परवा असाच कशावरून तरी विषय निघाला तेव्हा लेक पटकन म्हणाली "बाबा, तू भोळा आहेस. लोक तुझ्याशी काही काळापूर्वी कसे वागलेत ? हे तू विसरून जातोस आणि भाबडेपणाने त्याच लोकांवर पुन्हा विश्वास ठेवतोस."
तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला. "स्वतः पाॅझिटिव्ह राहून अशा लोकांना अदखल करून आपली प्रगती साधता आली पाहिजे" वगैरे तिला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला.
आणि मला मी २४ वर्षांचा असतानाचे माझे आणि माझ्या तीर्थरूपांचे अगदी असेच झालेले संभाषण आठवले. मी सुध्दा आमच्या दादांना असेच म्हणायचो. "दादा, तुम्ही भोळे आहात. लोक तुम्हाला फसवतात, तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. पण तरीही तुम्ही त्या सगळ्यांना सोबत घेऊन का चालता ?" वगैरे वगैरे.
मला खात्री आहे की आमच्या तीर्थरूपांचा आणि पितामहांचा सुध्दा असाच संवाद आमच्या तीर्थरूपांच्या पंचविशीत झालेला असेल. आम्हा मुलांसमोर कधी असा संवाद झाला नाही तरी आमचे दादा आमच्या पितामहांविषयी आमच्या काका मंडळींशी बोलताना जे बोलत त्यावरून असाच संवाद त्यांच्या तरूणपणीही झाला असेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
प्रत्येक जुनी पिढी ही अनुभवाने समृध्द असते, जगाचे टक्केटोणपे खाऊन त्यांनी आपापल्या जगण्याची पध्दती शोधली असते, विकसित केलेली असते.
तर प्रत्येक नवी पिढी ही त्या त्या काळाशी खूप सुसंगत असते. सतत बदलणारे जग या नव्या पिढीच्या कायम प्रत्ययाला येत असते. त्यानुसार त्या त्या नवोन्मेषाने जगण्याचा ही प्रत्येक नवी पिढी प्रयत्न करीत असते. या भिन्न विचारी पिढ्यांच्या एकमेकांबद्दल या भावना असणारच. जगण्याची मूळ मूल्ये सारखीच असलीत तरी काही बाबतीत Generation Gap साहजिकच आहे.
- "दोन पिढ्यांमधल्या सुप्त संघर्षाचा मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि कोटुंबिक दृष्टीकोनातून घेतलेला एक सम्यक आढावा" या शोधग्रंथाचे लेखक आणि GGA (Generation Gap Analysis) या नव्या संज्ञेचे जनक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.