Tuesday, October 27, 2020

दीन दुःखी का कष्ट घटाऍ, भारत स्वर्ग बनेगा.

 अभियांत्रिकी क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून अध्यापन करीत असताना दोन वर्षांपूर्वी अचानक एक विलक्षण बातमी वाचनात आली. डेन्मार्क आणि हॉलंड ही युरोपीय राष्ट्रे त्यांच्या दूध दुभत्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत दूध दुभत्याच्या अर्थकारणाचा भाग २० %  आहे. तिथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये याच व्यवसायाला लागणा-या यंत्रांच्या निर्मितेचे, आधुनिकीकरणाचे आणि तत्सम संशोधनाचे जास्तीत जास्त कार्य चालते. दूध दुभत्याच्या या व्यवस्थेला केंद्रीभूत मानूनच त्यांनी आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आणि मनुष्यबळाची आखणी केलेली आहे. म्हणजे तिथला एखादा इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअर दुग्धव्यवसायाला लागणा-या इंस्ट्रूमेंटेसचीच आखणी, उभारणी आणि देखभालीचे शिक्षण घेईल. उगाचच शिकागो, तोक्यो, शांघाय मधल्या मोटार व्यवसायात काय नवनवीन इंस्ट्रूमेंटस लागतायत यावर तो आपली बुद्धी आणि वेळ खर्च करणार नाही आणि नासा मध्ये जाऊन अवकाश संशोधनासाठी लागणा-या इंस्ट्रूमेंटसची तो कल्पनाही करणार नाही. जी गोष्ट इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअरची तीच मेकॅनिकल इंजिनीअरची, तीच इलेक्टॉनिक्स इंजिनीअरची. सगळे आपापल्या क्षेत्रात संशोधन करतील पण त्याची उपयुक्तता देशाच्या विकासात योगदान देणा-या मुख्य व्यवसायाला असेल असेच एव्हढेच आणि इतपतच.


भारतात चाललेल्या सध्याच्या संशोधनाविषयी विचार केला तर असे एकत्रित स्वरूपाचे संशोधन शेती या भारताच्या मुख्य व्यवसायाविषयी का झाले नाही ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. अक्षरशः हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी निघणा-या करोडो इंजिनीअर्सपैकी ०.१ % इंजिनीअर्सपण शेतीबाबत असे उपयुक्त संशोधन करीत असतील की नाही ? हा प्रश्नच आहे. बरे, संशोधनांची गरज नाही असे नाही आणि संशोधक मनोवृत्तीचे विद्यार्थी, शिक्षकही कमी आहेत असे नाही पण नेमके संशोधन कुठे आणि कसे व्हायला हवे यावर संवादच होत नाही. शेतीविषयक संशोधन हा कृषी विद्यापीठांचा भाग असल्याचे मानून इतर सर्व विद्यापीठांनी त्यातून अंग काढून घेतलेय आणि कृषी विद्यापीठांना आपल्या संशोधन विषयक गरजांसाठी इतर विद्यापीठांशी संपर्क साधता येत नाही. ही अशी कोंडी झालेली आहे. परिणामी दरवर्षी शेकडो पी. एच. डी. चे प्रबंध, हजारो एम. टेक. चे प्रबंध सादर होतात आणि सादरकर्त्याला पदवीच्या कागदांचे सुख प्रदान करून वाचनालयाच्या कोप-यात गुप्त होतात आणि तिथेच वर्षानुवर्षे धूळ खात राहतात.

साधे उदाहरण आहे. आज भारतभर वाहतूक व्यवसाय अत्यंत वाढलेला आहे. दोन ऍक्सल ट्रक्स जाऊन आजकाल सगळे १०, १४, १८ चाकांचे मल्टी ऍक्सल ट्रक्स दिसायला लागले आहेत. मोठमोठ्या राष्ट्रीय महामार्गांवर असे ट्रक्स दुरूस्ती, देखभालीसाठी थांबायला थोड्या थोड्या अंतरावर महामार्गाच्या बाजूलाच "Truck Lay Bye" उभारल्या गेलेले आहेत. अतिशय स्तुत्य रचना. सोबतच गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्या प्रमुख शहरांमध्ये गल्लोगली पंक्चर दुरूस्ती, मोटारगाड्यांच्या चाकांची देखभाल यासाठी पूर्वीची श्रमाधारित दुकाने जाऊन स्वयंचलित यंत्रांवर चालणारी आणि पूर्वी काही तास लागणारे दुरूस्तीचे काम काही मिनीटांमध्ये करणारी दुकाने आलेली आहेत.




महामार्गाच्या बाजूला ट्रक थांबवून जुन्या श्रमाधारित पद्धतीने ट्रकची चा्के बदली करताना त्या ट्रकचे क्लीनर्स, ड्रायव्हर्स पाहिलेत की त्या बिचा-यांपर्यंत हे नवे औद्योगिकीकरण कधी पोहोचणार ? या विचाराने मन खिन्न होते. ट्रकची थांबलेली चाके म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे मंदावलेले चाक हा सरळ हिशेब डोळ्यासमोर येतो. बरे त्या ट्रकसाठी ट्रकच्याच बॅटरीवर चालणारे, हवेच्या दाबाखाली (pneumatic) चाक बदलणारे, पंक्चर दुरूस्त करणारे असे छोटेखानी यंत्र बनविणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे. अशी गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न करणारे मेंदू हवेत. बरे, असे संशोधन परदेशात झाले असल्यास त्याचा नेमका विध घेऊन आपल्या हवामानाला, इथल्या वापरणा-यांच्या संस्कृतीला उपयुक्त असे बदल त्यामध्ये करणे एव्हढाच भाग नवीन संशोधनाचा राहील. तो तरी आपण पुढाकार घेऊन केला तर या अनेक उपेक्षितांचे अज्ञात आशिर्वाद आपण घेऊच पण देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यातही आपण सक्रिय राहू हा विचार आजच्या अभियंत्यांनी करण्याची गरज आहे. (या संकल्पनेवर पेटंट घेण्याचा माझा स्वतःचाच विचार होता पण आज ही संकल्पना आपल्या सगळ्यांसमोर मांडल्याने हा विषय आपणा सर्वांच्या मालकीचा झालेला आहे.)

आज भारतभर शेतकरी बंधूंसाठी आपण आपली बाजारपेठ खुली केलेली आहे. मग काटोलच्या एखाद्या संत्रा उत्पादक शेतक-याला, इंदूरच्या छोट्या व्यापा-याशी संपर्क साधून, आपली संत्री झाडावरून उतरवल्यावर लगेच दुस-या दिवशी इंदूरला बाजारपेठेत का पाठवता येऊ नये ? भारतीय रेल्वेवरून धावणा-या प्रत्येक एक्सप्रेस गाडीत पुढे आणि मागे गार्डाच्या डब्यासोबत एक चार टनी मालवाहू डबा असतो. मग चेन्नईवरून येणा-या आणि उज्जैनला जाणा-या गाडीत काटोल स्टेशनात "आज त्या मालवाहू डब्ब्यात किती जागा उपलब्ध आहे ?"  ही माहिती प्रवासी आरक्षणाच्या उपलब्धतेसारखी त्या शेतक-याला का उपलब्ध होऊ नये ? काटोल ते उज्जैन हा ८ तासांचा प्रवास करून ती ताजी संत्री त्या व्यापा-यापर्यंत १० तासात आणि उपभोक्त्यापर्यंत १५ तासांमध्ये का पोहोचू नयेत ? MBA च्या अभ्यासक्रमात शिकलेले Supply Chain Management या ठिकाणी अंमलात आणावे असे कुणालाच का वाटू नये ? की Supply Chain Management हे फ़क्त फ़्युचर गृप आणि ऍमेझोनमध्ये काम करणा-यांनीच वापरले पाहिजे असा दंडक सरकारने घालून दिलेला आहे ?



 
शेतक-यांची पोरेही MBA वगैरे करून फ़ुटकळ नोक-यांच्या मागे आपली शक्ती वाया घालवतात हे पाहून खरोखर चिंता वाटते. अरे कल्पवृक्ष तुमच्या दारी आहे रे. त्याच्याकडे काय मागायचे ? त्याची मशागत कशी करायची ? याचा विवेक बाळगा. मग तो कशी फ़ळे देतो ते बघा. समर्थांनी "घरी कामधेनू पुढे ताक मागे" असे जे वर्णन केलेले आहे ते आपलेच आहे हे ओळखा.

जबलपूरचे प्रसिद्ध कवी कै. श्री. लक्ष्मण ज हर्षे यांच्या "राम उसीने पाया" या गीतमालेच्या शेवटल्या ओळी आहेत

दीन दुःखी का कष्ट घटाऍ, सबको राम मिलेगा
उंच नीच मतभेद हटाऍ, भारत स्वर्ग बनेगा.

यात आपल्या आसपास वावरणा-या दीन दुःखितांचे कष्ट कमी करण्यासाठी माझे शिक्षण, माझे संशोधन आणि पर्यायाने माझे जीवन मी पणाला लावेन हा संकल्प भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राने घ्यायला काय हरकत आहे ? भारतवर्षासाठी हे चिंतन आणि त्याप्रमाणे आजपासूनच करायला लागूयात.

- आदर्शवादी चिंतन करणारा, भाबडा वाटणारा पण आदर्शवादी चिंतनातूनच आदर्श जीवन निर्माण होण्याची वाट सापडेल यावर दृढ विश्वास असणारा भारतकुमार राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment