Showing posts with label marathi poem. Show all posts
Showing posts with label marathi poem. Show all posts

Saturday, April 6, 2024

आकर्षणाचा नियम




आकर्षणाचा नियम


असतात ज्यांची घरे,

पाणवठ्यांजवळ, धरणांजवळ, कालव्यांजवळ.


असतो त्यांच्याच मनात कायम ओलावा,

मुलाबाळांविषयी, नातेवाईकांविषयी

प्राणीमात्रांविषयी, वृक्षवल्लींविषयी

आणि

स्वतःविषयी ही.


हे जितके खरे

तितकेच याच्या उलट, याचा converse


ज्यांच्या मनात असतो अपार,

समस्त सृष्टीबाबत कायम ओलावा.

ज्यांच्या डोळ्यांमधून झरतो,

समस्त दुःखितांविषयी अपार अश्रूपाट


कायम नांदते पाणी त्यांच्याच घरी

कामना करते पाणी कायम तिथेच राहण्याची.


कारण


आकर्षित करणार शेवटी पाण्याला पाणीच.


मग ते 


नदीतले पाणी मनातल्या पाण्याला असो

किंवा

डोळ्यातले पाणी घरच्या आडाच्या पाण्याला असो.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

(०६/०४/२०२४)


Tuesday, January 2, 2024

अन्कळा झाल्या कधीच्या...

कविवर्य सुरेश भटांच्या प्रत्येक गझलेत एक अत्यंत चमत्कृतीपूर्ण आणि मनाला भुरळ पाडणारी कल्पना आणि तशी शब्दरचना असते. त्यांचे रंगूनी रंगात सा-या हे गीत मी अगदी बालपणापासून ऐकतोय. खूप आधी पाठही झालेले हे गीत.


यातले "अन्कळा झाल्या कधीच्या, सोशिल्या ज्या ज्या कळा" हे वाक्यपण खूपदा कानावरून गेले आणि ब-याचदा गळ्यातूनही गेले. पण "अन्कळा" या शब्दाला मी "अन कळा" असे सुटे सुटे म्हणत होतो. "अन" या शब्दाचा अर्थ "आणि"असा घेऊन मी त्या ओळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असे. पण नीटसा अर्थबोध होत नसे. मग मी "असेल कवीची एखादी आगळीवेगळी कल्पना" म्हणून तो विषय मनात दाबून टाकीत असे.


असेच एकदा आम्ही पती पत्नी प्रवासात होतो. गाडीत टेपवर हेच गाणे लागलेले आणि आमच्या गप्पा रंगलेल्या. गप्पांमध्ये तिने एक आठवण मला करून दिली. फ़ार वर्षांपूर्वी तिच्या कुणीतरी काका / मामाने माझा अकारण फ़ार अपमान केला होता. तेव्हा मी सुद्धा त्या घटनेवर फ़ार संताप करून घेतला होता. पण आमच्या गप्पांमध्ये तिने आठवण करून दिल्यावरही मली ती घटना, ती व्यक्ती स्मरतही नव्हती. नेमका तेव्हाच माझ्या मनात अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" या ओळींचा अर्थ अक्ष्ररशः प्रगट झाला. एखाद्या माणसाने इतके सोसले, इतके सोसले की त्याने काय काय सोसले हेच त्याला कळेनासे झालेले आहे हा या "अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" चा अर्थ.


बाय द वे "अन्कळा" या शब्दाचा वापर फ़क्त सुरेश भटांनी केलाय ? की हा शब्द इतरही लेखक / कवींनी आपल्या साहित्यात वापरलाय ? याविषयी मला जाम उत्सुकता आहे.


- स्वतः स्वभावाने अत्यंत क्षमाशील आणि सतत पॉझिटिव्ह विचार करीत असल्याने विषारी विचार आणि विषारी माणसे यांना आपल्या मनात कधीही स्थान न देता सतत पुढे पुढेच जाणारा साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Monday, June 8, 2020

पावसाची आणखी एक कविता




दिसे सूर्य ही धुकट आता
पाण्याचे झाड बहरले.
ग्रीष्मांताच्या कल्पनेने
मन माझे मोहरले.
आज संध्याकाळी आलेल्या पावसांच्या सरींमुळे स्फुरलेल्या या ओळी.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

Friday, January 3, 2020

निरोपक्षण: एका कवितेची गोष्ट

कराडला असताना कराडचे चिमुकले स्टेशन हे माझ्यासारख्या रेल्वेवेड्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नसले तरच नवल होते. सुट्टीच्या दिवशी, परीक्षे आधीच्या अभ्यासाच्या सुट्टीत (Preparation Leave) मध्ये मी आपली अभ्यासाची पुस्तके पाठीशी बांधून, हॉस्टेलमधल्या एखाद्या मित्राची सायकल घेऊन कराड स्टेशनची वाट धरीत असे. कराड स्टेशनच्या सातारा बाजूच्या आऊटर सिग्नलला खाली एक छान चौथरा होता. तिथे मी माझे अभ्यासाचे बस्तान बसवीत असे. आजुबाजूला अजिबात लोकवस्ती नव्हती. नुसती उसाची शेते. मी चक्क पुस्तकेच्या पुस्तके घडाघडा वाचीत असे. बालपणापासून अशीच अभ्यासाची, पाठांतराची सवय होती. हॉस्टेलला असे घडाघडा पाठांतर इतरांच्या अभ्यासात अडथळा आणणारे नक्की असणार हे मी जाणून होतो.

अशा आडजागी अभ्यासाला बसण्याचा आणखीही एक मोठ्ठा फ़ायदा होता तो म्हणजे येणा-या जाणा-या गाड्यांच्या वेळेवर स्टेशनवर जाऊन ती गाडी बघता यायची, नोंदी घ्यायच्या यायच्या. (अशाच एका नोंदीची कथा या ब्लॉगमध्ये आलेली आहे.)

त्या काळी कराड हे एक चिमुकले स्टेशन होते.पु.लं. च्या "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये वर्णन केल्याप्रमाणेच. दिवसा फ़क्त तीनच प्रवासी गाड्या जाणा-या, तीन येणा-या. मिरज - पुणे पॅसेंजर, कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस, नागपूर- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस, मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि पुणे - कोल्हापूर पॅसेंजर. बस्स. मालगाड्यांची वाहतूकही तुरळकच असायची.




सकाळी ८ वाजता मिरज - पुणे पॅसेंजरच्या वेळेला मी स्टेशनवर जात असे. पॅसेंजर पुण्याकडे गेली की स्टेशन्समोरच असलेल्या छोट्याशा हॉटेलमधे नाश्ता करून मी अभ्यासाला बसत असे. दुपारी ११ च्या सुमाराला कराड स्टेशनवर कोल्हापूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस यांचे क्रॉसिंग होत असे. त्यावेळी पुन्हा प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन गाड्या बघून पुन्हा काहीतरी पोटात ढकलून मग मी थेट संध्याकाळी ४ पर्यंत अभ्यासात गर्क होत असे. मग नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून घेऊन चहा वगैरे पिऊन मी परतीची वाट धरीत असे. तोपर्यंत अभ्यासही छान झालेला असायचा. माझ्या अभियांत्रिकीच्या अभ्यासाशी रेल्वे अशी अविभाज्यपणे जोडल्या गेलेली आहे.

असाच एक दिवस. मिरज - पुणे पॅसेंजर कराडच्या फ़लाटावर आलेली होती. उतरणारे प्रवासी एखाददुसरेच. चढणारे पण हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच. मला कुठेच जायचे नसल्याने मी आपला निवांत एका बाकड्यावर बसून गाडी बघत होतो. 



गाडी सुटण्याची तयारी पूर्ण झालेली होती. इतक्यात एक मुलगा आणि एक मुलगी धावतपळतच फ़लाटावर आलेत. गाडी सुटलेली नाही हे पाहून उसासा टाकण्याचीही उसंत न घेता ती मुलगी गाडीच्या एका ड्ब्यात बसली. दोघांनीही क्षणभरच का होईना, हातात हात धरले होते आणि गाडी हलली.

गाडीने पुरेसा वेग घेईपर्यंत तो मुलगा त्या मुलीचा हात हातात घेऊन फ़लाटावर चालत होता. शेवटी वाढत्या वेगाने त्यांची ताटातूट केलीच. हातातून हात सुटले. मग गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो मुलगा तिकडे बघत हात हलवीत होता. मुलीचाही हात गाडीतून असाच हलत असणार. जड पावलांनी तो मुलगा परतला. एकमेकांशी बरेच बोलायचे होते पण "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे" अशीच त्या दोघांचीही अवस्था मला बसल्या बसल्या भारावून टाकणारी, स्तब्ध करणारी होती.

त्या दोघांचे नक्की नाते काय होते ? याची आत्ता २७ - २८ वर्षांनंतरही मला कल्पना नाही. प्रियकर - प्रेयसी असतील, कदाचित खूप छान मित्र असलेले भाऊ - बहीण ही असतील. पण त्या घटनेने एका चांगल्या कवितेला जन्म दिला. ही माझी मी केलेली एक अत्यंत आवडती कविता आहे.

निरोपक्षण

निरोपक्षणी शब्द मुके, ओल्या काजळकडा
वसंतबहरात सुना, माझ्या बकुळीचा तो सडा.

काही देणे काही घेणे, राहूनच गेले तसे
क्षमेचे याचनेचे भान त्या हलत्या हातास नसे.

भावनालाटेवर स्वार, गहिवर आणि उमाळा
चित्र सारे धूसर दिसते, भरून आला डोळा.

अलविदाच्या अश्रूंत कृतज्ञता गोठलेली
संदर्भ पुसता सारे, घटना मनी कोरलेली.

                                                   - राम प्रकाश किन्हीकर




Monday, January 20, 2014

पाहिजेत

मी तसा माझ्या ब्लॊगवर कविता वगैरे टाकण्याच्या जरा विरोधी मताचा आहे. पण काल जुनी पेटी साफ़ करताना काही जुनी कागदपत्रे सापडलीत. त्यातच १९९२ मध्ये केलेली ही कविता पण. टाकण्याचा मोह आवरला नाही म्हणून टाकतोय. १९९२ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत आठवड्याला ४-५ या वेगाने कविता केल्यात. काही छान होत्या, काही बुंदीप्रमाणे पाडलेल्याही होत्या. बघू. नंतरही काही कविता टाकाव्याश्या वाटल्यात तर इथे टाकीन.

पाहिजे.....
एक स्थापत्य अभियंता,
जो सांधू शकेल,
एक विशाल परंपरेचं
पण.........
सध्या माणसामाणसांतल्या,
समाजासमाजातल्या.......
व्देषाच्या भूकंपानं.......
तडे गेले गेलेलं राष्ट्र

पाहिजे.....
एक स्थापत्य अभियंता,
जो नव्याने बांधू शकेल,
धर्माधर्मातल्या भेदांच्या वाळवीने,
पोखरलेला एक धर्मनिरपेक्ष देश........

पाहिजे.....
एक स्थापत्य अभियंता,
जो तोडूही शकेल,
माणसामाणसांतल्या बुरसटलेल्या विचारांच्या,
आणि भेदांच्या भिंती.

साहित्य असेल आमचे.
दुर्दम्य इच्छाशक्तीची पहार,
उदार हृदयांच्या विटा, 
आणि........
माणुसकीचं, बंधूभावाचं सिमेण्ट.

पाहिजेत.....
त्वरित.......

- राम प्रकाश किन्हीकर
    (२७/०२/१९९२)


Saturday, September 22, 2012

ज्यादिवशी........त्यादिवशी


ज्यादिवशी....
पोटभर आणि मनभर जेवल्यावर
तुला अनेक अर्धपोटी, उपाशी आतड्यांचे पीळ जाणवणार नाहीत,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
अंगभर प्रावरणं ल्यायल्यानंतर
तुला फ़ाटक्या वस्त्रांमधले दुःख काय असते ते जाणवणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.


ज्यादिवशी....
आनंदांच्या लहरींवर विहार करताना
दुःखाच्या गर्तेत लोटल्या गेलेल्यांची आठवण,
तुझे डोळे पाणावणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
स्वतःच्या नवजात बाळाचा
वात्सल्याने मुका घेत असताना,
तुला तुझ्याच दिवंगत आजोबांची आठवण येणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
तुला स्वतःच्या हृदयात
बुध्दाची करुणा, ख्रिस्ताची दया आणि
शंकराच्या ज्ञानाचा साक्षात्कार होणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

कारण त्यानंतर जगेल फ़क्त देह
ज्यात चैतन्य नसेल.
कारण चैतन्य म्हणजेच
उपाशी पोटांची आठवण,
फ़ाटक्या कपड्यातले दुःख निवारण्याची तळमळ,
दुःखितांविषयीचा कळवळा,
पूर्वजांचे स्मरण.

चैतन्य म्हणजे बुध्द,
चैतन्य म्हणजे ख्रिस्त,
चैतन्य म्हणजे शंकर.

म्हणूनच हे चैतन्य जर,
तुझ्या देहात नसेल.
तर तू जगलास काय ?
किंवा मेलास काय ?
फ़रक पडत नाही.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(ही कविता दै. तरूण भारत, नागपूरच्या दि. २२/०६/२००८ रोजीच्या आसमंत पुरवणीत प्रकाशित झालेली आहे.)








Monday, July 11, 2011

पावसातली तू

लावू नकोस बोल मला तो पावसाचा दोष होता,
आषाढघन बरसताना खरंच तुलाही होष होता?

पावसात भिजावे तू हा अनामिक आदेश होता,
मदनाने पावसाचा फ़क्त घेतला वेष होता.

नभात मेघ दाटले अन धरती ही तृणबावरी,
सांग फ़ुलून आली कशी मुलुखाची तू लाजरी.

नितळ धारांसारखे प्रेम तुझे हे उचंबळे,
मग हातांवरील मेंदी नेत्रात का गं साकळे?

खरंच का नेत्रात तुझ्या, अश्रु डोकावून गेला?
की पावसाचा थेंब हा मार्ग वेडावून गेला?

सांग केला का कधी, मी मर्यादाभंग होता?
वेडे अग सगळाच तो पावसाचा रंग होता.

-प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

(ही कविता दै. तरूण भारत, नागपूर मध्ये दि. २० ऒगस्ट २००० रोजी प्रकाशीत झालेली आहे.)



(ही कविता ब्लोगवर खास सुधीर गोखले (नाना) साठी टाकली. बुंदींच्या दिवसांची आठवण अजूनही आहे म्हणून.)

कवितेची थोडी पार्श्वभूमी:

माझ्या जीवनात रेल्वेचे अनन्यसाधारण स्थान आहे. मला रेल्वे प्रवासही भरपूर घडला आहे. रेल्वे माझी पहिली प्रेयसी आहे. त्यामुळे माझ्या बहुतेक लेखनात बस किंवा रेल्वे चा संदर्भ येतोच येतो.

वास्तविक ही एक प्रेमकविता. आमचे लग्न दि. ०७/०२/२००० (नाथबीज) रोजी जमले. दि. १२/०३/२००० ला चंद्रपूरला साक्षगंध झाले. लग्नाची तारीख मात्र फ़ार लांबची निघाली.(माझ्याच आग्रहावरून) तारीख निघाली ती ०२/१२/२०००. तब्बल आठ साडेआठ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला.

दरम्यानच्या काळात मी नागपूरला आलो की वैभवी चंद्रपूरवरून नागपूरला यायची. आम्ही मग मनसोक्त भटकायचो. थोडी लांब सुटी आली की मी चंद्रपूरला जायचो. तसही चंद्रपूर माझं आजोळ असल्याने बालपणापासूनच मला चंद्रपूरची ओढ होतीच.

अशाच एका पावसाळी दिवशी आम्ही खूप भटकलो. थोडे ओलेही झालोत. त्याच दिवशी रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने मी मुंबईला परत जायला निघालो होतो. दिवसभर भटकूनही तिच्याविषयी वाटणारी ओढ कमी झाली नव्हती. सारखा डोक्यात तिचाच विचार चालला होता. (या ओढीलाच राधा-कृष्णाची ओढ म्हणतात हे सौ. मंदामावशींनी सांगितल्यानंतर तर अशी ओढ वाटण्यात आम्हा दोघांनाही धन्यता वाटायला लागली होती.)

ती आत्ता काय करीत असेल? आठवणींमध्ये गुंग असेल की दुसर्या कामांमध्ये तिने स्वत:ला गुंतवून घेतले असेल? असलेच असंख्य विचार. सारखी बेचैनी, अनामिक हुरहुर बस्स.

अशातच गाडी सुटली. मधला बर्थ होता. रात्रीचे नऊ वाजत होते. आजुबाजुच्या पासिंजरांनी आपापले बर्थस लावून घेतेलेत. मला झोप येत नसतानाही मधला बर्थ पकडून आडवे व्हावे लागले. हुरहुरीतूनच या कवितेचा जन्म झाला. तेव्हा गाडीने ८० कि.मी. अंतर कापून वर्ध्यात आगमन केलेले होते. रेल्वेच्या बर्थ वर केलेली कविता.

Monday, March 28, 2011

आठवणीतली कविता.

तुझ्यासाठी काय ठेऊन जाऊ सांग?
तशा पुष्कळ कविता आहेत तुझ्यावरती.
तू दिलेले फोटो परत दिलेत तर,
उगाच तुझ्या खणात होईल, भारूडभरती.

अर्धवट एक कथा लिहिलिय, तीच देऊ?
तू आणि तूच फ़क्त ती करशील पुरी.
त्याच्यापेक्षा नाकारलीस जी माझी भेट,
आता तुला चालेल का ती चंदनसुरी ?

पावसात जिथे भिजलो होतो नाचत नाचत,
जपून ठेवले आहे तिथले एक मोरपीस.
तेच तुला दिले असते पण नकोच,
उगाच माझी आठवण होईल दिसंदिस.

त्याच्यापेक्षा तुझ्यासाठी हवेवरती,
सोडून जाइन गाण्यामधले हळवे सूर.
चांदण्यात फ़िरताना ते ऐकू नकोस,
उगाच तुझ्या पापणीमध्ये येइल पूर.

- कविवर्य वसंत बापट

- वसंत बापट.