Wednesday, June 10, 2020

१० रूपयाची थाळी.

(हा लेख अजिबात राजकीय नाही. सध्याच्या १० रूपयांच्या थाळीशी याचा संबंध नाही.)
कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाची कथा. १६५ रूपये वर्षभराची फ़ी आणि हॉस्टेलचे ६० रूपये वर्षभराचे असा एकूण सुटसुटीत मामला होता. अर्थात तेव्हा कौटुंबिक उत्पन्न पण कमी होते. मला आठवते मी १९८९ मध्ये कराडला शिकायला गेलो तेव्हा माझ्या दादांचा (वडील) पगार महिन्याला १५०० रूपये होता. माझ्या मावशीचे यजमान शासनात कार्यकारी अभियंता होते, त्यांचा पगार ५००० रूपये महिना होता. ५००० रूपये महिना म्हणजे डोक्यावरून पाणी वाटण्याचा तो काळ. पेट्रोल ९ रूपये ६० पैसे लीटर असायचे. लुनामध्ये सिंगल ऑइल टाकून १० रूपयांचे बिल व्हायचे.
कराडला आम्हा सगळ्या हॉस्टेलर्स साठी कॉलेजने कॅम्पसमध्येच मेसची व्यवस्था केली होती. सहकारी तत्वावर ही मेस चालायची. जागा, भांडी कुंडी, आवश्यक तेव्हढे फ़र्निचर कॉलेजने दिलेले होते. पण संचालनाची व्यवस्था बघायला मुलांची टीम असायची. प्रत्येक वर्षाचे दोन ऑडिटर्स आणि प्रत्येक महिन्याला बदलणारे दोन सेक्रेटरी. दररोज सकाळी सेक्रेटरीने मेसमधे जाऊन रोजची भाजी, इतर मेन्यु याबाबत आचा-याला सूचना द्यायच्या. सेक्रेटरीने एकंदर किती मुले जेवलीत, किती मुलांचा खाडा होता यावर लक्ष ठेवायचे. क्वचितप्रसंगी कराड गावात जाऊन काहीतरी गोडधोड, खारा माल आणून मेसमधे चेंज किंवा सणावारी फ़ीस्ट चे आयोजन करायचे. दररोज भाजी घेऊन गावातून टेम्पो यायचा तसाच पंधरवाड्याला किराणा घेऊन टेम्पो यायचा. त्याकडेही सेक्रेटरीला लक्ष द्यावे लागे.
महिनाअखेरीचा एकूण खर्च भागिले महिन्याभरातल्या एकूण जेवलेल्या ताटांची संख्या असा हिशेब करून प्रत्येकाने जेवलेल्या ताटांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे मेसबिल बोर्डावर लावले की सेक्रेटरीची जबाबदारी संपायची. मग ते मेसबिल कॉलेजमधे असलेल्या बॅंकेत असलेल्या मेसच्या खात्यात भरावे लागे. सेक्रेटरी आणि ऑडिटर व्हायला मिळणे हा मोठाच मान होता. कुठल्याही अधिकृत शिक्षणापेक्षा प्रभावी पद्धतीने व्यवस्थापनशास्त्राचे धडे देणारे विद्यापीठ म्हणजे ती मेस आणि तिचा कारभार होता.
पण ही मेस सहकारी तत्वावर चालणारी असल्याने पुरेशी विद्यार्थी संख्या असल्याशिवाय सुरू करणे परवडत नसे. दोनवेळचे पोटभर आणि औरस चौरस जेवणाचे त्याकाळी महिन्याचे मेसचे बिल १३० ते १४० रूपयांपर्यंत येत असे. अगदी १५० च्या वर मेसबिल गेले तर आरडाओरडा व्हायचा.
महाविद्यालयात विषम सत्रांसाठी २ जुलै आणि सम सत्रांसाठी २ जानेवारीला प्रवेश घ्यावा लागे. आम्ही नागपूरकर मंडळी या तारखांना जायचोत पण पुणेकर, सोलापूरकर, कोल्हापूरकर, सांगलीकर मंडळी या तारखांना प्रवेश घेऊन त्याचदिवशी पुन्हा आपापल्या घरी पळ काढत असत. आम्हाला पुन्हा २५ तासांचा प्रवास करून घरी परत येणे आणि पुन्हा दोन आठवड्यांनी जाणे परवडत नसे. आम्ही तिथेच थांबायचो. पण त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थीसंख्या पहिल्या दोन तीन आठवड्यात अगदी नगण्य असे. आणि मेस सुरू करण्याएव्हढी संख्या नसल्यामुळे मेस सुरू होत नसे.
१९८९ ते १९९३ काळात आमचे कॉलेज गावाच्या अगदी एका टोकाला होते. कॉलेजनंतर उसाची शेते आणि गु-हाळेच. ब-याचदा आम्ही सुटीच्या दिवशी कृष्णानदीकाठच्या त्या गु-हाळांमध्ये जाऊन भरपूर उसाचा रस प्यायलोयत. ताजा ताजा बनलेला पेढ्यांसारखा गूळही खाल्लाय. बाटल्या भरभरून काकवीही आपापल्या हॉस्टेलच्या खोल्यांवर आणून ठेवलीत. कधीमधी मेसमध्ये एखादी नावडती भाजी जेवणात असेल तर पोळीसोबत काकवी खायला खूप मज्जा यायची.
मेस सुरू नसली की आम्हाला कराड शहरात जाऊन जेवावे लागे. बरे तेव्हढ्यासाठी बस पकडून गावात जा, जेवा आणि परता ही प्रक्रिया (सकाळी, संध्याका्ळी) दोनवेळा करायचा कंटाळाही यायचा आणि परवडायचेही नाही. १६५ रूपयात प्रवेश घेतलेले आम्ही सगळेच विद्यार्थी आपापल्या विद्यापीठ क्षेत्रातले गुणवंत विद्यार्थी होतो आणि सगळ्यांचीच परिस्थिती मध्यमवर्गीयच. उधळ माधळ करणे ही त्या जमान्यात कुणाचीच प्रवृत्ती नव्हती. आहे त्यात भागवणे हाच सगळ्यांचा स्वभाव. सगळ्यांच्या घरून एम. टी. (मेल ट्रान्सफ़र) ने बॅंकेत पैसे यायचेत. घरून पाठवलेत की आठ दिवसांनी बॅंकेतल्या आमच्या खात्यात जमा होणारे. भविष्यात कधीकाळी एका क्लिक सरशी पैसे ताबडतोब इकडून तिकडे जमा होतील हे स्वप्नसुद्धा आमच्यापैकी कुणी तेव्हा पाहिले नव्हते. सर्वांच्याच घरून दर महिन्याला ३५० ते ४५० रूपये यायचेत आणि ते पैसे पुरेसे होते.
दोनवेळा जेवण्यासाठी गाव गाठायला नको म्हणून आमच्यापैकी बहुतेक जणांनी एक युक्ती काढली होती. कराडमध्ये आल्याआल्या पहिल्याच दिवशी, संध्याकाळी गावात जेवायला गेल्यावर, दोघे किंवा तिघे रूम पार्टनर्स कॉन्ट्री (contribution) काढून एखादी ३० - ३५ रूपयांची जॅमची बाटली घेऊन येत असत. मग रोज सकाळी
४० पैसे चहा,
६० पैसे क्रीमरोल
आणि जेवणासाठी २ मोठे पाव (प्रत्येकी ५० पैसे)
असा खर्च करून पाव + जॅम असे आमचे सकाळचे जेवण दररोज २ रूपयांत व्हायचे. त्याकाळी आम्ही सगळेच सिंगल हड्डी (वजन गट ४० ते ५० किलो) असल्याने २ पाव आणि जॅम आम्हाला भरपूर होत असे. ती जॅमची बाटलीही आम्हाला महिनाभर पुरत असे.


संधाकाळी मात्र महाविद्यालयीन कामकाज आटोपले की आम्ही सगळे गावात चक्कर मारायला निघत असू. बसने निघून गावात पोहोचणे, चावडी चौक मार्गे कृष्णा - कोयना प्रितीसंगमावर जाणे. तिथल्या घाटावर उगाच बसणे आणि रात्री ८ वाजता उठून कराड बसस्टॅण्ड जवळ असलेल्या "अलंकार" डायनिंग हॉल मध्ये जाणे हा नित्यक्रम होता. याला एकमेव कारण म्हणजे अलंकार मध्ये मिळणारी १० रूपयांची अनलिमिटेड थाळी. आमच्यातले सगळे भोजनभाऊ त्यावर आडवा हात मारीत असत. रात्रीचे आणि थोडे उद्या सकाळचे्ही जेवण उदरात साठवून तृप्त मनाने आणि भरलेल्या पोटाने आम्ही अलंकारचा निरोप घेत असू. त्यात घडीच्या पोळ्या, दोन भाज्या (त्यात एखादी उसळ आणि एखादी कोरडी भाजी), वरण, भात आणि "अलंकार स्पेशल" असलेली कांदा, टोमॅटो ची दह्यातली कोशिंबीर असा अनलिमिटेड मेन्यु असे. ही कोशिंबीर इतकी खुमासदार असायची की बरीच मंडळी पोळ्यांसोबत कोशिंबीरीचाच फ़डशा पाडायची. हॉटेलमधली वेटर मंडळी किंवा मालकही उदार असावीत कारण या कार्यक्रमात कुणालाच खाण्याविषयी रोकटोक नसायची.
दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यातले दोन तीन आठवडे संध्याकाळी ही १० रूपयांना मिळणारी थाळी आम्हा विद्यार्थ्यांचे त्या त्या महिन्याचे बजेट कोलमडू देत नसे. आत्ता जवळपास ३० वर्षांनी १० रूपयात मिळणा-या शिवथाळीची घोषणा ऐकली आणि आम्हाला त्याकाळी मोठाच आधार असलेल्या १० रूपयांच्या अलंकार थाळीची आठवण आली.


No comments:

Post a Comment