Sunday, October 11, 2020

जागतिक टपाल दिवसानिमित्त पोस्टाशी नात्याच्या आठवणी

 ९ ऑक्टोबर.

जागतिक टपाल दिवस. आज मोबाईल, व्हाॅटसॅप मुळे भलेही पोस्टाचे महत्व कमी झाले असेल.
पण २० वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. आमचे लग्न ठरल्यानंतर लग्न पार पडेपर्यंतच्या प्रियाराधनाच्या काळात, प्रेमपत्रांच्या देवाणघेवाणीत कबुतराची भूमिका निभावणार्या भारतीय पोस्टाचे आम्हा उभयतांच्या जीवनातले स्थान कसे विसरायचे ?
आईवडीलांच्या सुरक्षित छायेत १८ वर्षे काढल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला घरापासून ११०० किमी दूर गेलेल्या एका भावनाप्रधान तरूणाने जवळपास रोज एक पत्र घरी आणि इतर जवळच्या मंडळींना पाठवणे आणि त्यालाही घरून आणि इतर सगळ्यांकडून दररोज एक पत्र मिळणे आणि या घडामोडीत एक दृढ मानसिक आधार व दिलासा प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या पोस्टाचा आधार कशात मोजायचा ?







अगदी अक्षरओळख झाल्याझाल्या चंद्रपूरच्या आजी आजोबा, मामा मामींना पत्र पाठवणार्या रामच्या जीवनात पोस्टाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
थोडी मिशी आणि स्वतंत्र मते फुटू लागल्यानंतर मुंबईपासून कोल्हापूरापर्यंतच्या विविध वर्तमानपत्रांना लेख, पत्रे पाठवणार्या तरूण रामच्या लेखनविश्वात पोस्टाचे स्थान कुठल्या लेखात मांडायचे ?
तसे आमचे सर्वच आर्थिक व्यवहार अत्यंत माफक आहेत. त्यामुळे पोस्टात बचत खाते, पीपीएफ खाते वगैरे काढण्याची वेळ आली नाही पण पोस्टाकडून भरपूर पत्रे दररोज मिळण्याचे सुख मात्र भरपूर अनुभवायला मिळाले.



पैसा सोडला तर इतर बाबींचा काटेकोर हिशेब ठेवण्याच्या सवयीमुळे मी पाठवलेल्या प्रत्येक पत्राचा हिशेब नीट ठेवलाय. १९८९ ते १९९३ या माझ्या कराडच्या वास्तव्यकाळात मी दरवर्षी ६०० च्या आसपास पत्रे पाठवायचो. काही ख्यालीखुषालीची, काही काळजीची, काही धीर देणारी तर काही मनातल्या प्रांजळ अभिव्यक्तीची.
मला प्रत्युत्तरातही भरपूर पत्रप्रेम मिळाली. माझ्या नातेवाईकांमध्ये काहीकाही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी कदाचित दोनतीन किंवा एकमेव पत्र पाठविले असेल तर ते मलाच पाठविले असेल. मी सुध्दा बहुतेक सगळी पत्रे व्यवस्थित जतन करून ठेवली आहेत.
आमच्या बालपणी नागपुरात एक पोस्टाची व्हॅन "फिरते पोस्ट ऑफिस" म्हणून शहराच्या विविध भागात फिरायची. पोस्टल साहित्याची विक्री, कार्डस, इनलॅण्डस, पाकिटे आदि पत्रे स्वीकारणे हा व्यवहार त्या व्हॅनमधे चालत असे. आमच्या घराजवळ ती व्हॅन रात्री साडेआठच्या सुमारास येई. त्यामुळे पत्राची डिलीव्हरी लवकर व्हायला हवी असेल तर त्या व्हॅनमधे पत्र टाकावे लागे. वडिलांसोबत राहून या गोष्टी बालपणापासून बघितल्याने प्रत्येक शहरातल्या पोस्टल खात्याचे पत्र स्वीकारण्याचे आणि पोहोचवण्याचे algorithm अभ्यासण्याचा छंदच जडला आणि एका शहरातून दुसर्या शहरात कमीत कमी वेळात पत्र कसे पाठवायचे या शास्त्रात आम्ही प्रवीण झालो.
मेल रेल्वेगाड्यांना एकेकाळी लालभडक पोस्टाचा डबा असायचा. त्यात पत्र टाकायला एक छोटीशी रचना असायची. MPSC , UPSC परीक्षेसाठी लगोलग आपला अर्ज पाठवणे आवश्यक असण्याच्या तातडीच्या वेळी दुपारी ४.०० वाजता नागपूर स्टेशनवर जाऊन हावडा - मुंबई मेलच्या डाक डब्यात टाकलेले पत्र नेमके दुसर्या दिवशी मुंबईतले आयोगाचे संबंधित कार्यालय सकाळी उघडेपर्यंत तिथे पोहोचलेले असे.
उपरोल्लेखित प्रियाराधनाच्या काळात ऐरोलीवरून पत्रांच्या निकासीला वेळ लागतोय हे लक्षात घेऊन वाग्दत्त वधूशी लवकरात लवकर संवाद व्हावा म्हणून दिवसा पत्र लिहून संध्याकाळी धडपडत ठाणे स्टेशन गाठणे आणि त्याच रात्री विदर्भ एक्सप्रेसआधी रिकाम्या होणार्या तिथल्या पत्रपेटीत प्रियेचे पत्र टाकणे ही धडपड आज आठवली तरी पोस्टाच्या लालभडक पेटीविषयी कृतज्ञता दाटून येते.



बालपणी पोस्टाची ती लालभडक दिसणारी व्हॅन दिसली की आज काहीतरी गोड खायला मिळणार अशी सगळ्या बालगोपालांची समजूत होती. (गोड खायला मिळण्याचे तेव्हा मोठे अप्रूपही होते म्हणा.) पण आता वाटतय अरे या पोस्टाच्या लालभडक पेटीच्या, लाल व्हॅनच्या सहवासाने आपले पूर्ण जीवनच गोड केलेले आहे की.
सलाम सगळ्या पोस्टल कर्मचा-यांना
- भरपूर पत्रे लिहून आणि स्वीकारून पोस्टाला भरपूर महसूल प्राप्त करून देणारा रामभाऊ पत्रमित्रे.

1 comment: