Sunday, May 17, 2026

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग: एका शोचनीय परिस्थितीचा ए्कूणच आढावा

१६/५/२०२६


चला, नागपूर ते मडगाव धावणारी हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडी आजपासून नियमित झाली. 


इतकी वर्षे ही गाडी (11039 / 11040) हॉलिडे स्पेशल च्या नावाखाली प्रवाशांकडून तिकीटांसाठी जादा अधिभार घेऊन चालवल्या जात होती.  ही गाडी आता नियमित रेल्वेगाडी (11203 / 11204)  झाल्यामुळे प्रवाशांची ही लूट थांबेल.


ही गाडी आल्यापासून आपल्या लेटलतिफीसाठी आणि कूर्मगतीने चालण्यासाठी (इथे "धावणे" हा शब्दप्रयोग सुध्दा मला करवत नाही.) एकेकाळी आमच्या "महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळणारी दूषणे हल्ली या गाडीकडे निर्देशित झाली आहेत. ही गाडी दोन्हीहीकडे कायम किमान ३ तास उशीरा पोहोचते. बरे, या गाडीची नागपूर आणि गोव्यालाही  पोहोचण्याची वेळ संध्याकाळची पण कायमच्या लेटलतिफीमुळे ही गाडी कायम मध्यरात्री  सिनेमाचे सेकंड शो सुटण्याच्या वेळेत पोहोचते.


आमच्या तरूणपणी सेकंड शो पाहून सायकलने परतताना आम्ही कायम आपल्या शर्टच्या खिशात त्या थिएटरच्या  डोअरकीपरने फाडून  हातात दिलेले अर्धे तिकीट आहे की नाही ? हे वारंवार चाचपून बघत असू. न जाणो परतीच्या प्रवासात वाटेत रात्री गस्तीवरच्या पोलिसांनी पकडलेच तर आपले निरपराधित्व सिध्द करायला ते तिकीट उपयोगी पडायचे याची आठवण झाली.

तसेच भारतीय रेल्वेने या गाडीच्या तिकीटावर "अपने गंतव्य स्थानपर पहुचने के बाद रातमे आप आगे की यात्रा करना चाहते है तो यह तिकीट संभालकर रखिये. यह आपकी बेगुनाही का सबूत साबीत हो सकता है." असे आवर्जून लिहावे. नागपूर आणि विदर्भातून गोव्याला जाणारी मंडळी या गाडीच्या अशा अपरात्री पोहोचण्याने ती रात्र करमाळी किंवा मडगाव स्टेशनवरच काढतात आणि गोवा ट्रीपच्या पहिल्याच घासाला खडा चावून घेतात.


या गाडीचे वेळापत्रक बनविणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याने त्याच्या तरूणपणी  छकडा, रेंगी, बैलबंडी याशिवाय इतर साधनांनी प्रवासच केला नसावा अशी घनदाट शंका मला आहे. या गाडीच्या वेळापत्रकात रेल्वेच्या भाषेत भरपूर "स्लॅक टाईम" दिलेला आहे. तो वेळ वजा केला तर ही गाडी नागपूर ते मडगाव हा आपला प्रवास १९ तासात पूर्ण करू शकते. नागपूर ते कल्याण ११ तास आणि कल्याण ते मडगाव ८ तास. फक्त मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या गाडीला चांगली वागणूक देण्याचे मनावर घेतले पाहिजे.

कुठलीही नवी गाडी सुरू करताना त्या गाडीला नवे एंजिन  नवे डबे द्यायला हवे हा नियम नसला तरी एक संकेत आहे. पण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात हा संकेत कधीही पाळला जात नाही. विदर्भ एक्सप्रेस पहिल्यांदा सुरू झाली तेव्हाचा ब्लॉग इथे. त्यानंतर १९९१ मध्ये सुरू झालेल्या गोंडवाना एक्सप्रेस, त्यानंतरची नागपूर - पुणे एक्सप्रेस यांनाही तशीच वागणूक मिळाली होती.

 

आज या गाडीला WAP 7 या एंजिनासारखे जरा बरे असलेले मिळाले असले तरी ते एंजिन या गाडीला संपूर्ण मडगावपर्यंत मिळाले असेल की नाही? याबद्दल मी साशंक आहे. फारफार तर  भुसावळपर्यंत हे एंजिन जोडून नंतर तिथून या गाडीला हिचे नेहमीचे WAG 9, ज्या एंजिनाची महत्तम वेगक्षमता १०० किमीप्रतितास इतकीच आहे, मिळाले असण्याची शक्यता जास्त आहे. "अहो काय करायचेय या आरामात जाणार्‍या गाडीला वेगवान एंजिने देऊन ?"  ही टिपीकल मध्य रेल्वेची मनोवृत्ती.

पण आजच्या उदघाटन प्रसंगी गडकरी साहेबांसारखा राष्ट्रीय पातळीवरचा केंद्रीय मंत्री उपस्थित असतानाही मध्य रेल्वेने आपला कद्रूपणा दाखवलाच. नेहेमीचेच जुनाट डबे या गाडीला दिलेत. कदाचित आजच्या उदघाटन प्रसंगासाठी हे डबे बर्‍याच कालावधीनंतर धुतले असतील, एव्हढेच.


बाय द वे. आता ही गाडी नियमित गाडी म्हणून सुरू झालीय. नागपूरच्या रेल्वे प्रवासी मंडळातल्या बहुतांशी अमराठी मंडळींनी ही गाडी नैनपूर - छिंदवाडा मार्गे किंवा गोंदिया - बालाघाट मार्गे जबलपूरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटा बघू. नवीन गाडी सुरू झाली रे झाली की तिच्या देखभालीचा, वेळोवेळी रंगरंगोटी करण्याचा किती नसता त्रास आपल्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातल्या कर्मचार्‍यांना होत असतो हे तुम्हाला कळायला हवे. बिचारे दुरंतो आणि सेवाग्राम एक्सप्रेसचे रेक्स मेण्टेन करताकरताच किती मेटाकुटीला येतात! त्यात आता पुणे वंदे भारतची नवी भर पडलीय.


आणखी एक दुःखद निरीक्षण. देशभरात नवीन मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करताना सर्वत्र त्यांना नवाकोरा रेक मिळालाय. अपवाद फक्त नागपूर - पुणे वंदे भारतचा. या गाडीच्या उदघाटनाला सुध्दा हिला वर्षभर जुना असलेला दुसर्‍या कुठल्यातरी मार्गावरच्या वंदे भारतचा रेक दिला गेलेला होता. फुलांच्या माळांनी झाकला तरी रेकवरचे नंबर्स सगळी हकीकत सांगून जातात ना हो. असो. म. रे. चा आणि त्यातल्या त्यात तिच्या नागपूर विभागाचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच.


- स्वतः रेल्वेमंत्री झाल्यानंतर ताबडतोब भुसावळ, नांदेड, नागपूर मध्य, नागपूर दपूम आणि इटारसी हे विभाग एकत्र जोडून नागपूरला "मध्यवर्ती मध्य" (C. C. "Centrally Central")  हा नवीन विभागच तयार करण्याची जबर मनिषा मनात बाळगून तसे मांडे खाणारा (इतकी वर्षे नुसते असे मांडे खाऊनच पोट भरलय राव) एक सामान्य रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment