Wednesday, January 3, 2024

मनात (आणि शरीरातही) रूतून बसलेली काही गाणी.

या रविवारी मस्तपैकी वामकुक्षी करत होतो. अचानक वा-याच्या झुळूकेबरोबर आलेल्या एका गाण्याने माझी झोप उडवली. बरे, अगदी अस्वस्थ होऊन, मनाला वगैरे भिडून जागे करण्याइतपत क्लासिक वगैरे ते गाणे नव्हते. किंबहुना तो चित्रपट लागला तेव्हा (माझ्यासकट) तेव्हाच्या तरूण पिढीने त्या चित्रपटाची त्यातला नायक नायिकेची येथेच्छ खिल्ली उडवलेली होती. त्याचे संगीतकार सोडले तर त्यातले नायक आणि नायिका नंतर फ़ारसे कुठे दिसले नाहीत. त्या चित्रपटाचे संगीतकारही नंतर त्यांच्या संगीतापेक्षा इतर उचापतींमुळे चित्रपट सृष्टीबाहेर झाले होते.


ते गाणे होते "जानम जानेजाँ" आणि चित्रपट होता "आशिकी". बरे मग या गाण्यामुळे झोप उडण्याचे कारण म्हणजे अगदी विचित्र आहे. वपुंच्या जे के मालवणकर कथेमधला जे के आपल्या कमिश्नर बॉसच्या घरी जेवताना म्हणतो ना "सर, आम्ही हा श्लोक कसा विसरू ? तो रक्तात गेला आहे आमच्या." तसेच हे गाणे आमच्या मनापेक्षा शरीरात रूतून बसलेले आहे. त्यामुळे हे गाणे आजही, कुठेही ऐकले की अंगावर अगदी निराळाच शहारा येतो. आठवण कराड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाची आहे.


कराडला आम्हा सगळ्या हॉस्टेलर्स साठी कॉलेजने कॅम्पसमध्येच मेसची व्यवस्था केली होती. सहकारी तत्वावर ही मेस चालायची. जागा, भांडी कुंडी, आवश्यक तेव्हढे फ़र्निचर कॉलेजने दिलेले होते. पण संचालनाची व्यवस्था बघायला मुलांची टीम असायची. प्रत्येक वर्षाचे दोन ऑडिटर्स आणि प्रत्येक महिन्याला बदलणारे दोन सेक्रेटरी. दररोज सकाळी सेक्रेटरीने मेसमधे जाऊन रोजची भाजी, इतर मेन्यु याबाबत आचा-याला सूचना द्यायच्या. सेक्रेटरीने एकंदर किती मुले जेवलीत, किती मुलांचा खाडा होता यावर लक्ष ठेवायचे. क्वचितप्रसंगी कराड गावात जाऊन काहीतरी गोडधोड, खारा माल आणून मेसमधे चेंज किंवा सणावारी फ़ीस्ट चे आयोजन करायचे. दररोज भाजी घेऊन गावातून टेम्पो यायचा तसाच पंधरवाड्याला किराणा घेऊन टेम्पो यायचा. त्याकडेही सेक्रेटरीला लक्ष द्यावे लागे.



महिनाअखेरीचा एकूण खर्च भागिले महिन्याभरातल्या एकूण जेवलेल्या ताटांची संख्या असा हिशेब करून प्रत्येकाने जेवलेल्या ताटांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे मेसबिल बोर्डावर लावले की सेक्रेटरीची जबाबदारी संपायची. मग ते मेसबिल कॉलेजमधे असलेल्या बॅंकेत असलेल्या मेसच्या खात्यात भरावे लागे. सेक्रेटरी आणि ऑडिटर व्हायला मिळणे हा मोठाच मान होता. कुठल्याही अधिकृत शिक्षणापेक्षा प्रभावी पद्धतीने व्यवस्थापनशास्त्राचे धडे देणारे विद्यापीठ म्हणजे ती मेस आणि तिचा कारभार होता.


असेच एकदा 1991 सालच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही दोघे (मी आणि माझा अत्यंत हुशार, बुद्धीने अती तीक्ष्ण असलेला रूम पार्टनर शशांक चिंचोळकर) असे त्या मेसचे सेक्रेटरी झालेलो होतो. सणावारांचे दिवस होते. सगळ्या मुलांना घरच्या आठवणी येत असणार हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे त्या महिन्यात दर दोन तीन दिवसांनी गोडाधोडाचा, खा-या चमचमीत पदार्थांचा समावेश रोजच्या जेवणात करायचा हे आम्ही ठरविलेले होते. त्याप्रमाणेच एका रविवारी सकाळी आम्ही दोघेही कॉलेज कॅम्पसवरून कराड गावात गेलोत. जाताना शहर बसने आणि येताना (सोबत गोडधोड, खारा माल याने भरलेली जड पिशवी असल्याने) रिक्षाने यायचे असा सगळ्याच सेक्रेटरींचा आजवरचा खाक्या होता. त्यानुसार आम्ही गावातल्या राजपुरोहित भांडारकडून चांगल्या 150 कचो-या (प्रत्येकाच्या वाट्याला 2 - 2 तरी याव्यात हा हिशेबाने), गावातून चांगले 15 किलो आम्रखंड एका मोठ्या स्टीलच्या डब्यात भरून (तेव्हा आजसारखे प्लॅस्टिक बोकाळलेले नव्हते) रिक्षाने कॉलेज कॅम्प्सला परतत होतो.


रिक्षाचालक हा एक गरीब, परिस्थितीने गांजलेला वगैरे असतो हे माझे नागपूर आणि विदर्भातले मत कराडमध्ये पार धुळीला मिळाले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात टगेगिरी केलेली आहे असे दाखवल्याशिवाय कराड साता-यात रिक्षाचे लायसन मिळत नसावे. एक होते मात्र इथल्या रिक्षासुद्धा छान आणि चकाचक होत्या. नागपुरातल्या रिक्षांसारख्या जराजर्जर अवस्थेतल्या नसायच्या. रिक्षात टकाराचा टेप आणि प्रवाशांच्या मागे झंकार बीटस वाजणारे मोठ्ठे स्पीकर्स, त्यावर नवनव्या सिनेमातली गाणी मोठ्या आवाजात लावलेली असा तो एकंदर जामानिमा असायचा. 


तशाच एका रिक्षातून मी आणि शशांक चिंचोळकर आमच्या मेससाठी छानछान पदार्थ घेऊन चाललेलो होतो. महाराष्ट्र हायस्कूल समोरून कराडच्या कृष्णामाई पुलासाठी उतार सुरू व्हायचा. तेव्हा जुना पूल थोडा खालच्या बाजूला होता. उतार उतरून पूल ओलांडला की सैदापूर भागाला जाण्यासाठी चढ चढून जावे लागे. मग कॅनॉलवरून डावीकडे वळलोत की संत गाडगे महाराज कॉलेज (एसजीएम) आणि मग आमचे कॉलेज.


सकाळी 11 , 11.30 ची वेळ. रस्त्यावर रविवारमुळे तुरळक वाहतूक (तशीही त्या रस्त्यावर फ़ारशी वर्दळ कधी नसायची) आमचा रिक्षाचालक तरूण, जणू कानात वारे भरलेले वासरूच. ॲक्सीलेटर पिरगाळतच त्याने महाराष्ट्र हायस्कूलचे वळण घेतलेले. रिक्षात गाणे अगदी जोरात लागलेले. हेच "जानम जानेजाँ" च. त्यातले फ़ीमेल आवाजातले "जानम जानेजाँ" झाले आणि मेल आवाजातले "जानम..." तेव्हढे झाले आणि एकदम "धाड" असा आवाज झाला म्हणजे "जानम जानेजाँ..., जानम धाड" आम्हाला थोडे कळायला लागल्याची जाणीव झाली तेव्हा कळले की समोरून येणा-या एका सायकलवाल्याला वाचवायला आमच्या रिक्षावाल्याने आमच्या रिक्षाचे हॅंडल थो...डे तिरपे केले होते पण आमच्या रिक्षाचा वेग एव्हढा होता की आम्ही रिक्षासकट सरळ उभाचे आडवे झालेले होतो आणि त्याच अवस्थेत काही अंतर घासत घासत जाऊन पुढे थांबलेलो होतो. मी उजवीकडे बसलेलो असल्याने माझ्या अंगावर श्रीखंडाचा डबा, त्यावर कचो-यांची पिशवी आणि त्यावर माझा पार्टनर शशांक. डब्ब्याचे झाकण पक्के होते म्हणून बरे. नाहीतर त्यादिवशी भर कृष्णामाईच्या काठावर मला श्रीखंडस्नान घडले असते.


मला उजव्या बाजूने थोडे खरचटले होते तर शशांकला मुका मार लागलेला होता. लगेच गर्दी जमली. गर्दीने मोठ्या उत्साहात रिक्षा सरळ केला. रिक्षाचालकाला मात्र भरपूर लागलेले होते. त्याला घेऊन पब्लिक कॉटेज हॉस्पिटलला गेले. आम्ही दोघेही दुस-या रिक्षाने हॉस्टेल मेसला परतलो. आमच्या जखमांवर मलमपट्टी, सूज उतरण्याची औषधे घेऊन आम्ही दोघेही मेसमधे जाऊन आमची कामे करू लागलोत. "अरे, मेस के लिएं, हमने अपना खून दिया है" वगैरे फ़िल्मी डॉयलॉगबाजी आमच्या मित्रमंडळीसमोर करून आम्ही आमच्या आयुष्यात मग्न झालोत.


पण आजही हे गाणे लागले की मी त्यादिवशी कृष्णामाईच्या पुलावर जातो. त्या गाण्यातले "जानम जानेजाँ" झाल्यावर मला "जानम धाड" एव्हढेच ऐकू येते. कारण ते गाणे मनात रूतलेले नाही तर त्या अपघातामुळे अक्षरशः शरीरात रूतून बसलेले आहे.

या गाण्यामुळे अंगावर शहारा येतो पण तो भलताच.


- कॉलेजमध्ये असताना शांत, शिस्तप्रिय आणि तेव्हढाच टारगट विद्यार्थी, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment