Friday, June 19, 2020

पॅसेंजर गाड्या कथा आणि व्यथा.

भारतीय रेल्वेवर धावणा-या पॅसेंजर दर्जाच्या ज्या गाड्या २०० किंवा त्यापेक्षा अधिक अंतर कापतात, त्यांना एक्सप्रेस दर्जाच्या गाड्यांमधे बदलण्याविषयीचे भारतीय रेल्वेचे परिपत्रक आमच्या कायप्पा समूहावर वाचले आणि मन आनंदित झाले. ही सूचना मी ३१ मे २०१२ रोजी लिहीलेल्या ब्लॉगमधे पोटतिडीकेने केलेली होती. (तो ब्लॉग इथे वाचा)
आमच्या कायप्पा समूहावर या सूचनेबाबत नकारात्मक विचारच वाचनात जास्त आलेत. "आता या गाड्यांना (थोडे थांबे कमी करून आणि थोडा वेग वाढवून) एक्सप्रेस मधे बदलतील आणि तिकीटभार एक्सप्रेसचाच द्यावा लागेल. लूट चालवलीय जनतेची" वगैरे वगैरे कॉमेंटस वाचून सखेदाश्चर्य वाटले. स्थितीस्थापकत्व ( Inertia ) हा भारतीय समाजाचा मोठ्ठा सदगुण आणि तेव्हढाच मोठ्ठा दुर्गुण आहे याची पुन्हा प्रचिती आली. कुठल्याही बदलाकडे आपण आधी साशंकतेने का पाहतो ? हा मला पडलेला मोठठा प्रश्न आहे.
खरेतर पॅसेंजर गाडी ही संकल्पना ब्रिटीशांनी एतद्देशीयांकडे बघण्याच्या त्यांच्या खास दृष्टीकोनातून आणलेली आहे. १५० वर्षांपूर्वी "इथल्या रिकामटेकड्या नेटीव्हांना कशाला हव्यात एक्सप्रेस गाड्या ? एक्सप्रेस आणि मेल गाड्या या आम्हा इंग्रज अधिका-यांची जलद वाहतूक आणि या खंडप्राय देशातले आमचे संदेशवहन त्वरेने व्हावे म्हणून आहेत." ही वसाहतवादी मानसिकता या पॅसेंजर गाड्यांच्या नियोजनामागे नसेलच असे नाही. बरे. स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे झाली, आम्ही सगळेच मेल, एक्सप्रेस गाड्या सरावाने वापरायला लागलोत तरीही पॅसेंजर गाड्यांच्या उपयुक्ततेचा कुणालाही पुनर्विचार करावा वाटला नाही हे आमचेच दुर्दैव. तुकोबांच्या इतर कुठल्याही नाही पण "ठेविले अनंते..." वर आम्ही भलताच विश्वास ठेवलाय हो.
गेल्या ५ - ६ वर्षांपासून रेल्वेत पॅसेंजर गाड्यांविषयी थोडा वेगळा विचार व्हायला लागल्याचे जाणवायला लागलेय. १२५ वर्षांपासून सुरू असलेल्या काही काही गाड्या कायमच्या रद्द झाल्यात तर काहींचे उदगम आणि गंतव्य बदललेत. काहींचा मार्ग कमी केला तर काही गाड्यांच्या जागी आधुनिक डीएमयू ( Diesel Electric Multiple Units ), एमइएमयू ( Mainline Electric Multiple Units ) गाड्या आल्यात.
एकेकाळी सर्वसामान्य जनतेला या पॅसेंजर गाड्या उपयुक्त असतीलही पण २०२० मधे नागपूर ते आग्रा हा जवळपास ९०० किमी चा प्रवास २४ तास घेणा-या पॅसेंजर गाडीने एखादा गरीब माणूस करीत असेल ही समजूत चुकीची आहे. नागपूर ते टाटानगर हा ७५० किमीचा अखंड प्रवास पॅसेंजरने करणारे प्रवासी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील. मग उगाच पुराणमतवादी मतांना कवटाळून नागपूर - आग्रा, नागपूर - टाटानगर पॅसेंजर गाड्या सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे ? आणि नेमकी कुणाची सोय आहे ?
एक्सप्रेस गाड्यांच्या व्दितीय वर्गाच्या तिकीटवाढीला गेल्या १७ - १८ वर्षांपासून चाप बसलेला आहे. मग नागपूर ते मुंबई व्दितीय वर्गाचे १७० रूपयांच्या आसपासचे तिकीट घेऊन १५ तासात एखादा गरीब, गरजू मनुष्य मुंबई गाठेल की नागपूर - भुसावळ आणि भुसावळ - मुंबई अशा दोन पॅसेंजर गाड्यांचे १२० रूपयांच्या आसपासचे तिकीट काढून ४० तास प्रवास करणे स्वीकारेल ?
गंमत म्हणजे आत्ता आत्ता पर्यंत ब्रिटीशांनीच केलेले या पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक अस्तित्वात होते. त्यामुळे देशात कुठूनही, कुठेही जायला पॅसेंजर गाड्यांच्या एकाला एक सोयीच्या वेळी होत्या. म्हणजे मुंबईवरून सकाळी मुंबई - भुसावळ पॅसेंजरने निघून संध्याकाळी भुसावळला पोहोचले की तासा दीड तासाच्या अंतराने भुसावळ - नागपूर, आणि भुसावळ - इटारसी या गाड्या मिळू शकायच्यात. इटारसी गाडीने दुस-या दिवशी पहाटेपर्यंत इटारसीला पोहोचलो की लगेच इटारसी - आग्रा पॅसेंजर तयार. त्या गाडीला पुढे आग्रा - दिल्ली पॅसेंजरची जोड असायची. म्हणजे कमी पैशात रेल्वेचा पूर्ण आनंद घेत, मजल दरमजल करीत एतद्देशीयांनी आरामात प्रवास करावा हे कृपाळू ब्रिटीश सरकारचे धोरण होते. प्रत्येक मार्गावर हीच कथा. हैद्राबाद - काझीपेठ, काझीपेठ - वर्धा, वर्धा - भुसावळ, भुसावळ - मुंबई.
एकेकाळी पॅसेंजर गाडी ही छोट्या छोट्या खेडेगावच्या लोकांना जवळच्या शहरांशी रास्त दरात जोडत होती. पण बदललेल्या भौगोलिक आणि अर्थसामजिक ( Socio-Economic ) अवकाशात हा प्रवासाचा परीघही आजकाल आकुंचन होत होत १०० ते १५० किमी अंतरावरच स्थिरावला आहे. या सा-यांचा वापर करून या १०० - १५० किमी परीघावरील कष्टकरी जनता, मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी वेगवान आणि सुविधाजनक अशा डेमू, मेमू गाड्याच उपयुक्त ठरू शकतील. या गाड्यांच्या मर्यादित अंतरावरच्या धावेमुळे त्यांची एखाद्या क्षेत्रात वारंवारता वाढवून अधिकाधिक "नाहीरे" वर्गाची सोय करता येइल हा एक नवा आणि चांगला विचार पुढे येतोय तर त्याला विरोध कशाला ?
उदाहरणच द्यायचे झाले तर नागपूरजवळच्या काटोल आणि नरखेड या दोन छोट्या शहरांचे / गावांचे घेऊयात. आज सकाळी ८.०० वाजता नागपूरवरून काटोल कडे जाणारी नागपूर - इटारसी पॅसेंजर आहे आणि परतताना संध्याकाळी ७.०० च्या आसपासची इटारसी - नागपूर पॅसेंजर. काटोल नागपूर प्रवासासाठी अगदी तशाच वेळा दोन पॅसेंजरच्या आहेत. आता एक्सप्रेसचे तिकीट परवडत नाही म्हणून ज्या मजूराला, विद्यार्थ्याला पॅसेंजरने प्रवास करणे भाग आहे त्याला एखाद्या दिवशी लवकर परतायचा स्वस्त पर्याय आपण जुन्या व्यवस्थेत उपलब्ध करून देतोय का ? म्हणजे या "नाही्रे" वर्गाने कायम हालअपेष्टा सोसाव्यात आणि विनाकारण आपला वेळ दवडावा ही सक्ती आपली ही जुनी व्यवस्था करतेय, हे येतय का लक्षात ? त्याऐवजी जर नागपूर - नरखेड - नागपूर अशी मेमू सुरू झाली तर दिवसाच्या किमान ६ फ़े-या तिला मारता येईल आणि ज्या वर्गासाठी पॅसेंजर गाड्या सुरू ठेवण्याचा कंठशोष चाललाय त्यांना रोजच्या दळणवळणासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील असे माझे प्रामाणिक मत आहे.
मग रेल्वे विभागाने या दृष्टीकोनातूनच १६० वर्षांपासूनच्या आपल्या भूमिकेला छेद देत २०० + किमी अंतरापेक्षा जास्त गाड्यांचे रूपांतर एक्सप्रेस गाड्यांमधे करण्याचा निर्णय घेतला असेल आणि छोट्या अंतरासाठी जर ते डेमू, मेमू गाड्या सुरू करीत असतील तर सर्वजनसुखाय, सर्वजनहितायच ते ठरेल, नाही का ?
- पॅसेंजर ते राजधानी
आणि
जनरल क्लासची बाकडी ते प्रथम श्रेणी वातानुकुलीत केबीन असा सर्वच प्रवास केलेला प्रवासी पक्षी, राम प्रकाश किन्हीकर.
ता. क.: माझ्या कराड ते पुणे ते कोपरगाव या जनरल वर्गाच्या प्रवासाची कथा इथे वाचा.



No comments:

Post a Comment