Tuesday, January 11, 2011

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र. २

रविवार दि. ५/९/१९९९. वेळ दुपारी ३.०० वाजता. नागपूर रेल्वे स्टेशन.

आमची २१०६ अप नागपूर-मुंबई विदर्भ एक्सप्रेस हलली. गेले तीन दिवस मी नागपूर ला होतो. आता मुंबई ला परत चाललोय. श्रीकांत,लहान भाऊ, नेहेमीप्रमाणे स्टेशन वर सोडायला आलाय. गाडी हलली, निरोपांची देवाण घेवाण झाली.पत्र पाठव,फोन कर इ.इ.त्याच्या निरोप देण्याच्या पध्दतीवरुन मला नेहेमी माझ्या वडिलांची, दादांची आठ्वण येते. १९८९ मध्ये मी पहिल्यांदा कराड ला जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा पासून माझ्या प्रत्येक प्रवासात निरोप द्यायला ते स्टेशनावर यायचेच. अगदी तसाच निरोप श्रीकांत देतो. फ़लाटावर अगदी गाडी दिसेनासी होईपर्यंत त्याचे हात हलत राहतात.

तसही नागपूर चा निरोप घेणे हे एक जडच काम आहे. पण "अन्नासाठी दाहीदिशा" भटकंती अटळ आहे. आता उद्या सकाळी १०.३० ला कॊलेज. आनंद एव्हढाच आहे की पुढ्ल्याच आठवड्यात पुन्हा सुट्टी आहे आणि नागपूरला परत यायचेय.
नेहेमीप्रमाणे गाडीत बसण्यापूर्वी सर्वे झालाय.
२१०६ अप नागपूर-मुंबई विदर्भ एक्सप्रेस.
लोको नं: 20600 WAM 4, 6P combination. मध्य रेल्वे. अजनी शेड
Manufactured by: Chittaranjan Locomotive Works.

कोच नं: 9693 AB मध्य रेल्वे. त्रिस्तरीय शयनयान, एस-८,
Manufactured by: Integral Coach Factory, Madras
Shell No.: BGSCN 2827
Date: 23/02/1987
To sleep 1 to 72,
माझा बर्थ नं ४७,









२१०६ अप ची नागपूर पोझिशन : एस.एल.आर(गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन), जनरल, जनरल, टी-एस-१ (तत्काळ कोटा कोच), ए-१ (वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), ए.एस.-१(वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान), ए.एच.-१ (वातानुकूल प्रथम वर्ग+वातानुकूल द्विस्तरीय शयनयान),एस-१,एस-२,एस-३,एस-४,एस-५,एस-६,एस-७,एस-८,जनरल, एस.एल.आर(गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन), विशेष आरक्षित डबा (रेल्वे अधिकार्यांसाठी).(एकूण १८ डबे).


गाडी बरोबर १५.०० वाजता हललीय. माझा साईड लोअर बर्थ असल्याने मी प्रवासाचा पूर्ण आनंद घेतोय. वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर करत भुसावळ पर्यंत व्यवस्थित गाडी गेलीय. भुसावळ रात्री २१.०० वाजता. ३९१ किमी अंतर ६ तासात.सरासरी वेग ६५ किमी प्रतितास. जवळपास गीतांजली एक्स्प्रेसचाच वेग.

भुसावळ ला गाडी नेहेमीच्या १ किंवा ३ नं फ़लाटावर न घेता वळवून ४ नं वर घेतली जातेय तेव्हा माझ्या मनात पाल चुकचुकतेय.काहीतरी चुकतय हे निश्चित. कुठेतरी गडबड आहे हे नक्की.

भुसावळ ला पुन्हा गोंधळाचे वातावरण. मुंबई कडे जाण्यासाठी तीन चार गाड्या आधीच फ़लाटांवर उभ्या आहेत. मी खाली उतरून चौकशी करतोय तोच भयानक बातमी समजतेय.

कसारा घाटात आज दुपारी रस्त्यावर एक गॆस वाहून नेणारा टॆंकर उलटलाय. त्या घाटात किमी १२६ जवळ रस्ता व रेल्वे लाईन अगदी जवळ्जवळ आहेत. गॆस गळती मुळे रस्ता वाहतूक तर बन्द आहेच पण रेल्वे वाहतूक पण बन्द ठेवावी लागलीय. आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर रेल्वेत्ल्या कुणाकडेही नाही. कदाचित सर्व जण त्या प्रश्नाच्या उकलीतच गुंतलेत.
८००२ अप हावडा-मुंबई मेल (नागपूर वरून दुपारी १६.०० वाजता निघालेली) पावणे दहा वाजता बाजुच्याच ५ नं फ़लाटावर येतेय. त्या प्रवाशांचाही थोडा गोंधळ. सामानाकडे सहप्रवाशांना लक्ष ठेवायला सांगून मी मात्र भुसावळ स्टेशनावर भटकतोय.
रात्री साडे अकरा वाजताहेत आणि अचानक बातमी येतेय की आत्ता काही गाड्या जळगाव-सुरत-वसई मार्गे तर काही गाड्या मनमाड-दौंड-पुणे मार्गे मुंबईकडे सोडण्याचा निर्णय झालाय. विदर्भ एक्सप्रेस सोडून बाकी सगळ्या गाड्यांचे बदललेले मार्ग सांगितले जातायेत. माझ्या मनात खूप इच्छा की आता गाडी लेट जाणारच आहे तर जळगाव-सुरत-वसई मार्गे तरी जावी. निदान हा नवीन भाग तरी बघून घेउ. (उद्या कॊलेज ला जॊइन करायच आहे पण आता इलाज नाही. मधून कुठून तरी किर्लोस्कर सरांना(आमचे विभाग प्रमुख) फोन करू.) (१९९९ ला मोबाईल सर्रास नव्हते. एस.टी.डी./ पी.सी.ओ. बूथ शोधणे आणि फोन करणे क्रमप्राप्त होते.)

आणि उदघोषणा जाली की इतर गाड्या जरी दुसर्या मार्गांनी वळवलेल्या असल्या तरी विदर्भ एक्सप्रेस मूळ मार्गानेच जाईल. मग काय विचारता? इतर गाड्यांमधले लोंढेच्या लोंढे विदर्भ एक्सप्रेस कडे धावलेत. मी पण जागेच्या काळजीने धावलोय. डब्यासमोर ही गर्दी! कसाबसा माझ्या सीट पर्यंत पोहोचतोय तो तिथे आधीच ४ आगांतुक येवून बसलेले. दोघांना उठवून मी बसतोय.(झोपायला जागाच नाही. बसू दिल हेच खूप झाल.) इतर गाड्या भराभर हलल्यात. आमची गाडी हलायच नाव नाही. आता सगळेच कंटाळलेत. चर्चा रंगात आल्यात. रात्री साडेबाराच्या सुमाराला गाडी हललीय. इथून अगदी नऊ तास जरी घेतलेत तरी गाडी सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईत जाइल. कॊलेजला लेट मार्क होइल इतकच.

डब्यातले सगळेच आता पेंगताहेत. डब्यात सर्वत्र वेडेवाकडे होउन लोक पसरलेत. मलाही बसल्या बसल्याच डुलकी लागलीय.

सोमवार दि. ६/९/१९९९.

गाडी थांबल्यासारखी वाटतेय. बाहेर बघतोय तो मनमाड आलेल. साडेचार वाजलेत. पुन्हा खाली उतरतोय आणि एन्जिनापर्यंत पायपिट. घटनांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न. कळतय की अजूनही तो टॆंकर आणि त्यातली वायुगळती आटोक्यात आलेली नाहीय. आणि विदर्भ एक्सप्रेस सुद्धा आता दौंड-पुणे मार्गेच जाईल.

तडक मी स्टेशनच्या बाहेर. एस.टी.डी./ पी.सी.ओ. बूथ शोधतोय. सगळ्या बूथ्स वर तौबा गर्दी. वाट बघता बघता गाडी सुटणार तर नाही ना हे टेन्शन. थोडा कुठे एन्जिनाचा आवाज आला तर ही आपलीच तर गाडी नाही ना असे दचकणे.
अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा नंबर लागतोय. पहाटे सव्वा पाच वाजता किर्लोस्कर सरांना फोन करायचा की नको हा विचार होतोय. पण नंतर इतका वेळ मिळेल न मिळेल, तसेही किर्लोस्कर लाख माणूस आहेत. त्यांना आपली निकड कळेलच हा विश्वास. फोन लावतोय आणि किर्लोस्कर सरांना झोपेतून उठवतच मी आज येणार नसल्याचा निरोप सांगतोय. थोडक्यात सगळी सिच्युएशन समजावून सांगतोय. ते म्हणताहेत की डोंट वरी. चला. एक दड्पण तर दूर झाल. आता रेल फ़ॆनिंग ला मोकळे.

धावतच फलाटावर जातोय. विदर्भ एक्सप्रेस अजूनही आहे. मनमाड-दौंड-पुणे मार्गे वळवलेल्या इतरही गाड्या उभ्या आहेत आणि आता वाट आहे ती डिझेल एन्जिनांची. मनमाड पर्यंत ज्या एन्जिनाने आणले ते आता उपयोगाचे नाही. आता येथून पुढे पुण्यापर्यंत डिझेल एन्जिन. काल मुंबईवरून निघणार्या काही गाड्याही पुणे-दौंड-मनमाड मार्गे भुसावळ कडे जाणार असल्याने या मार्गावरचा ताण वाढलाय आणि साहजिकच डिझेल एन्जिनांचा तुटवडा निर्माण झालाय.

सकाळी सहा वाजता कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस वळून येतेय. ही गाडी मात्र वेळेवर धावतेय. इतर गाड्यांना कधी नव्हे हो ह्या गाडीचा हेवा वाटत असणार. आता हिच डिझेल एन्जिन कुणाला मिळणार? कारण वाट पाहणार्या ३,४ गाड्या आहेत. आमच्या विदर्भ एक्सप्रेस च्या आधी आलेल्या सुध्दा काही गाड्या आहेत.

पण आमच नशिब बलवत्तर आहे. ते एन्जिन सरळ विदर्भ एक्सप्रेस च्या दिशेने फ़िरून येतेय. आम्ही शंटिंग पाहून पुन्हा आमच्या डब्याकडे धाव घेतोय.



मनमाड ते पुणे:
लोको नं: 17589 WDM 2A , द.म.रेल्वे, काजीपेठ शेड Long Hood Front
Manufactured by: Diesel Locomotive Works, Varanasi


गाडी साडेसहाच्या सुमाराला हललीय. आता एकेरी मार्ग. त्यातही काल या मार्गावर वळवलेल्या गाड्या. प्रत्येक स्टेशनवर थांबाव लागत होत.पुढून येणारी गाडी आली की मग निघायच. आता सर्वांनाच भुकेची जाणिव झालेली. दरवेळी आई डबा देताना थोडा जास्तिचाच डबा देते आणि त्यावरून मग मी चिडतो."अगं, एव्हढा डबा काय करायचाय? उद्या सकाळ पर्यंत मी पोहोचणार आहेच. मग डबा वाया जातो आणि टाकून देतांना जिवावर येतं" हे माझ नेहेमीच आर्ग्युमेंट. पण भरपूर डबा देण्याचा तिचा आग्रह. यात गेल्या दोन तीन वेळांपासून माझा विजय होत होता. तिला माझ म्हणण पटल होत म्हणा किंवा वाद टाळायचा म्हणा. पण आता माझ्याजवळ खायला काहिही नव्हत. पिण्याचे पाणीही संपत आलेले.

वाटेत क्रॊसिंग साठी गाडी थांबत होती खरी पण येवला, कोपरगाव, पुणतांबा सारखी चिमुकली स्टेशन्स इतक्या प्रवाशांची गरज कशी भागवणार? तिथल्या एख्यादाच स्टॊल वर खाण्यापिण्याचे पदार्थ मिळवण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की ते पदार्थ लगेच संपायचे. पाणीही मिळेना. स्टेशनवरचं पाणी मिळवण्यासाठी त्या नळाभोवती खूप गर्दी व्हायची. कधी नव्हे तो त्या बिचार्यांना एव्हढा भाव मिळत होता.

भुकेने, तहानेने व्याकूळ मी दौंड ची वाट पहात होतो. दौंड स्टेशनात गाडी दुपारी दोन च्या सुमारास शिरली आणि गाडीचा वेग पुरता कमी होण्याआधीच मी फ़लाटावर उडी टाकली होती. तिथल्या निरामिष भोजनालयात जाऊन थाळीची ऒर्डेर देइपर्यंत गाडी थांबली. तौबा गर्दी पुन्हा त्या भोजनालयाकडे धावली. इतर माणसे येण्याआधी आमचे भोजन सुरुही झाले होते.
इथे एन्जिन उलट बाजूला लागले आणि गाडीचे डबे उलट क्रमाने लागलेत. ए.सी. डबे जे मुंबईच्या बाजूला असतात ते आता विरूध्द बाजुला झालेत. जवळपास तासाभराने गाडी हलली. बहुतेक सर्व प्रवाशांची पोट्पूजा आटोपली होती.















पुण्याला पोहोचायला संध्याकाळचे १६.४५ वाजताहेत. इथे पुन्हा एन्जिन बदलणार.
पुणे ते मुंबई:
लोको नं: 20147 WCG 2 मध्य रेल्वे. कल्याण शेड
डी.सी. प्रवाहाचे विद्युत एन्जिन.




पुण्याहून साडेपाच च्या सुमाराला गाडी हलली आणि खंडाळा घाटातून रात्री २१.३० ला कल्याण ला पोहोचली. इथे उतरून पुढे लोकल ने ठाण्यापर्यंत जायचय.(१९९९ मध्ये २१०६ अप विदर्भ एक्सप्रेस ला ठाणे हा थांबा नव्हता).

एकुण प्रवास: ७८३+२४०(अतिरिक्त) = १०२३ किमी

सरासरी वेग: ३३.५४ किमी प्रतितास.


आईच्या आग्रहाच महत्व पटवणारा प्रवास. आता यानंतर कधीच जादा डब्याला नाही म्हणायच नाही हा निश्चय.

Photo courtesy: www.irfca.org (Loco database)

2 comments:

  1. किती डिटेल्स लिहिता तुम्ही रामभाऊ! इतके छान प्रवासवर्णन त्यातील बारकाव्यांसह..!मी 94 ते 2000 दरम्यान नागपुरला रामकृष्ण मठात नंदुरबार येथून नेहमी रेल्वेनेच प्रवास केला. आणि आता भुसावळ ते कल्याण वर्षातुन दोन तिनदा तरी रेल्वे ने प्रवास होतोच!पण आता असे वाटते की मी तो प्रवास अनुभवलाच नाही!माझा प्रवास यांत्रिकच झाला, होतोय..!!तुम्ही एक नवी दृष्टी दिली..!खूप खूप धन्यवाद! सादर प्रणाम!!

    ReplyDelete
  2. Khup chan varnan Ram bhau

    ReplyDelete