"इंग्रजी ही आजच्या विश्वाची ज्ञानभाषा आहे" हे गोंडस आणि तितकच लंगड समर्थन करीत करीत आपण आपल्या पुढल्या पिढीला जबरदस्ती इंग्रजी माध्यमातून शिकवले.
१. मग जर्मनी, जपान इत्यादी देश इंग्रजीवाचून अज्ञानीच राहिलेत अशी आपली समजूत आपण अधोरेखित करतोय.
२. मराठी माध्यमात (किंवा तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड इ. भारतीय भाषा माध्यमात) शिकलेले माझे बंधू, अनेक मित्र गेली अनेक वर्षे युरोप आणि अमेरिकेत अक्षरशः राज्य करताहेत, त्यांचे काहीच अड्ले नाही हो. त्यांनी आपली मातृभाषा तर प्राथमिक शिक्षणात उत्तम आत्मसात केली आणि गरज पडेल तेव्हा इंग्रजीही उत्तम आत्मसात केली.
३. याउलट प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजीचे हे जोखड मानेवर घेऊन फिरणारी आजची लहान पिढी, "सत्तेचाळीस म्हणजे फोर्टी सेव्हन, तेवीस म्हणजे ट्वेंटी थ्री" अशा केविलवाण्या समजावणीला सामोरे जाताहेत आणि "ना इधरके रहे ना उधरके रहे हम" ही अवस्था पावतात, हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे.
बर ते जाऊद्या, तो आजचा मुद्दाच नाही. आपण इंग्रजी भाषा शिकताशिकता त्यांच्या संस्कृतीचीही गुलामगिरी कधी मान्य केली ? हे आपले आपल्यालाच कळले नाही हे खर दुःख आहे.
आपला बर्थडे आजकाल केक कापल्याशिवाय होत नाही,
आपण सर्वांनी सामाजिक मदिराप्राशनाला (स्पष्ट शब्दात बेवडेगिरी) विरोध न करता मूक मान्यता दिलीय, किंबहुना त्याला प्रतिष्ठाच दिली आहे. या आणि अशा अनेक निरर्थक प्रथा आपण मानसिक गुलामगिरीपोटी स्वीकारल्या आहेत.
१०,००० वर्षांपूर्वी रचलेल्या ऋग्वेदात "मित्रो दाधार पृथिवीं मुतद्यात" (सूर्याच्या आधाराने पृथ्वी स्थिर आहे.) हे आपल्या संध्याविधानात आपण रोज उच्चारतो पण आपल्या पूर्वजांविषयी आपल्याला अभिमान न वाटता,
"There is gravitational attraction of Sun that keeps earth revolving around it in orbit" हे Newton चे तेच वचन प्रमाण मानतो आणि त्याचा मात्र अभिमान बाळगतो. इतकच नाही तर "त्यांच सगळच चांगल आणि आपल सगळच वाईट" अशी मानसिकताही बाळगतो.
इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीने आपल्या मनांवर जो आघात केलाय त्यातून सावरणे केवळ अशक्य झाले आहे. आणि गेल्या २५ वर्षांमध्ये ही पाश्चात्य शरणता वाढीला लागली आहे हे आपले दुर्दैव आहे.
आपल्या पूर्वजांना आधुनिक विज्ञानाचे नियम आणि त्याचे तंत्रज्ञानही अवगत होते फक्त ते ज्ञान त्यांनी फक्त एका वर्गापुरतेच मर्यादित ठेवले ही त्यांची निःसंशय चूक झाली. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, मौखिक ज्ञान प्रसाराच्या मर्यादा हे सगळे घटकही आपण आज लक्षात घ्यायला हवेत.
या ८० व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या या राष्ट्राविषयी रास्त अभिमान बाळगून कुठलीही मानसिक गुलामगिरी न करता स्वतंत्र विचाराने राष्ट्राला अजेय करण्याचा संकल्प करूयात.
सगळ आपल्यातच आहे रे. भूतकाळातल्या झालेल्या चुका टाळण्याचा दृढ निश्चय करूयात आणि
"परम वैभवम नेतु मे तत स्वराष्ट्रम" या वचनाप्रती संपूर्ण भारतीय मानसिकतेने कटिबध्द होऊयात.
जय हिंद.
— अजूनही भस्मधारण, प्रातःसंध्यावंदन करणारा मातृभूभिमानी रामचंद्र प्रकाशराव.

No comments:
Post a Comment