Friday, June 5, 2020

खगोलशास्त्रीय अध्यात्मिक प्रश्न.


या वर्षी २२ मे रोजी शनि महाराजांची जयंती झाली. बरोबर ७ दिवसांनी जेष्ठ शुध्द सप्तमीला शनी महाराजांची धाकटी बहीण तापी जयंती असते.
कान्ह देशाला (उच्चारी खान्देश) समृध्द करणार्या या तापी माईच्या तीरावर आम्ही दोन वर्षे आनंदाने घालवलीत. शिरपूरला आमचे निवासस्थान तापी माईच्या तीरावरून अक्षरशः ४०० मीटर. आणि सतत वाहणार्या तापीमाईचे दर्शन आमच्या निवासस्थानातून आम्हाला निरंतर होत राही.
आपली ग्रहमाला सूर्यापासून तयार झाली आहे. सूर्यापासून एकेक ग्रह वायुरूपाने दूर होत गेला आणि स्वतःभोवतीच्या परिवलनामुळे ग्रहगोल आकार घेत गेलेत.
शनि ग्रहाचा हा वायुरूप भाग पृथ्वीच्या अगदी जवळून पृथ्वीच्या पश्चिमेला जाताना सातपुडा पर्वत परिसरात उलथापालथ झाली असावी आणि तापी नदीचा जन्म झाला असावा. म्हणून तापी माँ ला शनी महाराजांच्या धाकट्या बहिणीचा मान मिळाला असावा असा माझा कयास आहे. जाणकारांनी खुलासा करावा.
कारण तापी माईचे उगमस्थान मूळतापी (उच्चारीः मूलताई) इथून तापी नदी पूर्वेकडे वाहत जाऊन वैनगंगेसारखी विदर्भात गोदावरीला मिळणे भौगोलिकदृष्ट्या सहज शक्य होते. पण तापीमैय्या आणि नर्मदामैय्या या दोन्ही पश्चिमवाहिनी मैय्यांच्या कृपेने कच्छचे वाळवंट गुजरातच्या पश्चिमेपर्यंतच मर्यादित राहिले. अन्यथा महाराष्ट्रात वायव्येकडून पार विदर्भापर्यंत हे वाळवंट भिडले असते.
म्हणून कान्ह देशात तापी नदीला "मैय्या" चा मान आहे. पिल्लांच्या भरणपोषणाची काळजी घेणारी ती एक आईच.
या सर्व उलथापालथीला कारणीभूत आपल्या शनी महाराजांचा जन्म.
आणखी एक शंका.
बहुतांशी नद्यांचा जन्मदिवस हा सप्तमीच का ? गंगा मैय्या, तापी मैय्या, नर्मदा माई सगळ्या सप्तमीच्याच. यमुनामाई मात्र षष्ठीची.
गोदामैय्याची जन्मतिथी काय ?
- अध्यात्मिक खगोलशास्त्राचा डोळस आधुनिक अभ्यासक रामशास्त्री.


ता.क. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरला तापीमैय्याच्या अगदी तीरावर "तापी माँ" म्हणून अगदी टपरीवजा कळकट्ट ढाबा आहे. इथले गरमागरम आलू पराठे "World's Best" या श्रेणीतले आहेत हे मी स्वानुभवातून सांगू शकतो.

No comments:

Post a Comment