Thursday, June 11, 2020

एका फोटोची कथा.

जून २०१६. शिरपूर मुक्कामी असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला आलेलो होतो. परतताना कुलेदेवतेचे दर्शन घ्यावे म्हणून १०/०६/२०१६ ला श्रीक्षेत्र माहूरला गेलो. संध्याकाळी पोहोचलो. श्रीक्षेत्र माहूरला मुक्कामी राह्यलोत.
११/०६/२०१६ : सकाळी ६.०० वाजता मंदीर उघडताच प्रसन्न दर्शन घेतले आणि प्रार्थना करून परतलो. दिवसभर गाडी चालवून संध्याकाळच्या सुमारास शिरपूर गाठायचे होते. जवळपास ६०० किमी प्रवास होणार म्हणून श्रीक्षेत्र माहूरवरून ७.००, ७.१५ लाच प्रस्थान ठेवले.
माहूर - पुसद - वाशिम - मालेगाव (जहांगिर) - पातूर - बाळापूर - खामगाव - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ - जळगाव - एरंडोल - पारोळा -धुळे - शिरपूर असा प्रवास होता.
माहूर ते पुसद हा प्रवास नेहेमीप्रमाणेच छान पार पडला. ग्रामीण भागातला रस्ता असला तरी रस्ता छान आणि रमणीय होता. दोन्ही बाजूंनी वृक्षांची कमान असली की रस्ता खूप छान वाटतो. ती ड्रायव्हिंगची मजा अगदी १२० -१३० च्या वेगाने जाता येणा-या एक्सप्रेस वे ला सुद्धा येत नाही हा माझा अनुभव.
पुसद शहरात प्रवेश करून लगेच शहरात जाणारा रस्ता डावलून वाशिम कडे जायला निघालो. पुसद - यवतमाळ - वाशिम तिठ्यावरून वाशिम कडे जायला डावीकडे वळतोय ना वळतोय तोच हे धूड समोरून वेगात आले आणि गाडी जराही डावीकडे घेण्याची तसदी न घेता रस्त्याच्या मधोमध उभे ठाकले.



आमचा वेग नुकत्याच घेतलेल्या वळणामुळे ५ ते १० पर्यंत असेल. आम्ही गाडी थांबवली. जळजळीत कटाक्षांची देवाण घेवाण झाली. मग आम्ही थोडी रिव्हर्स घेऊन गाडी बाजूने काढत आमचा लांब पल्ला गाठायला निघालो. समोरची यश्टी आपला प्रवास संपवायला पुसद शहराकडे निघाली.
आज जुने फोटो चाळताना हा फ़ोटो अचानकच सापडला आणि प्रसंग ताजा झाला.
अकोला जलद पुसद
मार्गे : पातूर - मालेगाव (जहांगिर) - वाशिम.
MH -40 / N 9794.
अ. वाशिम आगार. (वाशिम आगार, अकोला विभाग. एस टी च्या दृष्टीने वाशिम जिल्हा असला तरी वेगळा विभाग नाही. अजूनही अकोला विभागातच आहे. १९८३ मध्ये गडचिरोली जिल्हा वेगळा होऊनही आत्ता आत्ता पर्यंत एस. टी . च्या दृष्टीने चंद्रपूर विभागच होता. चं. गडचिरोली असेच आगार होते. आत्ता तीन वर्षांपासून गड. गडचिरोली झाले आहे. आता वा. वाशिम, वा. कारंजा, वा. मंगरूळपीर कधी होतेय ? ते बघायचे.)
२ बाय २ आसन व्यवस्था. एकून ४३ आसने + १ वाहकाचे आसन.
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली अशोक लेलॅंड बस. चित्ता मॉडेल.
या सिरीजमध्ये काही लेलॅण्ड गाड्या नागपूर कार्यशाळेने बांधल्यात आणि कोकण किंवा मराठवाडा या लेलॅण्ड प्रभुत्व क्षेत्रांना न देता विदर्भातच अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना दिल्यात. विदर्भातल्या चालकांना या लेलॅण्ड गाड्या पळवायला, चालवायला आवडल्या असाव्यात. कारण इतक्या वर्षांनंतरही त्या गाड्या विदर्भातच राहिल्यात.
दि. ११/०६/२०१६ सकाळी ०९.३८ वाजता.
स्थळ : पुसद
एक फोटो म्हणजे एक फ़ोटोच असतो का ? कितीतरी आठवणी त्याच्याशी निगडीत असतात.

No comments:

Post a Comment