त्या डालगोना काॅफी मुळे आठवले.
साधारण ४ वर्षांपूर्वी शिरपूर मुक्कामी, एका संध्याकाळी, हा तिबेटियन थंपून चा प्रयोग करून बघितला होता. खूप सुंदर चवीचा हा पदार्थ बनला होता.
साधी गोष्ट. आपल्या आईने केलेली चविष्ट वरणफळे, वरणात न उकळता, चिनी साॅसमध्ये (रेड चिली, ग्रीन चिली, सोया आणि व्हिनेगर) उकळलीत की झाले थंपून तयार.
मला प्रकर्षाने वाटत, बर का, की रागांच्या जशा वेळा असतात तशा पदार्थ खाण्याच्याही वेळा असतात.
ही वरणफळे दुपारच्या जेवणात चालत नाहीत असे थोडीच आहे ? भैरवी दुपारी ऐकली तर कान थोडेच फाटणार आहेत. पण जसा भैरवीचा मजा उत्तर रात्रीनंतरच्या फिकुटल्या पहाटेत, तशीच वरणफळांची मजा पावसाळी संध्याकाळीच.
बाकी वरणफळे ( ही खावीत ती आपापल्या आयांच्या हातचीच) पावसाळ्यात सरत्या संध्याकाळी किंवा चढत्या रात्री (८ ते ९ च्या मध्ये) च खावीत. बाहेर पावसाने सूर धरलेला असावा. वातावरणात सुखद गारवा नुकताच आलेला असावा आणि ताटातल्या वाफाळत्या वरणफळाचा घास तोंडात जावा. वा !.
अशावेळी साक्षात परमात्मा जरी प्रसन्न होऊन समोर उभा ठाकला आणि "वत्सा, तुला त्रिभुवन घेऊन टाक. मला ही वरणफळे दे." असे म्हणाला तरी "गोपालकाल्याप्रमाणेच वरणफळे हा सुध्दा मनुष्यमात्रांचाच विशेषाधिकार आहे. देवमंडळींनी ती खायला मनुष्यावतारात प्रकट व्हावे." असे त्याला ठणकावून सांगण्याची हिंमत वरणफळेच देऊ शकतील.
- आपला श्रीकृष्णभक्त, पण श्रीरामानुयायी अध्यात्मिक शेफ रामचंद्र तिबेटी फ्यूजने.
No comments:
Post a Comment