ublic
आपल्या उपनिषदांनी, पुराणांनी आपल्याला दिलेली उपासना हे प्रत्यक्ष आत्मनिवेदन भक्तीचे रूप आहे.श्रीगणपत्यथर्वशीर्ष म्हणताना "त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि..." म्हणताना बाप्पा प्रत्यक्ष समोर बसलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय, त्याची स्तुती करून त्याला खूष करतोय ही भावना यायलाच हवी.उगाच अंघोळ करताना,पूजा करून "टाकताना", इकडेतिकडे खाणाखुणा करीत, अथर्वशीर्ष म्हणणे हा संवाद म्हणजे पुढे बाप्पा बसलाय आणि त्याचे अस्तित्व अमान्य करून आपण आपल्याच व्यापात गुंतलोय अशी अवस्था आहे. तरी तो बिचारा अकारण करूणामयी असल्याने आपले हे अपमानास्पद वागणे मनावर घेत नाही आणि कृपाच करतो हे त्याचे देवत्व.बाकी अंघोळ करताना अथर्वशीर्ष म्हणून एक कार्यक्रम "उरकून घेणारी" मंडळी स्वतःला गणपतीचा अवतार समजतात की काय ? अशी मला कायम शंका येते. स्वतःवर अभिषेक करत असताना स्वतःच अथर्वशीर्ष म्हटल्यासारखं.तशीच भावना देवी कवच वाचताना आणि अर्गला स्तोत्र म्हणताना यायला व्हायला हवी.किन्हीकरांची कुलदेवता म्हणजे श्रीक्षेत्र माहूरची रेणुकादेवी. मातृरूप असलेली अत्यंत प्रेमळ मूर्ती. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधे केवळ रेणुकेनेच कुठलेही शस्त्र धारण केलेले नाही. त्यामुळे या अवतारासमोर देवीकवच म्हणताना "आपण अगदी शाळकरी मूल आहोत. रेणुका माय आपल्याला शाळेत जायला तयार करून देतेय आणि आपल्या संरक्षणासाठी प्रेमाने, खूप मायेने आपल्या सर्वांगावर एकेक आयुध चढवून, प्रतिकारशक्ती वाढेल असे खाऊपिऊ घालून जगाच्या शाळेत पाठवतेय" अशीच भावना होते.आणि अर्गला स्तोत्र म्हणताना तर मला "नाळ" मधला चैत्या झाल्यासारखेच वाटत असते. "आई, मी तुझ सगळ काम केल न वं, अभ्यास केला न वं, आता त मले खेळाले जाऊ दे." म्हणत तो आईशी जी लाडीगोडी करतो अगदी तशीच आईची विविध प्रकारे स्तुती करून"रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि." हे मागणे मागताना मनाची अवस्था होते.आईला तिचे स्वतःचे सामर्थ्य माहिती आहेच आणि मूल लाडाई गोडाई करून आपले मागणे मागतेय हे ही तिला ठाऊक आहे. मुलांचे संपूर्ण हित डोळ्यांसमोर ठेऊन ती योग्य तेच करेल हा विश्वास मात्र पाहिजे.पौराणिक आणि उपनिषदोक्त स्तोत्रे ही भावपूर्ण आहेत. त्याच भावात ती म्हटलीत तर परमेश्वराशी वेगळेच नाते पटकन जोडल्या जाईल, नाही का ?- "देव भावाचा भुकेला" या संतवचनावर अतिशय दृढ श्रध्दा असलेला रेणुकासुत राम.
No comments:
Post a Comment