Tuesday, June 2, 2020

माणदेश

सांगोला वास्तव्यात खूप सुखी आणि आनंदमय जीवन होते. पंढरपूर फक्त २५ किमी. मनात आले की एखाद्या संध्याकाळी पटकन एखादी चक्कर पंढरपूरला टाकता यायची.

आणि गोंदवले ९० किमी. दोन दिवस लागून सुट्ट्या असल्या की एक दिवस प.पू. महाराजांच्या सहवासात घालविण्याची ओढ लागायची. मग काय ?

सकाळी सगळं आवरून निघून गोंदवल्याला जाणे आणि संध्याकाळपर्यंत तृप्त मनाने परतणे हा आनंदाचा गाभा असायचा.

अशाच एका भर उन्हाळी प्रवासातील हे छायाचित्र. साळमुख फाटा ते पिलीव या प्रवासातला हा हिरवागार रस्ता.




माणदेश (सातारा जिल्ह्याच्या आग्नेयेकडील, सांगली जिल्ह्याच्या ईशान्येकडील आणि सोलापूर जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग) हा पूर्वीपासून "कायम दुष्काळी" म्हणून ओळखला जातो. वार्षिक पर्जन्यमान २०० ते ३०० मिमी फक्त. (नागपूर आणि विदर्भात त्याच्या पाचपट वार्षिक पाऊस पडतो. यावरून तिथली भीषणता लक्षात येईल.)

पण कमी पडलेल्या पावसात , एव्हढ्या उन्हातही ही सावलीची बेटे मन कसे प्रफुल्लित करून टाकतात, नाही ?

माणदेशातल्या माणसांचे वर्णन व्यंकटेश माडगूळकरांनी सविस्तर केलेले आहेच. दोन अडीच वर्षाच्या वास्तव्यात मला अनुभवायला मिळालेली माणदेशी माणसेही अशीच होती. विपरीत परिस्थितीचे भांडवल न करता, रडत न बसता, परिस्थितीला जिद्दीने तोंड देणारी,

वरून खडबडीत आणि रूक्ष वाटली तरी जीव लावणारी, जिवाला जीव देणारी

आणि

बनेलपणाचा आवही आणता न येणारी स्पष्ट, साधी, सरळ, प्रामाणिक.

अशा या माणदेशात राहून त्या मातीच्या, तिथल्या माणसांच्या प्रेमात न पडता राहणे अशक्यच.

"Never hate in plurals" हे वुडहाऊस सांगून गेलाय.

पण

"Never love in plurals" हे कुणीही सांगितलेले नाही. Rather कुणीच सांगू शकणारही नाही.

- अस्सल वैदर्भीय असलो तरी माणदेशी आणि खान्देशी मातीवर अपार प्रेम करणारा, प्रवासी पक्षी, राम.

No comments:

Post a Comment