Tuesday, May 22, 2012

सांगोला - एका नव्या स्वप्नाच्या शोधात


माझ्यासाठी आजवर कधीच पाहिलेले नवीन गाव, नव्यानेच उघडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय, तिथे विभागप्रमुख म्हणून रुजू होण्यासाठी आलेली नवीनच संधी, तिथे जाण्यासाठी नव्यानेच सुरू झालेली नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस, तिचा अकोल्यानंतरचा नवीनच मार्ग. यंदाच्या उन्हाळ्यात अगदी नवीन स्वप्नांच्या शोधात हा छोटासाच प्रवास करण्याचे आम्ही ठरवले.

शनिवार, दि. १२/०५/२०१२
नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या अगदी १५ मिनिटे अगोदर आमची "तत्काळ" तिकीटे कन्फ़र्म झाल्याचा एस.एम.एस. आला आणि तोपर्यंत टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. ११४०३ अप नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर आधीच उभी होती. आम्ही आमच्या डब्यापर्यंत गेलो.

मग नेहेमीप्रमाणे कुटुंबाला गाडीत बसवून गाडीच्या इतर निरीक्षणासाठी खाली उतरणे झाले.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात उन्हाळी विशेष म्हणून धावलेली ही गाडी जुलैपासून नियमित झालेली आहे. सध्या नागपूर ते कोल्हापूर च्या दरम्यान धावणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसपेक्षा ही नागपूर ते कोल्हापूर प्रवासाला जवळपास तास कमी घेत हा प्रवास २४ तासात पूर्ण करते. अकोल्यानंतर वाशिम, हिंगोली, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज असा पूर्णपणे नवीनच मार्ग घेत ही गाडी जाते. अकोल्यानंतर विद्युतीकरण नसल्याने हा संपूर्ण प्रवास डिझेल एंजिनाने होणार हे उघड होत.


18976 R WDM 3A
Loco built by : Diesel Loco Works, Varanasi
Rebuilt: Diesel Loco Modernization Work, Patiala, July 2005.

गाडीच्या डब्यांची पोझिशन : गार्ड पार्सल, साधारण, साधारण, साधारण, शयनयान (एस- ते एस-), वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान (बी-), वातानुकूल द्विस्तरीय शयनयान (-), साधारण, साधारण, साधारण, गार्ड पार्सल. (एकून १९ डबे)

त्यातला एस- हा विशिष्ट क्रमांकाचा डबा होता.
माझा डबा : 95103 CR, बी- कोच,
रेल्वे कोच कारखाना, कपूरथळा, ड्ब्लु जी सी सी एन ५८, नोव्हेंबर १९९५,
६२ शायिका
आमच्या शायिका ३३,३५ आणि ३८.

सहसा या त्रिस्तरीय शयनयान डब्यांना ६४ शायिका असतात पण १९९५ मध्ये या प्रकारच्या डब्यांचे नव्यानेच उत्पादन व्हायला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या काही डब्यांमध्ये शायिका क्र. च्या जागेत प्रवाशांना पुरविण्यात येणा-या बेडरोल्सचे कपाट होते. नंतर रेल्वेच्या लक्षात ही चूक आली आणि बेडरोल्सचे कपाट .सी. कंपार्टमेंटच्या बाहेर (प्रवेश द्वाराजवळ) गेलेत. जुन्या कोचेसमध्ये मात्र ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेच.


ह्या सगळ्या नोंदी सुरू असतानाच १४.५० ला फ़लाट क्र. वर १२८१० हावडा-मुंबई मेल येउन उभी झाली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली ही खूप जुनी, अगदी ब्रिटीशकालीन गाडी. गेल्या १५० वर्षात या गाडीच्या वेळापत्रकात फ़क्त काही मिनिटांचा बदल झालेला आहे. भारतीय रेल्वेतल्या महत्वपूर्ण बदलांची ही साक्षीदार गाडी. प्रथमवर्ग वातानुकूल, द्विस्तरीय वातानुकूल आणि त्रिस्तरीय वातानुकूल असा काव्यमय न्याय देणारी ही गाडी आमच्या गाडीच्या पुढेच काढणार हे उघड होतं. झालंही तसंच. १४.५९ ला ही गाडी पुढे निघाली आणि आमची गाडी १५.०० ऐवजी १५.०७ ला रवाना झाली.

या गाडीच्या वेळापत्रकावर एक नजर टाकली असता आपल्या लक्षात येइल की धामणगाव ते बडनेरा, गंगाखेड ते परळी वैजनाथ, परळी वैजनाथ ते लातूर रोड तसेच बार्शी ते कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान गाडीला भरपूर वेळ देण्यात आलाय. अकोला ते पुढे हा एकेरी मार्ग असल्याने गाड्यांच्या क्रोसिंगसाठी जास्त वेळ समजू शकतो पण धामणगाव ते बडनेरा या गाडीला इतका जास्त वेळ देण्यात येण्याचे कारण म्हणजे दुपारी १५.४० वाजता नागपूरवरून रवाना होणारी १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस. आझाद हिंद धामणगाव ते बडनेरा या स्थानकांमध्ये नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसला मागे टाकत असणार. नागपूरवरून निघताना आझाद हिंद उशीराने धावत असल्याची उदघोषणा कानावर पडल्याची बातमी सौभाग्यवतींनी दिली. आज कदाचित हा ओव्हरटेक होणार नाही अशी आशा बाळगून आम्ही प्रवासाची मजा घ्यायला लागलो. (आपल्या गाडीला ओव्हरटेक म्हणजे नामुष्कीच की हो ! हरहर ! छे, छे ! असे होता कामा नये.)

बरोबर तास १० मिनिटांत ७९ किमी अंतर कापून गाडी वर्धेच्या फ़लाटाला लागली. चहावाला शोधण्यासाठी मी खाली उतरलो. दुपारी खूपच घाईघाईत आम्ही निघालो होतो. जेवण करता आलं तरी फ़ार झालं इतकं करकचून झालेलं नियोजन होतं. चहावाला काही मिळाला नाही. १६.२१ ला गाडीने फ़लाट सोडला.


पुलगाव लगेच येतं. तसं आजही ते १६.४४ ला आलंय. पुलगाव स्टेशनवर आमचे .पू. बापुराव महाराज उतरले होते. (त्यांच खातखेडा हे गाव इथून जवळच आहे म्हणून पुलगावच्या फ़लाटाशी जवळीक. देवळात शिरताना उंब-याला हात लावून नमस्कार आपण का करतो ? किंवा ती पायधूळ आपण मस्तकी का लावतो ? कारण आपल्या अगोदर तिथे अनेक -या भक्तमंडळींचे पाय लागले असतात. त्यांची चरणधूळ आपल्याही मस्तकाचे भूषण व्हावी म्हणून.) फ़लाटाला नमस्कार करण्याइतपत नम्रता अंगी अजून आलेली नाही पण मी गाडीतूनच हात जोडतो. (१६.४४--१६.५०)
धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच. तो मात्र मैत्रीची जाणीव ठेवतो आणि एक कटिंग का होइना, फ़र्मास चहा पाजतो. सगळ्यांना. धामणगाव (१७.१४--१७.२०).

बडनेरा येईपर्यंत मनात धाकधूक. कुठेही गाडीचा वेग मंदावला की ओव्हरटेकची शंका मनात चुकचुकायला लागायची. पण तशातला काही प्रकार झाला नाही. मागाहून येणारी आझाद हिंद एक्सप्रेस उशीरा धावत असल्याचा फ़ायदा आम्हाला मिळाला. नियोजित वेळेपेक्षा मिनिटे उशीरा १८.०६ वाजता आम्ही बडनेरा फ़लाटावर उभे.

बडने-यात शिरता शिरता अमरावतीकडून अमरावती-जबलपूर सुपर एक्सप्रेस येताना दिसली. नागपूरकरांकडून पळवलेली आणखी एक गाडी. डबे सगळे नवीन २०११ किंवा २०१२ मधले होते पण एंजिन तेव्हढ मालगाडीच होतं. 27365 AJNI WAG 7. कदाचित बडने-यानंतर पुढील प्रवासासाठी बदललंही असेल. बडने-यालाही थोडासाच मुक्काम करून आम्ही १८.१२ ला हललो.

मूर्तिजापूरचा थांबा हा नियोजित थांबा नव्हे पण उन्हाळ्यात प्रायोगिक तत्वावर तो दिल्या गेलेला आहे. मूर्तिजापूर (१८.५१--१८.५६)

आता अकोल्याचे वेध लागले होते. अकोल्यापर्यंत जर ही गाडी निर्विघ्न गेली की मग ओव्हरटेकचा प्रश्नच नव्हता. मग बाबा, तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा, असं आझाद हिंदला सांगता आलं असतं. झालंही तसच. गाडी वेळेच्या १८ मिनिटे आधीच १९.२७ वाजता अकोल्याला फ़लाट क्र. वर उभी झाली. आम्ही जेवणं उरकलीत. आमच्या कंपार्टमेंटमधले सहप्रवासी वाशिमवरून बसणार होते त्यामुळे भरपूर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा आम्ही पूर्ण फ़ायदा घेतला आणि अगदी आरामात जेवणं आटोपलीत.

अकोल्याला एंजिन उलट बाजूने लागले. आत्तापर्यंत आमचा कोच गाडीच्या मागल्या बाजुकडे होता तो आता पुढल्या बाजुला आला आणि डिझेल एंजिनाचा तो मस्त आवाज ऐकत झोपी जाण्याचे भाग्य आमच्या नशिबात येणार होते. अकोल्यावरून बरोबर २०.१२ ला गाडी हलली.

वाशिम येईपर्यंत आम्ही रेल्वेने दिलेल्या पथा-या पसरल्यात आणि झोपेची तयारी केली. वाशिमला सहप्रवासी आलेत. त्यांनाही थोडं स्थिरस्थावर व्हायला साधारण अर्धा तास लागला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण दर्शनाला निघालेली मंडळी होती.

अकोल्यानंतरचा हा प्रदेश माझ्यासाठी नवीनच होता पण रात्र झाल्यामुळे झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर हिंगोलीला झोपलो.
वाशिम (२१.३८--२१.४४)
हिंगोली (२२.२५--२२.२७)

दि. १३/०५/२०१२
सकाळी जाग आली तेव्हा गाडी लातूर स्थानकात उभी होती. पावसाची रिमझिम सुरू होती. वातावरणात आल्हाददायक गारवा होता. लातूर गावापासून स्टेशन बरंच दूर असावंस वाटलं कारण गावातल्या समृद्धीच्या खुणा स्टेशनावर दिसत नव्हत्या. (तसं बघायला गेलो तर कराड, सांगली, सातारा ही स्टेशनंही अशीच फ़सवी आहेत. पहिल्यांदा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी मी कराडला महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलो होतो तेव्हा ते स्टेशन पाहून निराश झालो होतो. इथूनच परत फ़िरावं असं प्रकर्षाने वाटू लागलं होतं, गावात काही भव्यदिव्य असेल असं स्टेशनकडे पाहून वाटेचना. पण चार वर्षातल्या ह्या गावाच्या सहवासाने मला केव्हाच खिशात टाकलं होतं.). 

गाडी लातूरवरून हलली तेव्हा पहाटेचे ०५.५२ झालेले होते. ४०-४५ मिनिटे मी दारात उभा राहून मुक्त निसर्गाची मजा लुटत होतो. स्वच्छ मोकळी हवा फ़ुफ़्फ़ुसांमध्ये भरून घेत होतो. अचानक एका छोट्याश्या स्टेशनावर गाडीचा वेग मंदावला आणि गाडी थांबलीच. मी मोठ्या उत्कंठेने पुढून कुठली गाडी येतेय याची वाट बघत होतो. कुठली एक्स्प्रेस असेल ? तिचं एंजिन कुठलं असेल ? तिचे डबे कसे आणि किती असतील ? ही सगळी उत्सुकता.

फ़ार वेळ ताटकळत ठेवता समोरून मोठ्ठ्याने हॊर्न वाजवत एक दुहेरी एंजिनांची मालगाडी लातूरकडे निघून गेली. गाडीतल्या बहुतेकांची झोप चाळवल्या तरी गेली आणि -याच जणांची मोडलीसुद्धा.

ढोकी गावातून गाडी निघाली. (ढोकी ०६.४२--०६.४८)

उस्मानाबाद सकाळी ०७.१८ ला आलं. हे स्टेशनही गावापासून बरंच लांबवर आहे असं वाटलं. इथला फ़लाट बार्शीकडे चांगलाच उतरता आहे हे लक्षात आलं. ब्रेक जर बरोबर लागलेले नसतील तर गाडी आपोआप बार्शीकडे चालायला लागण्याइतपत उतार तीव्र आहे. मिनीटे थांबून ०७.२३ ला आम्ही हललो.

"उस्मानाबादनंतर नाश्ता येईल, तो करून घ्या. नंतर जवळपास मिरजपर्यंत काहीही मिळणार नाही" हा जाणकारांचा उपदेश लक्षात घेउन आम्ही नाश्ता येण्याची वाट बघत बसलो.

बार्शी फ़लाटही मोठा स्वच्छ आणि नीटनेटका वाटला. १९९२ मध्ये इथे झालेल्या पाणिनी वक्तृत्व स्पर्धेतल्या माझ्या सहभागाची आठवण झाली. आजवर मी अनुभवलेली सर्वात उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा. त्या स्पर्धेत माझ्या व्याख्यानाचा विषयही "फ़लाटदादा, फ़लाटदादा" हाच होता. तिथलं भगवंत मंदीर आठवलं. पण गाडी लगेच हलली. बार्शी (०७.५७--०८.००)

लगेचच थो्डा वेळ धावून गाडी शेंद्रीला थांबली. आडबाजुचं हे स्टेशन. सुरूवातीला समोरून येणा-या गाडीची वाट पहाण्यात काही वेळ घालवला. जवळपास अर्धा तास झाला तरी गाडी हलण्याचे चिन्ह दिसेना मग हळूहळू इतरही उतारू मंडळी गाडीखाली उतरायला लागली. कदाचित एखादी मागून येणारी गाडी ओव्हरटेक करणार असेल म्हणून वाट पाहिली पण मग ड्रायव्हर साहेबांनीच खुलासा केला की समोरच्या स्टेशनात (कुर्डूवाडीला) जागा नाही म्हणून सिग्नल नाही. मग बार्शी ते कुर्डूवाडी या ३७ किमी अंतरासाठी तास वेळ देण्यातली रेल्वेची चलाखी समजली. आता इतका उशीर होउनही गाडी कुर्डूवाडीला वेळेत पोहोचणार आणि रेल्वे आमच्या गाड्या अगदी वेळेवर धावतायत म्हणून पाठ थोपटून घेणार.

मी मात्र या संधीचा फ़ायदा घेत एंजिनाचे भरपूर फ़ोटो काढलेत. पूर्ण गाडीला एक फ़ेरफ़टकाही मारला.

शेंद्रीला जवळपास ५२ मिनीटे थांबून गाडी ०९.१४ ला निघाली. आणि ०९.३८ ला कुर्डूवाडीत फ़लाट क्र. वर दाखल झाली.

कुर्डूवाडीला मजा होती. फ़लाट क्र. वर मिरज-निजामाबाद पॆसेंजर उभी होती. थोड्याच वेळात सोलापूरकडून सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर दाखल झाली. (आजकाल मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस जेव्हा सोलापूर आणि कोल्हापूरला पोहोचतात तेव्हा दिवसभर नुसतं यार्डात पडून राहण्यापेक्षा त्याच गाड्यांना अनुक्रमे सोलापूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस म्हणून पाठवतात. म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस--कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस--सिद्धेश्वर एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस --सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस--महालक्ष्मी एक्सप्रेस अशा रितीने त्या मुंबईला परततात. फ़क्त सोलापूर-कोल्हापूर या दोन्ही बाजुंच्या प्रवासात त्यांचा प्रथम वर्ग वातानुकूल आणि द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचा डबा बंद ठेवतात.)

आमच्याच मार्गावर जाणारी ही गाडी कानामागून आली आणि निघाली सुद्धा. तेव्हढ्यात फ़लाट क्र. वर ११०१४ अप कोइंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) एक्सप्रेस गाडी आली. मध्य रेल्वेच्या लाडक्या गाड्यांपैकी ही एक गाडी. नवीन प्रकारचे एंजिन या गाडीला लागले होते.20040, WDP 4, SWR, KJM shed.

११०१४ अप गाडीची रचना : गार्ड पार्सल, साधारण, शयनयान (एस- ते एस-१०), भोजनयान, एस-११, बी- ते बी- (वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान), - (वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), एच.- (वातानुकूल प्रथम वर्ग + वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), साधारण, गार्ड पार्सल.

ही गाडी पण अगदी थोडाच वेळ रेंगाळली आणि रवाना झाली. एव्हाना सकाळचे दहा वाजून गेलेले होते. दौंडकडून मुंबई-पंढरपूर पॆसेंजर गाडी फ़लाट क्र. वर आली आणि आमची गाडी हलली. (१०.२९ वाजता)

कुर्डूवाडी ते पंढरपूर हा प्रदेश हिरवागार आहे. आता कुठेही थांबता गाडीने चांगला वेग घेतला. डिझेल एंजिन आपला चिरपरिचित आवाज करीत वेगाने मार्ग आक्रमू लागले. पंढरपूरच्या अगदी आधी चंद्रभागेचा पूल लागला. भर उन्हाळ्यातही नदीला पाणी भरपूर होते. नदीकडे आणि वाळवंटाकडे बघत हात जोडल्या गेलेत. किती सज्ज्न सत्पुरूषांचे आणि संतांचे पाय त्या वाळवंटाला लागले असतील, लागत असतील आणि लागतीलही.

पंढरपूर स्थानकाबाहेर बार्शी लाइट म्हणून ओळखल्या जाणा-या आणि आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात असणा-या नॆरो गेज रेल्वेचे एंजिन आणि एक डबा ठेवला आहे. पण पंढरपूर स्टेशन मला इंप्रेस करू शकले नाही. पंढरपूर (११.१७--११.२६)

सतीशला फ़ोन केलेलाच होता. आता अगदी ३० किमी वर सांगोला. सतीश स्टेशनवर घ्यायला येणार होता आणि मी नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायला उत्सुक झालो होतो. 


3 comments:

 1. वां! तुमचे प्रवासवर्णन वाचताना अगदी स्वत: प्रवास केल्याचा अनुभव येतो.

  ReplyDelete
 2. एका रेल्वेचे किती ते वर्णन !!!! बाप रे !!!

  ReplyDelete
 3. Really Great sir....
  नागपूर - कोल्हापूर रेल्वेचे एकदम खास वर्णन केले आहे ....☺☺ I Like it..
  मी तुमचा एक विद्यार्थीच आहे
  ( विद्याधर पैलवान BE Mech )

  ReplyDelete