Friday, July 31, 2020

श्रीविष्णुसहस्त्रनाम

जेव्हा जेव्हा विष्णुसहस्त्रनाम म्हणायला लागतो, परमात्म्याच्या सहस्त्र नामांचा गोडवा गायचाय हा विचार तर अत्यंत आकर्षित करणारा आहेच. पण मला सुरूवातीलाच भरून येत ते त्यातल्या भावामुळे. 

शरपंजरी पडलेल्या आणि देहविसर्जन करण्याची वेळ समीप आलेल्या पितामह भीष्मांना, ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने, जेष्ठ पांडव, सत्यनिष्ठ युधिष्ठीर "अत्यंत योग्य धर्ममार्ग कुठला ?" असा प्रश्न विचारतो.

आणि वयाने, अनुभवाने अतिशय थोर असलेले पितामह भीष्म त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या, त्यांच्याविरूद्ध युद्धाचे संचलन करून, कुरूकुलाचा नाश करवलेल्या, श्रीकृष्णाचे खरे स्वरूप ओळखून युधिष्ठीराला त्याचीच भक्ती करण्याचा सल्ला देतात. ज्ञानोत्तर भक्तीचा हा श्रेष्ठ आविष्कार आहे असे मी मानतो. 

आपल्या आसपास असलेल्या, आपल्या स्वजनांविषयी आपल्याला "स्वजनमोहिनीमाया" असते आणि म्हणूनच आपण त्यांचे अंतरंग स्वरूप ओळखू शकत नाही. पांडवांनाही त्या परमात्म्याचे खरे स्वरूप तोपर्यंत तितकेसे कळले असण्याची शक्यता कमी आहे. एक सखा, आत्येभाऊ, एक राजा, एक योद्धा, एक मार्गदर्शक असेच त्या भगवंताला त्यांनी आजवर बघितले आणि जाणले होते. पण पितामह भीष्मांनी त्याचे वर्णन करताना पहिलेच शब्द "जगत्प्रभू, देवदेव, अनंत आणि पुरूषोत्तम" असे उच्चारून आपल्या ज्ञानाचा आणि हृदयात जागत असलेल्या भक्तीचा प्रत्यय दिला. 



नेमके याच वाक्यावर सदगदित व्हायला होत. पितामह भीष्म आपल्याला अनेक अंगांनी माहिती आहेत. गंगापुत्र देवव्रत, सत्यनिष्ठ, इच्छामरणी, कुरूकुलाच्या चुकांचा बोध होऊनही केवळ वचनात गुंतल्याने कुरूकुळाचे रक्षण करणारा अजोड योद्धा अशी अनेक रूपे आपण याप्रसंगापूर्वी बघितली आहेत पण भगवंताच्या ख-या स्वरूपाला ओळखून त्याच्या भक्तीत लीन झालेला आत्मा हे नवे स्वरूप कुणाही साधकाला सदगदित करणारेच आहे.

- भगवंताच्या प्रेमामुळे, अकारण करुणेमुळे सदगदित होत असलेला मुमुक्षू राम.

(माझ्या इतर धार्मिक लेखांप्रमाणे हा लेखही कॉपी पेस्ट होऊन काही दिवसात मला कुठल्या तरी धार्मिक गृपवर बघायला मिळेल याची खात्री आहे.)

No comments:

Post a Comment