मला वाटतं "गटारी अमावास्या" म्हणणे आणि तशा प्रकारे साजरी करणे हे मुंबई ठाण्याच्या संस्कृतीचे विदर्भावरील सांस्कृतिक आक्रमणाचे लक्षण आहे.
आपल्या वैदर्भिय संस्कृतीत ही "जिवती अमावास्या" आहे. घराच्या दारांवर, देवघरावर जिवत्या चिकटवायला घरोघर सोनार मंडळी जायचीत. त्याकाळी फॅमिली डाॅक्टरांसारखी 'फॅमिली सोनार' मंडळीही असायचीत. आजकालचे "साठे" "पेठे" "गाडगीळ" या पेढ्या अशा जिवत्या चिकटवत नाहीत हे बरेच आहे. नाहीतर प्रत्येक जिवतीचे बजेट लाखभर रूपयांमध्ये गेले असते.
आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घेणारी जिवती (किंवा जीवदानी) देवी, तिची पूजा आजच्या दिवशी विदर्भात होते. खूप घरी वडा पुरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक होतो. (पुरण वाटताना पाट्या वरवंट्याला चिकटून उरलेल्या, लागलेल्या डाळी वाया जाऊ नये म्हणून आमटीचा कट रचून "कटाची आमटी" करणे हे वैदर्भिय ऐसपैसपणात बसत नाही बरं का.)
जिवतीच्या दिवशी फार काही धार्मिक अवडंबर न करता मनोभावाने जिवतीची पूजा करून कढी वडा पुरण दाळभाजी असा साग्रसंगीत स्वयंपाक करणे आणि मस्त दुपारची झोप काढणे ही आपली वैदर्भिय संस्कृती.
पण गेल्या २० वर्षात ३१ डिसेंबरसारखी रात्रीपर्यंत अभक्ष्यखान, अपेयपान करून श्रावण महिन्याचा "कोटा" एकाच दिवशी संपूर्ण करण्याची ही विकृती आपण मुंबई ठाण्यातून आयात केली आहे.
आपण विदर्भवादी, विदर्भप्रेमी असू तर "गटारी" नव्हे तर "जिवती" साजरी करूयात. आपल्या लेक्राबाक्रांच्या मंगल आयुष्याची कामना करत हा मंगल दिवस साजरा करूयात.
- संपूर्ण महाराष्ट्रात रहिवास असलेला पण अस्सल वैदर्भी वृत्तीचा प्रा. राम किन्हीकर.
No comments:
Post a Comment