ऍलेक्स हॅलीच्या "द रूटस" वरून प्रेरणा घेऊन.
१९ व्या शतकाच्या अखेरीचे, विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातले, एक जमिनदार घराणे.
आईवेगळे दोन भाऊ. वडीलांच्या करड्या शिस्तीत वाढलेले. कालौघात जमिनदारी जाऊन हातावर पोट असण्याची परिस्थिती.
थोरल्याचे लग्न झाले. थोरल्याच्या प्रेमळ पत्नीने धाकट्या भावाला अगदी आईची माया लावलेली. मातृसुखाला बालपणीच आचवलेला धाकटाही आपल्या मातृस्थानी तिला मानणारा. भावाभावांमध्ये अलोट प्रेम पण दीर वहिनीत आई मुलाच्या नात्याचा अपार जिव्हाळा.
माझे आजोबा श्री राजाभाऊ किन्हीकर आणि आजी सौ. रमाबाई किन्हीकर यांच्या मांडीवर तिनही मोठी नातवंडे.
कालांतराने धाकट्याचेही लग्न झाले. संसार वाढला. थोरल्याने नशिब काढायला म्हणून कुटुंबासह नागपूरचा रस्ता धरला.
नागपुरात आल्यानंतर संकटांनी थोरल्याची पाठ सोडली नाही. पण विनोदाचे अभेद्य कवच आणि अफाट लोकसंग्रह याच्या जोरावर थोरल्याने संसार रेटला. धाकट्याचाही संसार सर्वसामान्य माणसांसारखाच ओढग्रस्तीचाच चालू होता.
दोघांचीही वंशवेल बहरली. मुला मुलींची लग्ने झालीत. मुले कमावती व्हायला लागलीत. सुखाचे दिवस उंबरठ्यावर दिसायला लागलेत.
अचानक नागपूरवरून धाकट्याला बातमी गेली की वहिनी (तत्कालिन) असाध्य रोगाने आजारी आहे. भेटायला येऊन जा.
धाकटा आणि त्याच्या पत्नीने लगोलग नागपूरचा रस्ता धरलेला. आयुष्यभर खस्ता खाऊन सुखाच्या दिवसांच्या पहाटेला जर्जर झालेली स्वतःची प्रेमळ वहिनी मृत्यूशय्येवर पाहिली आणि धाकट्याचा बांध फुटला. दोघेही भाऊ प्रतिभाशाली नट, नकलाकार, कीर्तनकार, कवी.
माझे पितामह
धाकट्याने खरेतर आपल्या कुलदेवता, रेणुकादेवीसाठी, केलेली रचना (बोलाविले मला तू, मी दर्शनासी आलो..) आपल्या वहिनीसाठी तिच्या शय्येजवळ बसून म्हटली. वहिनी आणि तिचा हा पुत्रवत दीरच नव्हे तर त्या मैफिलीत तिथे असलेले आबालवृध्द अक्षरशः ओक्साबोक्सी रडले. त्या रचनेचा भाव आणि दीर वहिनीचे प्रेम पाहून.
मी स्वतः या प्रसंगाचा साक्षीदार आहे. वय वर्षे ४. या अजाणत्या वयात त्या मैफिलीत माझ्याही डोळ्यात अमाप पाणी तरळल्याचे आज ४४ वर्षांनी स्पष्ट आठवते. नव्हे, त्या प्रसंगाच्या आठवणीने आजही पाणी तरळते.
लगेच काही दिवसात ती प्रेमळ वहिनी म्हणजे माझ्या वडिलांची आई, सौ. रमाबाई जयराम किन्हीकर देवाघरी गेली. पुढल्या १० वर्षात धाकटा भाऊ, कै. श्री बाळकृष्ण श्रीधर किन्हीकर यानेही जगाचा निरोप घेतला. ६ वर्षांनंतर थोरला भाऊ कै. श्री जयराम श्रीधर किन्हीकर यानेही जगाचा निरोप घेतला.
No comments:
Post a Comment