मागील भागात आपण चिंतन केल्याप्रमाणे मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात.
कालकन्या जरा आणि तिच्यासोबतचे ३६० गंधर्व व ३६० गंधर्वी ह्यांनी राजाच्या नगरीच्या नऊही द्वारांमधून केलेल्या हल्ल्याने राजा हतबल झाला. अत्यंत विषयासक्त असल्याने तो या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकला नाही. तो हतप्रभ झालेला पाहून प्रजाजनांमध्ये त्याच्याविषयी अनादर वाढला. एव्हढेच नाही तर तर ज्या कन्या, पुत्र, पत्नींसाठी त्याने जीवनभर आटाआटी केली यांनाही तो नकोसा झाला. हे पाहून त्याला मनोमन अतीव दुःख झाले. अशातच त्याला मृत्यू आला. पण पत्नीकडून इतका अपमान, इतका अपेक्षाभंग होऊनही मृत्यूसमयी त्याला "आता माझ्यानंतर माझ्या पत्नीचे कसे होईल ?" याचीच चिंता लागून राहिली होती. त्यामुळे यमपुरीतले विविध भोग भोगून झाल्यानंतर त्याला पुढला जन्म हा विदर्भराजाच्या सुंदर राजकन्येचा मिळाला.
यथावकाश त्या वैदर्भीचा मलयराज नावाच्या अत्यंत पराक्रमी तितक्याच सात्विक राजाशी विवाह झाला. त्या दंपतींना अनेक पराक्रमी कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. एका कालावधीनंतर राजा अत्यंत संन्यस्त जीवन जगू लागला आणि त्याची पत्नी वैदर्भी त्याच्या सेवेत मग्न होऊन आपल्या कर्तव्यात आनंद मानू लागली. अशा प्रकारे वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत करीत असताना राजा मलयध्वज हा कालवश झाला. राजपत्नी वैदर्भीने त्याच्या परलोकगमनाचा खूप शोक केला आणि त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याच्या चितेसोबत ती सती जायला तयार झाली.
तिची शोकाकूल अवस्था पाहून त्याठिकाणी एक ब्राह्मण आला आणि तिला उपदेश करू लागला. त्या ब्राह्मणाने वैदर्भीला तिचा मागील जन्म स्मरण करून दिला. एका हंसासारख्या विमल जीवाने नऊ द्वारे असलेल्या नगरीत कसा प्रवेश केला, तो त्या नगरीलाच आत्मस्वरूप समजून तो हंस कसा त्यात रमत गेला, त्यानंतर त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा कसा हल्ला झाला आणि त्यात त्याचे नगर कसे भस्मसात झाले याचे स्मरण त्या ब्राह्मणाने वैदर्भीला दिले.
तो ब्राह्मण तिला म्हणाला "तू स्त्री नाहीस आणि गेल्याजन्मी होतास तसा पुरूषही नाही. आपण दोघेही हंस आहोत. मी ईश्वर आहे आणि तू जीवात्मा आहे. या जगात "मी स्त्री आहे, मी पुरूष आहे" असा भ्रम या परमहंस स्वरूप असलेल्या जीवाला केवळ ईश्वराच्या मायेने प्राप्त होतो. जो त्या मायेला भुलतो त्याला हा नऊ छिद्रे असलेला देह म्हणजेच स्वतःचे सर्वस्व वाटते. त्यात उपलब्ध असलेले सुखोपभोग घेणे हेच त्या जीवाला त्याचे परमकर्तव्य वाटते. त्या जीवावर वर्षातले ३६० गंधर्वरूपी दिवस आणि ३६० गंधर्वीरूपी रात्री निरंतर हल्ला करीत असतात. काळाची कन्या असलेल्या जरा म्हणजे म्हातारपण त्या जिवावर जबरदस्ती आक्रमण करीत असते. वास्तविक त्या जरेशी कुणीही स्वतःहून लग्न करायला बघत नाही, म्हातारपण कुणालाही आवडीने नको असते पण ती योग्य वेळी हल्ला करून त्या शरीराचा नाश करतेच. म्हणून आत्म्याने "मी म्हणजे शरीर" हा भ्रम सोडून देऊन स्वतःचे हंसस्वरूप जाणून या जगात वावरायला हवे."
त्या ब्राह्मणरूप परमात्म्याचा उपदेश ऐकून तो वैदर्भी नामक शोकाकूल जीव शांत झाला आणि परत त्या हंसरूपाला प्राप्त होऊन त्या ब्रह्मरूप हंसासोबत जीवरूप हंसरूपाने पुन्हा मानससरोवरात विहार करू लागला. जीव आणि ब्रह्म, जीवाचे देहाचे मायेत फ़सत जाणे आणि विचारहीन होऊन देहालाच आत्मस्वरूप समजणे यावर हे पुरंजनोपाख्यान आहे.
अगदी पहिल्याच लेखात चिंतन केल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याचे खरे परमात्मस्वरूप दाखवणे हे श्रीमदभागवताचे उद्दिष्ट आहे. राजा परिक्षितीला केलेला उपदेश हा तुमच्या माझ्यासारख्या संसारात, देहात बांधल्या गेलेल्या आणि देहालाच सर्वस्व मानणा-या सर्वसामान्य सांसारिकांसाठी आहे. याचे आपण सतत मनन करीत गेलोत तर या जीवनाशेवटी आपणही त्या निर्मळ हंसरूपाला प्राप्त होऊ ही श्रीमदभागवताची आपल्याला दिलेली ग्वाही आहे.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १९४८ दिनांक १५ / ७ / २०२६
१५ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment