Sunday, June 7, 2020

देवाने काय म्हणून कृपा करावी आमच्यावर ?

असा विचार करा की तुम्ही उच्चपदस्थ आहात. (आपल्यापैकी बरीच मंडळी असतीलही.) तुमच्या हाताखालील कर्मचार्यांचे भले आणि बुरेही करण्याचे अधिकार तुमच्याजवळ आहेत.
अशावेळी तुमच्या अधीनस्थ मंडळी तुमच्याशी खूप प्रेमाने वागताहेत. रोज तुमची स्तुती करताहेत. तुम्हाला दर दिवसाआड कुणी ना कुणीतरी पार्टी देतायत. सगळा आनंदी आनंद.
पण तुमच्या लक्षात येतेय की ही सर्व मंडळी त्यांचे केवळ भलेच व्हावे या स्वार्थी हेतूने तुमची तारीफ करताहेत, तुमच्याशी प्रेमाने वागण्याचे केवळ नाटक करताहेत. खरे पाहिले तर तुमच्या सुखदुःखात त्यांना काडीचाही रस नाही. सब स्वारथ का व्यवहार. त्या सगळ्या लोकांशी वागताना आता तुम्हाला कसे वाटेल ?
आता स्वतःच्या जागी देवाला कल्पून पहा आणि तुमच्या अधीनस्थ लोकांच्या जागी स्वतःला. आपल्या स्वतःचेच भले व्हावे म्हणून रोज मारे अभिषेक, आवर्तने करणार्या आणि नैवेद्यांची पार्टी देणार्या पण देवाविषयी काहीच आंतरिक आस्था नसणार्यांचे हट्ट देवाने का म्हणून पुरवावे ?
"न मिळो खावया
न वाढो संतान.
परी हा नारायण
कृपा करो."
ही श्रीतुकोबांची वृत्ती गाठणे तर आपल्या सारख्या प्रापंचिकांना अशक्यच आहे. पण त्या भगवंतावर दररोज एक क्षण का होईना, पण निःस्वार्थी, निष्कारण प्रेम करण्याचा संकल्प करूयात का आपण ?
- प्रापंचिक राम किन्हीकर.


No comments:

Post a Comment