Saturday, August 8, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३९ रुक्मिणीस्वयंवर

विदर्भ देशाचा राजा् भीष्मक याला पाच पुत्र आणि एक अत्यंत सुस्वरूप आणि सुशील कन्या होती. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रूक्मकेश आणि रूक्ममाली हे पुत्र आणि रूक्मिणी ही कन्या. त्यात थोरला पुत्र रूक्मी हा अत्यंत पराक्रमी होता आणि ज्येष्ठ युवराज म्हणून वडिलांसोबत राज्याचा कारभार तोच बघत असे.


रूक्मिणी विवाहायोग्य वयाची झाली तेव्हा तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. रूक्मिणीने नगरातील विद्वान जनांकडून द्वारकाधीश श्रीकृष्णांची ख्याती, त्यांचा अतुलनीय पराक्रम, त्यांचे विलोभनीय रूप यांचे वर्णन फ़ार पूर्वकाळापासून ऐकले होते आणि मनोमन असा निश्चय केला होता की मी विवाह करेन तर श्रीकृष्णांशीच. तिने मनोमन श्रीकृष्णांनाच वरले होते.


इकडे द्वारका नगरीत भगवंतांनी रूक्मिणीचे सौंदर्य, तिची शालीनता, विद्वत्ता यांची किर्ती ऐकली होती आणि साक्षात लक्ष्मीरूप असलेल्या रूक्मिणीशी विवाह करून तिला आपली पट्टराणी करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होताच.


पण रूक्मिणीसाठी जेव्हा वरसंशोधन सुरू झाले तेव्हा तिच्या थोरल्या भावाच्या मनात तिच्यासाठी वर म्हणून त्याचा मित्र असलेल्या शिशुपालाचे नाव आले. शिशुपाल हा एक दुष्ट आणि क्रूर शासक होता. पण रूक्मीला त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीपुढे त्याचे अवगुण फ़ारसे जाणवत नव्हते. वृद्ध पिता भीष्मक थकल्यामुळे रूक्मी हाच विदर्भ राज्याचा खरा शासक असल्याने त्याच्या मर्जीपुढे त्याच्या इतर भावांचे, रूक्मिणीचे किंवा खुद्द भीष्मक राजाचे काही चालेना. रूक्मीने विवाहाची तारीख निश्चित केली आणि शिशुपालाचे मित्र दंतवक्र, जरासंध इत्यादि राजे विदर्भ नगरीच्या राजधानीत कौंडिण्यपूरला येण्यास निघालेत.


रूक्मिणीला ही दुःखद वार्ता कळताच तिने एक युक्ती केली. तिने तिच्या विश्वासातल्या एका ब्राह्मण दूताला बोलावून त्याच्या हाती स्वतः लिहीलेले एक प्रेमपत्र दिले. आणि ते द्वारका नगरीत जाऊन श्रीकृष्णांना देण्यास सांगितले. त्या प्रेमपत्रात तिने श्रीकृष्णांच्या रूपाची, पराक्रमाची स्तुती केलेली होती आणि तिने त्यांनाच मनोमन वरल्याची ग्वाही दिली होती. तिच्या विवाहप्रसंगी तिथल्या परंपरेनुसार जेव्हा ती जगदंबेच्या दर्शनाला जाईल तेव्हा तिथून तिचे हरण करण्याची विनंती तिने श्रीकृष्णाला केलेली होती. शिशुपाल हा वर म्हणून तिला अजिबात पसंत नाही आणि भगवंतांनी येऊन तिचे हरण आणि पाणिग्रहण केले नाही तर ती आपले प्राण त्यागणार असल्याची खात्रीसुद्धा तिने त्या पत्रातून भगवंतांना दिलेली होती. 


श्रीमदभागवताच्या दशम स्कंधातल्या बावन्नाव्या अध्यायातील रूक्मिणीने श्रीकृष्णाला लिहीलेले हे पत्र विविध अंगांनी अभ्यासण्याजोगे आहे. या पत्रातील भाषासौंदर्य, व्याकरण आणि भावनांची नेमकी अभिव्यक्ती हे खरोखर एका अभ्यासाचा विषय आहेत. हे सुंदर पत्र वाचून भगवंतांनी आपला रथ सिद्ध केला आणि ते रूक्मिणीच्या हाकेला ओ देण्यासाठी द्वारकेवरून तातडीने निघालेत. भगवंत तातडीने विदर्भ देशाकडे निघालेत ही बातमी बलरामदादांना कळल्यावर ते सुद्धा आपली पुरेशी सेना घेऊन भगवंतांच्या मागेमागे द्वारकेवरून विदर्भाकडे निघालेत.



लग्नाच्या नियत दिवसाच्या आदल्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा कौंडिण्यपूरला आलेत. संपूर्ण नगरात लग्नाची घाई गडबड सुरू होती. शिशुपाल, जरासंध इत्यादि अनेक राजे आपल्या सैन्यासह त्या नगरीत येऊन लग्नसमारंभासाठी मुक्काम ठोकून होते. कौंडिण्यपूरच्या सगळ्या प्रजाजनांनी श्रीकृष्णांना बघितल्यावर त्या सगळ्यांनाच त्यांच्या सुंदर रूपाची, तेजाची आणि पराक्रमाची जणू भुरळच पडली आणि त्या सर्वांच्या लाडक्या राजकन्येसाठी, रूक्मिणीसाठी श्रीकृष्ण हाच योग्य वर आहे अशी त्यांच्या मनातून खात्री पटत चालली होती.


आपल्या पत्राचा आदर करून प्रत्यक्ष श्रीकृष्ण नगरीत आलेले आहेत हे ऐकून रूक्मिणी मनोमन आनंदली. तिने लग्नासाठीचा सगळा साजशृंगार अगदी मनापासून करायला सुरूवात केली. ठरल्या वेळेनुसार लग्नापूर्वी ती आपल्या अनेक सख्यांसह आणि सैनिकांच्या पहा-यात कुलदेवी जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेली असताना पूर्वसंकेताप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी तिचे हरण केले आणि तिला आपल्या रथावर घेऊन तो रथ भरधाव द्वारकेकडे सोडला. 



या प्रकारामुळे अपमानित होऊन शिशुपालादि राजांनी आपापल्या सैन्यासह श्रीकृष्णांचा पाठलाग सुरू केला. पण बलरामदादांनी त्यांच्या सैन्यासह त्या सर्वांचा प्रतिकार करून तो पाठलाग मध्येच थांबवला. बलरामदादांच्या सैन्याने तिथे असलेल्या सकल राजांच्या सैन्याचा पाडाव केला. हताश झालेला शिशुपाल, जरासंध आदि राजे माघारी परतले. पण रूक्मिणीचा सगळ्यात थोरला बंधू रूक्मी याने श्रीकृष्णांच्या रथाचा पाठलाग प्राणपणाने सुरूच ठेवला. श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवून त्याच्याशी युद्ध केले. श्रीकृष्णांच्या अतुल पराक्रमापुढे रूक्मीचा पराक्रम अगदी थिटा पडला. तो मरणासन्न अवस्थेत असताना रूक्मिणीने आपल्या बंधूच्या प्राणासाठी श्रीक्रुष्णांसमोर पदर पसरला आणि तिच्या विनवणीवरून श्रीकृष्णांनी रूक्मीला सोडून दिले. निराश, हताश झालेला रूक्मी त्याच्या पूर्वप्रतिज्ञेनुसार पुन्हा कौंडिण्यपूरला कधीही आला नाही. नगराबाहेर भोजकट नावाचे एक नवे नगर वसवून तिथे तो राहू लागला.


रूक्मिणीला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत आलेत. बलरामदादांनी द्वारकेत मोठा लग्नसमारंभ आयोजित केला होता. प्रत्यक्ष लक्ष्मीप्रमाणे सुंदर असलेल्या आणि आपल्या राजाला प्रिय असलेल्या द्वारकेच्या राणीला, रूक्मिणीला बघून द्वारकेतील सगळे प्रजाजन अगदी आनंदून गेलेत. श्रीकृष्णांचा पहिला विवाह अशा प्रकारे साजरा झाला. 


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण दशमी शके १९४८ दिनांक  ८ / ८ / २०२६


८ ऑगस्ट २०२६ 


No comments:

Post a Comment