Tuesday, October 13, 2020

रेल्वे, मराठी रेल्वेमंत्री आणि समाजवादी विचारवंत.

 मथळा वाचून बुचकळ्यात पडला ना ? वरील तीन गोष्टींचा एकमेकांशी नक्की कसा संबंध ? "म्हणजे लग्नापूर्वी शी लुक्ड, बरका, एक्झाक्टली लाईक काननबाला ऑर दुर्गा खोटे" या पुलंच्या पात्रपरिचयासारखे यांच्यात काहीतरी साम्य आहे की नाही ? आहे. (आता या क्षणी अण्णूच्या लग्नातली गोणेश्वर छापखान्यातली गंमत, निरगाठ उकलून दाखवल्याप्रमाणे, सांगणा-या नारायणाचा, माझ्यात संचार झालाय असे समजा.)

एकेकाळी आपले बहुतांशी मराठी विचारवंत आणि लेखक मंडळी समाजवादी विचारसरणीची होती. किंबहुना समाजवादी, डावे विचार म्हणजेच खरे विचार, इतर उजवे विचार, हास्य विनोद म्हणजे थिल्लरपणा नाहीतर अतिरेकीपणा असा (गैर)समज महाराष्ट्रातल्या तत्कालीन वाचकांच्या गळी उतरवण्यात हे लेखक, विचारवंत सफ़ल झाले होते म्हणाना. साम्यवादी, समाजवादी रशियाचा आदर्श ठेवण्याचा आणि भांडवलशाही अमेरिकेचा व्देष करण्याचा तो काळ होता. (जरी ब-याचशा डाव्या विचारवंतांची दुसरी, तिसरी पिढी भारतातल्या भांडवलशहांच्या "स्पॉन्सरशीप" घेऊन अमेरिकेतच शिकलीत आणि तिथेच स्थायिक झालीत.) दुस-याच्या मुलांना "मराठी भाषेत शिका आणि बोला" असा उपदेश करून स्वतःच्या मुला, नातवंडांना "बॉम्बे स्कॉटिश" (बॉम्बे हा. मुंबई नाही.) मध्ये पाठवण्याचा निगरगट्टपणा या समाजवाद्यांकडूनच आलेला असण्याची शक्यता आहे, असो.
इकडे "क्रांती, निधडी छाती, शूर शिपाई" वगैरेंच्या कवितेतून गर्जना करणारे हे समाजवादी विचारवंत प्रत्यक्षात मात्र दिल्लीकरांना टरकून असत. उत्तरेतल्या दबंग राजकारण्यांसमोर आणि दक्षिणेकडल्या बेछूट राजकारण्यांसमोर नाही म्हटल तरी थोडा न्यूनगंड घेऊन वागणारी ही मंडळी. तसे न्यूनगंडाचे कारण नव्हते पण उगाचच शेपूटघालू वृत्ती. "केवळ आमुचा सह्यकडा" लिहीताना "भव्य हिमालय केवळ तुमचा" असे लिहीले असते तर लगेच देशद्रोहाचा आणि फ़ुटीरतेचा कुणी आरोप करणार नव्हते. पण उभ्या देशाच्या एकसंधत्वाची जबाबदारी महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे , भारताचे नेतृत्व महाराष्ट्र करणारा आहे, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाणारा आहे, या कवी कल्पनांमध्येच रमणारे "भव्य हिमालय तुमचा आमुचा" किंवा "तुमच्या आमुच्या गंगाजमुना, केवळ आमुची भीमथडी" वगैरे लिहीते झाले नसते तरच नवल. (जणू काय "तुमच्या असूद्या गंगा जमुना" लिहीले असते तर नर्मदेच्या दक्षिणेला भारत वेगळाच देश म्हणून मान्यता पावणार होता.)
तर काय ? उगाचच बोटचेपे धोरण घेऊन अंगी क्षमता असतानाही प्रचंड न्यूनगंडात जगणे आणि साध्या साहित्यातूनही बंडखोरी व्यक्त करू न शकणे हा १९६० ते १९९० पर्यंतच्या मराठी साहित्यिकांचा (काही सन्माननीय अपवाद वगळता) खरा बाणा होता. मराठी बाणा घेऊन ही मंडळी वावरलीत खरी पण तो बाणा अत्यंत तकलादू आणि स्वतःपुरता होता. देशभरात त्या बाण्याची मोहर कुठेही उठलेली दिसली नाही. ("मराठी माणसांचा तुम्हाला राग आहे म्हणून तुम्ही संयुक्त महाराष्ट्र द्यायला टाळाटाळ करताय" म्हणून नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फ़ेकून मारणारे चिंतामणराव देशमुखांसारखे काही फ़क्त थोडे अपवाद.)
१९७८ मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि असेच समाजवादी विचारवंत, मधु दंडवते रेल्वेमंत्री झालेत. खूप मोठ्ठा माणूस, खूप अभ्यासू. १९७९ च्या रेल्वे अंदाजपत्रकात त्यांनी "वर्गविरहित रेल्वे गाड्या (Classless Trains)" ही संकल्पना आणली. लांब पल्ल्याच्या गाड्यांना एकच वर्ग (व्दितीय श्रेणी) असावा. प्रथम वर्गाचे डबे नसावेत ही त्यांची संकल्पना. तत्पूर्वी त्यांनी सगळ्या व्दितीय वर्ग शयनयान डब्यांना आसनांना किमान २ इंच कुशन्स असले पाहिजेत असा आग्रहही धरला. त्यापूर्वी व्दितीय वर्गाच्या शयनयान डब्यांना फ़क्त लाकडी फ़ळ्या असत. कुशन्स फ़क्त प्रथम वर्गाच्या डब्यांना असत. आज आपण व्दितीय वर्गात आरामात कुशन्सवर बसून जाऊ शकतो याचे श्रेय निश्चितच मधू दंडवत्यांना द्यायला हवे.
झाले. ४ नोव्हेंबर १९७९ ला पहिली वर्गविरहीत गाडी म्हणून मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस सुरू झाली. सुरूवातीच्या काळात गीतांजली एक्सप्रेस गाडी मध्य रेल्वेची होती. खूप सोयीसुविधा पहिल्यांदाच या गाडीत होत्या. लाल + क्रीम रंगसंगतीचे आकर्षक डबे, प्रत्येक व्दितीय वर्ग शयनयान डब्यांना कुशन्स असलेली आरामदायक आसनव्यवस्था, प्रत्येक डब्यात पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे(तेव्हा बिस्लेरी संस्कृती बोकाळलेली नव्हती. १९८९ - ९० नंतर हे फ़ॅड आले. एरव्ही प्रवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे ही रेल्वेची, बससेवेची जबाबदारी होती.) या गाडीला पहिल्या दिवसापासून प्रथम वर्गाचा डबा नाही. आजही नाही. त्याकाळी गीतांजलीला इगतपुरी-भुसावळ-अकोला-नागपूर-दुर्ग-बिलासपूर-टाटानगर असे मोजकेच थांबे होते. सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुपरफ़ास्ट आणि आरामदायक प्रवास व्हावा हे मधू दंडवत्यांचे स्वप्न. किती उदार, किती उदात्त विचार !



वर्गविरहीत गाडी म्हणून सुरू झालेल्या गीतांजली एक्सप्रेसला कालांतराने प्रथम वर्ग तर नाही पण त्यापेक्षाही महाग तिकीट असलेला ए.सी. टू टायर (व्दिस्तरीय वातानुकूल शयनयान) चा डबा जोडला गेला. त्याला "सेकंड एसी" म्हटले म्हणून तो दुस-या वर्गाचा थोडीच होणार आहे ? तो तर बिगर वातानुकूल प्रथम वर्गापेक्षा महाग तिकीटांचा. पण त्याकडे या सगळ्या समाजवाद्यांनी सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले. "सेकंड एसी" त "सेकंड" आहे न ? मग झाल तर अशी सोयीस्कर पळवाट त्यांच्या समर्थनार्थ त्यांनी काढली असावी आणि मनाची समजूत करून घेतली असावी. समाजवादाच्या मूळ उदात्त हेतूला असा हरताळ फ़ासला जातो आणि त्याला गोड मुलामा देऊन समाजवादी गप्प बसतात आणि इतरांना बसवतातही याचे हे प्रातिनिधिक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. मधू दंडवत्यांनी त्यांच्या वर्गविरहीत गाड्यांना वातानुकूल दर्जाचे, महागड्या प्रवासाचे डबे बसवून आपल्या संकल्पनेची खिल्ली उडवल्या गेल्याबद्द्ल कधी निषेधाचा सूर व्यक्त केला असल्याचे वाचनात नाही. त्यांच्यातला हा समाजवाद सोडला तर बाकी माणूस आदरणीय, खूप खूप मोठ्ठा.
बर, यात महाराष्ट्रातले उजवे विचारवंतही मागे नाहीयेत हं. मधू दंडवत्यांनंतर २० वर्षांनी, १९९८ मध्ये, राम नाईक रेल्वेमंत्री झाले. त्यांनी मुंबई - हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस सुरू केली. तोपर्यंत गीतांजली एक्सप्रेस दक्षिण पूर्व रेल्वेकडे गेलेली होती. बंगाल्यांची "गीतांजली" तर आमची "ज्ञानेश्वरी" असा अभिनिवेश राम नाईकांच्या मनात तेव्हा नसेलच असे सांगता येणार नाही. पण सुरूवातीलाच मध्य रेल्वेतल्या अमराठी अधिका-यांनी ज्ञानेश्वरी चे स्पेलींग "Dnyaneshwari" करण्याऐवजी "Jananeshwari" असे केले. (नशीब पुणे - पाटणा ज्ञानगंगा एक्सप्रेसचे "Gyaanaganga" केले तसे ज्ञानेश्वरी चे "Gyaaneshwari" नाही केले.) त्यामुळे वर्षा दोन वर्षातच मराठी माणसेही या गाडीला "जन्नेश्वरी" एक्सप्रेस म्हणू लागलेत. अगदी मराठी मनांचा मानबिंदू असलेल्या कालनिर्णयनेही त्यांच्या वेळापत्रकात २०१३ पर्यंत "जन्नेश्वरी" असाच उल्लेख या गाडीचा केलेला आढळेल. एकदा या गाडीच्या प्रवासात एका मराठी सहप्रवाशाला मी हा मुद्दा समजावून सांगत होतो पण तो म्हणाला," छे, छे. अहो बिहार - झारखंड मध्ये जन्नेश्वरी नावाची देवी आहे. तिच्यावरून या गाडीला हे नाव ठेवलेय." आपल्याच संस्कृतीविषयी एव्हढी उदासीनता इतरत्र कुठे बरं दिसेल.



बर या ज्ञानेश्वरी एक्सप्रेस सोबत रेक शेअर करणारी मुंबई - नागपूर समरसता एक्सप्रेस सुरू झाली होती. (ममता बॅनर्जी बाई रेल्वेमंत्री झाल्याबरोबर ही गाडी पुरूलियाच्या आडमार्गाने करून त्यांनी हावड्यापर्यंत वाढवून महाराष्ट्राच्या तोंडातून पळवली. या गाडीचे नाव अजूनही समरसता हेच आहे. चैत्यभूमी मुंबई आणि दीक्षाभूमी नागपूर यांचे सामरस्य साधणारी म्हणून "समरसता" एक्सप्रेस. पण आज ९० % जनता तिला (त्यात ७५ % मराठीही आलेत हं) समर सता, तर कधी समर सत्ता म्हणते्य. (समर टाइम मध्ये येणारी किंवा जाणारी सत्ता, असा त्यांचा हेतू असतो की काय ? न जाणे.)



नितीशकुमार हे आणखी एक समाजवादी रेल्वेमंत्री झालेत. महाराष्ट्र सोडून बाकी देशातले हे समाजवादी खूप "दबंग" मनोवृत्तीचे असतात हं. त्यांच्या कल्पनेतल्या "संपर्क क्रांती" गाड्यांची संकल्पना खूप छान होती. एखाद्या राज्याची राजधानी सोडून, (कारण राज्याच्या राजधानीला देशाच्या राजधानीशी जोडणारी राजधानी एक्सप्रेस ही सेवा लोकप्रिय आहे. इतर सेवा देण्याची आवश्यकता नाही.) इतर शहरांना देशाच्या राजधानीशी जलद जोडणारी सेवा असे या कल्पनेचे स्वरूप. पण त्यातही समाजवादी ढोंगीपणा आणि महाराष्ट्रावर अन्याय झालाच.
१. आंध्रप्रदेश संपर्क क्रांती - तिरूपती ते ह. निझामुद्दीन. ही गाडी आंध्र प्रदेशात भरपूर थांबे घेते. पुढे अतिशय कमी थांबे घेत दिल्ली गाठते.
२. कर्नाटक संपर्क क्रांती - यशवंतपूर - ह. निझामुद्दीन. कर्नाटकात भरपूर थांबे घेऊन पुढल्या राज्यांमध्ये न थांबता झटपट दिल्ली गाठणारी गाडी.
३. तामिळनाडू संपर्क क्रांती - मदुरै - ह. निझामुद्दीन. तामिळनाडूत छोट्या छोट्या गावांचेही थांबे घेणारी ही गाडी पुढे दिल्लीपर्यंत मात्र केवळ आवश्यक तेव्हढे थांबे घेते.
पण महाराष्ट्रासाठीची महाराष्ट्र संपर्क क्रांती ? राजधानी मुंबईतून सुरू करायची नाही म्हणून मुंबई उपनगरांतल्या वांद्रे स्थानकावरून निघून महाराष्ट्रात फ़क्त बोरीवलीला थांबा घेत दिल्लीला जाणारी गाडी. हेतू शुद्ध असता तर सोलापूर किंवा कोल्हापूर वरून ही गाडी सुरू करून महाराष्ट्रातल्या छोट्या गावांसाठी थांबे देऊन महाराष्ट्राबाहेर सुपरफ़ास्ट पळवता आली असती की नाही ? पण तेच. महाराष्ट्रीय बोटचेपेपणा आणि समाजवाद्यांचा ढोंगीपणा. (राजसाहेबांच्या २०२२ च्या भाषणासाठी मुद्दे देतोय असे वाटतेय का ? )



आतासुद्धा सुरेश प्रभू आणी पियुष गोयल ही मराठी माणसे लागोपाठ रेल्वेमंत्री झाली आहेत. पण महाराष्ट्राच्या हाताला काही विशेष लागलय असे म्हणवत नाही. बिहारी, बंगाली व्यक्ती रेल्वे मंत्री झाली की जी दबंगाई दाखवते आणि आपापल्या राज्यांचा फ़ायदा करून देते तशी दांडगाई मराठी माणसाने दाखवावी ही अपेक्षा चुकीची नाही ना ? मराठी माणसाची अति उदात्त मानसिकता याच्या आड येतेय का ?
- समाजवादाचे मूळ हेतू कितीही पटले तरी समाजवाद्यांचा ढोंगीपणा न आवडणारा, उजवा विचारवंत रामभाऊ.

No comments:

Post a Comment