भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे बालपणापासूनचे मित्र. सांदिपनी ऋषींकडे दोघांनीही ज्ञान आणि विद्या ग्रहण केल्यात. त्यानंतर श्रीकृष्ण राजधर्माचे, क्षत्रियधर्माचे पालन करून आपले जीवन जगू लागलेत तर सुदामा आपल्या ब्राह्मण धर्माचे जीवन जगू लागलेत. ज्ञानदान करणे, समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही त्या काळात ब्राह्मणांची मुख्य कर्तव्ये होती. अपरिग्रह, कुठल्याही गोष्टींचा अति संग्रह करणे हे ब्राह्मणधर्माला लांछन होते. घरात तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी अन्नसाठा सुद्धा नको इतकी या अपरिग्रहाची सीमा होती. त्याकाळी समाजातले इतर घटक ब्राह्मणांचा हा अपरिग्रह जाणून त्यांच्या जीवनक्रमाला सुरळितपणे चालू ठेवण्यासाठी ब्राह्मणांना दान आदि करून त्यांचा चरितार्थ चालवित असत.
सुदामा ज्या देशात रहात होते त्या देशात एकूणच दुष्काळी परिस्थिती. समाजातले सगळेच घटक आपला आपला चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करीत असत त्यामुळे सुदामा हा परिस्थितीने गरीबच होता. फ़ाटके, मलिन कपडे, कुटुंबातल्या सगळ्यांना जेमतेम पुरेल इतकेच अन्न, इतर सुखसुविधांचा अभाव अशा परिस्थितीत सुदामा आणि त्याचे कुटुंब आपला काळ क्रमित होते.
एकेदिवशी या दारिद्राला आणि अत्यंत अभावाच्या जगण्याला कंटाळून सुदामांची पत्नी अत्यंत दीनवाण्या चेहे-याने सुदामांना म्हणाली की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तुमचे मित्र आहेत असे तुम्ही कायम सांगता. त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगून काही धन मिळाले तर आपले जगणे थोडेतरी सुसह्य होईल. कृपा करून आपण द्वारकाधीशांकडे जाऊन त्यांची भेट घ्यावी. पत्नीच्या सांगण्यानंतर धन मागण्यासाठी नव्हे तर त्या निमित्ताने आपली आपल्या बालमित्राशी भेट होईल या हेतूने सुदामा द्वारकेस जाण्यास तयार झालेत. द्वारकाधीशाकडे रिकाम्या हाताने कसे जायचे ? म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला द्वारकाधीसाठी काहीतरी भेटवस्तू दे असे सांगितले. तिने शेजारची चार ब्राह्मण घरे भिक्षा मागून मूठभर कोरडे पोहे आणले आणि एका पुरचुंडीत बांधून ती भेटवस्तू सुदामांसोबत द्वारकाधीशांसाठी दिली.
द्वारकेत सुदामा प्रवेशले आणि आपल्या बालमित्राचे हे सगळे वैभव पाहून अत्यंत हरखून गेलेत. अनेक चौक्या पहारे दूर करीत करीत सुदामा श्रीकृष्णाच्या महालापर्यंत पोहोचलेत. फ़ाटक्या आणि मलिन वस्त्रातला आपला मित्र आपल्या द्वाराशी आला आहे हे वर्तमान श्रीकृष्णांना कळताच ते सुदाम्याच्या स्वागतासाठी महालाबाहेर धावत आले आणि त्यांनी तिथेच सुदाम्याला घट्ट मिठी मारली. ते सुदाम्याला अत्यंत आदरपूर्वक आपल्या महालात घेऊन आलेत आणि त्यांनी सुदाम्याला आपल्या मंचकावर बसविले. त्यांचे पाय धुतलेत, त्यांची सेवा केली, त्यांच्या विश्रांतीसाठी आपला मंचक उपलब्ध करून दिला. याप्रसंगी प्रत्यक्ष लक्ष्मीरूप असलेली रुक्मिणी सुदाम्यांना मंचकावर वारा घालीत होती आणि श्रीक्रुष्ण त्यांचे पाय चेपत होते.
विश्रांतीनंतर श्रीकृष्णांनी सुदामदेवांना आपल्या इतर राण्यांशी, पुत्रांशी ओळख करून दिली आणि ते दोघे मित्र गुरूगृहीच्या आठवणींमध्ये रमलेत. गुरूगृही असताना शिकलेली विद्या, झालेल्या गंमतीजंमती, गुरूंचा उपदेश या आठवणींमध्ये दोघेही रमलेत. भगवंतांना काही मागायचे आहे याचा विसर सुदामदेवांना पडला आणि सुदामदेव आपल्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलेले आहेत हे भगवंतांनी जाणूनसुद्धा त्याबद्दल अवाक्षर काढले नाही. अचानक भगवंतांनी सुदाम्यांना तू माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली आहेस की नाही ? असा प्रश्न केला. आपल्या कनवटीला मलिन वस्त्रांमध्ये बांधून आणलेले ते मूठभर पोहे अशा सर्वधनसंपन्न द्वारकाधीशाला भेटवस्तू म्हणून देण्यास सुदामांना संकोच वाटला. ते तो मुद्दा टाळू लागलेत. पण भगवंतांनीच चपळाईने त्यांचा धांडोळा घेऊन ती पोहे बांधलेली पोटली हस्तगत केली आणि त्यातले मूठभर पोहे आपल्या तोंडात टाकून ते अत्यंत मनापासून त्यांचा आस्वाद घेऊ लागलेत. राजमहालातील इतर सर्वजण, श्रीकृष्णांच्या राण्या एका अत्यंत मलिन, फ़ाटक्या वस्त्रात असलेल्या ब्राह्मणाची ही सरबराई पाहून आश्चर्यचकित होत होते. भगवंतांनी एक मूठ पोहे संपवून दुसरी मूठ घेण्यासाठी त्या पोटलीत हात टाकला तोच त्यांचा तो हात प्रत्यक्ष लक्ष्मीस्वरूप असलेल्या रुक्मिणीने पकडला असे श्रीमदभागवतकार वर्णन करत आहेत. एक मूठ पोह्यांनीच भगवंत सुदामदेवांना काय काय आणि किती किती देणार होते हे माता लक्ष्मीने ओळखले होते. त्यांनी दुसरी मूठ पोहेसुद्धा भक्षण केले असते तर त्रैलोक्याचे राज्य सुद्धा सुदामदेवांना देऊन टाकले असते म्हणून माता लक्ष्मीने भगवंतांना दुसरी मूठ पोहे खाऊ दिले नाही असे भाष्यकारांचे विवेचन आहे.
सुदामदेवांची सेवा, आदरसत्कार, भोजन, गप्पागोष्टी झाल्यानंतर सुदामदेव परत जाण्यास निघालेत तेव्हा त्यांना निरोप द्यायला प्रत्यक्ष द्वारकाधीश सीमेपर्यंत आलेत. सुदामदेवांच्या मनातल्या गोष्टी, याचना इत्यादि बाबी त्यांच्या स्वतःच्या संकोचामुळे सुदामदेवांच्या मनातच राहून गेल्यात. आणि द्वारकाधीश इतके वस्ताद की त्या गोष्टा मनोमन जाणूनही त्यांना ते व्यक्त करण्याची वेळ द्वारकाधीशांनी सुदामदेवांच्या द्वारकेच्या वास्तव्यात येऊ दिली नाही. इकडे आपल्या बालमित्राची भेट झाली म्हणून सुदामदेव परतताना अत्यंत हर्षभरित होते.
सुदामदेव त्यांच्या नगरीजवळ आले तेव्हा त्यांना त्या नगरीचा संपूर्ण कायापालट झालेला दिसला. जुने दारिद्र्य जाऊन तिथे आता सर्वत्र वैभवसंपन्नता दिसू लागली होती. सुदामदेवांचे घर आणि कुटुंबियसुद्धा सर्व प्रकारच्या लौकिक ऐश्वर्याने समृद्ध झालेले होते. सगळे लौकिकरित्या संपन्न झालेले होते. सुदामदेवांना हे कृत्य कुणाचे आहे ते कळले आणि मनातून ते अधिकच विरक्त झालेत. यानंतरचे जीवन त्यांनी सुखसमृद्धीत राहूनही भगवंतावरच्या आपल्या मनातील प्रेमात दिवसेंदिवस वाढ करीत घालवलेत. त्या वैभवाने ते भुलले नाहीत. त्या लौकिक वैभवापेक्षा आपल्या मित्राची द्वारकेत झालेली भेट, त्याने दिलेला सन्मान हे त्यांच्या मनात जास्त ठसले होते. लौकिक वैभवापेक्षा प्रत्यक्ष भगवंताची झालेली भेट ही जास्त मौल्यवान असते हे शाश्वत सत्य सुदामदेवांनी जाणले म्हणून ते मुक्तीच्या मार्गाला गेलेत.
पंतकाव्यात या प्रसंगाचे अत्यंत सुंदर वर्णन एका आर्येत केल्या गेलेले आहे.
ऋणतरी मूठभर पोहे, ज्याच्या व्याजात हेम नगरी ही
मुद्दलात मुक्ती देणे, ही कोण्या साहुकारीची रिती ?
मूठभर पोह्यांच्या ऋणात व्याज म्हणून सुदामदेवांना सर्व लौकिक ऐश्वर्य भगवंतांनी दिले, आणि ते मुद्दल चुकवायचे म्हणून त्यांना मुक्ती प्राप्त करून दिली. इतक्या छोट्याशा ऋणाची इतकी परतफ़ेड जगातला कुठला सावकार करीत असतो ? फ़क्त भगवंताच्या दरबारी हा प्रेमाचा, भक्तीचा हिशेब आहे.
आपण सर्व भाविकही आपल्या नेहेमीच्या लौकिक मागण्या बाजूला ठेऊन भगवंतावर आपला मित्र म्हणून प्रेम करून बघूयात का ? तो अशा प्रेमाचा फ़ार भुकेला आहे. त्याला हे असे निर्व्याज प्रेम अगदी मनापासून आणि फ़ार फ़ार आवडते.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्दशी शके १९४८ दिनांक ११ / ८ / २०२६
११ ऑगस्ट २०२६
No comments:
Post a Comment