Tuesday, October 27, 2020

एका सुंदर रांगोळीची आठवण

 दिवाळी २०१३. धनत्रयोदशीचा दिवस.

दिवाळी साजरी करायला आम्ही सहकुटुंब सांगोल्यावरून नागपूरला येत होतो.
सांगोल्यावरून निघायला थोडा उशीरच झाला होता. पहाटे ५.०० ला निघायचे ठरले होते पण कॅम्पस मधून निघता निघता तब्बल ७.०० वाजले.
७७५ किमी (मार्गे पंढरपूर - टेंभूर्णी - करमाळा - नगर - औरंगाबाद - जालना - सिंदखेडराजा - मेहकर - कारंजा (लाड) - अमरावती) जायचे म्हणजे जवळपास १६ ते १७ तास लागणार हा गेल्यावेळेचा हिशेब होता.
रात्री ८ किंवा ९ नंतर गाडी चालवायला मला अजिबातच आवडत नाही. मी बर्याचदा पहाटे उठून, अंघोळ वगैरे आन्हिके उरकून अगदी ३.३० ला ही गाडी चालवलेली आहे पण रात्रीच्या ड्रायव्हिंगचा खूप कंटाळा येतो.
रात्री ८ आणि पहाटे ३.३० चा अंधार जरी सारखाच असला तरी पहाटेच्या ड्रायव्हिंगला हळूहळू उजाडत जाणार्या प्रकाशाची आशावादी किनार असते. त्यात ड्रायव्हिंग करणे आनंददायी अनुभव असतो.
तेच रात्री ८ नंतर क्षणाक्षणाला गडदभीषण होत जाणार्या अंधाराची खिन्न किनार असते. ही वेळ सर्व सृष्टीच्या विसाव्याची. मग यावेळी निसर्गनियमाविरूध्द जाऊन आपली गाडी दामटावी असे वाटत नाही.
सांगोल्यावरून जवळपास ४८० किमी कापून संध्याकाळी मालेगाव (जहांगीर) ला आलो तेव्हा संध्याकाळचे ६ वाजत आले होते.
मग रात्री नागपूरला जाण्यापेक्षा जवळच वाशिमला मुक्काम करायचे ठरले. वाशिमला मुक्काम करूयात, उद्या सकाळी इथल्या ग्रामदैवत बालाजीचे दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊयात हा बेत ठरला. वाशिमचे बालाजी मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. गतकालीन विदर्भाचे वैभव त्यात दिसून येते.
वाशिममध्ये मुक्कामाच्या ठिकाणांचा शोध घेतला असता आमच्या कल्पनेपेक्षाही उत्कृष्ट अशा, हाॅटेल मणिप्रभाचा शोध लागला. (आज ते हाॅटेल तिथे आहे की नाही हे माहिती नाही पण ambience, maintenance, service आणि food quality मधे इतका चांगला दर्जा भल्याभल्या हाॅटेल्समधे मी बघितलेला नाही. त्याचा अगदी प्रामाणिक review सुध्दा मी tripadvisor वर टाकला.)
त्या हाॅटेलच्या स्वागत कक्षासमोरच काढलेल्या या सुंदर गालिचावजा रांगोळीचा हा फोटो.



दरवर्षी २३ ऑक्टोबरला फेसबुकवरून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या आठवणी ताज्या होतात. दरवर्षी फक्त फोटो टाकतो. यावर्षी फोटोमागची संपूर्ण आठवण.
- एक कलासक्त, रसिक ड्रायव्हर बंधू, रामभाऊ मोटरवाले (फक्त दिवसा गाडी हाकणारा गडी)

No comments:

Post a Comment