Monday, July 20, 2020

गाड्यांची पळवापळवी. काही रँडम विचार.

प्रफुल पटेल भंडार्याचे खासदार असताना पहिल्यांदा कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस आणि नंतर मुंबई - नागपूर विदर्भ एक्सप्रेस गोंदियापर्यंत पळवली. १५ वर्षे झालीत. अजूनही या दोन्ही गाड्यांमधे नागपूर ते गोंदिया प्रवासासाठी एकूण प्रवासी क्षमतेच्या ३० % प्रवासीही नसतात.
नुकतीच फेब्रुवारीत नागपूर - सिकंदराबाद त्रिसाप्ताहिकगाडी रायपूरवाल्यांनी अशीच पळवली.
बरे. या गाड्यांचा जनरल कोटा गोंदिया ते कामठी पर्यंतच आहे. नागपूरपासून पूल्ड कोटा (PQWL) सुरू होतो. म्हणजे ७० % प्रवाशांना केवळ २० % तिकीटे उपलब्ध होतात. मग काय ? हुशार मंडळी कामठी ते मुंबई प्रवास तिकीट घेऊन बोर्डिंग पाॅइंट "नागपूर" टाकतात. आणि जादा पैसे भरून का होईना खात्रीची जागा मिळवतात.
आपल्या मतदारसंघाच्या रेल्वे प्रश्नांविषयी विशेष आस्था असणारे चंद्रपूरचे माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांनी आपल्या मतदारसंघाच्या सोयीसाठी मुंबई - काजीपेठ आणि पुणे - काजीपेठ गाड्या सुरू केल्या. आणि या दोन्हीही गाड्यांना जनरल कोटा तिकीटे थेट वर्धेपर्यंत उपलब्ध आहेत. वर्धेनंतर पुलगावपासून या गाड्यांचा पूल्ड कोटा सुरू होतो. म्हणजे बल्लारशाह, चंद्रपूर, भांदक, वरोरा, हिंगणघाट, वर्धा इथल्या प्रवाशांना पुण्याला / मुंबईला जायला पूर्ण गाडीच्या उपलब्धतेचा पर्याय असतो.
मला वाटत, विदर्भ एक्सप्रेसलाही गोंदिया ते चांदूररेल्वे पर्यंत जनरल कोटा मिळाला तर तिचे "विदर्भ" नाव सार्थ होईल.
(विदर्भ एक्सप्रेसच्याच जवळपास वेळेत अमरावतीवरून मुंबईसाठी रोज सुपरफास्ट गाडी आहे म्हणून चांदूररेल्वेपर्यंतच्याच प्रवाशांची जास्तीत जास्त सोय व्हावी हा दृष्टीकोन.)
आता दिल्ली सराय रोहिला ते छिंदवाडा पाताळकोट एक्सप्रेस नव्या झालेल्या मार्गाने नागपूरपर्यंत पळवली आहे. आम्ही नागपूरकर तर गोंदिया - रायगड जनशताब्दी, गोंदिया - बरौनी (साप्ताहिक एक्सप्रेस), गोंदिया - हावडा (सुट्टी विशेष गाडी) आणि बल्लारशाह - सिकंदराबाद एक्सप्रेस नागपूरपर्यंत पळवून आणण्याची वाट बघतोय.
डेक्कन क्वीन नंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची लाडकी पंचवटी एक्सप्रेस. ही गाडी सुरू झाली तेव्हा मुंबई - नाशिक होती. पण मनमाड्च्या रेल्वे वर्कशॉपच्या कर्मचार्यांनी हिला मनमाडपर्यंत पळवली. तशीच गत गोदावरी एक्सप्रेसची झाली. तपोवन एक्सप्रेसची झाली. आता तपोवन एक्सप्रेस तर नांदेड पर्यंत वाढवल्या गेली.



मुंबई - पुणे प्रवासासाठी डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड या गाड्या असताना फ़क्त मुंबई - नाशिक साठी एकही गाडी नाही हे दुर्दैव आहे. गोदावरी आणि पंचवटी या दोन्ही गाड्या ९५ % नाशिकलाच भरतात आणि परतीच्या प्रवासात नाशिकलाच रिकाम्या होतात. तरीही मनमाडवाल्यांच्या दादागिरीमुळे मनमाडपर्यंत धावतात.
या पळवापळवीमुळे गाड्यांची नावे निरर्थक ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरूवातीला औरंगाबाद - मुंबई धावणारी "देवगिरी एक्सप्रेस" आता थेट सिकंदराबादपर्यंत वाढवलीय. त्यातल्या किती तैलंगी प्रवाशांना "देवगिरी" या महाराष्ट्राच्या १२ व्या शतकापर्यंतच्या राजधानीविषयी काही माहिती असेल ? अर्थात मराठी प्रवाशांनाही काही माहिती असण्याची शक्यता कमीच आहे म्हणा.
तशीच समरसता एक्सप्रेस. तिला काही लोक समर सता असे अज्ञानाने म्हणतात. पण १९९८ ला ती सुरू झाली तेव्हा चैत्यभूमी मुंबई आणि दिक्षाभूमी नागपूरची समरसता साधणारी गाडी म्हणून आली होती. ममताबाईंनी ही गाडी पुरूलिया मार्गे हावड्याला पळवली आणि तिच्या नावाचा संदर्भच हरवला.
या समसरता एक्सप्रेससोबतच तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईकांनी मुंबई - हावडा "ज्ञानेश्वरी" सुपर डिलक्स एक्सप्रेस सुरू केलेली होती. पण हाय रे दैवा !
रेल्वेतल्या कुठल्यातरी अमराठी अधिकार्याने इंग्रजीत "Dnyaneshwari" ऐवजी "Jananeshwari" असे स्पेलिंग टाकले आणि ज्ञानेश्वरी एक्सप्रेसची "जन्नेश्वरी" एक्सप्रेस झाली. मराठी माणसांच्या मनाचा तथाकथित मानबिंदू वगैरे वगैरे असलेल्या कालनिर्णयमधेही चक्क २०१३ पर्यंत या गाडीचा "जन्नेश्वरी" म्हणून उल्लेख होत होता. या नावाची कुठली तरी देवी बिहार - बंगालकडे आहे ही बर्याच मराठी प्रवाशांची नंतर नंतर समजूत होत गेली. आत्मविस्मरणाचे हे किती दुर्दैव !
असो, या प्रकरणावर एखाद्या ग्रंथाचे लेखन होईल एव्हढा मालमसाला आहे. पण या माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन इथेच थांबतो.
- हाच लेख थोड्याच दिवसात व्हाॅटसअॅपवर माझ्या नावाशिवाय किंवा इतर कुठल्यातरी चौर्यकर्मी लेखकाच्या नावाने मलाच पहायला मिळेल याची खात्री असलेला सभ्य लेखक राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment