच्या कल्पनेने मन मोहरणे, पलाशफ़ुलांच्या रंग, गंधाने तिला होळीत माखून टाकण्याच्या कल्पनेने मन शहारणे या नित्य मनोव्यापारातल्याच घटना होत्या. वर्धा ते नागपूर हे अंतर काही क्षणातच पार केल्यासारखे वाटे.


कडक वैशाखात तर विचारायलाच नको. गाडी थांबते न थांबते तोच थंड पाण्याच्या नळाच्या शोधार्थ प्लॆट्फ़ॊर्मवर धावणे, थंड पाण्याचा नळ मिळाल्यावर आणि त्यातल्या त्यात चुकून रांगेत आपलाच पहिला नंबर असला तर जग जिंकण्याचा आनंद होणे, पाण्याची पिशवी अर्धवटच भरल्यानंतर मागच्या रेटारेटीमुळे आणि गाडीच्या काळजीमुळे रांगेतून बाजुला व्हावे लागणे आणि नंतर "मिळालेले पाणी, आपण कल्पना केली होती तेव्हढे थंड नाही" हा अनुभव येणे, या सग्ळ्या गोष्टी मला वाटतं, सार्वत्रिकच आहेत. पण त्या अर्धा पेला पाण्याने जी तहान भागायची ती आज एक संपूर्ण ’बिस्लरी’ सुध्दा भागवू शकत नाही.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून परत जाताना मशागती पूर्ण झालेल्या काळ्याशार जमिनी पावसाची वाट बघत असतात. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीसच येउन धिंगाणा घालणारा पाउस, इथे चांगला १५ जूनपर्यंत आलेला नसतो. त्या जमिनी आणि तो आभाळाकडे डोळे लावून बसलेला भूमिपुत्र पाहिला की पर्जन्यसूक्त जोरात म्हणावेसे वाटते.


पावसाळ्यात रात्रभर, छान, एक चादर पांघरण्याएव्हढीच, थंडी असावी. गाडीला गर्दी नसल्यामुळे, तुम्ही मागितल्याबरोबर, खालचा बर्थ मिळालेला असावा, रात्रभर गाडीच्या ठेक्यावर झोपेचं गाणं जमलेलं असावं आणि पहाटे प्रसन्न जाग यावी. विदर्भ शेगाव किंवा जलंब स्टेशनच्या आउटर सिग्नलची वाट पहात थांबलेली असावी. कुठे थांबलीय याचा अंदाज घेण्यासाठी आपण सहज खिडकी उघडावी तर सरत्या रात्री, अगदी आपल्या शेजारी, दिव्यांनी लुकलुकणारं ख्रिसमस ट्री दिसावं. पावसाळ्यात हे काजवे अगदी बाभळीलाही सुंदर करून टाकतात. नजर टाकावी तिथपर्यंत हे झाडांना लगडलेले दिवेच दिवे. आयुष्य सार्थकी लागलं, असं वाटायला लावणा-या अनेक क्षणांपैकी हा एक क्षण. काही वेळाने सिग्नल मिळाला की गाडी हळूच हलते आणि परमेश्वरी सृष्टीतून नागरसृष्टीत प्रवेश करते.

पण ही नागरसृष्टीही काही कमी विलोभनीय नसते. पावसाळ्याच्या दिवसात झुंजुमुंजु झाल्यावर एखाद्या छोट्या स्टेशनात गाडी तब्येतीनं थांबलेली असते. सर्वत्र ओलासर धुंद वास आणि त्यात मिसळलेल्या गाडीच्या लोखंडी वासाच एक निराळच विश्व तयार होतं. फ़लाटावरचा एखादाच पोरगा ’चॆग्रॆ्म’ ओरडून त्या शांततेवर चिमुकला ओरखडा उमटवत असतो. सर्व विश्व झोपेचं पारणं करण्याच्या बेतात असतानाच स्टेशनच्या बाहेर कुठलातरी पानवाला सिनेमाचं गाणं लावतो. अशा (अ)वेळी "गोरी है कलाईयां" सारखं तद्दन फ़िल्मी गाणंही वसंतरावांच्या चीजेइतकच आवडतं. घरी परतण्याची ओढ त्या गाण्याला विलोभनीय करते की त्या गाण्यामुळे घराची ओढ अधिक विलोभनीय होते? हे एक न उलगडणारं कोडं होऊन बसतं. मुंबईचा पाउस हा रामगोपाल वर्माच्या चित्रपटांमध्येच छान दिसतो. खरोखर मुंबईचा पाउस म्हणजे चिखल, रोगराई आणि झोपडपट्टीवासियांचे शिव्याश्राप. पण विदर्भात पाउस म्हणजे मळभ दूर होऊन सुस्नात होण्याची प्रक्रिया वाटते.

नागपूरला येण्यासाठी सगळेच ऋतू आनंदाचे; पण त्यातही सर्वोच्च आनंद म्हणजे गणपती, गौरींसाठी येण्याचा. मला वाटतं, गणरायाच्या आगमनाआधी निसर्गातच एक खूप आनंद भरून आणि भारून राहिलेला असतो. गाडीने येत असताना पिकं चांगली गुडघ्याएव्हढी क्वचित खांद्याएव्हढी झालेली दिसतात. शेतकरी पिकांच्या आशेने आनंदात असतात. सणांच्या आणि गोडाधोडाच्या आशेने लेक्रबाक्रं आनंदून जातात आणि आपलं मन भरून येतं.


विदर्भातल्या काहीकाही फ़लाटांना मात्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. शेगावचा फ़लाट धार्मिक आहे. संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शानेही असेल, पण इथे उतरणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात एक उत्सुकता आणि आशा असते आणि इथून चढणा-यांच्या डोळ्यांतील तृप्तता आणि धन्यता वाचता येते.



अकोल्याचा फ़लाट हा नागर संस्कृतीत जायला उत्सुक असलेल्या सुशिक्षित अनागर तरूणासारखा भासतो. तर मूर्तिजापूर म्हणजे संत गाडगेबाबांसारखाच भोळा, सरळ पण रोखठोक वाटतो. ’ज्ञानेश्वरी’, ’आझाद हिंद’ ’गीतांजली’ सारख्या सुपर एक्सप्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत पण त्याचं त्याला सुखदुःख नसतं. न थांबणा-या गाड्यांविषयीची नैसर्गिक असूया इथल्या फ़लाटांमध्ये अजिबात नाही.


बडनेरा स्टेशन मात्र ख-या अमरावतीकरांसारखं आतिथ्यशील आणि अघळपघळ. कधीही "क्या बडे! उतर जा ना! जा ना कल सुबे!" अशी मैत्रीपूर्ण साद देइल असं वाटत.

चांदूरचा फ़लाट अगदी आत्ताआत्तापर्यंत चिमुकला होता. २४ डब्यांची गाडी थांबली पाहिजे म्हणून एव्हढ्यातच त्याची वाढ झालीय. मोठ्या माणसांचे मोठ्ठे बूट घालून घरातला लहान मुलगा ऐटीत मिरवतो तसा हा फ़लाट वाटतो.

धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच आहे. नोकरीनिमित्त एक वर्षासाठी तेथे असताना रोज त्याची भेट व्हायचीच. रात्री फ़लाटावरच जमवलेला आम्हा नाट्यकर्मींचा गप्पांचा फ़ड आमच्या नाट्यविषयक जाणिवा फ़ार समृध्द करून जायचा. नाटकाचा रंगमंचीय प्रयोग सादर होण्यापूर्वी त्यावर करून पाहण्याच्या निरनिराळ्या ’प्रयोगां’ची संहिता याच फ़लाटावर तयार झालेली आहे.


वर्धा स्टेशन मात्र जुन्या गांधीवाद्याप्रमाणे तत्वनिष्ठ वाटतं. ३१ जानेवारी १९४८ ला गांधीजी प्रदीर्घ मुक्कामासाठी वर्धेला येणार होते हा फ़लाटावरचा उल्लेख वाचला की मन गलबलून येतं. पण त्या फ़लाटावरचा सर्वोदयी साहित्याशेजारचा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल विचित्र वाटतो. तसा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल फ़लाटाला निषिध्द नाही, पण ’स्टारडस्ट’,’फ़िल्मफ़ेअर’ हे नेमके ’महर्षी अरविंदकी वचनें’ च्या मांडीला मांडी लावून बसलेली बघायला अस्वस्थ होतं खरं.

घरी परतताना सगळ्याच गाड्या हर्षोत्फ़ुल्ल वाटतात ख-या, पण पुन्हा नागपूर सोडून नोकरीसाठी जाताना आपल्या मानसिकतेचं प्रतिबिंब गाड्यांवर पडून त्यासुध्दा उदास वाटतात. कराडला शिकायला असताना परीक्षा संपल्यावर परतताना आम्ही सगळे २४ तासांपैकी १८ तास दंगा करत परतायचो आणि कराडला परत जाताना मात्र सगळे एकजात उदास. मोठी दंगेखोर मुलेदेखील, खिडकीच्या गजांमधून उदासपणे आपल्या आईवडीलांकडे पाहत हात हलवताना बघितली की काळीज हलत असे. मग बाहेरचा कितीही सुहाना मौसम, कितीही चांगलं निसर्गदृष्य पाहण्याचा मूड नसे. परतताना एका बर्थवर अडचण सोसून दोघे-दोघे झोपून येणारे आम्ही जाताना प्रत्येकाला वेगळा बर्थ असूनही अडचण झाल्यासारखे जात असू.


बराच काळ लोटला. आम्ही अभियंते झालोत. नागपूरमधल्या न होणा-या विकासाची वाट पहात विकसित पश्चिम महाराष्ट्रात नोकरीनिमित्त गेलोत. लग्न झालं, मुलंबाळं झालीत. ज्यांच्या ओढीने एकेकाळी नागपूरला जायचो ते आजी-आजोबा देवाघरी गेलेत. दरवेळी आम्हाला स्टेशनवर सोडायला आणि घ्यायला येणारे आणि गाडी कितीही उशिरा येणार असली. तरी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत तिथेच आमची वाट पहात थांबणारे आमचे वडीलही दृष्ट लागावी तसे गेलेत. आता स्टेशनावर सोडायला धाकटा भाऊ येतो. गाडीतल्या दरवाज्यातला मी त्याला दिसेनासा होईपर्यंत हात हलवीत राहतो, अगदी वडीलांसारखाच. त्या काळी ते "पोहोचल्यावर पत्र टाक रे" म्हणायचे हा "फ़ोन कर" म्हणतो. काळ बदलला.

अजूनही विदर्भ नागपूर सोडते. वर्धा, पुलगाव, धामणगाव येइपर्यंत अंधार माजलेला असतो. बडनेरा मूर्तिजापूरच्या मध्ये जेवण उरकून शेगावला मंदिराच्या दिशेने हात जोडून सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागतात.

अजूनही सुट्ट्यांमध्ये नागपूरला जायचय म्हटल्यावर अंगात अमाप उत्साह संचारतो. त्या जल्लोषातच मी बॆग भरायला घेतो. फ़सफ़सून वाहणा-या माझ्या उत्साहाकडे बायको कौतुकाने आणि कधी चेष्टेनेही पाहते. मी पण मनावर घेत नाही. काळाबरोबर बदलल्या न गेलेल्या माझ्यातल्या मी ला ’विदर्भ’ मधून पुन्हा विदर्भाच्या मातीत जाण्याची ओढ लागते.

-प्रा. राम प्रकाश किन्हीकर



(हा लेख दै. तरूण भारत नागपूर मध्ये रविवार दि. १७ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झालेला आहे.)

Friday, February 3, 2012

II ॐ नमो भगवते वासुदेवाय II

पार्श्वभूमी :

पं. जसराज यांनी गायलेली ही ईश्वरस्तुती काही वर्षांपूर्वी माझ्या ऐकण्यात आली. चिकाटीने ती मी लिहून घेतली आणि रोज सकाळी श्रीमदभागवताच्या पाठापूर्वी त्यातले काही कडवे रोज नेमाने म्हणतोय.
गतवर्षी प.पू. बापुराव महाराजांकडे झालेल्या भागवत सप्ताहात आमचे उत्साही मित्र श्री. शार्दूल तेलंग यांनी भागवतकार श्री. विवेकजी घळसासींना याबद्दल सांगितले. विवेकजींच्या आग्रहामुळे व सेवा म्हणून ही स्तुती मी त्या श्रीमदभागवतसप्ताहात म्हटली सुद्धा.
नंतर विवेकजींनीच ही गोष्ट कौतुक म्हणून पश्चिम नागपूर नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब देशपांडे यांना सांगितली. त्यांनी लगेचच प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रवचनाआधी हा गीत गायनाचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले आणि गतवर्षी व ह्यावर्षीही हा कार्यक्रम पार पडला.
मी जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा यामागे ईश्वरी योजनेशिवाय काहीच आढळत नाही. मी फ़ार चांगला गाणारा वगैरे नाही. पश्चिम नागपूर नागरीक संघ पं. जसराजांची ध्वनीमुद्रिका लावून सुद्धा हा कार्यक्रम पार पाडू शकले असते पण माझ्या देहाने ही सेवा स्वीकारावी अशी ईश्वरी इच्छा असावी.
कार्यक्रमानंतर बरीच मंडळी येवून भेटायची व ह्या गीताची मागणी व्हायची. शेवटी हे गीत आंतर्जालावर
ब-याच ठिकाणी टाकले आणि आज या व्यासपीठावरपण टाकतोय.

II ॐ नमो भगवते वासुदेवाय II


गोविंदं गोकुलानंदम
गोपालं गोपीवल्लभम
गोवर्धनधरं वीरं
तं वंदे गोमतीप्रियम II धृ II

नारायणं निराकारम
नरवीरम नरोत्तमम
नृसिंहं नागनाथंच
तं वंदे नरकांतकम II धृ II

पितांबरं पद्मनाभम
पद्माक्षं पुरूषोत्तमम
पवित्रं परमानंदम
तं वंदे परमेश्वरम II धृ II

राघवं रामचंद्रंच
रावणारिं रमापतीम
राजीवलोचनं रामम
तं वंदे रघुनंदनम II धृ II


वामनं विश्वरूपंच
वासुदेवंच विठ्ठलम
विश्वेश्वरं विभुम व्यासम
तम वंदे वेदवल्लभम II धृ II


दामोदरं दिव्यसिंहम
दयालुं दीननायकम
दैत्यारिं देवदेवेशम
तं वंदे देवकीसुतम II धृ II


मुरारिं माधवं मत्स्यम
मुकुन्दं मुष्टीमर्दनम
मुंजकेशं महाबाहुम
तं वंदे मधुसूदनम II धृ II


केशवं कमलाक्षंच
कामेशं कौस्तुभप्रियम
कौमुदेतीधरं कृष्णम
तं वंदे कौरवांतकम II धृ II


भुधरं भुवनानंदम
भूतेशं भूतनायकम
भावनैकं भुजंगेशम
तं वंदे भवनाशनम II धृ II


जनार्दनं जगन्नाथम
जगच्चैकं विनाशकम
जामदग्न्यवरं जोगीम
तं वंदे जलशायिनम II धृ II


चतुर्भुजं चिदानंदम
चाणूरमल्लमर्दनम
चराचरगतं देवम
तं वंदे चक्रपाणिनम II धृ II


श्रियःकरं श्रीयोनाथम
श्रीधरं श्रीवरप्रदम
श्रीवत्सलधरं श्यामम
तं वंदे श्रीसुरेश्वरम II धृ II


योगीश्वरं यज्ञपतिम
यशोदानंददायकम
यमुनाजळकल्लोळम
तं वंदे यदुनायकम II धृ II


शालीग्रामं शिलासूक्तम
शंखचक्रोपशोभितम
सुरासुरसदासेव्यम
तं वंदे साधुवल्लभम II धृ II


त्रिविक्रमम तपोमूर्तिम
त्रिविधाभोगनाशनम
त्रिस्थलं तीर्थराजेंद्रम
तं वंदे तुलसीप्रियम II धृ II


अनंतं आदिपुरूषम
अच्युतंच वरप्रदम
आनंदंच सदानंदम
तं वंदे अघनाशनम II धृ II


लीलयाकृतभूभारम
लोकस्त्वैकवंदितम
लोकेश्वरम च श्रीकांतम
तं वंदे लक्ष्मणप्रियम II धृ II


हरींच हरिणाक्षींच
हरिनाथं हरीप्रियम
हलायुधसहायंच
तं वंदे हनुमत्पतिम II धृ II