आता श्रीकृष्ण आणि बलरामदादा सगळ्या गोकुळवासियांच्या अत्यंत प्रेमाचे झालेले होते. सगळे गोकुळवासी जरी त्यांना आपल्यासारखेच गोपबाल समजत होते तरी वृंदावनातल्या जाणत्या लोकांना आणि नंदबाबांना श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे काहीतरी दैवी शक्ती आहेत याबाबत खात्री होती.
एकदा गोकुळात वार्षिक इंद्रपूजेची तयारी सुरू असताना ती लगबग पाहून श्रीकृष्णाने आपल्या नंदबाबांना विचारले की बाबा ही कशाची तयारी ? आपण काय करतोय ? तेव्हा नंदबाबांनी गोपांच्या वार्षिक इंद्रपूजेबाबत त्यांना सविस्तर सांगितले. इंद्र ही पर्जन्याची देवता असल्याने आपण दरवर्षी इंद्रयज्ञ करून इंद्राला संतुष्ट करतो असे प्रतिपादन केले. यावर श्रीकृष्णाने आपल्याला पर्जन्य देणारा हा गोकुळातला गोवर्धन पर्वत आणि याच्यावरील घनदाट वृक्षराजी आहे, आपल्याला समृद्धी देणारे आपले गोधन आहे आणि आपल्याला सदैव आशिर्वाद देणारे हे गोकुळवासी ब्राह्मण आहेत. आपण त्यांच्यासाठी यज्ञ केला पाहिजे, त्यांना आपल्या यज्ञातील हविर्भाग दिला पाहिजे. इंद्राची पूजा,यज्ञ करायला आपल्याकडे राज्य कुठे आहे. आपण सर्वांनी या गोवर्धनाची, गोधनाची आणि ब्राह्मणांची पूजा व प्रदक्षिणा केल्यानेच आपल्याला इंद्रपूजा केल्याचे फ़ळ मिळू शकेल असा आग्रह धरला. नंदबाबांसह सगळ्या जाणत्या गोपांना ते पटले आणि त्यांनी इंद्रयज्ञाऐवजी गोवर्धनाला उद्देशून यज्ञ केला आणि यज्ञाचा हविर्भाग त्यालाच अर्पण केला.
इंद्राला यज्ञ न केल्याबद्दल आणि यज्ञातला हविर्भाग न मिळाल्याबद्द्ल फ़ार राग आला. त्याने या गोकुळवासियांना धडा शिकविण्यासाठी आपल्या अधीन असलेल्या सांवर्तक नावांच्या मेघसमूहाला बोलावून गोकुळात अतिवृष्टीकरण्याचा आदेश दिला. या अतिवृष्टीमुळे या गोकुळवासियांना इंद्राचा अधिकार कळून ते क्षमायाचना करीत इंद्राला शरण येतील असा त्याचा होरा होता. सांवर्तक मेघांनी गोकुळावर अतिवृष्टी करण्यास सुरूवात केली. या अकाली पावसाने आणि पावसासोबत वाहत असलेल्या अतिथंड वा-यांमुळे सगळे गोकुळवासी भयभीत झाली. या प्रचंड थंडी आणि अविरत पावसापासून आपापल्या लेकरांना वाचवण्यासाठी आपल्या शरीराखाली घेत ती सगळी गोपमंडळी आपल्या गोधनासह श्रीकृष्णाच्या आश्रयाला आलीत आणि यावर उपाय शोध म्हणून विनवू लागलीत.
भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार ओळखला आणि सगळ्या गोपबालकांना प्रथम निर्भय केले. त्याने सहज लीलेने शेजारचा गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गोकुळवासियांना त्यांच्या मुलाबाळांसह आणि गोधनासह त्या विशाल स्वरूपाच्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेण्यास सांगितला. श्रीकृष्ण वचनांवर विश्वास ठेऊन सगळ्या गोपबालकांनी तसे केले आणि सतत सात दिवस गोकुळात पाऊस पडूनही कुणाही गोप बालकाला किंवा त्यांच्या गोधनाला काहीही झाले नाही.
भगवान श्रीकृष्ण आपल्या अचाट लीलेने गोकुळाचे रक्षण करतो आहे हे बघितल्यानंतर इंद्राचे गर्वहरण झाले. त्याने ती अतिवृष्टी थांबविली. श्रीकृष्णाने त्या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला आलेल्या सगळ्या गोपांना आपल्या गोधनासह पुन्हा गोकुळात निर्भयपणे परतण्याची आज्ञा केली आणि गोवर्धन पर्वताची पुनर्स्थापना त्याच्या जागी केली.
आज आपण सर्वत्र यात्रा करत सुटतो. आज या ठिकाणी जा, उद्या त्या ठिकाणी जा. आज इथे नवस बोल, उद्या तिथे नवस बोल. यात्रा करणे, भगवंताच्या विविध ठिकाणांची शोभा पाहणे, त्यानिमित्ताने भारतभ्रमण करून या विशाल देशातील सगळ्या संस्कृती, परंपरा यांचे अवलोकन करणे यात वाईट काहीच नाही. पण आपण फ़क्त २००० किलोमीटर दूरचा अमुक एक देव लवकर पावतो हा स्वार्थी हेतूने तिथे जाऊन गर्दी करतो, तिथल्या पर्यावरणाला इतकी गर्दी सोसणार आहे की नाही याचा विचार न करता तिथल्या व्यवस्थेवर ताण उत्पन्न करतो हे ठीक नाही. यात भारतभ्रमण, तिथल्या रूढी परंपरा यांचे डोळस अवलोकन, त्या रूढींचे आपल्या रूढीपरंपरांशी साम्य किंवा विरोधाभास आणि त्यातून या भारतवर्षाविषयीचे एक साकल्य आकलन हे कुठेच होत नाही. आपण प्रवासी म्हणून जातो. विमानाने, हेलीकॉप्टरने भराभरा जाऊन तरातरा येतो. यात पर्यटनाच्या मूळ हेतूला आपण आपल्या स्वार्थी हेतूने नख लावतोय हे आपल्या लक्षातच येत नाही. यात भगवंताच्या दर्शनाचा आनंद तो किती आणि आपल्याकडील धनाचे, संपत्तीचे प्रदर्शन करून स्थानिक भाविकांवर मात करून परतल्याचे सुख ते किती याचा विचार सर्वांनीच करण्याची आज गरज आहे.
भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि कुलदेवता यांना ओळखून, त्यांची आपल्यावरील कृपा ओळखून त्यांची पूजा प्रथम करण्याचा उपदेश या उदाहरणाद्वारे केलेला आहे. त्यानंतर ५००० वर्षांनी समर्थांनी सुद्धा आपल्याला "उगेच भ्रमू नये भ्रमे" हा तसाच उपदेश आपल्या दासबोधातून केलेला आहे. तो लक्षात घ्यावा हाच या कथेचा बोध आणि प्रसाद सुद्धा आहे.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्थी शके १९४८ दिनांक २ / ८ / २०२६
No comments:
Post a Comment