प्रकाश आमटेंनी त्यांच्या वाॅलवर टाकलेला चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मागे, जीपमधून खाली उड्या टाकून मोबाईल घेऊन फोटो आणि व्हिडीओजसाठी धावणार्या अति मूर्ख माणसांचा एक व्हिडीओ बघितला. तो वाघ बिचारा या कोलाहलात घाबरून पळून गेला म्हणून. जर त्याने बिथरून त्या भेकड जमावावर हल्ला केला असता तर, सगळ्यांच्या धोतरांचे पितांबर झाले असते.
चैत्रात नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा केल्याचे अनेकांचे अनुभव वाचलेत, परवापासून इथल्या एका ताईंच्या परिक्रमेचा रोजचा अहवाल वाचतोय. "आज सकाळी मैय्यात अंघोळ केली, पूजा करून निघालो, सकाळी या आश्रमात हा नाश्ता, दुपारी त्या आश्रमात अमुक अमुक पदार्थांचे जेवण, माझ्या मनात आज पुरणपोळी खायचे होते तिथे नेमकी पुरणपोळीच वाढत होते, बघा मैय्या आपल्या भक्तांची इच्छा किती आणि कशी पुरवतेय ते !, संध्याकाळी अमक्यातमक्या आश्रमात आसन लावले, चहा बिस्कीटे आणि रात्री आलु पुरीचा बेत होता." वगैरे वगैरे. हे सगळे भोग तर आपण घरीही छान घेऊ शकतो की. मैय्याच्या परिक्रमेत किती अंतर्मुख झालो, किती तिचे मानसिक सान्निध्य अनुभवले, किती तिथल्या निसर्गातल्या खूप सकारात्मक विचारांशी आपण जोडले जातोय, किती त्या वातावरणाचा भाग होऊन आपण स्वतःच मैय्यारूप, शिवरूप होतोय या प्रश्नाचे उत्तर नाहीच.
त्यात तर एका ट्रॅव्हल कंपनीने ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी आठवडाभराची मैय्या परिक्रमा "आरामदेह एसी स्लीपर कोच"ने व राहण्याची, भोजनाची फाईव्ह स्टार व्यवस्था अशी जाहिरात वाचली...
केदारनाथच्या दर्शनरांगेत मुंबईच्या लोकलशी स्पर्धा करणारी गर्दी पाहिली आणि...
एकच विचार मनात तरळून गेला की निसर्गाचे संवर्धन व्हावे, माणसांचा निसर्गाला त्रास कमी व्हावा आणि सगळ्या सृष्टीचा दुवा घ्यावा असे सरकारला वाटत असेल तर किमान किमान किमानताडोबा जंगल सफारी चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा यावर पुढली काही वर्षे संपूर्ण बंदी घालावी.
चारधाम आणि ताडोब्यातल्या ज्या मंडळींच्या उपजिवीका या पर्यटनावर अवलंबून आहेत, (परिक्रमेत तिथल्या स्थानिकांची उपजिवीका परिक्रमावासियांमुळे चालत नाही. उलट हे असे माजोरी आणि पर्यटक परिक्रमावासी तिथल्या स्थानिकांवर बोझ बनून राहतात. ते मैय्याकाठचे कायम निवासी असल्याने सात्विक रूजुतेने ते बोलत नाहीत तरी त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट आपण होऊ द्यायला नको.), त्यांना सरकारने पर्यायी उपजिवीका उपलब्ध करून द्यावी किंवा लाडक्या बहिणींसारखे अक्षरशः दरमहा चांगली रक्कम देऊन त्यांना सावरून धरावे.बस करा रे आता हा माजोरेपणा, निसर्गात ढवळाढवळ करून आनंद घेण्याचा पुण्य कमावण्याचा मूर्खपणा. Enough is really enough.
- "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" या श्रीतुकोबांच्या उक्तीशी आणि"सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला" या संत गाडगेबाबांच्या उक्तीशी प्रामाणिक असलेला सर्व संतांच्या पायीचा एक यःकश्चित कण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
गोनिदा नी भ्रमण गाथा लिहून मय्याच्या आजूबाजूच्या परिस्थिती चे आणि त्यांच्या स्वतच्या विचारांचे वर्णन केले.
ReplyDeleteआता मात्र तिन्ही ठाव कसा पुःखा मारला याचीच वर्णन येतात. वरती अमुक बाबा दारा बाहेर न पडता कसे अनेक लोकांना खाऊ पिऊ घालतात अश्या अद्भुत कथा.
परिक्रमा हा पिकनिक असल्या प्रमाणे वर्तन आहे.
खऱ्या साधकांनी परिक्रमा करावी. देव दर्शन वाल्यांनी वाहन वापरावी, हॉटेल चालू द्यावी.
नर्मदा वासियांना ताप देऊ नये आणि निसर्गाचे नुकसान करू नये. मेय्या तुच ह्या हौशे गवशे यांना सद्बुद्धी देऊ शकतेस
अगदी योग्य सूचना.
ReplyDelete