Tuesday, January 2, 2024

अन्कळा झाल्या कधीच्या...

कविवर्य सुरेश भटांच्या प्रत्येक गझलेत एक अत्यंत चमत्कृतीपूर्ण आणि मनाला भुरळ पाडणारी कल्पना आणि तशी शब्दरचना असते. त्यांचे रंगूनी रंगात सा-या हे गीत मी अगदी बालपणापासून ऐकतोय. खूप आधी पाठही झालेले हे गीत.


यातले "अन्कळा झाल्या कधीच्या, सोशिल्या ज्या ज्या कळा" हे वाक्यपण खूपदा कानावरून गेले आणि ब-याचदा गळ्यातूनही गेले. पण "अन्कळा" या शब्दाला मी "अन कळा" असे सुटे सुटे म्हणत होतो. "अन" या शब्दाचा अर्थ "आणि"असा घेऊन मी त्या ओळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असे. पण नीटसा अर्थबोध होत नसे. मग मी "असेल कवीची एखादी आगळीवेगळी कल्पना" म्हणून तो विषय मनात दाबून टाकीत असे.


असेच एकदा आम्ही पती पत्नी प्रवासात होतो. गाडीत टेपवर हेच गाणे लागलेले आणि आमच्या गप्पा रंगलेल्या. गप्पांमध्ये तिने एक आठवण मला करून दिली. फ़ार वर्षांपूर्वी तिच्या कुणीतरी काका / मामाने माझा अकारण फ़ार अपमान केला होता. तेव्हा मी सुद्धा त्या घटनेवर फ़ार संताप करून घेतला होता. पण आमच्या गप्पांमध्ये तिने आठवण करून दिल्यावरही मली ती घटना, ती व्यक्ती स्मरतही नव्हती. नेमका तेव्हाच माझ्या मनात अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" या ओळींचा अर्थ अक्ष्ररशः प्रगट झाला. एखाद्या माणसाने इतके सोसले, इतके सोसले की त्याने काय काय सोसले हेच त्याला कळेनासे झालेले आहे हा या "अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" चा अर्थ.


बाय द वे "अन्कळा" या शब्दाचा वापर फ़क्त सुरेश भटांनी केलाय ? की हा शब्द इतरही लेखक / कवींनी आपल्या साहित्यात वापरलाय ? याविषयी मला जाम उत्सुकता आहे.


- स्वतः स्वभावाने अत्यंत क्षमाशील आणि सतत पॉझिटिव्ह विचार करीत असल्याने विषारी विचार आणि विषारी माणसे यांना आपल्या मनात कधीही स्थान न देता सतत पुढे पुढेच जाणारा साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment